जीवाला जीव देणारा गड़
किल्ल्याचा प्रकारः गिरीदुर्ग उंची: 3754 फूट
जिल्हा: पुणे जवळचे ठिकाण:जुन्नर
खडा पारशी
"हा जीवधन किल्ला शत्रुंच्या तोफखान्यापुढे अंत्यंत अभेद्य आहे आणि त्यामुळे आतमध्ये सैन्य सुरक्षित लपू शकते."-- मेजर एल्ड्रीज
(बॉम्बे कुरियर 16 मे 1818 )
सातवाहन राजकुळानें कोरलेला सुविख्यात नाणेघाट ज्याच्या कुशीत आहे, असा हा ऐन घाटमाथ्यावरचा जीवधन किल्ला जुन्नरच्या पश्चिमेस उभा आहे.
इतिहासः- जीवधन हा प्राचीन दुर्ग. निजामशाही संस्थापक मलिक अहमदने सन 1489 मध्ये बहामनी सत्तेकडून जीवधन जिंकून घेतला. जून 1633 मध्ये मोगलांनी निजामशाही बुडवली, त्यावेळी जीवधनवर निजामशाही वंशजापैकी अल्पवयीन मूर्तजा कैदैत होता. शहाजीराजांनी त्याला कैदैतून सोडवून पेमगिरीवर नेले व नवीन निजामशहा म्हणून घोषित केले. नंतर आदिलशाहीने पाठिंबा काढून घेतल्यामुळे शहाजीराजांना गड मोगलांना द्यावा लागला. शिवाजीराजांनी साल्हेर विजया नंतर १६७२ मध्ये इतर दुर्गांबरोबर जीवधन पण जिंकून घेतला. नंतर मोगलांकडे हा कधी गेला हे ज्ञात नाही. मराठ्यांनी में 1702 मध्ये जीवधन जिंकून घेतला. पण लगेच त्याच वर्षी नोव्हेंबर मध्ये मोगलांनी हा हस्तगत केला. तेव्हा किल्लेदार म्हणून मुहिब विहीशीची नेमणूक झाल्याचा अंदाज आहे. पुढे नानासाहेब पेशव्यांच्या आज्ञेवरुन 1757 मध्ये मराठ्यांनी शिवनेरी बरोबर जीवधन घेतला. 3 में 1818 रोजी इंग्रज अधिकारी मेजर एल्ड्रीज याने चावंड, हडसर बरोबर जीवधन तोफांचा मारा करुन जिंकला.
या किल्ल्यांचा विस्तृत इतिहास श्री सतीश अक्कलकोट यांच्या " दुर्ग " पुस्तकात वाचावा.
कसे जावे:-
पुणे -जुन्नर हे अंतर साधारण 90 कि.मी आहे. तिथून 25 कि.मी लांब घाटघर हे पूर्व पायथ्याचे गाव आहे. इथून गडावर जायला दिड-दोन तास लागतात.
ठाणे जिल्ह्यातील कल्याणहून तासाभरात वैशाखरे गावात यावे. इथुन नाणेघाट चढता येतो. नाणेघाटातून जीवधन वर जाणारी वाट ही जंगलातून आहे. नाणेघाटातून 2 तासांनतरच्या पायपिटीनंतर दोन फाटे येतात. डाव्याबाजूने गेल्यास जीवधनच्या पाय-यांपाशी पोचतो. उजव्या बाजूची वाट ही सुळक्याच्या खाली येते.
गडावर काय आहे:- घाटघरहून जवळचे तळे व मंदीराच्या बाजूने निघावे. गडाखाली बांबूचे वन व करवंदाच्या जाळ्या आहेत, त्यामुळे गडावर जाणारी पायवाट लवकर सापडत नाही. पायवाटेने तासाभरात आपण कातळात खोदलेल्या पाय-यांपाशी येतो. या प्रत्येकी दिड फूट उंचीच्या 240 पाय-या संपल्यावर कातळात खोदलेल्या खोबण्या लागतात. हा 50 फुटांचा अवघड टप्पा खोबण्यांमध्ये बोटे टेकवीत, कड्याशी छाती घाशीत चढावा लागतो. वर आल्यावर आपण उध्वस्त दरवाज्यापाशी येतो. जवळच पाण्याची टाकी आहे. गडाचा विस्तार मोठा आहे. पश्चिमेस धान्यकोठार असून त्याचा बाहेरचा भाग बांधलेला व आतला भाग कोरण्यात आलेला आहे. प्रवेशद्वारी गजलक्ष्मी शिल्प कोरलेले असून आत 3 मोठ्या खोल्या आहेत. वर टेकडीवर जिवाई देवीची सुबक व रेखीव मूर्ती हे एक आकर्षण आहे. पश्चिम टोकावर गडाला बिलगून उभ्या असलेल्या "वानरलिंगी" सुळक्याचे दर्शन होते. इथून सरळसोट तुटलेल्या कड्याचे (400 फूट उंच ) व तळकोकणाचे (2000 फूट खोल ) विहंगम दृश्य दिसते. दक्षिण दिशेला दुर्ग व ढाकोबा दिसतात, पूर्वेला चांवड, हडसर, निमगिरी, शिवनेरी पर्यंतचा परिसर दिसतो. पश्चिम टोकाकडे गडाचे मुख्य प्रवेशद्वार आहे, दरवाजा अत्यंत अवघड ठिकाणी बांधलेला आहे व मोठ्यामोठ्या दगडांनी बुजलेला होता. मात्र जानेवारी 2007 ला पुण्याच्या Y-Z ट्रेक ग्रुप ने हे दगड काढून दरवाजा मोकळा केला तसेच गडावरच्या पाण्यांच्या टाक्यांची पण सफाई केली. दरवाज्यासमोर खोदलेल्या पाय-या आहेत. या उतरून नाणेघाटात जाता येते. इंग्रजांनी 1818 मधील युद्धानंतर ही वाट तोडून टाकली होती.
महत्त्वाचे:-
गडावरच्या धान्य कोठारात १५-२० जणराहू शकतात,पण उंदीर-सापांपासून सावधान.
जेवणाची सोय आपली आपणच करावी.
गडावरंच्या तलाव व टाक्यांमध्ये पाणी फक्त पावसाळ्यात मिळेल, उन्हाळ्यात पाणी आटून जाते.
आपण करण्यासारखे काही:-
गडावर झाडे खूप कमी आहेत, त्यामुळे जाताना विविध झांडाच्या बिया वाटेवर आणि गडावर टाकल्या तर पावसाळ्यात त्या रुजतील व काही वर्षात झाडे वाढतील. यासाठी वर्षभर बिया साठवायला हव्यात.
पाण्याचे तळे स्वच्छ ठेवावे.
प्लास्टिकचा किंवा अन्य कचरा करु नये.
गडावर कुठेही व कशानेही नाव लिहु नये. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारुनसुद्धा आपले नाव कुठेही लिहले नाही तर आपण लिहीणारे कोण. कुठे नाव लिहीलेले आढळल्यास फोटो काढून आम्हास पाठविणे.
गडावर दारू पिऊन धिंगाणा घालु नये व इतरांनाही परावृत्त करावे.
This page is maintained by Chaitanya Rajarshi and Bhalchandra Pujari