pandav.html

Pandavgad

पाडंवगड

किल्ल्याचा प्रकारः गिरीदुर्ग जिल्हा: सातारा

जवळचे ठिकाण: वाई उंची: 4185 फूट

इतिहासः-

कोल्हापूरच्या शिलाहार घराण्यापैकीं भोज शिलाहाराने दक्षिणेकडे जे किल्ले बांधले त्यांमध्ये पांडवगडाची गणना होते. महाभारतकाळी राजा विराटाच्या वैराटगडाबरोबरच या गङाचे देखील अस्तित्व होते. पांडवांच्या वस्तीमुळे याला हे नाव पडले. बहामनी राज्याची शकले झाल्यानंतर हा गड विजापूरच्या आदिलशाहीकडे आला. शिवाजीमहाराजांनी हा किल्ला कधी जिंकला याबाबत इतिहासकारांचे एकमत नाही. इ. स. 1701 मध्ये औरंगजेबाने गडावर ताबा मिळवला पण फार काळ तो टिकला नाही, मराठ्यांनी पुन्हा गड जिंकून घेतला. इ. स. 1817 मध्ये दुस-या बाजीरावाचा मंत्री त्र्यंबकजी डेंगळे याने हा किल्ला बळकावला. पण पुढे इ. स. 1818 मध्ये मराठेशाही बुडाली त्यावेळी मेजर थेचर याने 24 मार्च रोजी किल्ला जिंकला.

या किल्ल्यांचा विस्तृत इतिहास श्री सतीश अक्कलकोट यांच्या " दुर्ग " पुस्तकात वाचावा.

कसे जावे:-

  1. पुणे-वाई अंतर साधारण 85 कि.मी आहे. वाईवरुन जवळच्या मेणवली गावात यावे ( इथे स्वदेस पिक्चरचे चित्रीकरण झाले होते ). मेणवलीचा घाट फारच छान आहे. वसईच्या युद्धात चिमाजी आप्पांनी जिंकलेली पंचधातुची अतिशय जड घंटा मंदीराच्या बाहेर टांगली आहे. गावात नाना फडणवीसांचा सुंदर वाडा आहे. तोही बघता येईल. मेणवलीहून दोन तासात गडाचा माथा गाठता येतो.

  2. वाईहून शेलारवाडी येथे यावे. इथून दिड तासात आपण कातळाजवळ पोचतो. खडकात कोरलेल्या पाय-या चढून उत्तराभिमुख दरवाजातून प्रवेश करावा.

  3. गडाच्या भोवती असणा-या कांबरवाडी, गुंडेवाडी या वाटेने देखील गडावर जाता येईल.

गडावर काय आहे:- किल्ला सामान्यपणे चौरस आकाराचा आहे. वरील भूमीचे क्षेत्रफळ 6 एकर आहे. दरवाजा उत्तराभिमुख आहे. त्याची बांधणी जुन्या-नवीन पद्धतीची आहे. माथ्यावरती अंदाजे 100 फूट लांब आणि 60 फूट रुंद असे कोरडे तळे आहे. याशिवाय 10-12 कोरडी टाक्या असून त्यापैकी 2 टाक्यांचे पाणी उत्तम आहे. पांढुजाईचे पड्क्या अवस्थेतील मंदीर आहे, त्याचा लवकर जीर्णोद्धार झाला नाही तर ऊन, पावसाच्या तडाख्यामुळे ते लवकरच भुईसपाट होईल. वर मारुतीची पण सुंदर मूर्ती आहे. गडावरुन माढंरदेवीचा डोंगर, पांचगणी, महाबळेश्वर, कमळगड, रायरेश्वर, कोळेश्वर पठार, रोहिडा, वैराटगड, चंदन-वंदन, कल्याणगड असे मोहक दॄश्य दिसते.

गडावर एका पारशी माणसाचा (वाडिया बाबा) बंगला असून त्यात ते एकटे कुत्र्यांबरोबर राहतात. त्यांच्या मालकीची २२ एकर जागा आहे. त्यांच्याच पुढाकाराने गडावर वृक्षारोपण तसेच अनेक सुधारणा झाल्या आहेत.

महत्त्वाचे:-

    1. गडावर राहण्याची सोय नाही, मेणवली गावातल्या मंदीरात 10-15 जणांना राहता येईल.

    2. जेवणाची सोय आपली आपणच करावी.

    3. उन्हाळ्यात पाण्याची टंचाई असू शकते..

आपण करण्यासारखे काही:-

  1. जाताना विविध झांडाच्या बिया वाटेवर आणि गडावर टाकल्या तर पावसाळ्यात त्या रुजतील व काही वर्षात झाडे वाढतील. यासाठी वर्षभर बिया साठवायला हव्यात.

  2. पाण्याचे तळे स्वच्छ ठेवावे.

  3. प्लास्टिकचा किंवा अन्य कचरा करु नये.

  4. गडावर कुठेही व कशानेही नाव लिहु नये. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारुनसुद्धा आपले नाव कुठेही लिहले नाही तर आपण लिहीणारे कोण. कुठे नाव लिहीलेले आढळल्यास फोटो काढून आम्हास पाठविणे.

  5. गडावर दारू पिऊन धिंगाणा घालु नये व इतरांना ही परावृत्त करावे.

आभारः हा लेख लिहीताना आम्हाला आदरणीय कै. गो. नी. दाडेंकरांच्या 'किल्ले' (मॅजेस्टिक प्रकाशन, मुबंई), व श्री सतीश अक्कलकोटयांच्या ' दुर्ग' (सह्याद्रीभ्रमण मंडळ प्रकाशन, सांगली), या पुस्तकांची मोलाची मदत झाली. ही पुस्तके संग्राह्य आहेत व ती जरुर वाचावीत

मारुतीची मूर्ती

देवीची मूर्ती

पांढुजाईचे मंदीर

वाडिया बाबांबरोबर

मनीष, विशाल, चैतन्य, भालचंद्र

नाना फडणवीसांचा वाडा

नियम कृपया पाळावेत

मेणवलीचे मंदीर- मुक्कामाची सोय

मेणवलीचा घाट

This page is maintained by Bhalchandra Pujari, Chaitanya Rajarshi for S a h y a d r i E x p l o r e r s