राजगड

राजगड

राजांचा गड, गडांचा राजा

किल्ल्याचा प्रकारः गिरीदुर्ग जिल्हा: पुणे जवळचे ठिकाण:वेल्हे,नसरापुर

उंची: ४५१४ फूट

हत्ती प्रस्तर

पाली दरवाजा

इतिहासः- राजगडाचे पूर्वीचे नाव मुरुंबदेव. हा ब्रह्मदेवाचा अपभ्रंश. बालेकिल्ल्यावरील ब्रह्मेश्वराचे मंदीर ही या किल्ल्यातीळ मूळ वास्तू. एके ठिकाणी या डोंगराचा उल्लेख शहामृग पर्वत असाही आढळतो. हा किल्ला मुस्लिमपूर्व काळापासून अस्तिवात होता, याची पुष्टी गुंजवणे दरवाजाची बांधणी करते. बहामनी राज्याची पाच शकले होऊन निर्माण झालेल्या अहमदनगरच्या अहमदबहिरी निजामशाहाने प्रथम हा ताब्यात घेऊन तेथील मंदीराचा विध्वंस केला (१४९०). यानंतरच्या काळात निरनिराळ्या सुलतानशाहींच्या राजधान्या मैदानी भागात स्थापन झाल्या आणि राजकीय हालचालींचे केंद्र म्हणून किल्ल्यांचे महत्व कमी होऊन नाममात्र सैन्य आणि अधिकारी ठेवण्यापुरताच किल्ल्यांचा वापर होऊ लागला. आदिलशाही आणि निजामशाहीच्या तडजोडीत इ. स. १६२६ मध्ये राजगड आदिलशाहीकडे आला. इ. स. १६४९ मध्ये बापूजी मुदगल नव्हेकर-देशपांडे ह्याने तो शिवाजी राजांस जिंकून दिला. तोरण्यावर सापडलेल्या धनाचा वापर करून मुरुंबदेवाच्या डोंगराच्या माच्या बांधून, बुरुज उभारुन, तटबंदीने नटवून, दरवाज्यांचे अडसर घालून, कडे तासून आणि पाणी, इमारतीची सोय करुन राजांनी कायापालट केला आणि नामकरण केले 'राजगड' (१६५४).

अत्यंत बळकट असा हा किल्ला १६७५ पर्यंत (अदमासे २५ वर्षे) स्वराज्याची राजधानी होता. स्वराज्य आकारास येत असताना आलेली सगळी संकटे राजगडाने आपल्या रुंद छातीवर झेलली. राजाराम महारांजाचा जन्म, सईबाईंचा अकाली मृत्यु इत्यादि छ्त्रपतींच्या आयुष्यातील अनेक कौटुंबिक घटना राजगडावरच घडल्या. फत्तेखानावरील स्वारी, अफजलखानाशी गांठ, शाहिस्तेखानांशी झुंज, जयसिंगाशी तह, आग्र्याला प्रयाण, तिथून निसटून पुन्हा स्वराज्यात येणे इत्यादि घटनांचा साक्षी राजगडच आहे.

उत्तरकालीन राजधानी जरी रायगडच असली, तरी राजगडाचे महत्व शिवकालामध्ये केवळ अद्वितीय होते. राजगड हा केवळ राजांचा गड नव्हे तर गडांचाही राजा आहे. राजगडासारखा दुसरा किल्ला नाही.

या किल्ल्यांचा विस्तृत इतिहास श्री सतीश अक्कलकोट यांच्या " दुर्ग " पुस्तकात वाचावा.

कसे जावे:- राजगड पुण्याहून ५०-५५ कि.मी अंतरावर असून पुणे-सातारा महामार्गावर नसरापूर फाट्याला उतरावे. फाट्यापासून नसरापूर १ कि.मी अंतरावर आहे. नसरापूरवरुन राजगड २०-२५ कि.मी वर आहे.

राजगडावर जाण्यासाठी ६-७ पाऊलवाटा आहेत. त्यापॅकी ३ वापरात नसलेल्या, दाट झाडीने व अतिशय अवघड चढ-उतरणीमुळे तसेच रस्ता चुकण्याच्या शक्यतेमुळे दुर्लक्षित आहेत.

    1. नसरापूरवरुन वेल्हे गावाकडे येताना मार्गासनी गावात यावे, तिथून जीपने किंवा चालत अर्ध्या पाऊण तासात गुंजवणे या पायथ्याच्या गावी यावे. या वाटेने गेल्यास २-३ तासात आपण चोरदिंडीतून गडाच्या पद्मावती माचीत येतो. हा मार्ग अवघड आहे पण बहुतेक दुर्गप्रेमी जवळची वाट म्हणून याच मार्गाचा वापर करतात.

    2. गुंजवणे गावातून वाटाड्या सोबत घेऊन जंगलामधून ४-५ तासात गुंजवणे दरवाज्यामधून गड सर करता येतो.

    3. वेल्हे गावाहून पाबे येथे जावे. इथून कानंदी नदी ओलांडून खरीव गावातून खरीव खिंडीतून वाजेघर गावी यावे. इथून उजवीकडील वाटेने पाली दरवाजा लागतो, तर डाव्या हाताने गेल्यास चोरदिंडी. या दोन्ही वाटांनी चढून गेल्यावर आपण पद्मावती माचीत येतो.

    4. नसरापूर गावापासून भाटघर जलाशयातून (येसाजी कंक जलाशय) जाणा-या होडीतून ४-५ तासांचा सुंदर प्रवास करून भुतोंड्यास उतरुन तिथून अळू दरवाजाने संजीवनी माची गाठावी.

    5. तोरण्याच्या बुधला माचीवरुन डोंगराच्या सोंडेवरुन जाऊन संजीवनी माचीवर जाणा-या मार्गे ६-७ तास लागतात.

गडावर काय आहे:- डोंगराच्या उंचावलेल्या भागावर तीन पाकळ्यांच्या फुलासारखा आकार असलेला राजगड सर्व बाजूंनी खोल द-या, नद्या किंवा अवघड टेकड्यांनी वेढलेला आहे. पाकळ्यांच्या मधला भाग ताशीव कड्यांनी उंच करुन त्यावर बालेकिल्ल्याचे बांधकाम केलेले आहे. तीन पाकळ्या म्हणजेच तीन माच्या. यापैकी संजीवनी माची व सुवेळा माची या निमुळत्या होत गेलेल्या डोंगरांच्या सोंडेवर आहेत तर पद्मावती माची विस्तृत पठारासारखी आहे. राजगडाचा घेर १९ कि.मी चा आहे.

पद्मावती माची:- माचीवर येण्यासाठी पाली हे प्रमुख प्रवेशद्वार आहे. या दरवाज्याच्या मार्गावर दोन भव्य प्रवेशद्वार असून पहिले दार हे हत्ती अंबारीसकट येईल इतके ऊंच आहे. देवडी, परकोट आहेत, माचीला चोरदिंडी आहे. दुस-या दरवाज्याच्या कमानीवर राजमुकुटाची आकृती खोदलेली आहे. वयाच्या सोळ्याव्या वर्षीच स्वतःची स्वतंत्र राजमुद्रा प्रचारात आणणा-या महाराजांनी दरवाज्यावर राजमुकुट कोरणे हे महत्वाकांक्षेबरोबरच प्रचंड आत्मविश्वासाचे निदर्शक आहे. माचीवर सुंदर पद्मावती तलाव, पद्मावती मंदीर, रामेश्वर मंदीर, सईबाईंची समाधी असून राजवाडा, अंबरखाना, सदर, घोड्याच्या पागा यांचे अवशेष आहेत. पद्मावती माचीतून बालेकिल्ल्यावर जाणारा मार्ग आहे. नुकतेच माचीवर आता निवासाची सोय, तसेच स्त्रियांसाठी शौचकूपांची सोय करण्यात आली आहे.

सुवेळा माची:- पद्मावती माचीवरुन बालेकिल्ला उजव्या हातास ठेवून आपण सुवेळा माचीवर येतो. पूर्वेला गेली म्हणून 'सुवेळा' माची. या माचीवर येण्यासाठी गुंजवणे दरवाजा प्रमुख प्रवेशद्वार आहे. या ठिकाणी तीन दरवाज्यांची मालिका असून दुस-या दरवाज्यावर श्री किंवा गजलक्ष्मीचे चित्र कोरलेले आहे. या शिल्पावरुन तसेच दरवाज्याच्या बांधणीवरुन हा दरवाजा राष्ट्रकुट अथवा चालुक्य राजवटीतील म्हणजे ७व्या-८व्या शतकातील असावा असा संशोधकांचा अंदाज आहे. सुवेळा माची खुप लांबवर गेलेली आहे. मार्गावर हत्तीच्या आकाराचा प्रस्तर आहे तसेच मध्यभागाचे उंच टेकाड डुबा म्हणून ओळखले जाते. जवळच तानाजी मालुसरे, येसाजी कंक इत्यादींच्या घरांचे अवशेष आहेत. या माचीवरील चिलखती बुरुज, परकोट पाहण्यासारखे आहेत. तसेच हनुमान मंदीर, काळेश्वर बुरुज व देवी व अनेक चोरदिंड्या या माचीला आहेत. बुरुजावरुन उतरुन खाली पुढे जाताना डोंगराच्या निमुळत्या भागात सुमारे १० फूट व्यासाचे आरपार छिद्र पडलेले आहे, याला वाघाचा डोळा किंवा नेढ म्हणतात. माचीच्या उजव्या हातास येसाजी कंक जलाशय पसरलेला आहे.

संजीवनी माची:- पश्चिम दिशेला गेलेल्या डोंगराच्या सोंडेवर बांधलेली या तीन टप्प्यांच्या माचीला सर्वात शेवट्च्या निमुळत्या टोकावर बुरुज बांधलेला आहे. ही माची जवळ-जवळ २.५ कि.मी लांब आहे. अळू दरवाज्याच्या मार्ग याच माचीवर येतो. तटबंदीच्या खालून डोंगराच्या सोंडेवरुन जाणारा अर्धचंद्राकृती मार्ग थेट तोरण्याच्या बुधला माचीवर जातो. माचीवरील सपाट भागावर निवासस्थाने, दारुकोठारे, सदर, पाण्याच्या टाक्या इत्यादींचे अवशेष आहेत.

बालेकिल्ला:- पद्मावती माचीकडून सुवेळा माचीकडे जाणा-या रस्त्याचा एक फाटा बालेकिल्ल्याच्या ताशीव कड्याखाली येतो. मागे खोल दरी आणि समोर उभा कातळ आहे. वर जाण्याचा एकमेव मार्ग कातळात खोदलेल्या खांचामधून जातो. वर चढून आल्यावर दिसतो काळ्या दगडातला कमानदार दरवाजा ज्याच्या देवळीत अफझलखानाचे शीर पुरले होते. दारातून आत जाताच जननीचे मंदीर, ब्रह्मर्षी तलाव, ब्रह्मर्षी मंदीर, राजवाड्याचे व दारूकोठाराचे अवशेष दिसतात. पद्मावती माचीच्या दिशेला असणा-या बुरुजात चोरवाट आहे. बालेकिल्ल्याच्या समोरच्या बाजुला पद्मावतीच्या दिशेला एक गुहा आहे. ही गुहा प्राचीन ॠषींचे तपश्चर्येचे ठिकाण होते असे म्हणले जाते.

राजगडावरुन सिंहगड, तोरणा, लिंगाणा, पुरंदर, रायगड यांचे दर्शन होते.

गडावर जाण्याचा उत्तम काळ म्हणजे हिवाळा, पण श्रावणातील निसर्ग मात्र संमोहित करणारा. हिरव्यागार रानगवताने आणि रानझुडुपांनी गच्च भरुन गेलेला हा गड क्षणात धुक्याच्या चादरीत गडप होतो तर क्षणात उन्हात न्हाऊन निघतो. झपाट्याने येणा-या पावसाच्या सरी धुके धुवून टाकतात आणि धुक्याचा पडदा बाजूला झाल्यावर दिसतो हिरवा मखमलीचा गालीचा. हिरव्या रंगाच्या सर्व छ्टा दाखविणारी झुडुपे, रानगवत आणि रानफुलांनी सजून जाणारा राजगड विसरता येत नाही.

महत्त्वाचे:- जेवणाची सोय आपली आपणच करावी, पद्मावती मंदीराच्या जवळ असलेल्या टाकीत १२ महीने पाणी मिळेल, पद्मावती मंदीरात १५-२० जण राहू शकतात.

पद्मावती तलाव

सुवेळा माची

पद्मावती माचीवरील रामेश्वर मन्दिर आणि सईबाईंची समाधी

अनिकेत, भालचंद्र, शैलेश, संदीप, मनीष व फोटो काढणारा चैतन्य

आपण करण्यासारखे काही:-

    1. गडावर जाताना विविध झांडाच्या बिया वाटेवर आणि गडावर टाकल्या तर पावसाळ्यात त्या रुजतील व काही वर्षात झाडी वाढेल. यासाठी वर्षभर बिया साठवायला हव्यात.

    2. पाण्याचे तळे स्वच्छ ठेवावे.

    3. प्लास्टिक किंवा अन्य कचरा करु नये. कचरा सोबत न्यावा व कचराकुंडीतच टाकावा.

    4. गडावर कुठेही व कशानेही नाव लिहु नये. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारुन सुद्धाही आपले नाव कुठेही लिहले नाही तर आपण लिहीणारे कोण. कुठे लिहीलेले आढळल्यास फोटो काढून आम्हास पाठविणे.

    5. गडावर दारू पिऊन धिंगाणा घालु नये व इतरांनाही परावृत्त करावे.

आभारः हा लेख लिहीताना आम्हाला आदरणीय गो. नी. दाडेंकरांच्या ' किल्ले'(मॅजेस्टिक प्रकाशन, मुबंई), श्री सतीश अक्कलकोट यांच्या ' दुर्ग' (सह्याद्री भ्रमण मंडळ प्रकाशन, सांगली), श्री प्रविण भोसले यांच्या ' राजगड' (नरसिंह पब्लिकेशन्स, सांगली) आणि श्री र. द. साठे यांच्या ' राजगडची सहल' (शिल्पा प्रकाशन, पुणे) पुस्तकांची मोलाची मदत झाली. ही पुस्तके संग्राह्य आहेत व ती जरुर वाचावीत.

This page is maintained by Chaitanya Rajarshi for Sahyadri Explorers