Tung
तुंग ( उर्फ कठीणगड )
बालेकिल्ल्याचा कातळ 1
किल्ल्याचा प्रकारः गिरीदुर्ग जिल्हा:पुणे
जवळचे ठिकाण: लोणावळा उंची: 3526 फूट
पवना जलाशयानी तीन बाजूंनी वेढा घातलेला एक सुंदर दुर्ग म्हणून तुंग प्रसिद्ध आहे. याच्या उंच टोकामुळे हा पटकन लक्षात येतो. पवना मावळ या अतिशय महत्त्वाच्या प्रदेशावर नजर ठेवायला तुंग-तिकोना होते.
इतिहासः-
या पवना मावळ परिसरात कार्ले, भाजे, बेडसे, भंडारा, शेलारवाडी सारख्या प्राचीन गुहा आहेत, त्यामुळे तिकोना-तुंग किल्ले सन 800 किंवा 1000 साली बांधले गेले असल्याचा अंदाज आहे. इ. स. 1585 पासून निजामशाहीच्या ताब्यात असलेल्या तुंगला शिवाजी महाराजांनी माहुली, लोहगड, विसापूर, सोनगड, ताला आणि कर्नाळा या किल्ल्यांबरोबर 1656-57 मध्ये जिंकले. पुरंदरच्या तहात (1665) हा मोगलांना दिला गेला. तो परत 1670-71 मध्ये जिंकून घेतला. 1704 पर्यंत तुंग मराठ्यांच्या ताब्यात होता. 13 मे 1704 रोजी चाकण किल्लेदार मुगल सरदार अमानुल्ला खान याने हा जिंकला आणि औरंगजेबाने किल्ल्याचे नाव बदलून बंकीगड केले. सेनापत सिंग याची किल्लेदार म्हणून नेमणूक करण्यात आली. सन 1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्युनंतर मोगल साम्राज्य खिळखिळे झाले पण तुंग मराठ्यांनी जिंकला तो 1749 साली. पुढे 1818 मध्ये इंग्रजांनी अनेक किल्ल्यांबरोबर तुंग पण जिंकला.
या किल्ल्यांचा विस्तृत इतिहास श्री सतीश अक्कलकोट यांच्या " दुर्ग " पुस्तकात वाचावा.
कसे जावे:-
पुण्याहून लोकल पकडून लोणावळा येथे उतरावे. इथून बस किंवा जीपने घुसळखांबला यावे. इथून चालत एक-दिड तासाने 8 कि.मी लांब तुंगवाडीया पायथ्याच्या गावी पोचावे. गड सर करायला साधारण अर्धा तास लागतो.
तिकोना-तुंग असा ट्रेक करणारे जास्त लोकं आहेत. आधी तिकोना बघावा. तिकोना पेठेतून ब्राह्मणोली गावात बस किंवा जीपने जावे. ब्राह्मणोलीहून लाँचने केवरे गावात उतरावे. इथून चालत तुंगवाडीत यायला 20 मिनिटे लागतात.
गडावर काय आहे:-तुंगवाडी गावाभोवती भरपुर झाडी आहे. गावात भैरवनाथाचे मंदीर आहे. काळ्या पाषाणातील भैरवाची मूर्ती आहे. मंदीरापुढील कोरीव दगडांच्या वेशीवरुन मंदीर प्राचीन असल्याचे लक्षात येते. जवळच सुंदर मूर्ती असलेले मारुती मंदीर आहे. हनुमान मंदीराजवळून गडावर जाणारी वाट आहे. पाच मिनिटाच्या अंतरावर डाव्या बाजूस कातळावर मारुतीचे शिल्प कोरले आहे. यापुढे खडा चढ लागतो. मुरमाड घसरडी वाट आहे, यामुळेच किल्ल्याला कठीणगड नाव पडले असणार. अर्ध्यातासात गडाचे पहिले प्रवेशद्वार येते. नंतर मुख्य प्रवेशद्वार येते. दरवाजा टिकून आहे. आत देवडी पण आहे. थोडे वर गेल्यावर समोर उध्वस्त चौथ-याचे अवशेष दिसतात. डाव्या बुरुजावरुन खाली पाहिल्यावर तुंगची तटाने बंदिस्त असलेली माची दिसते. माचीवर दोन चौथरे आहेत, पण माचीवर उतरण्यासाठी वाट नाही. वर गणेश मंदीर आहे. जवळच चवदार पाण्याचे टाके आहे. पुढे गेल्यावर बालेकिल्ल्याचा कातळ लागतो. वर तुंगाई देवीचे उध्वस्त मंदीर आणि झेंडा आहे, बाजूलाच 8-10 फूट खोलीची गुहा आहे. तुंगवरुन पवना जलाशय, तिकोना, लोहगड, विसापूर किल्ले दिसतात. गड पाहायला एक-दोन तास पुरतात.
महत्त्वाचे:-
गडाखालच्या भैरवनाथ मंदीरात 15-20 जण तसेच मारुती मंदीरात 5-6 जण राहूशकतात.
जेवणाचीसोयआपलीआपणचकरावी.
गडावर गणेश मंदीराच्या जवळच्या टाकीत बारामहीने पाणी मिळेल, नाहीतर खाली गावात.
बालेकिल्ल्याचा कातळ 2
तुंगाईदेवी मंदीर
गडावरुन दिसणारे लोहगड-विसापूर
किल्ल्याची तटबंदी
आपण करण्यासारखे काही:-
जाताना विविध झांडाच्या बिया वाटेवर आणि गडावर टाकल्या तर पावसाळ्यात त्या रुजतील वकाही वर्षात झाडे वाढतील. यासाठी वर्षभर बिया साठवायला हव्यात.
पाण्याचे तळे स्वच्छ ठेवावे.
प्लास्टिकचा किंवा अन्य कचरा करु नये.
गडावर कुठेही व कशानेही नाव लिहु नये. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारुन सुद्धाआपले नाव कुठेही लिहले नाही तर आपण लिहीणारे कोण. कुठे नाव लिहीलेले आढळल्यास फोटोकाढून आम्हास पाठविणे.
गडावर दारू पिऊन धिंगाणा घालु नये व इतरांनाही परावृत्त करावे.
आभारः
हा लेख लिहीताना आम्हाला आदरणीय कै. गो. नी. दाडेंकरांच्या ' किल्ले' (मॅजेस्टिक प्रकाशन, मुबंई), व श्रीसतीश अक्कलकोट यांच्या ' दुर्ग' (सह्याद्री भ्रमण मंडळ प्रकाशन, सांगली), या पुस्तकांची मोलाची मदतझाली. ही पुस्तके संग्राह्य आहेत व ती जरुर वाचावीत.
तुंगवरची रानफुले
This page is maintained by Chaitanya Rajarshi for Sahyadri Explorers