लोकहितवादी तथा श्री. गोपाळ हरी देशमुख हे १९ व्या शतकातील एक थोर समाजसुधारक, तत्त्वज्ञ व लेखक. त्यांचे विचार आजही अतिशय क्रांतिकारक व अत्याधुनिक वाटतील असे आहेत. समाजसुधारणेचा त्यांनी महाराष्ट्रात पाया घातला असे म्हणण्यास हरकत नाही. परंतु ते कार्यकर्ते समाजसुधारक नव्हते आणि प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी आपल्या तत्त्वांप्रमाणे आचरण करण्याचे धैर्य न दाखविल्यामुळे त्यांच्या लेखनकार्यासही म्हणावी तशी प्रतिष्ठा मिळाली नाही. मराठीतील आद्य निबंधकार म्हणूनही त्यांना मान मिळाला नाही, त्याचे एक कारण म्हणजे त्यांचे लेखन अत्यंत विस्कळित असून त्यात सुसूत्रता नाही. वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी विविध पत्रे लिहिली आहेत, त्यांची विषयवार एकत्र मांडणी करून त्यांचे समालोचन करण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांनी केले आहे. त्यात त्यांचे संपादनकौशल्य तर दिसून येतेच, पण त्यामुळे शतपत्रांचा अभ्यास करणार्यांनाही त्यामुळे खूप मदत होईल अशी आम्हास खात्री वाटते.