पाचोरा - दि. 11 पाचोरा येथील श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या उत्स्फूर्त काव्यवाचन कार्यक्रमात 17 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या कविता सादर केल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. शिरीष पाटील हे होते. त्यांची कवयित्री बहिणाबाईंनी आपल्या कवितेत जीवनाचं खरं वास्तव, तत्त्वज्ञान साध्या सोप्या भाषेत मांडले आहे असे प्रतिपादन केले. बहिणाबाईंचा ज्योतिषांवर भरोसा नसून मेहनतीला सत्य मानणाऱ्या कवयित्री बहिणाबाई चौधरी होत्या असेही त्यांनी सांगितले. बहिणाबाईंप्रमाणेच विद्यार्थ्यांनीही आपल्या जीवनात मोठे योगदान द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडताना मराठी विभागप्रमुख व उपप्राचार्य प्रा. डॉ. वासुदेव वले यांनी बहिणाबाईंच्या काही निवडक कविता विद्यार्थ्यांसमोर सादर केल्या. त्यांनी बहिणाबाई आपल्या कवितेतून समाज, मन, शेती निसर्ग, संसार, श्वास, माहेर, सासर या सर्व विषयांमधून समाजाचे वास्तव मांडतात असे सांगितले. ते पुढे म्हणाले की, कवयित्री बहिणाबाईंनी आपल्या कवितेतून तत्वनिष्ठ दृष्टिकोन मांडून ग्रामजीवनाचं वास्तव चित्रण केलं आहे असे स्पष्ट केले. हिंदी विभागप्रमुख व उपप्राचार्य प्रा. डॉ. जे. व्ही. पाटील यांनी विद्यार्थ्यांसमोर कवयित्री बहिणाबाईंची 'खोप्यामधी खोपा' ही काव्यरचना सादर केली. ते म्हणाले, माणसाला दोन हात व दहा बोटे असल्यावरही इतका सुंदर खोपा माणूस तयार करू शकत नाही. ही किमया त्या पशुपक्ष्यांमध्ये आहे. याचं सूक्ष्म निरीक्षण बहिणाबाई आपल्या कवितेतून करतात असे स्पष्ट केले. यावेळी विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त कवयित्री 'बहिणाबाई चौधरी यांचे संघर्षमय जीवन' व 'कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कविता' या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात कु. तनया लक्ष्मण जाधव (तृतीय वर्ष - साहित्य) प्रथम, कु. डिंपल दीपक कुमावत (द्वितीय वर्ष - साहित्य) प्रथम, कु. जागृती रवींद्र वाणी (तृतीय वर्ष - वाणिज्य) द्वितीय, कु. दीपिका अरुण पाटील (तृतीय वर्ष - साहित्य) द्वितीय, कु. राजश्री अनिल पाटील (द्वितीय वर्ष - विज्ञान) तृतीय, कु. योगेश्वरी राजेंद्र पाटील (तृतीय वर्ष - साहित्य) तृतीय यांना मान्यवरांच्या हस्ते विभागून पारितोषिके देण्यात आली. पारितोषिक वितरणाची घोषणा डॉ. एस. बी. तडवी यांनी केली. याप्रसंगी प्रा. एस. टी. सूर्यवंशी, डॉ. के. एस. इंगळे, प्रा. वाय. बी. पुरी, प्रा. आर. बी. वळवी, डॉ. क्रांती सोनवणे, डॉ. माणिक पाटील, प्रा. अतुल पाटील, डॉ. शारदा शिरोळे, प्रा. नितीन पाटील, प्रा. विशाल पाटील, प्रा. स्वप्नील पाटील, प्रा. सुवर्णा पाटील, डॉ. प्राजक्ता शितोळे, प्रा. गौतम निकम, प्रा. स्वप्नील भोसले, प्रा. रोहित पवार, प्रा. सरोज अग्रवाल, प्रा. संजीदा शेख हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन प्रा. स्वप्नील भोसले यांनी केले. तर श्री. सुरेंद्र तांबे, श्री. जावेद देशमुख, श्री. जयेश कुमावत व विद्यार्थी विद्यार्थिनींनी कार्यक्रम यशस्वीसाठी परिश्रम घेतले.