संत साहित्य आणि त्यातून सहज मांडलेली जीवनाची तत्त्वं – या गोष्टी आपण वारंवार ऐकतो, वाचतो, अनुभवतो. मग परत त्याच गोष्टी सांगण्यात अर्थ काय, असं कुणाला वाटू शकतं. पण म्हणूनच हे संत साहित्य काळाच्या कसोटीत टिकून राहिलं आहे. वेगवेगळ्या प्रांतांतील संतांनी, त्यांच्या त्यांच्या भाषांमध्ये, त्यांच्या काळात लिहिलेलं हे साहित्य – जनमानसात मुखोद्गत झालं आहे, आणि जीवनाचे धडे देणारं आहे.
हे सगळं आठवण्याचं कारण – 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' हा चित्रपट. मोठं नाव असलं तरी या लेखात मी त्याला 'मुक्ताई' एवढंच म्हणणार आहे.
चित्रपट निर्मितीबद्दल भाष्य करायचं नाहीय इथे. त्यापेक्षा महत्त्वाचं आहे – तो अनुभव. पूर्वार्ध ओघाने चालतो. आपल्याला माहीत असलेले अनेक प्रसंग दिसतात – पण लक्षात राहतं त्याचं संगीत. ओळखीचं साहित्य, पण नव्या चालींमध्ये. मी तरी त्या चाली आधी कधी ऐकल्या नव्हत्या. त्या चालींनी आणि नादांनी मला एक नवाच दृष्टिकोन दिला – स्वतःकडे वळण्याचा, आत वाकून बघण्याचा. त्यामुळे संत साहित्याबद्दलची माझी आस्था अजूनच खोल झाली.
आजूबाजूला पॉपकॉर्न सांडणारी मुलं, मोठ्यांचे फोन, गप्पा – हे सर्व पुसट होतं जातं. समोर फक्त माऊलींचं विश्व उलगडतंय. पैठणला शुद्धिपत्र घ्यायला गेलेले भावंडं, रेड्याकडं वेद वदवणं – हे सगळं जसंच्या तसं अंगावर येतं. त्या क्षणी, गृहात एक शांतता उतरते. काही क्षण असे येतात जे केवळ अनुभवण्याचे असतात – समजून घेण्याचे नाही.
"पसायदान" सुरू होतं आणि डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात.
"आता विश्वात्मके देवे" – या शब्दांचा अर्थ नव्यानं उमगतो, त्या प्रसंगामुळे. तो शांत नाद… गूढ प्रकाश… आणि माऊलींचं समाधीकडे सरकणं – हे सर्व अनुभवताना, अगदी भरून येतं. मराठी साहित्यसंस्कृतीतल्या 'अमृतानुभवा'ची निर्मिती – ती एक दिव्य साक्ष वाटते. ज्ञानेश्वर माऊलींनी गीतेचा सार सामान्यांसाठी शब्दबद्ध केलाय, ही कल्पना शब्दांच्या पलीकडची आहे. म्हणूनच – पसायदान ऐकताना डोळ्यात पाणी येत नाही तरच नवल.
कान्होपात्रा, चोखामेळा, जनाबाई, सावता माळी, नामदेव —
सर्व संत एकामागून एक प्रकट होतात, माऊलींना भेटतात… कारण आता ते समाधी घेणार आहेत.
चित्रपट संपतो आणि मी भानावर येतो.
मला परत एकदा आळंदीला जायचं आहे, हे माझ्या मनात ठाम होतं.
पण त्याहीपेक्षा मोठा प्रश्न सतावतो – "असं नेमकं काय झालं, ज्यामुळे मला अश्रू अनावर झाले?"
माऊली जेव्हा त्या गुहेत प्रवेश करतात, कुंडलिनी जागृत करतात, आणि डोळे बंद करतात –
तेव्हा मला मनात एक वेगळी कस्तिरता, एक चंचलता जाणवते. का, ते कळत नाही.
पण त्यासोबत एक आनंदही असतो –
जणू मी काहीतरी सोडून देतोय आणि काहीतरी नव्याने स्वीकारतोय.
आपल्या पिढीला हे माहितीच नाही असं म्हणत बसण्यापेक्षा,
हा चित्रपट त्यांना दाखवावा, त्यावर चर्चा व्हावी, आणि त्या साहित्याशी त्यांची ओळख व्हावी –
हा प्रवास आपण सुरू करू शकतो का?
हा विचार प्रत्येकाने जरूर करायला हवा, असं मला मनापासून वाटतं.