तुझ्यातल्या अविरत करुणेला
शब्दांत का मांडावं मी?
शब्दं चौकटी असतात, छेद नसलेल्या
तू आणि तुझी संगत तर
प्रत्येकदा पाडते अश्या चौकटींना पाऊलों-पाऊली
म्हणून बघ
शब्दही रुसलेत आज माझ्यावर
कदाचित माहित झालं त्यांना देखील
की, आज विषय तुझ्यावर लिहण्याचा आहे
आता हीच निःशब्द अभिव्यक्ती मान्य कर
ज्ञानेश | रा. ०९:२२: ०६ डिसेंबर २०१७
मी सतत, एकटक
बघत राहायचो तिच्याकडे
तिच्या डोळ्यांकडे
डोळ्यांतल्या काळ्याश्यार टिबांकडे
पापण्यांची झपक पडली की रात्र व्हायची
आणि उघडली की दिवस उगायचा...
डोळ्यांभोवती असलेला ओलसरपणा
भूरळ पाडायचा मनात कायम
प्रेम आहे की राग
दुःख आहे की आग
कहिपण कळायचं नाही...
भूरळ वाढत गेलं
काळ्या टिंबांची वितळती हिमनग झाली
ओलसरपणा महासागर वाटायला लागला
गाव-वस्त्या दूरपर्यंत दिसेनाश्या झाल्या
माणसं, घरं, कुटुंब,
जात, समाज, धर्म, गरीबी मिटायला लागली.
उरलो फक्त आम्ही दोन्हींच
तिच्या डोळ्यातला महासागर आणि मी...
ज्ञानेश | फेब्रुवारी २०१९
पावसात नसतांना पावसासारखी तू
रिमझिमणाऱ्या अगणित थेंबानां घेऊन
बरसून जातेस अगदी मुसळधार...
अखंड कोरड्या अश्या ढगांतून
कोण जाणे कुठल्या गारव्याच्या साथीने
चिंब भिजवतेस देहाला आतून बाहेरून...
तुझ्यात अन सप्तरंगी धनुष्यात
साम्य शोधावं तेवढं कमी
दोघेही बहुरूनच येतात आणि बहरावूनच जातात...
ज्ञानेश | रा.१२:३५; २१ जुलै २०१७
मी कालही सपनात बघितलं तुला
पापण्यांच्या पडद्याआड
माझ्याच स्वछंद जगात
सगळी कसर काढायचं ठरवलेलं
भेटायची, हाताच्या स्पर्शाची
गप्पांची आन खूप काही सांगायची
ओठं फक्त हालत होती
हृदयाच्या वाढत्या-कमी होत्या तालावर
कानामध्ये राहुल देव बर्मनचं
एक सॉफ्ट रोमॅटिंक "कुछ ना कहो" टाइप
इंस्ट्रुमेंटल संगीत लावलेल्याचा भास
---
रात संपत आली असावी कदाचित
पहाट उजाडल्याची चाहूल
रोकण्याचा विचारातच स्वप्न मुडलं
पापण्या उघडल्या
जग बदललं, रोजप्रमाणे
ज्ञानेश | मे, २०१९
त्याच्या प्रत्येक नजरेच्या भेटिने
सातही आयुष्य पटकन संपायची
आपला ह्या 'सात वाल्या' गोष्टीवरचा विश्वासच उडला
मी रुजवून ठेवलं त्याला तळ हातावर
खुडून पिकलेल्या काट्याप्रमाणं
त्याच्या वेदनेच्या सहवसात बरिचशी आयुष्ये संपवली
आवरण लाल-पिवळ होत गेल
मला ख़बरही नाही लागली
काटा बाहेर पडला
...
जखम वाढली
सावळली
भरली गेली
उरलं फक्त वळखंड
'आयुष्य एकच असतं'
हे पटायला लागलं
...
ज्ञानेश | जुन २०१९