purandar-vajragad

Purandar-Vajragad

अल्याड जेजुरी, पल्याड सोनोरी

मध्ये वाहते क-हा, पुरंदर शोभती शिवशाहीचा तुरा

किल्ल्याचा प्रकारः गिरीदुर्ग

उंची: पुरंदर 4560 फूट

वज्रगड 4422 फूट

जवळचे ठिकाण: सासवड, नारायणपूर जिल्हा: पुणे

इतिहासः- पुरंदर म्हणजे इंद्र. ॠग्वेदात इंद्राने दस्यूंचे अनेक गड नष्ट केल्याचा उल्लेख सापडतो. गड पाडल्यामुळेच इंद्राला पुरंदर नाव प्राप्त झाले. हनुमान द्रोणागिरी पर्वत उचलून नेत असताना त्या पर्वताचा एक भाग खाली कोसळला, तोच हा इंद्रनील पर्वत अर्थात पुरंदर असेही म्हणले जाते.

हा किल्ला कोणी बांधला हे ज्ञात नाही. अंदाजे 1000 -1200 वर्षांपूर्वी बांधला गेल्याचा अंदाज आहे. बहामनीकाळी बेदरचे चंद्रसपंत देशपांडे यांनी बहामनी शासनाच्या वतींने पुरंदर ताब्यात घेतला. त्यांनी पुरंदरच्या पुनर्निर्माणास प्रारंभ केला. त्याच घराण्यातला महादजी निळकंठ या पुरुषाने अधिक कसोशिने हे काम पुरे केले. येथील शेंद-या बुरुज पुरता बांधून होईना, वारंवार ढासळे, तेव्हा बहिरनाक सोननाक याने आपला पुत्र नाथनाक आणि सून देवकाई त्यात जिवंत चिणली. त्यांचा बळी घेतल्यावर बुरुज उभा राहिला. शके 1550 साली निजामशाही बुडाली आणि किल्ला आदिलशाहीकडे आला. 1647 मध्ये महादजी निळकंठ वारल्यानंतर त्यांच्या मुलांमध्ये भांडणे सुरु झाली, तेव्हा शिवाजी महारांजानी मोठ्या हिकमतीने किल्ला आपल्या ताब्यात घेतला. शके 1571 मध्ये आदिलशाही सरदार फत्तेखान पुरंदरवर चालून आला तेव्हा मावळ्यांनी त्याचा सणसणीत पराभव केला. 1655 मध्ये नेताजी पालकर हे गडाचे सरनोबत म्हणून नियुक्त झाले. 14 मे 1657 मध्ये छ. संभाजी महारांजा जन्म पुरंदरवर झाला. 1665 मध्ये मोगल सरदार जयसिंग आणि दिलेरखान यांनी पुरंदरला मजबूत वेढा दिला. वैशाख शुद्ध एकादशीस पुरंदरचा उपदुर्ग वज्रगड पडला. किल्ल्याभोवतीचा वेढा पक्का होत असलेला पाहून किल्लेदार मुरारबाजी देशपांडे केवळ मावळे घेऊन दिलेरखानाच्या फौजेवर कोसळले. त्यांचा तो अभूनपूर्व पराक्रम पाहून दिलेरखानाने दातांतळी अंगोळी घातली, बोलला " अरे तू कौल घे, मोठा मर्दाना शिपाई! तुज नावाजतो" यावर रक्ताचा घोट घेऊन मुरारबाजी गरजले "तुझा कौल म्हणजे काय? मी शिवाजी रांजाचा शिपाई, तुझा कौल घेतो की काय?" खानाने मग तीर चालवून मुरारबाजींचा प्राण घेतला. शेवटी 11 जून 1665 साली पुरंदरचा तह झाला. तहात शिवाजी रांजाना 23 किल्ले मोगलांना द्यावे लागले. ते पुढील प्रमाणे:

पुरंदर, वज्रगड, कोंढाणा (सिंहगड), रोहिडा, लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, प्रबळगड, माहुली, मनरंजन, कोहोज, कर्नाळा, सोनगड, पळसगड, भंडारगड, नरदुर्ग, मार्गगड, वसंतगड, नंगगड, अंकोला, सागरदुर्ग, मानगड.

पुढे 8 मार्च 1670 रोजी निळोपंत मुझुमदार यांनी मोगलांकडून पुन्हा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला. छ. संभाजी राजांच्या मृत्युनंतर 1689 मध्ये तो मोगलांनी जिंकला व औरंगजेबाने किल्ल्याचे नाव बदलून "आजमगड" ठेवले. पुढे शंकराजी नारायण सचिवांनी पुरंदर घेतला. छ. शाहू महारांजानी किल्ला पेशव्यांना दिला. त्यानंतर पुरंदरास फार महत्त्व प्राप्त झाले. कित्येक वर्ष पेशव्यांची राजधानी म्हणून पुरंदर नांदला. 18 एप्रिल 1774 रोजी स्त्री पेशवा गंगाबाई येथे प्रसूत होऊन सवाई माधवराव पेशव्यांचा जन्म झाला. मार्च 1818 साली इंग्रजांनी पुरंदर-वज्रगड जिंकले.

काही वर्षांपूर्वी किल्ला NCC च्या ताब्यात होता.

कसे जावे:- पुणे- सोलापूर रस्त्याने दिवे घाटातून सासवड मार्गे नारायणपूर गावी यावे. हे अंतर साधारण 50 कि.मी आहे. गावात नारायणेश्वराचे राष्ट्रकूट-यादव काळातले हेमांडपंती बांधणीचे भव्य आणि सुबक मंदीर आहे. गावातून गडावर माचीपर्यंत खडीचा रस्ता आहे.

पुणे- सातारा रस्त्यावर कापूरहोळ गावात यावे. इथून नारायणपूर 12 कि.मी आहे. त्याआधी तिरुपतीचे प्रतिकात्मक बालाजी मंदीर बघता येईल.

पुरंदर

गडावर काय आहे:- पाऊण तासात आपण सरदरवाज्यातून माचीत पोचतो. माचीत पद्मावती आणि राजाळे हे दोन तलाव आहेत. पेशव्यांचा वाडा, इंग्रज तसेच NCC अधिका-यांचे मोडकळीस आलेले बंगले, ऑफिस, पुरंदरेश्वर, रामेश्वर मंदीर इत्यादि वास्तूंनी माची भरली आहे. पुरंदरेश्वर मंदीराचा जिर्णोद्धार थोरले बाजीराव यांनी केला होता. गडावर 1970 साली मुरारबाजींचा पुर्णाकृती पुतळा बसविण्यात आला. बालेकिल्ल्याचा चढ चढल्यावर आपण आपण दिल्ली दरवाज्यात पोचतो. दरवाज्यात देवी लक्ष्मी व हनुमानाचे देवालय आहे. डाव्या हातास खांदकडा आहे. खांदकड्याची टेकडी वज्रगडाच्या दिशेला लांबपर्यंत धावत गेलेली आहे. बंदिस्त खांदकड्यावर पाण्याची टाकी व टोकाला बुरुज आहे. खांदकडा पाहून पश्चिमेला दिसणा-या टेकडीच्या दिशेने चालावे, वाटेत राजगादी व त्यामागे केदार टेकडी आहे. या दोन्ही टेकड्यांना कवेत घेऊन तटबंदी बांधली आहे. उजवीकडे तटाच्या बाजूने थोड्या अंतरावर शेंदरी बुरुज आहे, खाली पद्मावती तळे दिसते. शेंदरी बुरुजापुढे शेंडी बुरुज, हत्ती बुरुज आणि शेवटी कोकणी बुरुज लागतो. पूर्वेकडे फत्ते बुरुज आहे. केदार टेकडीवर जाण्यासाठी कठ्डयासहिय पाय-या बांधल्या आहेत. वर माथ्यावर श्रीकेदारेश्वराचे सुंदर मंदीर आहे. गाभा-यात पिंड व कोनाड्यात देवी पार्वतीची मूर्ती आहे. समोर दीपमाळ व एक चौथरा आहे. इथून संपूर्ण पुरंदर पाहता येतो, पूर्वेकडे राजगड, सिंहगड, तोरणा दिसतात, दक्षिणेकडे मल्हारगड दिसतो.

राजटेकडीचा चढ उंच नाही. माथ्यावर राजवाड्याचे अवशेष आहेत. इथे संभाजी महारांजाचा जन्म झाला असेल.

वज्रगड

भैरव खिंडीतून वज्रगडावर जायला वाट आहे. डाव्या बाजूच्या वाटेने चढ्ल्यास थोड्याच वेळात आपण पहिल्या प्रवेशद्वारात येतो. दरवाजा चांगल्या स्थितीत आहे. नंतर दुसरा दरवाजा येतो. वर मोठे खडक आहेत, रुद्रेश्वर महादेवाचे लहान मंदीर आहे, जवळच पाण्याच्या पाच टाक्या आहेत. संपूर्ण वज्रगड तट-बुरुजांनी बंदिस्त आहे. गड पाहायला १ तास पुरतो.

महत्त्वाचे:-

      1. गडावर राहण्याची सोय नाही, गडाखाली माचीवरच्या पुरंदरेश्वर मंदीरात तसेच मिलीटरी बंगल्यात मुक्काम करु शकतो.

      2. जेवणाची सोय आपली आपणच करावी.

      3. बारामहीने पाण्याची सोय आहे.

आपण करण्यासारखे काही:-

  1. जाताना विविध झांडाच्या बिया वाटेवर आणि गडावर टाकल्या तर पावसाळ्यात त्या रुजतील व काही वर्षात झाडे वाढतील. यासाठी वर्षभर बिया साठवायला हव्यात.

  2. पाण्याचे तळे स्वच्छ ठेवावे.

  3. प्लास्टिकचा किंवा अन्य कचरा करु नये.

  4. गडावर कुठेही व कशानेही नाव लिहु नये. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारुन सुद्धा आपले नाव कुठेही लिहले नाही तर आपण लिहीणारे कोण. कुठे नाव लिहीलेले आढळल्यास फोटो काढूनआम्हास पाठविणे.

  5. गडावर दारू पिऊन धिंगाणा घालु नये व इतरांनाही परावृत्त करावे.

आभारः हा लेख लिहीताना आम्हाला आदरणीय कै. गो. नी. दाडेंकरांच्या ' किल्ले' (मॅजेस्टिक प्रकाशन, मुबंई), व श्री सतीश अक्कलकोट यांच्या ' दुर्ग' (सह्याद्री भ्रमण मंडळ प्रकाशन, सांगली), या पुस्तकांची मोलाची मदत झाली. ही पुस्तके संग्राह्य आहेत व ती जरुर वाचावीत.

This page is maintained by Chaitanya Rajarshi for Sahyadri Explorers