वधू - संशोधन (सामाजिक नाटक)

लेखक – पु. ग. सहस्रबुद्धे, एम.ए.

प्रथमावृत्ती : १९३७.

डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांचा ‘मालाकारांच्या (मराठीतील आद्य निबंधकार विष्णुशास्त्री चिपळूणकर) परंपरेतील थोर निबंधकार’ असा प्रसिद्ध साहित्यसमीक्षक कै. बालशंकर देशपांडे (‘वसंत’ मासिकाचे संपादक) यांनी गौरव केला आहे; तर प्रा. डॉ. प्र. ल. गावडे यांनी ‘ज्ञानकोशकारांच्या (थोर समाजशास्त्रज्ञ व आद्य ज्ञानकोशकार डॉ. श्री. व्यं. केतकर) परंपरेतील थोर ललित-लेखक’ असे त्यांचे गुणवर्णन केले आहे. पुगस यांनी जन्मभर आपली ‘वाणी आणि लेखणी’ समाजप्रबोधनासाठी झिजवली आणि प्राधान्याने तात्त्विक स्वरूपाचे व समाजशास्त्रीय लेखन विपुल प्रमाणात केले. तरीही त्यांनी ललित साहित्याचे सुप्त सामर्थ्य हेरले होते, यात शंकाच नाही. “एखादा विचार बुद्धीला पटला तरी तो अंत:करणाला पटतोच असे नाही. इतकेच नव्हे तर कित्येकदा तो प्रश्न अंत:करणाला पटला तरच बुद्धीला पटतो. मानव हा विचारांपेक्षा विकारांना जास्त वश असतो. त्यामुळे कोणताही तात्त्विक प्रश्न त्याला पटवून द्यावयाचा असेल तर बुद्धीला आवाहन करून भागत नाही, त्याच्या अंत:करणाला आळवावे लागते. स्त्रीशिक्षणावरील आगरकरांच्या निबंधांना हरिभाऊंच्या कादंबर्‍यांची जोड मिळाली नसती तर बहुजनसमाज इतक्या वेगाने हलला नसता. अंत:करणाला पटले तरच ते बुद्धीलाही पटते व मग मनुष्य कार्यप्रवृत्त होतो. नुसत्या बुद्धीला आवाहन करून एकतर तिला ते तत्त्व पटत नाही आणि पटले तरी ती मनुष्याला प्रेरणा देण्यास अगदी असमर्थ आहे. तेव्हा कोणतीही गोष्ट समाजाला पटवावयाची असेल तर ती त्याच्या अंत:करणाला नेऊन भिडविली पाहिजे व अंत:करणाला गोष्ट पटवावयाची तर मग कलेला फार महत्त्व आहे हे मान्य केलेच पाहिजे. तेव्हा मनोरंजनाच्या दृष्टीनेच नव्हे, तर तत्त्वप्रचाराच्या दृष्टीनेही रस, कला यांना अत्यंत महत्त्व आहे.” (स्वभावलेखन). या शब्दांत त्यांनी ललितलेखनकलेचा गौरव केला आहे.

असे असूनही त्यांनी ललितलेखन फारच कमी प्रमाणात केले, तेही फक्त अगदी सुरुवातीच्या काळात (१९३०-४०). आपले समाजशास्त्रीय विचार लोकांना पटविण्याचे, म्हणजेच समाजप्रबोधनाचे एक प्रभावी साधन म्हणूनच त्यांनी ललित साहित्याचा उपयोग बह्वंशी केला. याला फार थोड्या प्रमाणात अपवाद म्हणून त्यांच्या काही लघुकथा व ‘वधू-संशोधन’ या नाटकाचा उल्लेख करावा लागेल. ‘संशयकल्लोळ’ या प्रसिद्ध नाटकाच्या धर्तीवर लिहिलेले हे प्रहसनात्मक नाटक म्हणजे “डॉक्टरांच्या बोधवादी हेतूंपासून सर्वस्वी अलिप्त असलेली ही एकमेव कलाकृती मानावी लागेल” असा डॉ. प्र. ल. गावडे यांनी उल्लेख केला आहे. त्यामुळे पुगस यांच्या लेखनाशी परिचित आलेल्या चोखंदळ वाचकांना या नाटकाचे वाचन हा एक उद्बोधक अनुभव वाटेल.