अर्थ/व्युत्पत्ती : आज+ता+हयात असा तो बनला आहे. आजतागायत म्हणजे जन्मापासून ते आज आतापर्यंत. ताहयात चे मराठीत तागायत होऊन गेले.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
आठवडा
अर्थ/व्युत्पत्ती : संस्कृत अष्टावर्त, अष्टवासर, अष्टवार >> प्राकृत अठ्ठवाड, अठ्ठाह >> मराठी आठवडा; हिंदी अठवाहा, आठवारा; सिंधी आठिड्यो; तेलुगु अठार्वाढ (संदर्भ - दाते कोश ). सोमवार ते सोमवार आठ दिवस अशा अर्थी.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
ओनामा करणे, घालणे
अर्थ/व्युत्पत्ती : शिक्षणाची सुरुवात करताना "ॐ नमो सिद्धम्" या मंत्राने करत. त्यातल्या पहिल्या दोन शब्दांचा अपभ्रंश "ओनामा" - म्हणून कुठल्याही गोष्टीचा आरंभ करणे म्हणजे ओनामा करणे / घालणे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
औरस चौरस
अर्थ/व्युत्पत्ती : औरस चौरस' हा पूर्ण शब्द एकूण क्षेत्रफळ किती आहे हे सांगताना वापरतात. "चौरस”ची व्युत्पत्ती ”चतुरस्र/श्र" अर्थात चारही बाजूंनी संमिती असलेला अशी आहे. "औरस" हे त्याच शब्दाचे प्रासयुक्त द्वित रूप आहे असे कोश सांगतात. पण संतती वगैरेच्या बाबती जो "औरस" शब्द वापरला जातो त्याचे मूळ "उरस्" म्हणजे स्वीय, स्वतः पासून आलेले असे आहे. त्यामुळे कदाचित "औरस चौरस" म्हणजे मध्यापासून चारही बाजू संतुलित असलेला असा आकार (किंवा तसे संतुलन पूर्णपणे कायम राखणारे, नीट घेतलेले मोजमाप) असा असावा.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
कडवे
अर्थ/व्युत्पत्ती : शब्दकोशातली नोंद या शब्दाचा उगम कुठल्याही कवितेत पालुपद जिथे येऊन चरणाचा शेवट म्हणजे "कट" होतो ते कडवें असे सुचवते. पालुपद किंवा ध्रुवपदाला "आखणकडवे" म्हणजे "अखंड + कटवह/वाह" याच कारणाने म्हणतात. अपभ्रंशातल्या "कडवक"चे मूळही बहुधा तेच असावे
दाते कोशातली नोंदः कडवें—न. आंकणकडव्यानें किंवा पालुपदानें जेथें गाण्याचा एक भाग संपतो तो भाग; पद्यविभाग. [कड = शेवट]
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
ताजी
अर्थ/व्युत्पत्ती : ताजी या मराठी शब्दाचा अर्थ/व्युत्पत्ती बघायला गेलो तर तो ताज़ा( تازہ ) या फारशी शब्दापर्यंत घेऊन जातो. फारशी ताज़ा ची फोड ( ता + आज =ताज़ा ) ता म्हणजे पर्यंत. ताज़ा म्हणजे आजपर्यंतचं / आत्ताचं .
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
ताबडतोब
अर्थ/व्युत्पत्ती : ताबडतोब' हा हिंदी-उर्दू 'ताबडतोड' या शब्दावरून आला आहे. हिंदीत त्याचा अर्थ एकानंतर एक, पाठोपाठ किंवा विनाअडथळा. मराठीत त्याला तत्काळ असा अर्थ रूढ झाला.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
दही, ताक
अर्थ/व्युत्पत्ती : दही - दधि पासून, ताक - तक्र पासून. दोन्ही शब्द मूळ संस्कृत आहेत.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
धाय मोकलून रडणे
अर्थ/व्युत्पत्ती : धाय म्हणजे मोठ्याने काढलेला हेल. मोकलणे म्हणजे मुक्त करणे. मुक्तपणे हेल काढून, मोठ्याने रडणे.
अर्थ/व्युत्पत्ती : पाळ हे भुईसमांतर जाणारं तर मूळ उभं अधोगामी जातं, असा संकेत आहे.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
फट् म्हणता ब्रह्महत्या
अर्थ/व्युत्पत्ती : तांत्रिक पूजेत "फट्" हा शब्द मंत्रोच्चारांचे निर्देशसामर्थ्य वाढवतो म्हणून तो म्हणता क्षणीच एखादी अयोग्य क्रियाही सिद्धीस जाऊ शकते. या समजुतीवरून एखादी गोष्ट चुकून सुद्धा होऊ नये नाहीतर भलताच परिणाम होतो या अर्थी आलेला वाक्प्रचार.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
बिंदुस्रावी
अर्थ/व्युत्पत्ती : पूर्वी बोरू अथवा टांकाने लिहित तेव्हा शाईत लेखणी बुडवून नेमकी शाई लेखणीच्या जिभेत कशी माववावी याची एक कला होती. कमी शाई राहिली तर लेखणी लवकर कोरडी पडे आणि जास्त राहिली तर अक्षरांचे स्ट्रोक्स जाडसर उमटत आणि त्यांच्यात सातत्य रहात नसे. लेखन व्यवसाय करणाऱ्या जातींत सुलेखन कसे करावे याचे शिक्षण मुलांना बाळपणीच दिले जाई. लेखणीच्या जिभेत शाई जास्त राहिली तर ठिपका/ बिंदू देताना ती कागदावर चटकन उतरे आणि बिंदूचा आकार बेढब होई. ही प्रतिमा लक्षात घेऊन "बिंदुस्रावी" म्हणजे बिंदू देताना जरूरीपेक्षा अधिक स्रवणाऱ्या लेखणीसारखे लेखन हा वाक्प्रचार जन्माला आला. काहीतरी लहान, क्षुल्लकशी बाब घेऊन त्याचे भरताड वर्णन करायचे, किंवा विचार न करता जरूरीपेक्षा जास्त टीका करायची, किंवा बेतशीर न लिहिता अघळपघळ, भावनोत्कट काही लिहायचे अशा प्रकारच्या लेखनाला "बिंदुस्रावी" लेखन म्हणतात.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
बेसन
अर्थ/व्युत्पत्ती : व्युत्पत्तीकोशात बेसन शब्दाचा मूळ शब्द संस्कृत वेसनम् असा दिला आहे. प्राकृत रूप वेसण. बाक़ी बंगाली, ओड़िया, हिंदीमध्ये बेसन. पंजाबी बेसण. गुजराती वेणस असे दिले आहे. ह्यात संस्कृतीकरण नंतर झाले असावे असा क़यास वर्तवला आहे. "सूपशास्त्र" या रा. रा. रामचंद्र सखाराम गुप्तेंच्या १८७५ साली प्रकाशित पाककृतींच्या पहिल्या मराठी पुस्तकात बेसनाच्या लाडवांची पाककृती दिली आहे. 'बेसन' हा शब्द त्यात लाडू बांधण्यापूर्वी लाडवांसाठीचे जे सैलसर मिश्रण तयार केले जाते त्यासाठी वापरला आहे. बेसन कुठल्याही पिठाचे असू शकते असे त्या पुस्तकातल्या पाककृती वाचून वाटते. उदाहरणार्थ हा उल्लेख पहा - 'उडदांची सोलींव डाळ दळून त्याचें बेसन सदरींप्रमाणे तयार करावे. हें पुष्टिदायक होय.'
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
भोचक
अर्थ/व्युत्पत्ती : बहुचक हा मूळ शब्द. त्याचा अर्थ वाचाळ आणि चावट (बहुचौकस)
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
मथितार्थ
अर्थ/व्युत्पत्ती : मथितार्थ या शब्दांतील मूळ शब्द मथणे असा आहे. मथणे म्हणजे एकवटणे वा घुसळणे.घुसळून काढलेला अर्थ म्हणजे मथितार्थ.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
मियां (कधी याचाच उच्चार म्यां किंवा म्यांहा असाही करतात.)
अर्थ/व्युत्पत्ती : मराठी प्रथमपुरूषी एकवचनी तृतीया आहे ही! पुन्हा माऊलींचीच साक्ष काढायची तर - ते मियां गुरूकृपा नमिले!
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
मुमुक्षु
अर्थ/व्युत्पत्ती : मोक्षाची इच्छा असलेला तो मुमुक्षु. मुमुक्षु हे इच्छार्थक रूप अाहे. मुमुक्षा म्हणजे मोक्षाची इच्छा. तसाच बुभुक्षु/बुभुक्षा म्हणजे अनुक्रमे भक्षणाची' खाण्याची इच्छा असणारा/इच्छा. संस्कृतमध्ये असे अनेक शब्द सापडतील, जे मराठीतही अाले अाहेत. पिपासा-पिण्याची इच्छा' म्हणजेच तहान. जिगीषा-जिंकण्याची इच्छा. जिजीविषा-जगण्याची इच्छा.तितिक्षा-सहन करण्याची इच्छा, सहनशक्ती. जिज्ञासा, तितिर्षा वगैरे
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
मेटाकुटीला येणे
अर्थ/व्युत्पत्ती : दाते - कर्वे कोशांतल्या माहितीनुसार "गुडघ्यांवर उभे रहाणे अथवा गुडघे टेकणे" असा या क्रियेचा अर्थ आहे. याचे "मेटेंखुंटीस, मेटाखुटी, मेटाकुटीस येणें" असेही पर्याय दिले आहेत. "ढोपरखुंटीस येणें" असाही पर्याय आहे. त्यावरून फार कष्ट झाले की उभे रहाण्याची ताकदही न उरणे अशा अर्थाने हा वाक्प्रचार वापरला जातो.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
रांधणे
अर्थ/व्युत्पत्ती : शब्दकोशात पाहिले तर 'रंध्' असे संस्कृत क्रियापद मूलशब्द म्हणून दाखविला आहे!
त्यावरून रांधण:स्वैपाक, रांधणे (नपु): स्वैपाकाचे खापर, रांधप: शिजवलेले पदार्थ, रांधवणी:स्वैपाकाचे पाणी, रांधा:शिजवून केलेले मिश्रण,पाक, असे शब्द दाखवले आहेत. एका शब्दकोड्यात राद्ध असा शब्द स्वैपाकाकरता दाखवला होता!
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
लाखोली वाहणे
अर्थ/व्युत्पत्ती : देवतार्चनाचा एक प्रकार म्हणजे एक लाख फुले / पाने देवाला वाहणे. त्याला "लाखोली वाहणे" म्हणतात. शिव्यांची लाखोली वाहणे म्हणजे रीतसर एखाद्याची तोंडपूजा करणे!
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
शुकशुकाट
अर्थ/व्युत्पत्ती : शुक्क शब्द शून्य, निर्जन या अर्थाचा आहे. एखाद्या शब्दाची द्विरुक्ती स्थितीची तीव्रता दर्शविते. म्हणून शुक्क-शुक्क' वरून 'शुकशुकाट' हा सहज उच्चार!
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
सव्यापसव्य करणे
अर्थ/व्युत्पत्ती : कार्य चालवताना जानवे उजव्या (सव्य) आणि डाव्या (अपसव्य) खांद्यांवरून आलटून पालटून घ्यावे लागते. त्यावरून सव्यापसव्य करणे म्हणजे यातायात करणे किंवा "भूमिके"त प्रसंगानुसार बदल करत रहाणे.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
ससेहोलपट
अर्थ/व्युत्पत्ती : होलपटणे म्हणजे एखादी गोष्ट (जसे, दांडुका किंवा हत्यार) फेकून मारणे. सशांची शिकार करताना त्याला एखाद्या जागेवरून आरडाओरडा करून उठवतात आणि मग तो उघड माळरानावर पळायला लागला की हत्याराने होलपाटून मारतात. अशी शिकार अनेकदा समूहाने केली जाते. त्यावरून अशा प्रकारे त्रास देणे याला 'ससेहोलपट करणे' असा वाक्प्रचार आला.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
सूतोवाच करणे
अर्थ/व्युत्पत्ती : उपनिषदांमध्ये संवादांमध्ये वारंवार "सूत उवाच" अशी सुरुवात आहे, ज्यावरून "सूतोवाच केले" हा वाक्प्रचार रूढ झाला.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
हडेलहप्पी
अर्थ/व्युत्पत्ती : ॲन इंट्रोडक्शन टू कंपॅरेटिव्ह फायलॉलॉजी' या १९१८ साली प्रकाशित इंग्रजी पुस्तकात भाषाशास्त्रज्ञ पांडुरंग दामोदर गुणे यांनी 'हडेलहप्पी' या शब्दाची व्युत्पत्ती “order arms-hordel hupp ’’ या ब्रिटिश जमादाराने कवायतीदरम्यान दिलेल्या आज्ञेतून आली आहे असे लिहिले आहे. order arms म्हणजे बंदुक उजव्या हातात समोर धरून तिचा दस्ता जमिनीवर टेकवून उभे रहा. huddle up (हॉर्डेल हप्प हा नेटिव्ह उच्चार असावा) म्हणजे ताठ/ एकाग्रचित्त उभे रहा. ब्रिटिश सोजिरांच्या अरेरावी वागण्याला एका सैनिकी आज्ञेच्या उच्चाराशी साधर्म्य असलेला मराठी शब्द १८५७ च्या बंडानंतर तयार होणे आणि त्या शब्दाला 'दंडेलीपूर्वक वागणे, अरेरावी करणे' असे अर्थ चिकटणे हे अगदी स्वाभाविक वाटते.