भारत काळे या नवोदित कादंबरीकाराची ऐसे कुणबी भूपाळ ही महाकादंबरी एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीच प्रकाशित झाली. ४८४ पानांच्या या दीर्घ कादंबरीमुळे ललित साहित्यप्रेमी चोखंदळ वाचकांच्या श्री. काळेंबद्दलच्या अपेक्षा नक्कीच बळावल्या आहेत. बर्याच दृष्टिकोनातून तिचे अप्रूप रसिक मनाचा वेध घेते. त्यातील प्रबळ बाब म्हणजे या भूपाळचा भौगोलिक संदर्भ, सांस्कृतिक पार्श्वभूमी.
मराठवाडयातील अंतर्वेदीमधले छोटेखानी गाव. व्यवसायाने गावकरी पिढीजात शेतकरी. त्यातील द्वारकाबाईच्या कुटुंबातील भाऊबंदकीची ही प्रातिनिधिक कहाणी. द्वारकाबाईंनी पतीच्या पश्चात आपल्या विश्वनाथ आणि काशिनाथ या दोन मुलांना मोठे करून त्यांची लग्ने लावून दिली आहेत. पिढीजात मालकीची शेतजमीन बर्यापैकी. दोन्ही भावांना आधुनिक शिक्षणाचा गंध नाही. वातावरण निजाम-शाहीतले प्रतीत होते. हैद्रबाद संस्थानाचे विघटीकरण, मराठवाडयाचे संयुक्त महाराष्ट्रात विलीनीकरण व्हायच्या आधीचा पारंपरिक मराठवाडा मराठी ललित वाङ्मयात दुर्मिळच आहे. त्यात ऐसे कुणबी भूपाळला मानाचे पान मिळावे.
भाऊबंदकी आणि संकुचित दृष्टीने ग्रास-लेल्या द्वारकाबाईच्या कुटुंबात दोन्ही जावा आपापल्या शैलीने कौटुंबिक स्वास्थ्याला तडे देण्यामध्ये व विभक्त होण्यासाठी नवर्यांना चेतवण्या-मध्ये कृतकृत्यता मानणार्या दिसतात. द्वारकाबाई वयस्कच नव्हे, तर जगाचे सजग भान असलेल्या परंतु सुनांपुढे हतबल ठरत चाललेल्या चितारत्या आहेत. संपूर्ण कादंब-रीवर द्वारकाबाईंचे व्यक्तिमत्त्व जिवंत सावलीसारखे छाया करते. ओढूनताणून साधल्यामुळे नव्हे, तर आंतरिक रूजाबलाने ही कादंबरी द्वारकाबाईंची चैतन्ययुक्त जीवनगाथा ठरते. तिचे पर्यवसान त्यांच्या निधनात होते, हा संचिताचा दुर्विलास संवेदनशील वाचकाला भावावा. भाऊबंदकीतून तरारणारी वांझोटी स्पर्धा, केविलवाणी ईर्षा आणि कूपमंडूकी असूया यांचे प्रमाणशील, वास्तवदर्शी चित्रण यांनी ही कादंबरी समृद्ध झाली आहे. द. र. कवठेकर आणि र. वा. दिघेंच्या ग्रामीण वातावरण चितारणार्या कादंबर्यांचे भूपाळ वाचताना स्मरण व्हावे. परंतु दिघ्यांच्या गाजलेल्या सराई, आई आहे शेतात इत्यादी कादंबर्यांपेक्षा भूपाळ उजवी ठरावी. काळेंच्या कादंबरीत स्वप्नाळू
ध्येयवादाची कृत्रिम लकाकी तर नाहीच, पण निम्नस्तरीय सौंदर्यवादाचे हव्यासी सावटसुद्धा तिला ग्रासत नाही. या महाकादंबरीच्या शोकांताकडे प्रथमपासून झालेल्या आशयपूर्ण अपरिहार्य वाटचालीमध्ये वाचक गुंतत जातो.