प्रसिद्ध देवळांमध्ये रांगेत उभं राहणं, दोन क्षणांसाठी देवासमोर जाऊन लगेच बाहेर निघावं लागणं—या सगळ्याचा मला नेहमीच कंटाळा आणि राग वाटतो. त्यामुळेच मी शक्यतो अशी गर्दी असलेल्या ठिकाणी जाऊन दर्शन घेणं टाळतो. का, हे ठरवून सांगता येणार नाही, पण अशा ठिकाणी गेल्यावर मनःशांती किंवा आत्मिक समाधान कधीच मिळालं नाही.
याचा अर्थ मी देवळात जातच नाही, असं नाही. मी अनेक सुंदर देवळांना भेट दिली आहे, तिथल्या व्यवस्थेचा अभ्यास केला आहे, आणि काही ठिकाणी इतका रमलो आहे की, त्या आठवणी आजही मनात ताज्या आहेत. आज पुन्हा त्या आठवणी उलगडण्याचं काहीतरी खास कारण आहे, म्हणून हा प्रपंच.
सौंदत्ती यल्लम्मा हा काही नवीन विषय नाही. तिच्या जागरूकतेबद्दल, लोकांमध्ये असणाऱ्या अनामिक ओढीबद्दल आणि आस्थेबद्दल इतकं लिहून ठेवलंय, सांगून ठेवलंय की तिच्याविषयी ओढ न लागली तरच नवल! पण खरं सांगायचं तर यल्लम्माला जाऊ असा विचार आम्ही आधी कधी केला नव्हता. आणि नेमकी कालची पहाट.
साधारण चार वाजले असतील, आणि जाग येताच पहिला विचार मनात आला—आज आपण येताना यल्लम्माला जायलाच हवं. याचा काहीतरी विशेष अर्थ नक्कीच असणार, जो कदाचित येत्या काळात उलगडेल. आम्ही काल इंगळेश्वरला सिद्धम्माला भेटायला निघालो होतो. गाडीत बसताक्षणी मी सहज विचारलं, "येताना यल्लम्मा जवळ पडेल का?"
ते दोन टोकं, शिवाय संध्याकाळी सहाची तालीम—ही गोष्ट अशक्य वाटत होती. पण सिद्धम्माला भेटल्यावर तिने सहजच सांगितलं, "अरे जा की आईला भेटून या, ती काळजी घेईल." तिच्या या एका वाक्याने माझ्या मनात काहीतरी हललं. गाडीत बसताच मिथुन म्हणाला, "तीन तास लागतील, दर्शनासाठी अजून एक तासभर जाईल, मुखदर्शन तरी होईल की नाही माहीत नाही."
गाडीत बसलो आणि मिथुन म्हणाला तीन तास लागतील आणि दर्शनासाठी किमान एक तासभर तरी जाईल मुखदर्शन होईल की नाही माहिती नाही. यल्लमा विषयी इतकं वाचलं होतं माहिती होतं की तिथला सगळा मोठा कारभार आणि तिचा मोठा दरबार एवढा माहिती होता की मला असं वाटलं होतं की दिलेल्या वेळेमध्ये जर कळस जरी बघता आला तरी खूप आहे. मी म्हणालो "अरे आपण ना सौंदत्ती मध्ये फक्त प्रवेश करू तू मला हवं तर लांबून दाखव हेच ते देऊळ मी त्याच्यातच समाधानी असेल पण काहीही करून आपल्याला सहा वाजायच्या आत बेळगाव गाठलं पाहिजे." "शक्य नाही हो सगळे एकदम होणार नाही मी काय म्हणतो आपण प्रवास सुरू करूया. तेवढ्यात संजू म्हणाली "ती घेईल काळजी चला." मिथुन नि काय जादू केली माहिती नाही तीन तासांच्या ऐवजी आम्ही साधारण अडीच तासात सौंदत्ती गाठलं.
"सर देवळात जायच्या आधी जोगूळभावीत पाय धुतले पाहिजेत असे म्हणतात" मी आता ठरवलं होतं तसंही कळसच बघायचंय तर आपण पाय धु आणि मग देवळात जाऊ. तसंच केलं. डोंगरापाशी पोहोचलो त्यावेळेला मिथुन म्हणाला "मी तुम्हाला मागच्या बाजूने सोडतो तुम्ही पटकन खाली उतरा जर तुम्हाला रांग कमी दिसली तर रांगेत उभे रहा नाहीतर तुम्ही बाहेरून दर्शन घेऊन परत या. मी इथेच थांबतो. चप्पल गाडीत ठेवा." इथून पुढे जे काही घडलं ते मी जशास तसे सांगणं निव्वळ अशक्य पण हा अनुभव विरून जाऊ नये म्हणून शब्दात मांडण्याचा हा एक वायफळ प्रयत्न.
पाऊल बाहेर ठेवता मी आणि संजू जेव्हा खालच्या दिशेने धावायला लागलो त्यावेळेला मी हे साधारणपणे विसरलो होतो की संजू माझ्यासोबत आहे मी एवढ्या आवेशात धावतोय असं बघून संजू पण त्याच आवेशाने कदाचित धावत होती मिथुनने सांगितल्याप्रमाणे मी जेव्हा त्या स्पीकर पाशी गेलो तेव्हा तिथे एका दारापाशी काही गाई झोपल्या होत्या त्यांनी निव्वळ आत जाणं मुश्किल केलं होतं. आम्ही तसेच पुढे जाणार रांग बघायला तेवढ्यात मी संजूला म्हणालो संजू त्या ऑफिसमध्ये विचार ऑफिस मधल्या माणसांनी मोबाईल बघितला आणि म्हणाले ते काय दार उघड आहे की अजून देऊळ बंद व्हायचे. आम्ही काही ऐकलं नाही आणि आम्ही गायी होत्या त्या दारापाशी गेले मी एकटा असतो तर मी काही ते पार करून गेलो असतो असं मला वाटत नाही संजूंनी मला मार्ग दाखवला आणि मी तिच्या पावलावर पाऊल टाकलं आणि मी आत शिरलो. 100 रुपयाला एक अशी दोन तिकीट घेतली आणि आम्ही तडक आत शिरलो. दोन वळणं घेतल्या क्षणी आम्ही मंदिराच्या एका दारापाशी पोहोचली तिथे गेलो तेवढ्यात एक कॉन्स्टेबल म्हणाली चला पटकन आत या.
आम्ही आत गेलो आणि बघतो तर काय साक्षात आईच उभी होती. सलग अखंड चार मिनिट मी आणि ती असेच होते दोघे तिची पूजा बदलत होते बहुतेक त्यावेळेला त्यामुळे सगळे अलंकार काढले होते सगळे तिच्यावरचे हार गजरे फुल सगळं काढून बाजूला ठेवलं होतं त्यामुळे त्या भरजरी साडी मध्ये नटलेली ती आणि मी असे दोघेच बराच काळ एकमेकांकडे बघत होतो. मागून तीन चार लोक आली म्हणून पुजारी म्हणाले आता तुम्ही जा आम्ही तडक बाहेर पडलो आणि अचानक संजू म्हणाली "वैभव आपलं दर्शन झालंय." आणि मी भानावर आलो .
मग नंतर मिथुन भेटला सिद्धम्माला आधी फोन केला आणि सांगितलं "बघ तुझ्यामुळे हे शक्य झालं" तेव्हा ती म्हणते कशी "तुम्हाला एवढा आनंद झालाय हे बघून मलाच आईने दर्शन दिले असं वाटतंय." आम्ही गाडीत बसलो तेव्हा मिथुन ला मी हा सगळा प्रकार सांगत होतो आणि मिथुन म्हणाला "बघा तुम्हाला कळस बघायचा होता देवीनेच तुम्हाला भेटायला बोलावलं होतं आणि खरं सांगू का तुम्ही जेव्हा जोगुलभावी पाय धुतले तेव्हाच खरं तर तिच्या दर्शनासाठी तिनं दार उघडं केलं होतं तुमच्यासाठी." त्यानंतर लगेच आम्ही बेळगावच्या दिशेने पावलं उचलली तेव्हा पाच वाजले होते, ५:५५ ला मिथुन ने आम्हाला बेळगावात आणलं होतं आणि त्याच्या पुढच्या वीस मिनिटांमध्ये मी तालमीसाठी उभा होतो.
या सगळ्याचे काय अर्थ लावायचे या अनुभवाला अजून शब्दांमध्ये कसं मांडता येईल
याचा शोध मला अजून बरीच वर्ष घ्यावा लागणार आहे एवढं मात्र नक्की.