सत्याचे वाली (सामाजिक नाटक)

लेखक - पु.ग.सहस्रबुद्धे, एम्. ए.

प्रथमावृत्ती : १९३३.

‘सत्यमेव जयते’ हे खरे आहे काय? निदान सत्याचा जय व्हावा असे तरी लोकांना वाटते काय? तुम्हास तरी काय वाटते? या प्रश्नाचे एकदम उत्तर मागितले तर ‘हो’ म्हणावे असेच अनेकांना वाटते.

पुगस यांनी जन्मभर आपली ‘वाणी आणि लेखणी’ समाजप्रबोधनासाठी झिजवली आणि आपले समाजशास्त्रीय विचार लोकांना पटविण्याचे, म्हणजेच समाजप्रबोधनाचे एक प्रभावी साधन म्हणूनच त्यांनी ललित साहित्याचा उपयोग केला, हे सर्वमान्य आहे. ‘सत्याचे वाली’ या त्यांच्या नाटकात याचीच प्रचीती येते. सत्याचा जय व्हावा असे समाजातील प्रत्येक व्यक्तीला वाटत असते; पण आपल्या स्वार्थाकरिता सत्याचा बळी देण्यास मात्र प्रत्येकजण तयार असतो. तेव्हा निष्कर्ष हाच की समाजात सत्याचा वाली कोणीच नसतो. तथापि हे ध्यानात यावयास त्रयस्थाच्या भूमिकेवरून या व्यक्तींकडे पाहावयास हवे. या नाटकातील सर्व व्यक्तींकडे – न्यायाधीश, वकील, डॉक्टर, कंत्राटदार, मास्तर, शास्त्री, संपादक, दरोडेखोर या सर्वांकडे - पुगस यांनी तटस्थपणे पाहण्याचा प्रयत्न केला आहे आणि तसे पाहिल्यास काय गंमत दिसेल ती या नाटकात दाखविली आहे.