vijaysthamb

विजयस्तंभ

विजयी राजा सैन्यासह नगरात शिरला. अनाथ बालके, विधवा स्त्रिया, लुळेपांगळे पुरुष या सर्वाना तो सांगत सुटला, 'या, माझ्याजवळ या. मी शांतीचा उपासक आहे.'

पण कुणीही त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवायला तयार होईना.

राजाला फार वाईट वाटले. नगरमध्ये एक मोठा स्तंभ उभारून त्यावर आपला संदेश कोरण्याचा त्याने निश्चय केला.

एक प्रचंड स्तंभ तयार झाला. एखाद्या योगिनीप्रमाणे दिसणारी शान्तिदेवतेची आकृती त्याचावर कोरण्यात आली. त्या देवतेच्या डोळ्यांत आईचे वात्सल्य होते; गळ्यात फुलांच्या माळा होत्या; ओठांवर उषेचे स्मित होते; हातां मेघांचे कुंभ होते.

तो स्तंभ सर्वांना दिसावा म्हणून नगरच्या मध्यभागी उभा करण्याचे ठरले. त्याच्याकरिता एक जागा खणण्यात येऊ लागली. ती खणता खणता अनेक फुटकेतुटके दगड सापडू लागले. त्या दगडांवर चित्रविचित्र आकृती कोरलेल्या होत्या. त्या आकृतीचा अर्थ कुणालाच कळेना!

सारे दगड बाहेर काढून दूर दूर एका पर्वतावर राहणाऱ्या श्रेष्ठ संशोधकाकडे पाठवण्यात आले.

राजाने तयार कराविलेला स्तंभ नगरच्या मध्याभाघी मोठ्या थाटामाटात उभारण्यात आला. प्रत्येक नागरिक जाता येत त्या स्तंभापाशी थांबे, शान्तिदेवतेला वंदन करी आणि 'मी शांतीचा उपासक आहे.' हे त्याच्यावर कोरलेले शब्द उच्चारीत पुढे चालू लागे.

राजा कृतकृत्य झाला.

संशोधकाला त्या दगडावरील आकृत्यांचा अर्थ लागला की नाही हे पाहण्याकरिता एके दिवशी राजा त्या दूरच्या पर्वतावर घेला. संशोधक आनंदाने नाचत त्याला म्हणाला,

'महाराज, हे दगड साधे नाहीत. त्या सर्वांवर मिळून एक आकृती कोरलेली आहे. आकृतीच्या डोळ्यांत आईचे वात्सल्य आहे; गळ्यात फुलांच्या माळा आहे; ओठांवर उषेचे स्मित आहे; हातां मेघांचे कुंभ आहेत. 'मी शांतीचा उपासक आहे' असे शब्द त्या आकृतीखाली कोरले आहेत. हे सारे दगड जुळवून ती मूर्ती आपण तयार करावी आणि नगरदेवता म्हणून तिची स्थापना करावी अशी माझी आपल्याला प्रार्थना आहे. फार फार प्राचीन शिल्प आहे हे! या शिल्पातली कला सुद्धा किती सुंदर आहे!'

राजा काहीच न बोलता खाली मान घालून का निघून गेला हे त्या संशोधकाला कळेना!

( 'वनदेवता' )