आमच्याबद्दल
ज्येष्ठ साहित्यिक महेश एलकुंचवार ह्यांच्या भाषणातून प्रेरणा घेऊन मराठी शब्द असा फेसबूक गट फेब्रुवारी २०२० मध्ये सुरू झाला. इथे जनसहयोगातून, चर्चा करून मराठी प्रतिशब्द, नवे शब्द, सुंदर शब्द इ. शोधले जातात. ज्यांना ह्यात सहभागी व्हायचे असेल, त्यांनी ह्या गटात अवश्य यावे. ह्या गटात झालेल्या चर्चांचे सार इथे (ह्या संकेतस्थळावर) उपलब्ध केले आहे. ह्यात वारंवार भर पडत राहील आणि नवनवे शब्द बघायला मिळतील.
प्रतिशब्द ठरविण्याबाबत काही विचार/भूमिका
१. एखादा मराठी शब्द आधीपासूनच वापरात असेल आणि आपल्याला अगदी चपखल वाटत नसेल, तरी आपण तो वापरावा. नाहीतर कोणताच शब्द रुळणार नाही.
२. फारसी/उर्दू शब्दांचे काय? जे फारसी/उर्दू वर्षानुवर्षे (शतके) रुळले आहेत, ते आपण घ्यावे. "जे का रंजले गांजले" मधला "रंजले"सुद्धा "रंजिश"वाल्या 'रंज'वरून आलेला आहे.
३. जे शब्द अल्पशिक्षित लोकही वापरतात, त्यासाठी खूप सोपेच शब्द लागतील. आपण तसे देऊ शकलो नाही, तर तिथे इंग्लिश शब्दच वापरला जाणार आहे. उदा. "forward", "share", "message" हे शब्द सगळे लोक वापरतात. तिथे अग्रेषित, सहप्रचीत हे शब्द अर्थपूर्ण असले तरी चालणार नाहीत. तरीही आपल्याला अर्थपूर्ण शब्द आवडतात :( :) . अशावेळी हे अवघड आणि अर्थपूर्ण शब्द "औपचारिक" म्हणून लिहिले आहेत आणि सोपे शब्द अनौपचारिक म्हणून घेतले आहेत. उदा. mask = मुखपटल (औ), मुसकी (अनौ). forward = अग्रेषित (औ) , ढकलगप्पा (अनौ). रोजच्या बोलण्यात आपण अनौपचारिक शब्द वापरू अशी अपेक्षा आहे. साहित्य/समीक्षा लिहिताना औपचारिक वापरता येतील.
४. जे शब्द सगळे लोक तसेही वापरतच नाहीत (तशी वेळ येत नसेल), ते थोडेसे संस्कृतप्रचुर झाले तरी हरकत नाही. उदा. - deja vu = प्रतिस्मरण किंवा self-belief =आत्मधारणा. शिवाय हे शब्द ठरवितानाही प्रचलित शब्द विचारात घेतले आहेत. आत्मविश्वास प्रचलित आहे. म्हणून आत्मधारणा घेतला आहे (स्व-धारणा ऐवजी).
५. काही वेळा एकाऐवजी दोन (क्वचित तीन) शब्द घेतले आहेत. उदा. - itinerary = प्रवासरेखा, प्रवासआखणी. पण खूप जास्त पर्याय ठेवले, तर काहीच रुळणार नाही. कुठेतरी थांबावं लागणारच आहे.
६. दरवेळी शब्द ठरविताना त्यात "सगळाच्या सगळा" अर्थ आलाच पाहिजे असा हट्ट आपण सोडायला हवा. (नाहीतर शब्दकोश लागलाच नसता. आपण त्यात अर्थ बघतो. कारण दरवेळी तो शब्दात नसतो). नाहीतर आपले शब्द बोजड, अवघड होतील आणि मग अर्थातच त्या जागी इंग्लिश शब्द येईल. तंतोतंत, सगळा अर्थ नसला तरी जवळचा, संबंधित, सोपा आणि catchy (पकड घेणारा?) शब्द हवा. उदा. mobile phone साठी कानशा. हा विदर्भातल्या ग्रामीण भागात सहज वापरला जातो. आपण भ्रमणध्वनी, भ्रमणभाषचा जितका आग्रह धरू, तितका mobile वापरला जाणार आहे. पण आपण "भयशंकित" किंवा "प्रमाणभान"चा आग्रह धरू शकतो. कारण ते शब्द मुख्यत: अभिजन वर्ग वापरतो.
७. "शुद्धभाषा-प्रमाणभाषा" हा मुद्दा वारंवार येतो. महाराष्ट्र शासनाने डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे सांस्कृतिक धोरण तयार करण्यासाठी समिती स्थापन केली होती. या समितीने २०१० मध्ये आपला अहवाल शासनाला सोपवला आणि शासनाने तो मान्य केला आहे. या अहवालात मराठीच्या संदर्भात भाषा, विविध बोली व प्रमाणभाषा यावर अतिशय योग्य अशी भूमिका मांडली आहे. हा सगळा अहवाल राज्याच्या संबंधित संकेतस्थळावर उपलब्ध आहे. शासकीय पातळीवर ‘शुद्धलेखन’ असा शब्दप्रयोग न करता ‘प्रमाणलेखन’ असा शब्द वापरावा असे सुचवले आहे. आपलीही ही भूमिका आहे.
आपण मराठीच्या सर्व शैलींचा आणि वैविध्याचा आदर राखू या. प्रमाण भाषेत "केला जातो, केली जाते" आणि प्रादेशिक भाषेत "केल्या जातो". प्रमाण भाषेत "येतेस का", प्रादेशिक बोलताना "येतीस का". प्रमाण भाषेत "केलं" आणि प्रादेशिक बोली भाषेत "केलंन". असे सगळे फरक मान्य करून सर्व शैलींचा आदर राखू या. पण "प्रमाण" असं काहीतरी प्रत्येक भाषेत असणारच. तेही मान्य करून समजून घेऊ या. महाराष्ट्राच्या विविध भागात विविध बोली असल्या तरी सामान्य प्रशासनासाठी, परस्पर व्यावहारिक संवादासाठी, पाठ्यपुस्तकांसाठी प्रमाणभाषेची गरज असतेच. सर्वच भाषांमध्ये "प्रमाण" असं काहीतरी असतंच. उत्तर इंग्लंडमध्ये my ऐवजी me म्हणतात - म्हणजे "my place" ऐवजी "me place". चित्रपटात किंवा मालिकेतलं पात्र तसं बोलतं. प्रत्यक्षात तसं बोलणाऱ्याला कुणी हसत नाही. पण म्हणून वृत्तपत्रात किंवा बीबीसी बातम्यांमध्ये तसं कुणी बोलत नाही. तिथे प्रमाण इंग्लिशच वापरतात. तोच संकेत आपल्याला पाळता येईल.
८. कधी थेट, कधी अप्रत्यक्षपणे प्रश्न येतो, की अमुक-तमुकला मराठी शब्द कशाला हवाय? इंग्लिश वापरायला काय हरकत आहे? मराठी बोलताना पूर्ण मराठी बोलावं आणि इंग्लिश बोलताना छान इंग्लिश बोलावं अशी धारणा असलेले काही लोक आहेत. त्या दिशेने जाण्यासाठी हा गट आहे. त्यामुळे क्रिकेट बघायला गेल्यावर "इथे वेळ कशाला वाया घालवता, घरी अभ्यास करा" म्हटल्यासारखं आहे हे. सामना बघायची इच्छा असलेलेच तिथे जातात. (टेबल, पिन, पेन इ. रुळलेल्या शब्दांना इथे प्रतिशब्द शोधले जात नाहीत).