पंढरपूर, विठ्ठल, कीर्तन, पखवाज, वारकरी हे शब्द माझ्या आयुष्यात तरी एकादशी या संकल्पनेची खूप जवळून नातं सांगत होते.
लहानपणी जेव्हा पहिल्यांदा पखवाजाचे बोल ऐकले होते, त्याच वेळेला त्याची एक नशा तयार झाली होती आणि मग त्यानंतर पखवाजाचे सोलो वादन ऐकत ऐकत काम करत राहायचं, किंवा जिथे शक्य तिथे जाऊन पखवाज लाईव्ह ऐकायचं हे सुरू झालं. साधारण १५–१६ वर्षांपूर्वीची गोष्ट असेल जेव्हा मी कीर्तनासाठी म्हणून अभ्यास सुरू करायला लागलो, त्यावेळेला परत एकदा मला पखवाज, विठ्ठल या सगळ्यांची नव्याने ओळख व्हायला सुरुवात झाली. या सगळ्या निमित्ताने त्या विठ्ठलाच्या नाना प्रकारे ऐकलेल्या गोष्टी, वाचलेले अनुभव, संत साहित्य यांची झालेली थोडीफार ओळख, या सगळ्यातून त्या आशयाचं कुतूहल अजून अधिकाधिक वाढत गेलं, आणि मग ती लागलेली तहान मी नाना प्रकारे विझवायचा प्रयत्न केला.
"जय जय राम कृष्ण हरी" हा गजर नारदीय कीर्तन परंपरेत म्हटला जाणारा आणि वारकरी कीर्तन परंपरेत म्हटला जाणारा — एकच गोष्ट, एकच गजर पण त्याची अभिव्यक्ती एकमेकांपासून प्रचंड भिन्न. हीच नाही का ताकद कलेची? कीर्तन विश्वाशी माझी ओळख जरी नारदीय परंपरेतून झाली असली तरी सुद्धा वारकरी संप्रदायातील समूह गान याचं मला आकर्षण नेहमीच होतं आणि असणार आहे. मागच्याच महिन्यात पाहिलेला दशावतार, ज्याच्यामध्ये भक्त पुंडलिकाचा आख्यान सादर झालं, त्यात विठ्ठल असं म्हणतो पुंडलिकाला — “पंढरपुरात जे जे येतील, ते माझं नाव घ्यायच्या आधी तुझं नाव घेतील.” आणि म्हणून आपण म्हणतो — "पुंडलिकावरदे हरि विठ्ठल."
हे सगळं मनात ताजं असतानाच एक विषय सारखं डोक्यात घर करून होता — एक-दोन वर्षांपूर्वी बेळगावातल्या एका एकांकिका स्पर्धेमध्ये मी एका तिसरीतल्या मुलाला पखवाज वाजवताना बघितलं, आणि "आजकाल बेळगावात कुठेच पखवाज वाजवत नाही कोणी" — असा जो काही माझा एक भ्रम होता, त्याला पहिल्यांदाच तडा गेला. त्यानंतर मी त्या लहान पोराचा शोध घेतला, त्याचा नंबर मिळवला, पण मी त्याला काही संपर्क करू शकलो नाही. पण विठ्ठलाचा गजर आणि पखवाज — या दोन संकल्पना माझ्या डोक्यात तशाच घोळत राहिल्या.
दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र माझ्या एका मित्राने मला एक पोस्टर पाठवलं. "बाल संस्कार शिबिर – श्री गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था, कणबर्गी." मी आनंदाने ओरडायचा फक्त बाकी होतो, कारण माझ्याच घरापासून अवघ्या दहा किलोमीटरवर असणाऱ्या एका गावामध्ये वारकरी शिक्षण संस्था आहे! त्या पोस्टरवरती खरंतर खूप सारी नावं होती, त्यातल्या एकालाही मी ओळखायचं काही एक कारण नव्हतं. माझ्या मित्रांपैकी जनी मला ते पोस्टर पाठवलं, तो त्या संस्थेत बरीच वर्षं काम करतोय, पण मला सारखं असं वाटत होतं की जोपर्यंत मला त्या नावांपैकी कुणाशी बोलता येत नाही, तोपर्यंत मी तिथे जाणं काही फार उपयोगाचं नसेल. अर्थातच, जेव्हा मला प्रश्न पडतात, तेव्हा मी बाबांकडे धावून जातो, आणि अर्थातच बाबांकडे त्याची उत्तरं असतात. म्हणून इथेही तसंच झालं — ते म्हणाले, “अरे, ते राजू कावळे म्हणून आहेत ना? ते आपल्याकडे योगाला यायचे,” आणि त्यामुळे माझी आणि त्यांची ओळख आहे.
बस, तर एवढं खूप होतं मला एक संवाद सुरू करायला.
दर शनिवार-रविवार बेळगावला जायचं, आणि तिथे थोडंसं काम करायचं, आणि परत पुण्याला यायचं. आता हे रुटीन गेले दीड महिने इतकं झालंय, की आता तो शुक्रवार रात्रीचा आणि रविवार रात्रीचा बसमधला प्रवास अंगवळणी पडलाय. शनिवारी सकाळी बेळगाव गाठलं. राजू कावळे गुरुजींना फोन केला. तेव्हा ते म्हणाले — "या की, आम्ही इथेच असतो. तुम्ही जर संध्याकाळी आलात, तर तुम्हाला हरिपाठ पण बघता येईल. नाहीतर तुम्ही सकाळी आलात, तर तुम्हाला वर्ग बघता येईल." मी थोडा विचार केला आणि ठरवलं की मी हरिपाठासाठी जाईन संध्याकाळी साडेपाच वाजता.
या शिबिराचं जे कार्यक्रम स्थळ होतं, ते होतं श्री सिद्धेश्वर देवस्थान, कणबर्गी. एका डोंगरावरती असलेलं सिद्धेश्वराचं हे देऊळ. सध्या तिथं बरंच रिनोव्हेशनचं काम झाल्यामुळे त्यातलं बरंचसं दगडी काम नाहिसं आहे. पण ते इतकं उंचावर आहे की तिथून दिसणारं बेळगाव, तिथून दिसणारा निसर्ग — हा विहंगम आहे. देवळावर जायला साधारण आपल्याला ५० ते ७० पायऱ्या चढाव्या लागतात आणि मग एका गुहेमध्ये सिद्धेश्वर आरूढे — त्याचं दर्शन घेऊन आपण जेव्हा बाहेर बसतो, तेव्हा एक शांत, संथ वारा सारखा त्या देवळाच्या पटांगणात वाहत असतो. मी थोडावेळ बसलो होतो, कारण पायऱ्या चढून मी दमलो होतो. पण गंमत अशी की, चार वाजता आपण भेटू असं म्हणून ज्यांनी मला बोलावलं होतं, ते माझा फोन उचलत नव्हते. त्यामुळे सिद्धेश्वराचं मनसोक्त दर्शनही झालं, पण मनामध्ये हुरहुर होतीच की हे नेमकं काय चाललंय. मी ठरवलं की फार आत्ता कसलाच विचार न करता आपण मंदिर उतरून खाली जाऊ, तिथे बसूयात, मग बघू पुढे काय होतं.
देवळाच्या पायथ्याशी एक लांब रस्ता आहे आणि रस्त्याच्या बाजूला लागून एक अर्धवट तयार असलेली बिल्डिंग. मी जेव्हा पहिल्यांदा प्रवेश केला त्या परिसरामध्ये, तेव्हा मला असं दिसलं की बरीचशी मुलं तिथे झोपलीयेत. अर्थातच मला हे लक्षात आलं होतं की कदाचित हीच पोरं शिबिरातली आहेत. मी हा सगळा विचार एकीकडे करत होतो. मी दर्शन घेऊन परत खाली उतरायला लागलो, खाली आलो होतो तोपर्यंतही माझा संपर्क होत नव्हता. मी येऊन एका झाडाखाली बसलो, पाणी पिऊन.
आणि नेमकं तेच ठिकाण होतं, जिथून एक व्यक्ती पांढरा शुभ्र कुर्ता घालून आणि अत्यंत नीट धोतर नेसून बाहेर आली आणि तिनं जोरात हाका मारल्या, उठायच्या खुणा केल्या सगळ्यांना. आणि हाहा म्हणता साधारणपणे २०० ते २५० पोरं त्या खोलीमधून डोळे चोळत, हातपाय हलवत बाहेर पडली. साधारण दुसरी, तिसरी, चौथीपासूनची ते दहावीपर्यंतची पोरं त्यात होती. आणि सगळेजण नुकतेच झोपून उठलेले असल्यामुळे अजून जरा या जगात यायचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात तिथे आलेली काही पालक मंडळी पण होती. त्यांना बघून काही मुलांनी प्रचंड दंगा केला, “मला घरी जायचंय, मला घरी जायचंय” हे सगळं सुरू असताना, उरलेली सगळी चिल्लीपिल्ली त्यांचे वाळत असलेले कपडे कुठेतरी घेऊन येत होती, घडी घालून ठेवत होती. काही जण नुसतंच त्या जंगलामध्ये फेरफटका मारायला गेले, तर कोणीतरी नुसतंच पाणी प्यायला गेलं होतं. आणि परत एकदा ते दादा म्हणाले, “चला रे पटकन कपडे बदलून या.”
आजूबाजूच्या परिसरात असलेली झाडांची हिरवळ, त्या देवस्थानातली शांतता आणि ती मुलं… जेव्हा या सगळ्यातून ती मुलं आत गेली, अवघ्या एका मिनिटामध्ये ती मुलं बाहेर आली कपडे बदलून. आणि सगळ्यांनी एक पांढरा रंग अंगावर घेतला होता. सगळ्यांचा पांढरा हा एकसारखा होता का? तर अजिबात नाही. पण त्या सगळ्यांचा मिळून एकच पांढरा रंग तयार झाला होता. तितक्यात हरिपाठाच्या तयारीची लगबग सुरू झालेली. काही जण माईक लावत होते, तर काही जण कीर्तनकाराची गादी तयार करत होते. आणि तितक्यात एका बुवांनी पखवाज आणून ठेवला आणि मी तिथेच चिकटून बसलो. दिसायला तो आखीव-रेखीव तर होताच, पण आता काही क्षणातच मी त्याचा नाद ऐकणार होतो.
सिद्धेश्वराच्या पायथ्याशी आता विठ्ठलाचं कीर्तन होणार होतं. खरंतर ही कीर्तनाची तालीम होती. हे काही अख्यान नव्हतं. गुरुजींचा आदेश येतो, सगळी पोरं चार ओळींमध्ये उभी राहिली. आणि जसा गजर सुरू झाला, तशी सगळी पोरं जणू काही आपल्याला ते माहितीच आहे, अशा थाटात त्या तालावरती विठ्ठल रंगी नाचू लागली. सगळ्यांनाच सगळं जमलं का? तर अर्थातच त्याचं उत्तर नाही असंच आहे. पण ते जमलंय का मग ते तुझं चुकतंय तर सगळ्यांसमोर तुला ते चुकतंय असं सांगणं, किंवा तुला ते जमणार नाही असं सांगणं — असे कुठलेच प्रकार गुरुजींनी तिथे केले नाहीत. पुढचा दीड तास, प्रत्येकाला जसं समजलंय, जसं उमगलंय, जसं जाणवलंय, तसं आता ते त्या तालाच्या ठोक्यावर आणि त्या गजराच्या नादात नाचणार होते. काही पोरं आजूबाजूला बघत होती, तिथून शिकत होती. काही कदाचित त्यांना आधीपासून हे सगळं माहितीच असल्यामुळे, त्यांना नुसता ताल जरी बदलला तरी त्या तालावर नेमका पाय कसा जाणार आहे हे त्यांना अंगीभूत असेल.
मी जिथे उभा होतो, माझ्याबरोबर समोर जो चिमुकला — ज्या जोशात ते सगळं करत होता — तो बघून मी तर थक्क झालो. पखवाज, विठ्ठल — या सगळ्याच नेमकं काय, याची प्रचिती ते छोटसं पोर मला देत होतं. मी मात्र त्याला बघून अवाक होतो. पांढऱ्या शुभ्र आकाशाखाली, त्या हिरवळीमध्ये २००–३०० पोरं हरिपाठ म्हणत होती, त्या नादात गुंग होऊन नाचत होती, विठ्ठलाचा गजर करत होती — हे सगळं माझ्याच घरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या शिबिरात होत होतं — हेच मी स्वतःला सारखं सारखं सांगत होतो.
या शिबिराचं हे १२वं वर्ष. त्यामुळे मुलांची संख्या रोज वाढत जाते आणि पालक आपल्या मुलांना इथे सोडून जातात. स्वतःचं काम स्वतः करणं हे तर मुलं शिकतातच. शिवाय त्याच्यासोबतच ते गीतेतले काही अध्याय शिकतात, अमृतानुभवमधले काही प्रसंग, काही पद शिकतात. ज्या मुलांकडे पखवाज आहे, ती मुलं आपला पखवाज इथे घेऊन आलेली असतात. त्यांनाही पखवाजाविषयीची अधिक माहिती शिकवली जाते. त्याचा रियाज त्यांच्याकडून करून घेतला जातो. योगा शिकवला जातो. असा सगळा भरगच्च दिनक्रम ही पोरं १८ दिवस सलग करणार आहेत आणि मग आपल्या-आपल्या गावी परत जाणार आहेत. बेळगावच्या पंचक्रोशीतील विविध गावांमधून, ठिकाणांमधून आलेली ही मुलांची संख्या आवाक करणारी आहे आणि शिवाय — आपल्या संस्कृतीचे पुढील पाईक कोण — याची जाणीव करून देणारी आहे.
या शिबिरासाठी अख्खं गाव स्वतःच्या परीने, स्वतःच्या शक्तीने मदत करतं. असं एक तप त्यांनी पूर्ण केलंय — या विचाराने या यज्ञामध्ये सहभागी असलेल्या प्रत्येक गुरु-तुल्य, ऋषी-तुल्य व्यक्तीला साष्टांग दंडवत घातल्याशिवाय हा लेख पूर्ण होणार नाही. अजून एक विशेष म्हणजे — या शिबिराच्या पोस्टरवर असं स्पष्ट लिहिलंय की “मुलांनी फोन आणू नयेत, आणि आणल्यास ते जप्त करण्यात येईल.”सामाजिक माध्यम, आपला फोन — आपण या सगळ्याच्या कचाट्यात अडकलेले. आणि आपण अचानक त्या मुलांना १८ दिवस या सगळ्या जंजाळातून बाहेर काढून, निखळ शिक्षण, निखळ आनंद देण्याचं काम इथे होतं — या विचाराने ऊर भरून येतो. अभिमान वाटतो — त्या सगळ्यांचा, मुलांचा, गुरुजनांचा आणि पालकांचा.
Disclaimer
This video was recorded by Vaibhav Lokur at
Shri Siddeshwar Devasthan, Kanbargi, on 5th April 2025.
The children featured are participants of the Balvikas Shibir conducted by Varkari Shikshan Sanstha, Kanbargi. All rights to this video are held by Varkari Shikshan Sanstha. The recorder/author claims no ownership or rights over this content.