मनोगत
मनोगत
माझं नाव स्नेहा रणजित कलाटे. एक साधी गृहिणी, एक सामाजिक कार्यकर्ती आणि एक जबाबदार पत्नी या भूमिका मी आयुष्यात अतिशय मनापासून निभावत आहे. मी माझ्या सामाजिक कार्याची सुरुवात केवळ सेवाभाव आणि समाजाप्रती असलेल्या प्रेमातून केली आहे. माझं शिक्षण तांत्रिक क्षेत्रात – अभियांत्रिकी शाखेतील पदविका घेऊन पूर्ण झालं. शिक्षण घेत असतानाच मला समाजातल्या विविध समस्यांची जाणीव होऊ लागली. महिला, मुलं, वृद्ध, दिव्यांग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या जीवनातील अडचणी बघून मन अस्वस्थ होई. याच अस्वस्थतेतून मी समाजकार्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं.
माझे वडील श्री. कालिदास वाडेकर आणि आई श्रीमती शीला वाडेकर हे दोघेही सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रीय होते. त्यांचं सतत जनतेसाठी धावणं, कोणताही भेदभाव न करता मदतीसाठी तत्पर राहणं, हेच माझं प्रेरणास्थान ठरलं. लहानपणापासूनच समाजसेवेचं बाळकडू मला घरातूनच मिळालं. त्या संस्कारांचा पगडा माझ्या आयुष्यावर कायम राहिला.
लग्नानंतर माझे पती श्री. रणजित गुलाब कलाटे आणि दीर श्री. संतोष गुलाब कलाटे यांनी मला समाजकार्याची संधी दिली. त्यांनी प्रत्येक टप्प्यावर मला प्रोत्साहन दिलं, आणि त्यांची साथ हेच माझं खऱ्या अर्थानं बळ बनलं. २०१६ साली आम्ही "रणजित आबा कलाटे फाउंडेशन" ची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून आम्ही अनेक सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक उपक्रम राबवले आहेत.
कोविड काळात हजारो लोक अन्न, औषधे, आणि वैद्यकीय सुविधा मिळवण्यासाठी संघर्ष करत होते. त्या काळात आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही हजारो लोकांना जेवण, किराणा साहित्य आणि आरोग्य सेवा पोहोचवल्या. हा काळ माझ्यासाठी एक मोठा धडा होता. लोकांची व्यथा जवळून पाहिली, ऐकली आणि त्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न केला.
फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत अनेक उपक्रम राबवले आहेत:
वाकड परिसरातील १०,००० पेक्षा अधिक कुटुंबांना मोफत छत्र्या वाटप,
महाड येथील पूरग्रस्तांना आर्थिक मदत व जीवनावश्यक साहित्य,
दिव्यांग महिलांना स्वयंपाकासाठी घरगुती वस्तूंचे वाटप,
आधार कार्ड कॅम्प,मतदार नोंदणी अभियान,
70 वर्षावरील जेष्ठ नागरिकांसाठी आयुष्यमान भारत वयवंदन योजना,
२०२२, २०२३, २०२४ आणि २०२५ या वर्षाच्या मराठी कालनिर्णय दिनदर्शिकेचे प्रकाशन,
नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप, रक्त तपासणी शिबिर,
शालेय विद्यार्थ्यांसाठी लेखन साहित्य आणि बक्षीस वितरण,
बुद्धिबळ, चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन,
महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिरं आणि सक्षमीकरण कार्यशाळा
या सर्व कार्यामागे एकच भावना होती – “समाजात सकारात्मक बदल घडवायचा.”
महिला सक्षमीकरण हे मला अतिशय जवळचं वाटणारं क्षेत्र आहे. आजही आपल्या समाजात महिलांना शिक्षण, आरोग्य, आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळण्यात अडचणी येतात. मी या अडचणी दूर करण्यासाठी कार्य करत आहे. महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी मी प्रशिक्षण वर्ग, स्वयंरोजगारासाठी मदत योजना आणि आरोग्यविषयक जागरूकता शिबिरं आयोजित करते.
माझं एक स्वप्न आहे – पिंपरी-चिंचवड परिसरातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत मदत पोहोचवायची. कोणीही उपाशी झोपू नये, कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये, कोणालाही औषधोपचारांअभावी जीव गमवावा लागू नये – हीच माझ्या आयुष्याची दिशा आहे.
माझं कार्य सोशल मीडियावरही पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असते. आमच्या "Sneha Ranjeet Kalate" या यूट्यूब चॅनेलवरून आम्ही आमचे उपक्रम, जनजागृती संदेश आणि प्रेरणादायी व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवतो. समाजातील सामान्य माणसाच्या कथा, त्यांची संघर्षमय यशोगाथा मी जगासमोर आणण्याचा प्रयत्न करते.
भविष्यात मी शिक्षण, आरोग्य आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी अधिक मोठ्या प्रमाणात काम करू इच्छिते. मी स्वप्न पाहते की प्रत्येक घरात शिक्षण असेल, प्रत्येक महिलेला तिचा आत्मसन्मान आणि हक्काची जागा मिळेल. मी फक्त मदत करणारी व्यक्ती न राहता, एक प्रेरणा बनायचं स्वप्न बघते.
अशा या सेवायात्रेमध्ये अनेक अडथळे आले, टीकाही झाली, पण मी कोणत्याही अडचणींना न जुमानता माझ्या ध्येयाशी प्रामाणिक राहिले. माझ्यासाठी समाजसेवा म्हणजे "कर्तव्य" आहे, प्रसिद्धी नाही. मला कोणत्याही पदाची किंवा पुरस्काराची अपेक्षा नाही, पण एका लहानशा मुलाच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण झालं, एखाद्या वृद्धाचा आशीर्वाद मिळाला, की वाटतं – मी योग्य मार्गावर आहे.
अखेरीस, मी सर्व वाकड आणि पिंपळे-निलख परिसरातील नागरिकांची मनापासून आभारी आहे, ज्यांनी मला नेहमीच पाठिंबा दिला. माझं कुटुंब – माझे पती रणजित कलाटे आणि दीर संतोष कलाटे हे माझ्या या प्रवासाचे खरे आधारस्तंभ आहेत. त्यांच्याशिवाय हे सर्व शक्य झालं नसतं.
मी हे मनोगत एका विनम्र सेवकाच्या नात्याने मांडते – जो समाजासाठी काम करत आहे आणि शेवटपर्यंत करत राहील. समाजाच्या आशीर्वादाने, मी माझं कार्य अधिक व्यापक आणि प्रभावी बनवीन, हीच आशा.
धन्यवाद..!