कमळगड

कमळगड

--सह्याद्रीचे पाषाणपुष्प

-----------------------------------------------------

किल्ल्याचा प्रकारः गिरीदुर्ग

जिल्हा: सातारा जवळचे ठिकाण: वाई

उंची: ४५२२ फूट

नवरा-नवरी सुळके

९० फूट खोल कावेची विहिर

---------------------------------

चहुबाजुंनी घनदाट जंगलाने व दोनबाजुंनी पाण्याने वेढलेला असा कमळगड भान हरपायला लावतो. खरोखरच कमळगड हे पाण्यात उमललेले सह्याद्रीचे कमळपुष्प आहे.

----------------------------------------------------------

कसे जावे? : पुणे-वाई हे अंतर ८५ कि.मी आहे. वाईत श्रीमंत गणपतराव रास्त्यांनी १७६२ साली बांधलेले कृष्णेकाठचे प्रसिद्ध गणपती मंदीर बघावे. इथला कृष्णाघाट फारच सुंदर आहे.

नांदगणे मार्गे:- वाईहुन २५ कि.मी अंतरावर नांदगणे गाव आहे. हा कमळगडाचा दक्षिण दिशेचा पायथा आहे. वाई - नांदगणे सकाळी ९.३० ची बस आहे. वाईहुन दुपारी १२ किंवा संध्याकाळी ६ वाजता जोरला जाणारी बस पकडुन नांदगणेला उतरावे. इथुन गड चढायला अडीच तास लागतात.

गोरक्षनाथ मंदीर

वासोळे मार्गे:- वाईवरुन आसरे, जांभळी मार्गे साधारण ३० कि.मी अंतरावर असलेल्या वासोळे गावी यावे. हा कमळगडाचा उत्तर दिशेचा पायथा आहे. इथुन गड चढायला दीड- दोन तास लागतात.

वासोळे- नांदगणे पण कच्चा रस्ता आहे.

गडावर काय आहे? :- नांदगणे गावातील शाळा उजव्या हातास ठेवून चांगल्या वाटेने दीड तासात कोळेश्वर- कमळगडाच्या खिडींत यावे. खिडींच्या आधी डावीकडे लेणे आहे. लेण्यात गोदावरी देवी असून बाजूलाच बारामाही पाण्याची टाकी आहे. खिडींतून समोर खाली उतरणारी वाट वासोळे गावात जाते, डाव्या बाजुची वाट कोळेश्वराच्या पठारावरच्या दाट जंगलात जाते. खिडींतून उजव्या वाटेने जावे, पुढे कौलारु बांधणीचे रम्य गोरक्षनाथांचे मंदीर आहे.

वासोळ्याहुन पण गडावर जाणारी चांगली पायवाट आहे. काही ठिकाणी पायवाट फुटते तेव्हा रस्ता हरवण्याची दाट शक्यता आहे.

गोरक्षनाथ मंदीराचे दोन भाग असून उजव्या बाजूस चार सुंदर मूर्ती आहेत. डावीकडे पुजारी राहतात. मंदीरासमोरची जमीन सारवलेली असून वर पत्र्याची शेड टाकली आहे. समोर उंबराचे झाड आहे. त्याखाली अनेक मूर्ती ठेवल्या आहेत. पुढे थोडे चालल्यावर पाण्याचे छोटे टाके येते. त्याच वाटेने पुढे झाडीतुन चालत गेल्यावर १०-१५ मिनिटात आपण कमळमाचीवर येतो. इथे दोन घरांची धनगरवस्ती आहे; बाकी शेतजमीन आहे. चहुबाजूस घनदाट जंगल आहे. बालेकिल्ल्याची वाट उजवीकडच्या झाडीतुन जाते. १० मिनिटात आपण मोठ्या कातळापाशी येतो, वाट कातळात कोदलेली आहे. थोडे चढल्यावर आपण २००-२५० फुट उंच बालेकिल्ल्यावर येतो. माथा लहान आहे. ८०-९० फुट खोल असणारी कावेची विहीर हे इथले वॅशिष्ठ्य मानले जाते. कातळात खोदलेल्या या विहीरीत उतरायला रुंद पाय-या आहेत, पण जरा जपुन उतरावे. खाली दोन्हीबाजुस गुहेसारख्या खोल्या आहेत. उजेड येण्यासाठी छतामध्ये चार झरोके केले आहेत. संपूर्ण भाग कावेमुळे लालसर व निसरडा झाला आहे.

सभोवती पूर्ण घनदाट जंगल पसरलेले आहे. उत्तरेकडे धोम धरण, केंजळगड व रायरेश्वराचे पठार दिसते. दक्षिणेकडे पाचगणी-महाबळेश्वर दिसतात. दूरवर चंदन-वंदन, पाडंवगड, वॅराटगड दिसतात. सुंदर देखावा बघुन डोळ्यांचे पारणे फिटते. आंदनाने नाचावे- बागडावेसे वाटते.

धनगरवस्तीतून अर्ध्यातासेच्या अंतरावर नवरा-नवरी सुळके आहेत, तिला म्हातारीचे दातही म्हणतात. संपूर्ण गड फिरायला ३ तास पुरतात.

पाणी:- गोरक्षनाथ मंदीराच्या जवळच्या पाण्याच्या टाकीत पाणी मिळेल, पण उन्हाळ्यात ते आटण्याची शक्यता आहे. बाकी गडावर कुठेही पाणी नाही.

जेवणः- जेवणाची सोय आपली आपणच करावी.

मोबाईल रेंजः- गावात फक्त BSNL ची. गडावर बरेच ठिकाणी Idea, Hutch, Airtel रेंज येते.

राहण्याची सोयः- वासोळ्याच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदीरात १५-२० जण, तसेच प्राथमिक शाळेत ८-१० जण आरामात राहु शकतात (गावात २ शाळा आहेत).

नांदगणे गावातपण शाळेत राहता येईल.

माचीवरल्या गोरक्षनाथाच्या मंदीराच्या आवारात ८-१० जण राहु शकतात.

आभारः

हा लेख लिहीताना आम्हाला श्री सतीश अक्कलकोट यांच्या 'दुर्ग' (सह्याद्री भ्रमण मंडळ प्रकाशन) पुस्तकांची मोलाची मदत झाली. हे पुस्तक संग्राह्य आहे व जरुर वाचावे.

आपण करण्यासारखे काही :-

    1. विविध झांडाच्या बिया वाटेवर आणि गडावर टाकाव्या, पावसाळ्यात त्या रुजतील व काही वर्षात झाडी वाढेल. यासाठी वर्षभर बिया साठवायला हव्यात.

    2. पाण्याचे तळे स्वच्छ ठेवावे.

    3. प्लास्टिक किंवा अन्य कचरा करु नये. कचरा सोबत न्यावा व कचराकुंडीतच टाकावा.

    4. गडावर कुठेही व कशानेही नाव लिहु नये. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारुन सुद्धाही आपले नाव कुठेही लिहले नाही तर आपण लिहीणारे कोण. कुठे लिहीलेले आढळल्यास फोटो काढून आम्हास पाठविणे.

    5. गडावर दारू पिऊन धिंगाणा घालु नये व इतरांनाही परावृत्त करावे.

बालेकिल्ला

बालेकिल्ल्यावरुन दिसणारे विहंगम दृश्य

घनगर्द जंगल

चैतन्य, प्रमोद, प्रशांत, श्रीकांत

-----------------------------------------------------

This page is maintained by Chaitanya Rajarshi for Sahyadri Explorers