“मरणाऐवजी मी जगायचं ठरवलं...!”
Real Stories / Blogs जगण्याच्या सत्य कथा
“मरणाऐवजी मी जगायचं ठरवलं...!”
येथे त्या व्यक्तींच्या प्रेरणादायी कथा आहेत ज्यांनी आत्महत्येच्या उंबरठ्यावरून मागे वळून जीवनाची नवी वाट धरली.
“जगायचंय रे पुन्हा...” यामुळे त्यांचं आयुष्य पुन्हा उजळलं.
“एका फोन कॉलने बदललं ( साहांभूतीने ) माझं आयुष्य”
संचालिका “ललिता नवसागर यांच्या एका शब्दाने थांबवलं माझं पाऊल”
“मानवसेवेमुळे मिळाली जगण्याची दिशा”
Blog Titles.... collapsible group
उतरत्या वयात आधाराची आस आणि आत्महत्येचा शेवटचा विचार...
लिलाबाई ओंकार जाधव... एक वयोवृद्ध आजी, ज्यांच्या आयुष्याची कहाणी अनेक चढ-उतारांनी भरलेली आहे. बालपणीच त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्या भविष्याची चिंता करत वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी लग्नाचा निर्णय घेतला. मुडी मांडळ या गावी श्री. सदा दुला यांचे द्वितीय चिरंजीव श्री. पुंडलीक सदा संदानशिव यांच्याशी २७ एप्रिल १९६९ रोजी लिलाबाई विवाहबंधनात अडकल्या. काही दिवस सुखाचे गेले, पण लवकरच त्यांच्या पतीला अल्सर या आजाराने ग्रासले आणि त्यातच त्यांचा अंत झाला.
अल्पवयात वैधव्य आल्याने लिलाबाई पुन्हा आपल्या आई-वडिलांकडे राहू लागल्या. त्यांचे वडील मुंबई येथे म्हाडा विभागात नोकरी करत होते. काही वर्षांनंतर, उतरत्या वयामुळे त्यांचे नैसर्गिक निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या जागेवर लिलाबाईंच्या आईला म्हाडामध्ये नोकरी मिळाली. त्या वेळी लिलाबाईंचं वय ४० ते ४५ वर्षांच्या आसपास होतं. पतीच्या निधनानंतर त्यांनी पुनर्विवाहचा विचारही केला नव्हता. त्यातच त्यांच्या लहान बहिणीचं लग्न झालं आणि आईचंही उतरतं वय झालं होतं. आईला दमा (आस्थमा) चा त्रास असल्यामुळे तिला लिलाबाईंच्या मदतीची नितांत गरज होती.
उतरत्या वयामुळे आईला कामातून आराम मिळावा म्हणून लिलाबाईंनी म्हाडातील नोकरीचा राजीनामा दिला. आता दोघींच्या घरखर्चाची संपूर्ण जबाबदारी लिलाबाईंच्या खांद्यावर आली. त्यांनी लोकांच्या घरी धुणी-भांडी करून आई आणि स्वतःचा उदरनिर्वाह चालवला. काळ पुढे सरकत होता आणि एके दिवशी त्यांची आईही या जगात राहिली नाही. आता लिलाबाई पूर्णपणे एकट्या पडल्या होत्या.
एकटेपणा असह्य झाल्यावर त्या नातेवाईकांकडे जाऊन राहू लागल्या. तिथे त्या घरची सर्व कामं करत होत्या. त्यांच्या कामामुळे नातेवाईकांना त्यांचा खूप आधार वाटायचा. बऱ्याच नातेवाईकांना असं वाटायचं की लिलाबाईंनी कायम त्यांच्याकडेच राहावं, कारण त्या घरातली सगळी कामं अगदी चोखपणे करत होत्या.
नातेवाईकांच्या गरजा पूर्ण करता करता कधी त्या स्वतः उतरत्या वयात पोहोचल्या, हे त्यांना कळलंच नाही. आणि आता, जेव्हा त्यांच्या हातून पूर्वीसारखं काम होत नाही, तेव्हा त्यांच्यावर भटकंतीची वेळ आली आहे. आता त्यांना कोणीही जवळ येऊ देत नाही. लिलाबाई फोन करून लोकांना आसरा मागतात, पण या जगात उतरत्या वयात कुणीही आधार देण्यासाठी तयार नाही.
काही दिवसांपासून लिलाबाई त्यांच्या लहान बहिणीला फोन करून बोलत होत्या की, "आता माझं उतरतं वय झालं आहे, तुझ्याकडे मला थोडा आधार दे." अशा केविलवाण्या शब्दांतून त्या आपल्या बहिणीकडे मदतीची याचना करत होत्या. पण त्यांची बहीण त्यांना नेहमीच टाळत असे. 'माझ्याकडे येऊ नकोस, मी बाहेर आहे,' असं म्हणून ती नेहमी फोन कट करायची.
उतारत्या वयात त्या आपल्या सख्ख्या नातेवाईकांच्या दारात केवळ आधाराची याचना करत होत्या. पण म्हणतात ना, 'घरचे झाले थोडे आणि परके झाले जास्त', तसंच काहीसं त्यांच्या बाबतीत घडलं. सख्ख्या बहिणीनेही त्यांना सहारा देण्यास नकार दिला. निराशेच्या गर्तेत लोटलेल्या लिलाबाईंना स्वतःचं आयुष्य संपवण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग दिसत नव्हता. कोणावर विश्वास ठेवायचा? कोणीही साथ देत नसेल, तर जगायचं कशासाठी? याच विचारांनी त्या पूर्णपणे खचून गेल्या होत्या.
शेवटी, हताश होऊन त्यांनी बहिणीकडे मदतीचा हात मागितला. उतरत्या वयात आधार मिळेल या आशेने बहिणीच्या दारात उभ्या राहिल्या, केविलवाण्या नजरेने तिच्याकडे पाहिलं. पण बहिणीचं मन दगडासारखं कठोर झालं होतं. तिने लिलाबाईंना साफ नकार दिला. आता लिलाबाईंनी मुंबई गाठण्याचा निर्धार केला. गळ्यात एक चिठ्ठी बांधायची आणि धावत्या ट्रेनखाली उडी घेऊन स्वतःचं जीवन संपवायचं, असा विचार त्यांच्या मनात पक्का झाला होता.
नाशिकमध्ये आल्यावर त्यांनी पुन्हा एकदा बहिणीचा शोध घेतला. पण दिवस मावळला आणि सायंकाळ झाली. आता जायचं कुठं, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. अशा परिस्थितीत त्यांना जगताप नावाच्या त्यांच्या मानलेल्या बहिणीची आठवण झाली. त्या त्यांच्याकडे गेल्या आणि रात्रभर तिथेच राहिल्या. त्यांनी आपल्या मनातील सगळी व्यथा जगताप बाईंना सांगितली. 'आता माझ्यापुढे आत्महत्येचाच मार्ग उरला आहे,' हे सांगताना त्यांचा आवाज कातर झाला होता.
मुंबईला जाऊन स्वतःला संपवण्याच्या विचारात असलेल्या लिलाबाईंना जगताप बाईंनी समजावलं. त्या त्यांना घेऊन थोरात बाईंकडे गेल्या. थोरात बाईंनीही परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं आणि त्याच रात्री ११ वाजता नवसागर सरांना फोन करून घडलेली हकिकत सांगितली. नवसागर सर म्हणाले, "उद्या सकाळी त्यांना घेऊन मानवसेवा वृध्दाश्रमात या."
दुसऱ्या दिवशी सकाळी लिलाबाईंना घेऊन त्या नवसागर सरांकडे मानवसेवा वृध्दाश्रमात पोहोचल्या. उतरत्या वयात जेव्हा त्यांना आधार मिळाला, तेव्हा त्यांचे हृदय कृतज्ञतेने ओथंबून आले. त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. त्या म्हणाल्या, "जर मला सहारा मिळाला नसता, तर माझ्यासमोर आत्महत्येव्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय उरला नव्हता."
या हृदयद्रावक घटनेच्या माध्यमातून मला सर्वांना एकच गोष्ट सांगायची आहे, की आता हा दिखाऊपणा बंद करा. आज अनेक वयोवृद्ध लोक आत्महत्येचा मार्ग शोधत आहेत. कारण उतारत्या वयात त्यांना कोणीही आधार देत नाही. त्यामुळेच त्यांच्यासमोर आत्महत्येव्यतिरिक्त दुसरा कोणताही मार्ग शिल्लक उरत नाही. सरकारकडून केवळ पोकळ आश्वासनं मिळतात. उतरत्या वयात आमचं कोण करणार, हा प्रश्न त्यांना सतावत असतो.
मुख्यमंत्री साहेब, आता तरी डोळे उघडा! आमच्यावर उतरत्या वयात आत्महत्या करण्याची वेळ येत आहे. नातेवाईकांवर आम्ही ओझं बनत असल्यामुळे आम्हाला घराबाहेर काढलं जात आहे. वृद्धाश्रमाकडे जावं, तर शासनाकडून वृद्धाश्रमांना कोणतीही मदत मिळत नसल्यामुळे ते तरी आमचा स्वीकार कसा करणार? वृद्धाश्रम म्हणजे केवळ एक दिवसाची ॲक्टिव्हिटीज नाही, तर ते आमचं हक्काचं घर आहे. मुख्यमंत्री साहेब, तुमची लाडकी बहीण कधी तुमच्यावर अवलंबून होती का? तिने कधी लाडक्या बहिण योजनेची मागणी केली होती का?
मुख्यमंत्री साहेब, आमचा उतरत्या वयातील खरा सहारा म्हणजेच वृद्धाश्रम. आम्हाला या व्यवस्थेसाठी हृदयस्पर्शी मदतीची गरज आहे. उतरत्या वयात केवळ आश्वासने नको आहेत, तर शासनाकडून मदतीचा हात वृद्धाश्रम चालवणाऱ्या संस्थांना हवा आहे, जेणेकरून बेघर आणि निराधार वयोवृद्धांना एक सुरक्षित आश्रयस्थान मिळू शकेल. हे केवळ आकडे किंवा योजना नाहीत, तर जिवंत माणसं आहेत, ज्यांना केवळ आधाराची आणि मायेच्या स्पर्शाची गरज आहे.
चैताली प्रसाद धुळेकर हिने सांगितलेल्या सत्य घटनांवर आधारित जीवनकथा,
माझे नाव चैताली प्रसाद धुळेकर असून माझे वय २७ वर्षे आहे. माझे वडील निरंजन सरोदे यांनी माझा विवाह २०२० मध्ये प्रसाद धुळेकर यांच्याबरोबर लावून दिला. त्यानंतर काही काळातच माझ्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर माझी आई एकटी पडली. काही वर्षे आईने कुणाचाही सहारा नसताना एकटीने काढली.
गावातील एका प्रतिष्ठित व्यक्तीने माझ्या आईसाठी एक स्थळ आणले. ते शिक्षक पदावर होते, परंतु त्यांची पत्नीचे निधन झाले होते आणि त्यांना मूलबाळ नव्हते. त्यांनाही आयुष्यभरासाठी जीवनसाथी हवी होती. आईने होकार दिला आणि श्री. सुभाष भिरुड यांच्याबरोबर माझ्या आईचे लग्न झाले.
आईच्या लग्नानंतर काही दिवसांनी माझे पती प्रसाद धुळेकर यांना ब्रेन ट्यूमर हा आजार असल्याचे निदान झाले. त्याच वेळी मी एका मुलीला जन्म दिला होता. माझ्या पतीने तिचे नाव शर्वरी ठेवले आणि आम्ही आनंदात जगत होतो. घरात फक्त सासूबाई होत्या, त्या पवन नगर सिडको नाशिक, येथे कपड्यांचा व्यवसाय करत असत.
माझी मुलगी शर्वरी प्रसाद धुळेकर हिला माझ्या पतीने बालवाडीत टाकले. काही दिवसांतच माझ्या पतीचेही निधन झाले.
पतीच्या निधनानंतर सासूबाईंनी माझा व मुलीचा सांभाळ करण्यास स्पष्ट नकार दिला. मी आईला कळवले असता आई म्हणाली, "मी पण सांभाळू शकत नाही."
कुणाचाही सहारा उरला नसल्यामुळे मी एका बाईकडे भाड्याने खोली मागण्यासाठी गेले आणि तिला माझी संपूर्ण हकिकत सांगितली. त्या बाईने मला विचारले, "लग्न करणार का...?" माझ्यासमोर प्रश्न उभा राहिला, कारण लहान मुलगी सोबत होती आणि खोली भाड्याने घेतली तरी आमच्याकडे घर खर्च चालवण्यासाठी भांडी, पैसा काहीच नव्हते. मी त्यांना विचारले, "मला स्वीकारतील का? मला मुलगी आहे, तिचा सांभाळ ते करतील का?"
त्या बाईने ज्या मुलाची स्तुती केली, त्याच्याकडे बागाईत शेती होती, त्याला तीन-चार भाऊ होते, आणि ते सर्व एकत्र एका विचाराने वागत होते. माझ्या मुलीला ते सांभाळतील,का? असे मी त्या बाईला विचारले असता त्यांनी होकार दिला आणि त्या बाईने लगेच फोन केला सविस्तर माझ्याबद्दल बोलल्यावर ते म्हणाले, "आम्ही बघायला येतो." त्या बाईने मला तिच्याच घरी ठेवून घेतले.
दुसऱ्याच दिवशी ते आले. त्यांनी मला बघितल्यावर लगेच होकार दिला आणि माझ्या सर्व अटी मान्य केल्या.
नाशिक पंचवटीतील एका देवा-ब्राह्मणाकडून आमचे लग्न लावण्यात आले आणि ते मला वाई या गावी घेऊन गेले.
सुरुवातीस त्यांनी मला खूप जीव लावला, परंतु त्यानंतर थोड्या थोड्या गोष्टींवरून वादविवाद आमच्यात होऊ लागले. ते मुलीलाही नीट बोलत नव्हते तिची हेळसांड करु लागले आणि मलाही थोड्या थोड्या गोष्टींवरून, कामावरून मारहाण करू लागले. मी ही खंत खोलीवाल्या बाईला फोनवरून सांगितली.
ती बाई दुसऱ्याच दिवशी वाईला आली. त्यांनी तिला काय सांगितले, हे मला माहीत नाही, पण ती मलाच समजून सांगायला लागली की, तुला कुणाचा सहारा नाही, म्हणून ते सांगतील तशी कामे वेळेत केली पाहिजेत. ती म्हणाली, ऐकलेय तर "तुझं भलं होईल,याच उद्देशानेच मी तुझं लग्न केले. ते बागायतदार आहेत, तुला शेतावर जाऊन कामे करावीच लागतील."
मी म्हणाले, "माझी लहान मुलगी आहे, काम करू देत नाही. मला पण काम करता येत नाही. मी अशी कामे कधीच केली नाहीत आणि करणार पण नाही! ठेवायचे असेल तर ठेवा, नाहीतर मला जाऊ द्या."
यावर ती बाई म्हणाली, "मला यानंतर काही सांगायचे नाही. मला फोन देखील करायचा नाही व माझे नाव पण घ्यायचे नाही. मी तुझ्याच भल्यासाठीच केलं होतं, मला काय माहीत तुझी अशी वागणूक आहे."
त्यानंतर मी पतीला म्हणाले, "मला इथे राहायचे नाही, मला व माझ्या मुलीला जाऊ द्या." ते म्हणाले, "ठीक आहे. तुला जायचे तर जा, पण पोलिस ठाण्यात जाऊन तुला सांगावे लागेल की तुला राहायचे नाही, असे सांगून लिहून दे! मलाही या जबाबदारीतून मुक्त कर." पोलीस ठाण्यात गेल्यावर त्यांनी माझ्याकडून काय लिहून घेतले, हे मला माहीत नाही.
त्यानंतर मी पुन्हा नाशिकला आले. मी एका बाईला बोलत उभी होते, तिला म्हणाले, "कुठे मला सहारा मिळेल का?" तेवढ्यात एक व्यक्ती त्या बाईच्याच ओळखीचा जवळ आला. त्याला सर्व हकिकत सांगितल्यावर तो मला "भला" माणूस वाटला. बोलण्यावरून ते आमच्याच गावाकडील निघाले. त्यांनी माझे नाव, गाव विचारले. मी माझे नाव चैताली धुळेकर सांगितले. त्यांचे नाव महाडिक असल्याचे त्यांनी सांगितले आणि ते पाथर्डी फाट्यावर राहत असल्याचे म्हणाले. मी त्यांना माझी संपूर्ण सत्य हकिकत सांगितली.
त्यानंतर त्यांनी मला त्यांच्या मोटारसायकलवर बसवून घरी आणले. घरात त्यांची पत्नी नव्हती. त्यांनी सांगितले की, त्यांच्या पत्नीचे निधन झाले आहे. आता घरात फक्त त्यांचा एक मुलगा आणि तेच राहतात. त्यांची एक मुलगी आहे, परंतु बाहेरील देशात राहते. त्यांच्या पाच खोल्यांपैकी चार खोल्या भाड्याने दिल्या आहेत. महाडिक काका माझ्यापेक्षा वयाने मोठे परंतू वडिलांच्या वयात असल्यामुळे मी त्यांना महाडिक काकाच म्हणू लागले. त्यांच्याकडे धुणीभांडी व स्वयंपाकासाठी बाई ठेवलेली होती.
महाडिक काका मला व माझ्या मुलीला खूप जीव लावू लागले. दोन-तीन दिवस घरातच होतो. त्यानंतर मला ते त्यांच्यासोबत कामावर घेऊन जाऊ लागले. कारण त्यांचा छोटासाच व्यवसाय देखील होता.
एके दिवशी महाडिक काका मला म्हणाले की, "चैताली, मी खूप दुःखी जीवन जगत आहे.माझी बायको गेल्यापासून एकटाच पडलो आहे. सर्व सुख-सुविधा आहेत, परंतु बायकोचे सुख मिळत नाही. मला आयुष्यभराची साथीदार हवी आहे. चैताली, करशील का माझ्याबरोबर लग्न? कुठलीच गोष्ट कमी पडू देणार नाही, राणीसारखेच ठेवेल."
मी म्हणाले, "काका, मी तुमच्या मुलीसारखी आहे. असे कसे बोलता तुम्ही?"
ते लगेच म्हणाले, "ठीक आहे. तू मला खूप आवडतेस म्हणून म्हटले. तुला पण नवरा नाही, तू पण जवान आहेस, तुझ्या पण इच्छा असतील, त्या मी पूर्ण करू शकतो. मला पण बायकोची कमतरता भासत आहे. चैताली, तुला राणीसारखे ठेवतो, जर तू माझ्याबरोबर लग्न केले तर. बोल, विचार कर. जर तुला माझ्या मुलाबरोबर लग्न करायचे नसेल, तर माझ्या मुलाबरोबर लग्न कर. तो पण एकटाच आहे. तुझं चांगलं होईल. तुला कुठलेच काम करावे लागणार नाही. तुझ्या मुलीचे पण चांगले होईल."
महाडिक काकांना मी खूप आवडल्यासारखे मला वाटू लागले. मी थोडा विचार करू लागले. त्यांचा मुलगा माझ्याच वयाचा होता, दिसायला छान होता, परंतु हाता-पायाने त्याला अपंगत्व आल्यामुळे त्याला कोणी मुली देत नसेल, असे मला वाटू लागले. परंतु मी पण कशी त्याच्यासोबत लग्न करणार! मी फक्त आश्रयास आले होते.
त्यानंतर महाडिक काकांच्या नजरेत हळू हळू बदल होऊ लागला, मी त्यांना नकार दिल्यामुळे ते वेगळ्याच भावनेतून माझ्याशी वागू लागले.
काही दिवसानंतर लगेच त्यांनी मला सांगितले की, गच्चीवर एक चांगली खोली पाहुण्यांसाठी काढलेली आहे. "त्या रूममध्ये तू एकटी राहिलीस तरी हरकत नाही. कारण जर तू घरात राहिलीस, तर लोक प्रश्न करतील.माझी बदनामी होईल की,या मुलीला कसे घरात ठेवले तुमचे नाते काय आहे म्हटल्यावर काय सांगणार त्यासाठी मी तुला वरच्या खोलीत ठेवतो तिथे तु राहतेस हे देखिल कुणालाच कळणार नाही जर समजले तरीदेखील लोकांना सांगेल की, तू भाडेकरू आहे, परंतु मी तुझ्याकडून एक रुपयादेखील घेणार नाही." मी म्हणाले, "ठीक आहे." त्यांनी मला साफसफाई करून झोपण्यासाठी ती एकांतात असलेली खोली दिली.
भाडेकरू म्हणून रितसर इंदिरानगर पोलिस ठाण्यात त्यांनी माझी नोंदणी करून घेतली.
महाडिक काका रोज मला सोबत कामावर घेऊन जाऊ लागले. माझ्या मुलीला घरीच ते त्यांच्या अपंग मुलाला सांभाळायला लावू लागले आणि कामाचे नाव सांगून वेगवेगळ्या ठिकाणी मोटारसायकलवर दिवसभर घेऊन फिरत होते. हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जात होते, चांगले चांगले खायला घालत होते. कधी कधी हिंदी चित्रपट बघायला घेऊन जाऊ लागले. तिकिट मात्र सर्वांच्या मागचे असायचे. अंधार झाला की, मला खेटून बसायचे, अंगावर हात टाकायचे. मला आवडत नव्हते, मी हात काढून टाकायची, परंतु ते मुद्दाम होऊन टाकायचेच. मी त्यांना बोलायची, "काका, असे काय करता? मला कसं तरीच होतं." ते म्हणाले, "काय होते? होऊ दे ना!" मी गप्पच बसले.
त्याच दिवशी संध्याकाळी घरी आले, शर्वरीला जवळ घेतले आणि वरच्या खोली मध्ये शर्वरीला घेऊन गेले. महाडिक काका माझ्याशी असे का अश्लीलता न बाळगता असे का वागत आहेत, याचा मी विचार करू लागले. मी त्यांच्या मुलाबरोबर लग्न करते म्हणाले, तर असे ते करणार नाहीत, असा विचार करून आज बोलूनच टाकायचे, असे ठरवले.
मी शर्वरीला घेऊन खाली आले. महाडिक काका बाहेर गेले होते. मी त्यांच्या मुलाजवळ जाऊन बसले, त्याला विचारले की, "माझ्याबरोबर लग्न करतोस का?" मी मजबुरी म्हणून त्याचा हात हातात घेऊन विचारले. तो नाही म्हणाला आणि चटकन माझा हात बाजूला केला.
तेवढ्यातच एका बाजूवाल्या बाईने ते शब्द खिडकीतून ऐकले व आत आली व म्हणाली, "चैताली, चल माझ्या खोलीत बसून तुला एक सांगायचे आहे." तिने मला बाजूलाच असलेल्या तिच्या खोलीत नेले आणि म्हणाली, "अगं चैताली, मी एक विचारू का? राग मानू नकोस. महाडिक साहेबांबरोबर लग्न कर. मी तुझं ऐकलेय, तू त्यांच्या मुलाला 'लग्न करतो का' बोलताना. माझं ऐक, त्या मुलाला काहीच कळत नाही. महाडिक साहेबांनाच खरी तुझी गरज आहे. ते फक्त जगाला दाखविण्यासाठी मुलाचं लग्न करायचं म्हणतात. कोण त्या मुलाबरोबर लग्न करणार? त्याला बायकोचा अर्थच कळत नाही."
तेवढ्यात महाडिक साहेब त्यांच्या घरात जाताना दिसले. मी चटकन त्यांना "जाते," म्हणून महाडिक काका घरात गेली. महाडिक काका म्हणाले, "चैताली, कुठे गेली होतीस?" मी म्हणाले, "बाजूच्याच घरी गेले होते." महाडिक काका म्हणाले, "चैताली, असं कुणाच्या घरात जायचं नाही." महाडिक काकांच्या मनात वेगळेच काहीतरी होते, हे माझ्या लक्षात आले.
रात्रीचे आठ वाजले होते. आम्ही सोबत जेवण केले. शर्वरी रोज महाडिक काकांच्या बेडवरच झोपायची, परंतु महाडिक काका म्हणाले, "तिला झोपू दे. तू वर जाऊन झोप." मी म्हणाले, "काका, मी एकटीच कशी झोपू? शर्वरीला घेऊन जाते." ते म्हणाले, "नकोस, तिला खालीच झोपू दे! अतुल झोपेल तिच्याजवळ."शर्वरी व अतुल शांत झोपले. मी टीव्हीवर सिरियल बघत बसले होते. महाडिक काका मी सोफ्यावर बसले होते. मला वरती झोपण्यासाठी जावे असे वाटत नव्हते. मी महाडिक काकांना म्हणाले, "मी इथेच झोपते." महाडिक काका म्हणाले, "आता तुला स्वतंत्र खोली दिली आहे, जा तिथे जाऊन झोप." मी पण विचार केला की, आपण खोली केली असती, तर एकटेच झोपायला लागले असते, असा विचार करून गच्चीवरील खोलीत गेले.
आकाशात विजेच्या गडगडाट सुरू होता. मी खोलीत गेले, दार लावून घेणार, तेवढ्यातच महाडिक काका धावतच माझ्या पाठीमागे आले व म्हणाले, "पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. विजा कडकडाटात सुरू झालाआहे. घाबरशील म्हणून मी वर आलो आहे."
मी बेडवर बसले. तेवढ्यात धो-धो करीत जोराचा पाऊस आला. विजेचा कडकडाट सुरू असताना महाडिक काकांनी फटाफट दरवाजा-खिडक्या बंद केल्या. बाहेरचा आवाज कमी येऊ लागला. महाडिक काका माझ्या जवळ येऊन बसले. माझ्या मनात वेगवेगळे विचार येऊ लागले. रात्रीचे साधारण साडेदहा वाजले असतील, परंतु पाऊस थांबतच नव्हता.
महाडिक काका म्हणाले, "चैताली, तू झोप, मी पाऊस उघडल्यावर जाईल." असे बोलल्यावर मी अंग टाकले. महाडिक काकांनी आतून दरवाजा बंद केला होता. माझ्या हृदयात धडधड होऊ लागली. त्यांनी हळूच माझ्या बाजूलाच अंग टाकले. मी शांत पडले, झोपेचं सोंग केले. महाडिक काकांना वाटले, चैताली झोपली. बाहेर जोरजोरात पाऊस चालू होता.
हळू हळू महाडिक काका अंगावरील कपडे काढू लागले. मी शांत झोपेचे सोंग करीत होते. महाडिक काका आता काका राहिले नव्हते. हळूच अंगावर हात टाकला. त्यांनी हळूच माझी साडी वर केली. मला कसेतरीच होऊ लागले. महाडिक काका वासनाधीन झाले. मी पटकन उठून बसले, तर महाडिक काकांनी स्वतःच्या अंगावरील सर्वच कपडे काढले होते. त्यांनी चटकन मला मिठीत घेतले.
मी रडू लागले, "सोडा मला! हे काय करता? मी किती तुमच्यावर विश्वास ठेवला! मला माहीत नव्हते, तुम्ही असे करणार."
ते समजूत घालवत नाईलाजानेच रात्रभर माझ्या जवळच गप्पागोष्टी करत सकाळचे चार वाजेपर्यंत थांबले होते. जाता जाता त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवत मला हजार रुपये दिले आणि म्हणाले, "चैताली, मी खाली जातो. शांत हो. यानंतर असे काही होणार नाही, परंतु लक्षात घे, ही गोष्ट फक्त आपल्या दोघांतच राहू दे! जर कुणाला काही माहित झाले, तर तुझीच बदनामी होईल आणि नाईलाजास्तव तुला घराबाहेर काढावे लागेल. बाहेर जाऊन कितीही माझी बदनामी केली, तरीही काहीच होणार नाही, कारण मी तुला सहारा दिला व खोलीत भाडेकरू म्हणून ठेवले आहे. तुझ्याच फायद्याचे सांगतो, माझ्या मुलाबरोबर लग्न करून सुखी राहा! मी मरेपर्यंत तुमच्या सोबत राहील, कुठलीच कमतरता भासू देणार नाही."
सकाळी चार वाजेपर्यंत जागे असल्यामुळे झोप येत होती. मी दरवाजा बंद केला व सकाळी ११ वाजेपर्यंत मी झोपलेली होते. शर्वरी 'मम्मी मम्मी' म्हणून बाहेरून आवाज देऊ लागली. मी दरवाजा खोलून बघितले, तर बारीक पाऊस होता. मी पटकन अंघोळ करून घेतली आणि विचार केला की, आज आपल्या अंगावर हात टाकला, उद्या त्यांच्या उपकाराखाली दबूनच राहावे लागणार.व त्यांनी जसे म्हटले तसेच करावे लागेल.
मी चटकन अंघोळ करून खाली उतरले. स्वयंपाक करणारी बाई स्वयंपाक करून गडबडीत निघण्याच्या तयारीत होती. महाडिक काका घरात नव्हते. अतुल हा एकटाच घरात कार्टून बघत बसलेला होता. मी फटाफट बॅगेत कपडे भरले. महाडिक काका येण्यापूर्वीच घरातून निघाले पाहिजे, हे ठरवले. लगेच घराबाहेर पडले, रिक्षा पकडली आणि थेट नवीन ठक्कर बसस्थानकात पोहोचले आणि पुण्याला जाणारी बस पकडली. बस स्थानकातून बाहेर पडताना सुटकेचा निश्वास मी घेतला.
पुण्याला आत्याकडे गेले. आत्या आणि आत्याचा नवरा हे दोघेच राहत होते. सात-आठ महिने आत्याकडेच राहत होते. आत्याच्या नवऱ्याला कॅन्सर झालेला होता आणि ही सर्व जबाबदारी आत्यावरच आली. आत्याने सांगितले की, "चैताली, तू तुझी कुठे तरी जाऊन राहा, कारण खर्च वाढल्याने मला तुला आश्रय देता येत नाही."
आता कुठे जायचे हा विचार पडला. नाशिकला जायचे आणि सासूच्या साहाय्यानेच जगायचे. त्यांना घरात शर्वरीला फक्त सांभाळायला लावायचे आणि आपण बाहेर कामाला जायचे, असा विचार केला. मी पुन्हा नाशिकमध्ये आले, सासूला जाऊन भेटले. सासूबाईंना म्हणाले, "आता मला कुठेच आश्रय मिळत नाही. माझ्यापुढे आता पर्याय काहीच उरला नाही."
सासू म्हणाली, "आतापर्यंत कोणाबरोबर राहत होती?" वाईटसाईट शब्द वापरू लागल्या. तरीदेखील मी ऐकून विनंती केली, "मला तुमच्या नातीसाठी तरी जवळ राहू द्या. मी बाहेर कामावर जाईल आणि तुम्ही तुमच्या नातीला सांभाळा."
ती म्हणाली, "मुलगीच तुला अडचण ठरते का?" असे वाईटसाईट बोलून "निघ इथून, तुला कुठे जायचे तिथे जा... तुझे माझे नाते मुलगा गेल्यावर तू गेली, तेव्हाच संपले."
असे बोलल्यावर जावे कुठे सुचेना.माझ्या पुढे आत्महत्ये शिवाय पर्यायच उरला नाही..? संध्याकाळ झाली होती मी तात्पुरता ठक्कर बसस्थानकाचा आश्रय घेतला. दिवसभर बसून होते. पैसे सुद्धा माझ्याकडे नव्हते. उपासमार आली होती.
एके दिवशी एक मुलगी पैसे मागतांना बघितल्यावर मी पण विचार केला की, शर्वरीला आपण असे करायला लावू, शर्वरीला दाखवले की, आपल्या जेवणासाठी पैसे हवे आहेत. त्या मुलीसारखे पैसे मागितले, तर आपल्या दोघींनाही जेवायला मिळेल. शर्वरीने पैसे मागायला सुरुवात केली. रोजच्यारोज पैसे मिळू लागले, गरजा भागू लागल्या. म्हणून बसस्थानकाचाच आश्रय घेतला. सुरक्षित पण वाटत होते.
एक पोलिस माझ्याजवळ आला, म्हणाला, "मी बघतोय, तू मुलीला भीक मागायला लावते आणि तू मात्र बसून राहते. जा, कुठे तरी जाऊन काम कर. मुलीचे शिकायचे वय आहे, भीक मागायचे नाही. तुम्ही भिकारी नाहीत. चला येथून निघा, तुमचा पैसे मागायचा धंदाच झाला आहे."
मी म्हणाले, "साहेब, आम्हांला कुणाचाच सहारा राहिला नाही. आम्ही गेली १५ दिवसांपासून येथे सुरक्षित वाटत असल्यामुळे भीक मागून आम्ही उदरनिर्वाह करीत आहोत."
असे बोलल्यावर पोलिसांने तिथून हाकलून दिले व दम भरला, "जर पुन्हा इथे दिसलीस, तर मुलीला भीक मागायला लावल्या प्रकरणी पोलीस ठाण्यात बंद करेल व तुझ्या मुलीला बाल सुधारगृहात टाकेल."
मी बॅग उचलून बसस्थानकातून बाहेर पडत होते, तेवढ्यात एका रिक्षाचालक भावाने आवाज देऊन बोलावले, "ताई, कुठे जायचंय?" मी जवळ गेले. रिक्षावर जय भीम नाव लिहिलेले दिसल्यावर मला एक युट्यूबवरील व्हिडिओ आठवला की, अडचणीत असलेल्या मुलींना सहारा, साथ देतांना पाहिले होते. मी जरी मराठा समाजातील असले, तरीही त्या रिक्षावाल्याला भाऊ म्हटले.
तो म्हणाला, "ताई, कुठे जायचं?" मला तो हृदयातून बोलतांना वाटले व मी सर्व सत्य परिस्थिती माझी सांगितली आणि म्हणाले, "भाऊ, एखादी भाड्याने खोली मिळाली, तर मी काहीतरी काम करेल."
तो पटकन म्हणाला, "ताई, तुला काम पण मिळेल, सुरक्षित राहण्यासाठी आश्रय पण मिळेल, पण तुला तुझ्यासोबत जे घडले, ते मला जसे सांगितले, तेच सत्य तिथे सांग. असे म्हणावे लागेल की, जर मला सहारा नाही मिळाला, तर आत्महत्ये शिवाय पर्यायच नाही." तिथले नवसागर सर खूप दयाळू आहेत,ते तुला आश्रय देतीलच...
त्याने मला मानवसेवा आश्रमात आणून गेटवरच सोडून दिले आणि पैसे न मागताच निघून गेला. मला जसे त्या रिक्षावाल्या भावाने सांगितले, तसेच मी नवसागर सरांना सांगितल्यावर लगेच मला व माझ्या मुलीला आश्रय दिला.
आता खूप छान सुरक्षित वयोवृद्धांच्या सान्निध्यात मुलीला घेऊन आयुष्य घालवत आहे. त्या उतरत्या वयातील आजी-आजोबांच्या सुरकुत्यां पडल्या चेहऱ्यावरील जगण्याची उमेद बघून, "मलाही' जगायचंय"... मला वाट्ते माझ्यावर जी वेळ देवाने आनली तिच वेळ कुणावर येऊ नये आली तर एखाद्या सामाजिक उत्तरदायित्व फेडणाऱ्या संस्थेत जाऊ आनंदात राहावेत.परंतु आत्महत्येचा विचार डोक्यात आणायचे नाही.
चैताली तिच्या भावना व्यक्त करतांना.... येथे क्लिक करून चैतालीच्या भावना व्यक्त करतांना बघू शकता
माझे नाव अमोल बाळू जैन वय अंदाजे ३५ वर्षे, लग्न झाले होते आणि एक लहान मुलगा पण आहे.
मी दारूच्या आहारी गेल्यामुळे व्यसनाधीन झालो.
त्यामुळे घरात कौटुंबिक कलह वाढल्या गेल्यामुळे माझी बायको मला सोडून माहेरी आई-वडीलांकडे निघून गेली.
आई व मी भाडेतत्त्वावर रुम घेऊन राहत होतो.आई पण ऐका ठिकाणी काम करायची व मी पण एका बिल्डर कडे कामाला होतो, ऐके दिवशी कामावरून घरी जातांना दारू पिऊन मोटारसायकल चालवत असतांना माझा पाथर्डी गावाजवळील शेल पेट्रोल पंपाच्या जवळपास माझा अपघात झाला बेशुद्ध अवस्थेत मला शासकीय (सिव्हिल) रुग्णालयात टाकले .पायांचे ऑपरेशन झाले परंतू कायमचे अपंगत्व आले. बेवारस अवस्थेत दवाखान्यात पडलेलो असतांना माञ डॉक्टरांनी जीवदान दिले परंतु अपंगत्व आल्यामुळे काय करावेत हे कळत नव्हते.
आईला कोणी माझ्या अपघाताची माहीती दिली किंवा नाही हे सुद्धा मला कळले नाही.
कारण आई पण मला बघायला आली नाही आणि नातेवाईक हे सुद्धा मला बघण्यासाठी कुणीच का?आले नाही. बर्याच महिन्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलच्या कर्मचारीवर्गाकडून पोलिस चौकीत गुन्हा नोंदविण्यात आलेला होता त्या अनुशंगाने डॉक्टराकडुन पोलिसांना कळविले असता पोलीसांकडून माझी चौकशी झाली त्यानंतर भाडेतत्त्वावर घेतलेल्या घरी पोलिसांनी जाऊन चौकशी करून आले परंतू आई तीन महिन्यांपासून तिथे राहत नाही कुठे गेली हे कुणालाच माहीत नाही.
काही दिवसानंतर सिव्हिल मधून बाहेर निघण्याची वेळ माझ्यावर आली. कारण सिव्हिल मध्ये उपचार झाल्यावर जास्त दिवस ठेवत नाहीत असे डॉक्टर नर्स वारंवार बोलत असत. परंतू मला म्हणाले तुम्हचे नातेवाईक कोणीतरी येतील आणि घेऊन जातील असे आम्हाला वाट्त होते.परंतु कोणीच येत नसल्यामुळे आणि डॉक्टर व नर्सच्या वारंवार बोलण्यामुळे नाईलाजास्तव दवाखान्यातुन बाहेर पडावे लागू लागले कारण चालता येत नसल्यामुळे हातावरच भार देत एका दिवशी सिव्हिल हॉस्पिटल सोडावे लागले. सिव्हिल बाहेर येतांना बेवारस झाल्या सारखेच माझ्या मनाला वाटू लागले. खंत ऐवढीच वाट्त होती की, अपंगत्व का..?आले, मेलो असतो तर बरे झाले असते. मनालाच खात दवाखान्यातून बाहेर निघत होतो सिव्हिल हॉस्पिटलच्या गेटबाहेर आल्यावर लगेच एका व्यक्तीने मला हातावर घसरण करत चालतांना पाहिले पैसे न मागताच १०रुपयाची नोट काढून दिली. काही अंतरावर हातानेच सरकत सरकत जातांना कुठे जावे कळत नव्हते गोंधळून गेलो असल्यामुळे बाजूने चालणाऱ्यांना दया येत असावेत, अनेकाने पैसे देण्यास सुरुवात केली,एकाने दिले की,दुसरा देत होता. काही वेळातच माझ्याकडे बरेच पैसे जमा झाले तेवढ्यात दारू आणि बिअर बार हॉटेल डोळ्यासमोर दिसले. थोडा वेळ बघितल्यावर अचानक मुलाचे आणि बायकोचे डोळ्यासमोर चिञ आले. हृदय दाटून आले,डोळ्यांतून आश्रूंचे थेंब टपा टपा पडू लागले. आई बायको मुलगा असतांना मी बेवारस जीवन जगत आहे. ऐवढी ही वाईट आवस्था दारु मुळेच झालीआहे,आपल्याच जन्म दात्या आईने दिखील दारु मुळेच आपला शोध घेतला नसेल. दारु मुळे सर्व नातेसबंध तुटले त्याच दारु मुळे बायकोने आपल्याला सोडले, मुलगा दुर झाला, आई दुर झाली.
आज पासून दारूच्या दुकानासमोरुन सुद्धा जायचे नाही.
हा मनात दृढनिश्चय केला आणि बायकोला माफी मागून बायको व मुला बरोबरच आता राहायचे हा हेतू हृदयात ठेवून, बायकोला व मुलाला भेटण्यासाठी मन बैचेन झाले. रिक्षा थांबवण्यासाठी धावपळ हातानेच सुरुवात केली परंतू दुर्दैव माझेअशा अपंग अवस्था बघुन एकही रिक्षाचालक रिक्षा थांबत नव्हता तर काही तर रस्त्यांच्या मध्यो मध गेल्यामुळे रिक्षाचालक व इतर व्यक्ती शिव्या गाळ्या पण देऊ लागले ञ्यंबक नाका चर्च जवळपास आलो. सिग्नल आमच्या बाजुने बंद झाले होते, पटकन एका रिक्षाचालका जवळ गेलो आणि नाशिकरोडला जायचे आहे तीनशे रुपये देतो.असं बोलल्यावर लगेच त्या रिक्षाचालकांनी पटकन खाली उतरला आणि मला उचलून रिक्षात बसवले व म्हणाला सकाळपासून एकही भाडे मारले नाही, असे बोलत बोलत तो रिक्षाचालक आपली सर्व हकिकत सांगू लागला.रागा रागाने माझी बायको घरातून कधी मुलांना घेऊन कुठे निघून गेली माहीतच नाही तिचाच शोध घेत फिरत आहे असा तो रिक्षाचालक बोलत होता. मिञांच्या सोबतीने रोजच्यारोज दारू पिऊन घरी जाऊ लागलो, कधी कधी दिवसाही दारु पिल्यामुळे दिवस दिवस रिक्षातच झोपून राहायचो आणि संध्याकाळी माञ खाली हात घरी जाण्याची वेळ येत असे, कधीतरीच दोनशे तीनशे रुपये बायकोच्या हातात ठेवायचो परंतू राञी खुप दारू मिञांसोबत पिऊन घरी गेलो, उशिरापर्यंत बाहेर असल्यामुळे बायको वाट पाहून कंटाळून झोपली असेल तिने लवकर दार का खोलले नाही म्हणून मी तिला मारहाण केली, या वादविवादातून जेवण न करता मी दारु जास्त झाल्यामुळे तसाच झोपी गेलो असता मला सकाळी ९ वाजता उठल्यावर कळाले की, बायको मुलांना घेउन कुठे निघून गेली, माहीत नाही.
तिचाच शोध घेण्यासाठी फिरत फिरत ठक्कर बसस्थानकात आलो होतो परंतु सर्वी कडे शोध घेतला असता ती कुठेच आढळून आली नाही म्हणुन आता मी नाशिक रोड रेल्वे स्थानकावर जाऊन बघतोय,कारण कधी कधी रागा रागाने तिच्या आई-वडीलाकडे रेल्वेने किंवा बसने जातेय.
त्या रिक्षाचालकांवरील प्रसंग ऐकून माझी चूक लक्षात पुन्हः मला आली आणि डोळ्यांतून आश्रू-येऊ लागले ऐवढे हृदय ओथंबून आले की रडण्याचे हुंकार रिक्षाचालकांनी ऐकून मागे पाहीले आणि म्हणाला अहो माझ्या बायकोची यात काहीच चूक नाही.ऐवढे ऐकून माझा आवाज जास्तच वाढला...रिक्षाचालकांनी लगेच साईटला घेऊन रस्त्याच्या कडेला रिक्षा लावली त्याने बाटलीतून मला पाणी दिले आणि म्हणाला ऐवढे मनाला लावून घ्याल असे मला वाटले नव्हते.माफ करा तुम्हाला रडविले.
तेवढ्यातच मी बोलूनच टाकले भाऊ जे तुमच्या सोबत घडले ते गेली कित्येक महिन्यापुर्वी माझ्या संगे घडले.
काही महिन्यापूर्वीच पाथर्डीगावच्या रस्त्यावर माझा अपघात झाला आणि बेशुद्ध अवस्थेत कुणीतरी मला बेवारस म्हणून सिव्हिल हाॅस्पिटल मध्ये दाखल केले. अशा अवस्थेतून डाॅक्टरांनी मला वाचवले परंतु चार पाच महिन्यांपासून डिस्चार्ज देत होते परंतु अपंगत्व आल्यामुळे जगण्याची इच्छा नव्हती आणि कुठे जायचं कळत नव्हते.
आज सिव्हिल गेटबाहेर पडल्यावर पून्हा जगण्याची उमेद निर्माण झाली. त्यामुळेच बायकोकडे जाऊन माफी मागून तिच्याकडेच राहण्याचा निर्णय घेतला आहे.
रिक्षावाल्यांने सांगितल्या प्रमाणे बायकोच्या भावाच्या घरा जवळ सोडून दिले, कारण बायको मुलाला घेऊन भावाकडे राहत असे. मला बाहेर बघून माझी बायको मनिषा घरात निघून गेली मी तिला मनिषा ऽऽऽ मनिषा म्हणून आवाज दिला,पण ती बोलायचे टाळू घरात निघून गेली मी म्हणालो आता या नंतर कधीच दारु पिणार नाही.मला तुझ्या शिवाय कुणीच राहीले नाही, हृदयातून शपथ घेऊन बोलू लागलो परंतु तिने नकार दिला की,तुझा आणि माझा काहीच संबंध नाही.मी ऐवढे पण बोललो मनिषा तु नकार दिला तर माझ्या पुढे आत्महत्ये शिवाय पर्यायच उरणार नाही.मनिषा आरे तुरीच्या भाषेत म्हणाली जा..कुठे जाऊन मरायचे आहे तिथे जाऊ मर पण त्या आधी तु आमच्या घराच्या बाहेर तु निघं हे शब्द हृदयात लागले आणि
मी आत्महत्या करुन घेण्याचा निर्णय घेतला जगायचं कुणासाठी जिच्या पोटी जन्म घेतला ती आई सुद्धा नाही,बायको नाही नातेवाईकांकडून साथ नाही.
विचार केला की, नाशिक रोडच्या रेल्वेमार्गावर आत्महत्या करायचीच ह्या हेतूने रेल्वेस्थानकावर आलो,रेल्वे जवळपास येताच उडी मारणार तेवढ्यातच ऐकावे मला ओढले दोन कानाखाली ओढल्या आणि बाजूला काढले तो व्यक्ती त्याच रेल्वेने निघून पण गेला परंतु आजूबाजूस बरेच लोक जमले त्यातील काही विचारायचे का रेल्वे खाली आत्महत्या करत होता. रेल्वे स्थानकावरून बाहेर हाकलून लावले बाहेर आलो.रेल्वे स्थानकावर अनेक भिकारी भिक मागतांना दिसत होते. काही खुप दारु पिऊन पडले आढळले,काही भिकारी गांजा पिणारे दिखील दिसले,परंतू मनातून भिक घालणारे दिसत नव्हते,त्यामुळे माझ्यावर उपास मारीची वेळ आली अंगावर एकच घातलेला ड्रेस तो पण तीन चार दिवस रेल्वे स्थानका बाहेर कुठेही झोपल्या मुळे धुळीने माखून गेला व त्यामधून दुर्गंधी सुटली होती.
दिवसभर भिक मागून एक वेळचे जेवायला मिळायचे जवळपास कुणीच उभे राहत नव्हते.
पूर्वीचा ओळखीचा एक व्यक्ती दिसला आवाज देऊन त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला ते तसे थांबतच नव्हते मीच त्यांच्याकडे धावत गेलो, पण मला त्यांनी काही ओळखले नाही.मी पुर्ण परिचय दिला सर्व हकिकत सांगून टाकली.
त्यांना माझ्या बद्दल करुणा निर्माण झाली.ते म्हणाले की,मी राहण्याचा आश्रमात बंदोबस्त करतो.बर्याच आश्रमांना काॅल केला परंतु मला प्रवेश देण्यास नकारत होते तेव्हा मला मानवसेवाची आठवण झाली आणि मी त्यांना सांगितले की,मी स्वतःच सरांशी बोलतो. सरांना फोन लावला सरांना सर्व हकिकत सांगून टाकले, आणि म्हणालो सर आपण प्रवेश नाही दिला तर माझ्या पुढे आत्महत्या केल्या शिवाय पर्यायच नाही. सरांनी सांगितले असे करु नको माझ्याकडे जागा नाही तरिही तु मानवसेवा वृध्दाश्रमात ये.. मी त्यांना सांगितले की, मला मानवसेवाला नेऊन सोडा त्यांनी मला मानवसेवा सोडले त्यांना एक काॅल आल्यामुळे ते निघून गेले. मी गेट मधून आत बघितल्यावर बरेच व्यक्ती दिसल्या माझ्या अंगाचा दुर्गंधीचा त्यांना ञास होऊ नयेत म्हणुन बाहेरून गेटवर सांगितले की, मला सरांना भेटायचे आहे माझ्या जवळ कर्मचारी आले व म्हणाले काय काम आहे मी सांगितले की, येथे राहण्यासाठी आलो आहे. सरांनी मला बोलावले आहे. ते कर्मचारी बोलू लागले की, सकाळपासून कित्येक प्रवेश घेण्यासाठी येथे आले आणि वापस गेले बरेच गरजवंत जागच्या अभावे आश्रू-ढाळत वापस जातात आणि हे रोजच्यारोज होत आहे आत मध्ये बघा हे सगळेच लाईने प्रवेश मागणी करण्यासाठी बसले आहेत दहा बारा व्यक्ती माझ्या पुढे बसलेल्या बघितल्या मी त्यांना सांगितले की,मला सरांना एकदा भेटू द्या कर्मचाऱ्यांनी सांगितले ठिक आहे मी भेटू देतो पण वेळ लागेल काही हरकत नाही.आलेले सर्व जेष्ठ नागरिक व वयोवृध्द आल्या पाऊली निराश होऊ वापस जातांना मी गेटबाहेरुन बघत होतो.आणि माझ्या नंतर दिखील काही प्रवेश घेण्यासाठीच आले होते. मनात धाकधूक चालू होती इथे जर प्रवेश नाही मिळाला तर ऐखाद्या विहीरीत झोकून देऊन आत्महत्या करायचीच तेवढ्यात कर्मचारी माझ्या कडे आले व म्हणाले मी तुझ्याबद्दल सरांना सांगितले सरांनी राहण्यास परवानगी दिली. मला दोन कर्मचाऱ्यांनी उचलून नेऊन अंघोळ घातली कपडे नवीन घालायला दिले भुक खुप लागलेली होती लग्गेच जेवायला विचारू जेवण दिले.
मला जगण्यासाठी प्रेरणा मिळाली नवीन जीवदान मिळाले आणि उतरत्या वयातील वयोवृद्धांची जगण्याची उमेद बघून आता मला पण वाटते जगावं..!
पुणे जिल्ह्य़ातून सेवा निवृत्त पोलिस अधीक्षक श्रीमान. प्रभाकर गंगाधर कुलकर्णी
यांची सत्य जीवन कथा
पुणे जिल्ह्य़ातील सेवा निवृत्त पोलिस अधीक्षक श्रीमान. प्रभाकर गंगाधर कुलकर्णी
हे उतरत्या वयात आल्यावर स्मृतिभ्रंश झाल्यामुळे आपली माणसे कोण हेच लवकर त्यांच्या लक्षात येत नाही असे दाखल करणारे यांचे मत होते. परंतू चालतांना अडखळत चालायचे. आधाराची अंत्यत गरज होती हे माञ तितकेच सत्य होते. म्हणून त्यांना सेवा’श्रुषा घेता यावेत म्हणून त्यांनी मानवसेवा केअर सेंटर वृद्धाश्रमात दाखल केले असावेत.परंतु कुलकर्णी बाबा हे शिस्तबद्ध व्यक्तिमत्त्व आणि प्रेमळ स्वभावाचे होते. एके दिवशी A.C.P.आदरणीय, श्रीमान.अशोक नखाते साहेबांनी मानवसेवा वृद्धाश्रमातील वयोवृद्धांना भोजन दान दिले. त्या निमित्याने परिवारासह खाकी वर्दीत आले. तेव्हा ते त्यांच्या जवळ गेल्यावर त्यांनी रोखठोक स्वतःचा परिचय देत इंग्लिशमध्ये कडक आवाजात "My name is Prabhakar Gangadhar Kulkarni, Superintendent of Police".असे म्हणाले..! आणि पुढे म्हणाले परंतु शोकांतिकाआहे की, मला पेन्शन फक्त दोन रुपये आहे असे सांगायचे आणि क्षणभर शांत बसायचे..? कधी कधी त्यांच्या कार्यपद्धती बद्दल खुप छान सांगायचे की, आयुष्यभर मी रिश्वत घेतली नाही. नेहमीच गुन्हेगारीला आळा घालण्याचे काम केले. मी खाकी वर्दीशी एक निष्ठेने राहीलो. आयुष्यभर वर्दीला डाग लागू दिला नाही. कधी कधी खाकी वर्दीतील व्यक्तीना जवळ घेऊन म्हणायचे खाकी की ss.खाकी की..! आम्ही चकित व्हायचो असे का..?कुलकर्णी बाबा बोलताय ..! तेव्हा मात्र ते जोर जोराने हसायचे व त्या खाकी वर्दीतील व्यक्तीला जवळ बोलावून त्यांचा हातात हात घेऊन हसतच म्हणायचे खाकी वर्दीचं म्हणते खाकी..! नंतर समजून पण सांगायचे की, खाकी वर्दीशी एकनिष्ठ राहायचे कधी धबा लागू द्यायचा नाही. अशा प्रकारे छान बोलायचे, मार्गदर्शन देखील छान करायचे, स्मृतिभ्रंश झाला असेल असे आम्हाला कधीच वाट्ले नाही. माझ्या संगे चर्चा करतांना चर्चासत्र रंगात आल्यावर मी फॅमिलीबद्दल विचारणा केल्यास ते माहिती देण्यास टाळत असतं परिवारातील सदस्यांचा विषय काढला की, विषयांतर करायचे व त्यांचे डोळे पाण्याने भरुन यायचे त्यामुळे आमच्या लक्षात आले की, विचारणा करणे चुकीचे आहे. खुप हुशार, शार्प बुद्धीचे,शांत स्वभावाचे होते.
मला त्यांचा स्वभाव खूप आवडायचा कधी कधी एकञ बसून आम्ही दोघे दुपारचे भोजन घ्यायचो मला त्यांच्यासोबत जेवायला खुप आवडायचे कधी कधी तर माझा हात हात घेऊन तासनतास गप्पा गोष्टी करायचो. एक दिवस अचानक आमचा कर्मचारी धावतच माझ्या ऑफिसमध्ये आला व म्हणाला सर लवकर चला कुलकर्णी बाबा कसेतरीच करतायऽऽऽ व तुम्हालाच त्यांनी बोलावले आहे. मी चटकन ऑफिसमधून कुलकर्णी बाबा जवळ गेलो. बाबांची अवस्था बघुन लक्षात आले की, त्यांना डाॅक्टरांची गरज आहे मी म्हणालो थांबा..! मी डाॅक्टरांना घेऊन येतो. परंतू बाबांनी नकार देत मला जवळ बोलावले आणि अडखळत शब्दांतून बोलतऽऽऽबोलत ,माझा हात हातात घेऊन घट्ट पकडू लागले. काहीतरीच सांगणार तेवढ्यातच अडखळत बोलत बोलत घट्ट पकडलेला हात मोकळा होऊ लागला... बाबांनी आमची साथ सोडली. माझे डोळे आश्रूने भरले ते आश्रू पुसून कुलकर्णी बाबाकडे बघितले बाबा माझ्याकडे एकटक नजरेने बघत होते. काहीतरी सांगणार होते डोळ्यांत खुप काही दडलेले दिसत होते. हळूच मी त्यांच्या चेहऱ्यावर हात फिरवत त्यांचे डोळे बंद केले. कुलकर्णी बाबांची अंतिम इच्छा होती की,अंतिम शवाला, अग्नि डाग हा माझाच हातूनच देण्यात यावा असे नेहमीच ते मला बोलायचे, तुमच्या हातून जर हे घडले तर मला मोक्ष प्राप्ती होईल. त्यांच्या इच्छेनुसारच भगवंतानी माझ्या हातून त्यांची शेवटची इच्छा दिखील पुर्ण करुन घेतली. अशा महान व्यक्तीच्या पार्थिव देहाला मुलगा होऊन अग्निदाग देण्याचे भाग्य मला लाभले कारण हिंदू संस्कृतीनुसार मुलगाच वडीलांच्या पार्थिव देहास अग्निदाग देतो. मानवसेवा वृध्दाश्रमाच्या माध्यमातून अशा महान व्यक्तीची सेवा करण्याची संधी आमच्या हाताला ३ वर्ष लाभली. त्यांच्या आठवणीला उजाळा देतांना त्यांचे काही बोललेले शब्द आज ही काहीतरी सांगतात. अशीच एक वाक्य आज आठवले म्हणून त्याच्या हा लेख लिहीत आहे.ते म्हणत होते की, मी पोलीस अधीक्षक आहे परंतू शोकांकिका मला २ रु पेन्शन आहे..!.
याचा अर्थ मला आज कळाला की, कितीही मोठ्या पदावर माणूस असला तरिही नातेवाईकात त्याला उतरत्या वयात २ रुपयाची किंमत नसते. असेच कुलकर्णी बाबांना सांगायचे असेल असे मला आज वाट्त आहे. कारण लोक भ्रमाच्या भोपळ्यात बसून वावरत असतात. जो पर्यंत तुमच्या मध्ये पैसा कमविण्याची ताकद आहे तो पर्यंत तुमची किंमत सगळ्यांनाच कळते. त्यांच्या बद्दल अधिक माहीती आम्हाला गर्जेची वाटली नाही. कारण आम्ही माणूस म्हणून माणसाची सेवा करतो. त्यांचा पैसा पाहून सेवा करत नाहीत. बरेच विद्वान मंडळी वृद्धाश्रमात येऊन वृध्दांच्या झालेल्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करतात. वृद्धाश्रम म्हणजे काय..? हे त्या विद्वानांना माहिती असते. वृद्धाश्रम येणाऱ्याबदल सुद्धा त्याला माहीती असते.परंतू वृद्धाश्रम चालविणाऱ्यांना मुर्खात काढत बोलत असतात की हे वृद्धाश्रमाकडे कसे येताt तरी देखील वृद्धाश्रम चालवणारी व्यक्ती संकोच न करता सर्व माहीती देतात. मला वाटते असे प्रश्न करणाऱ्या व्यक्तीने आपल्या आई-वडीलांची सेवा कधी केलीच नसावेत. वृद्धाश्रम हे गरजवंत निराधारांचा आधारस्तंभ आहे असे मला वाटते.
माणसा तु भ्रमात राहू नकोस ज्यांच्यासाठी काबाडकष्ट करत आहेस हे तुला कुठ पर्यंत कामा येईल, हे कुणीच सांगू शकत नाही.वृद्धाश्रम चालवत असतांना हा मोठा अनुभव अनुभवायला मिळत आहे. कोट्यधीश कमविणारे रस्त्यावर आले आहेत. भूतकाळातील हे सत्य उदाहरण माडले आहे.
पोलीस अधीक्षक' (Superintendent of Police - SP) हे भारतीय पोलीस दलातील एक पद आहे, ज्यामध्ये जिल्हा पोलीस दलाचे सर्वोच्च अधिकारी म्हणून काम पाहिले जाते. ऐकेकाळी पुणे जिल्ह्याचे नेतृत्व करणारे पोलीस अधीक्षक म्हणून ते त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस ठाण्यांवर नियंत्रण ठेवत होते. आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे कामकाज योग्यरित्या चालत आहे की नाही याची खात्री ते करत होते.
• कायदा व सुव्यवस्था राखणे हे : जिल्ह्यातील गुन्हेगारी रोखणे, शांतता राखणे, आणि सार्वजनिक सुरक्षा सुनिश्चित करणे ही त्यांची प्रमुख जबाबदारी होती.
• गुन्ह्यांचा तपास: ते मोठ्या आणि गंभीर गुन्ह्यांच्या तपासावर लक्ष ठेवणे आणि गरज पडल्यास स्वतःही तपासात ते सहभागी होत असत.
• जनतेशी संवाद: ते जनतेच्या तक्रारी ऐकून घेतं आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतं. तसेच, पोलीस आणि जनता यांच्यातील संबंध सुधारण्याचे कामही ते करत.
• प्रशासकीय कामे: पोलीस दलातील कर्मचारी व्यवस्थापन, संसाधनांचे वाटप आणि इतर प्रशासकीय कामांची जबाबदारी त्यांच्यावर होती.
थोडक्यात, पोलीस अधीक्षक हे त्यांच्या जिल्ह्यातील पोलीस दलाचे प्रमुख असतात, जे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात.
अशी व्यक्ती जर वृद्धाश्रमात येऊ शकते तर वृद्धाश्रमाकडे शासनाकडून लक्ष दिले पाहिजेत. कोट्यावधी कमविलेल्यांनी पदावर असतांना किंवा सेवा निवृत्त झाल्यावर जमेल तसे वृद्धाश्रमाची परिस्थिती बदलण्यासाठी मदत करावेत. कारण ही आजच्या विज्ञान युगाची गरज आहे.