स्वतंत्र भारताच्या सर्वांगीण अभ्युदयासाठी समग्र भारतीयांनी प्रवृत्तिधर्माची प्रखर उपासना केली पाहिजे हे एक निर्विवाद प्रमेय आहे. संतांच्या निवृत्तिवादाच्या जळजळीत निषेधाच्या पार्श्वभूमीवर डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांनी या प्रवृत्तिधर्माच्या उपासनेचा आवेशपूर्ण पुरस्कार केला आहे. प्रवृत्तिधर्माच्या प्रचाराचे राष्ट्रीय कार्य एक व्रत म्हणून निष्ठापूर्वक अंगीकारणारे जे मोजके व्यासंगशील लेखक मराठीत आहेत, त्यांत डॉ. सहस्रबुद्धे यांचे स्थान फार मानाचे व महत्त्वाचे आहे. आगरकरांच्या विज्ञाननिष्ठ बुद्धिवादी विचारसरणीचा पुढला टप्पा, असा त्यांच्या विचारांचा गौरव करणे आवश्यक आहे. विज्ञान व लोकसत्ता यांवरील श्रद्धेचा आधार कायम ठेवून भारताचे ऐहिक जीवन सुखसमृद्ध कसे करता येईल, याचे विवेचन करण्याच्या कामी त्यांनी आपली युयुत्सू लेखनशक्ती आणि वाणी राबविली आहे. मराठीचे कुशल प्राध्यापक, विचारप्रेरक ग्रंथकार आणि प्रभावी वक्ते असा डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांचा त्रिविध लौकिक आहे.