तिकोना ( उर्फ वितंडगड )
किल्ल्याचा प्रकारः गिरीदुर्ग जिल्हा: पुणे
जवळचे ठिकाण: लोणावळा उंची: 3580 फूट
बुरुज
पवना जलाशयाच्या काठावर त्रिकोणी आकाराचा तिकोना गड उभा आहे. पवना मावळ या अतिशय महत्त्वाच्या प्रदेशावर नजर ठेवायला तुंग-तिकोना होते.
इतिहासः-
या पवना मावळ परिसरात कार्ले, भाजे, बेडसे, भंडारा, शेलारवाडी सारख्या प्राचीन गुहा आहेत, त्यामुळे तिकोना-तुंग किल्ले सन 800 किंवा 1000 साली बांधले गेले असल्याचा अंदाज आहे. इ. स. 1585 पासून निजामशाहीच्या ताब्यात असलेल्या तिकोन्याला शिवाजी महाराजांनी माहुली, लोहगड, विसापूर, सोनगड, ताला आणि कर्नाळा या किल्ल्यांबरोबर 1656-57 मध्ये जिंकले. इ. स. 1701 पर्यंत तिकोना मराठ्यांच्या ताब्यात होता. 11-12 सप्टेंबर 1702 रोजी चाकण किल्लेदार मुगल सरदार अमानुल्ला खान याने तिकोना जिंकला आणि औरंगजेबाने किल्ल्याचे नाव बदलून अमानगड केले. सन 1704 मध्ये सेनापत सिंग याची किल्लेदार म्हणून नेमणूक करण्यात आली. सन 1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्युनंतर मराठ्यांनी तिकोना जिंकला असावा. पुढे 1818 मध्ये इंग्रजांनी अनेक किल्ल्यांबरोबर तिकोना पण जिंकला.
या किल्ल्यांचा विस्तृत इतिहास श्री सतीश अक्कलकोट यांच्या " दुर्ग " पुस्तकात वाचावा.
कसे जावे:-
पुण्याहून लोणावळा लोकल पकडून कामशेतला उतरावे. इथून बस किंवा जीपने तिकोना पेठ या पायथ्याच्या गावी पोचावे. गड सर करायला साधारण 45 मिनिटे लागतात.
तुंग-तिकोना असा पण ट्रेक करता येतो. तुंग बघून तुंगवाडीत उतरावे. इथून जवळच्या केवरे गावात यावे. लाँचने ब्राह्मणोली गाव गाठावे. ब्राह्मणोलीहून तिकोनापेठ 30 मिनिटांच्या अंतरावर आहे. तुंग-तिकोना गाडीरस्ता पण आहे. अंतर साधारण 15 कि.मी आहे.
गडावर कायआहे:-गावातून गड उजव्या हातास ठेवून दहा मिनिटे चालल्यावर उजव्या हातास झाडीतून पायवाट वर चढत समोर दिसणा-या लहान खिंडीत उजव्या बाजूने वर चढते. या वाटेने 10-15 मिनिटात आपण तटाखाली येतो. या ठिकाणी तटाची उंची 50-60 फूट इतकी आहे. थोड्या अंतरावर सुंदर शिलाहारकालीन मंदिर /गणेश लेणी आहे. गाभा-याच्या मधोमध माथ्यावर कमळाची सुरेख आकृती कोरलेली आहे. समोर खडकात खोदलेली पाण्याची टाकी आहे. पाणी अतिशय स्वच्छ आणि गार असते. इथून पाच मिनिटांच्या चढाईनंतर बुरुज लागतो. बुरुजापासून उंच खोदीव पाय-यांना सुरुवात होते. सहा ते आठ इंच रुंदीच्या व दिड-दोन फूट उंचीच्या सुमारे 40-45 खड्या पाय-या चढल्यानंतर किल्ल्याचे प्रवेशद्वार लागते. उजव्या हातास चढल्यावर बालेकिल्ला लागतो. दरवाजा नष्ट झाला आहे. समोर जरंडेश्वराचे मंदीर आहे. आत पूर्ण शाळीग्रामाचे शिवलिंग आहे. मंदीराच्या मागे उध्वस्त अवशेष आहेत. इथल्या बुरुजावर उभे राहिल्यावर पवना जलाशय व त्यामागे तुंग किल्ल्याचे दर्शन होते.
महत्त्वाचे:-
गडावर गणेश लेण्यात 10-15 जण तसेच जरंडेश्वर मंदीरात 3-4 जण राहूशकतात.
जेवणाची सोय आपली आपणच करावी.
गडावरंच्या टाक्यांमध्ये बारामहीने पाणी मिळेल.
आपण करण्यासारखे काही:-
जाताना विविध झांडाच्या बिया वाटेवर आणि गडावर टाकल्या तर पावसाळ्यात त्या रुजतील व काही वर्षात झाडे वाढतील. यासाठी वर्षभर बिया साठवायला हव्यात.
पाण्याचे तळे स्वच्छ ठेवावे.
प्लास्टिकचा किंवा अन्य कचरा करु नये.
गडावर कुठेही व कशानेही नाव लिहु नये. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारुनसुद्धा आपले नाव कुठेही लिहले नाही तर आपण लिहीणारे कोण. कुठे नाव लिहीलेले आढळल्यास फोटोकाढून आम्हास पाठविणे.
गडावर दारू पिऊन धिंगाणा घालु नये व इतरांना ही परावृत्त करावे.
आभारः हा लेख लिहीताना आम्हाला आदरणीय कै. गो. नी. दाडेंकरांच्या ' किल्ले' (मॅजेस्टिक प्रकाशन, मुबंई), व श्री सतीश अक्कलकोटयांच्या ' दुर्ग' (सह्याद्रीभ्रमण मंडळ प्रकाशन, सांगली), या पुस्तकांची मोलाची मदत झाली. ही पुस्तके संग्राह्य आहेत व ती जरुर वाचावीत.
प्रवेशद्वार
कमळाची कोरलेली आकृती
मंदीर
जरंडेश्वराचे मंदीर
शाळीग्रामाचे शिवलिंग
तिकोन्यावरची रानफुले
मारुती शिल्प
पाण्याची टाकी
गणेश लेणी
पिंडी
तिकोन्यावरुन दिसणारा तुंग
7 वर्षांनी एकदाच फुलणारी कारवी
पाय-या 1
पाय-या 2
आम्ही गेलो होतो: मनीष, चैतन्य, निरंजन
This page is maintained by Chaitanya Rajarshi for Sahyadri Explorers