प्रस्तावना

या लेखमालेचे नाव “अक्षरचित्रांची रुपडी : ज्ञानेश्वरी रसग्रहण ” असे देण्यामागचे कारण थोडे विस्ताराने सांगावे लागेल. गेले २० वर्षांपासून माझा ज्ञानेश्वरीचा अभ्यास मोठ्या नाविन्यपूर्ण आणि कल्पक पद्धतिने सुरू आहे. त्याला अनेकजण हा अभ्यास नसून ओव्यांशी खेळणे आहे असे म्हणतील ! ज्ञानेश्वरीने माझ्यातल्या कलाकाराला नेहमीच आकृष्ट केले आहे. कदाचित तसे माझे भाग्य, विधीलिखित असावे ! याची सुरूवात १९९७ च्या सुमारास सी-डॅक मध्ये ज्ञानेश्वरी मल्टिमिडीआ स्वरूपात कंम्प्युटरवर आणण्याच्या प्रकल्पामधून झाली. त्यावेळी मी ज्ञानेश्वरीमधिल निवडक रूपकांचे एनिमेशन स्वरूपात सादरीकरण केले. तद्नंतर माझा ज्ञानेश्वरीचा अभ्यास स्वतंत्रपणे चालूच राहिला.

१) अक्षरचित्रांची रुपडी

मला ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक पानावर असंख्य खुणा आणि नोंदि करून ठेवायची सवय आहे. त्याचा उपयोग मला विशिष्ट ओव्या शोधायला होतो. अशा खुणा आणि नोंदि नसलेली पानं मला खटकत राहतात. अभ्यास करताना अनेकदा समुद्रामध्ये मोती सापडावेत तशा सुंदर ओव्या सापडल्या की प्रचंड आनंद होत असे, पण पुढे काय करावे हे सुचत नसे, आणि समाधानही होत नसे ! मग मी काहीवेळा अशी एखादी ओवी कागदाच्या चिठ्ठीवर लिहुन ती चिठ्ठी खिशात घालून ऑफीसला जात असे. काम करताना मध्येच चिठ्ठी उलगडून ती ओवी वाचावी आणि तोंड गोड करून घ्यावे असा उपक्रम अनेक दिवस चालू होता ! पण या कशानेही माझे समाधान होत नसे. कालांतराने मला ज्ञानेश्वरीच्या शब्दांमध्येही वैविध्यपूर्ण आकार दिसू लागले ! संपूर्ण ओवी नाहीतर त्या ओवीमधले काही निवडक शब्द अतिशय अर्थपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण आकाराचे आहेत असे वाटु लागले ! मग बोरू आणि काळी शाई घेऊन ज्ञानेश्वरीमधील शब्दांचे अक्षराकार कागदावर काढायला सुरूवात झाली. त्या अक्षराकारांमध्ये शब्दांचा अर्थ पकडायचा प्रयत्न सुरु झाला ! या कृतिला म्हणायचे तरी काय ? ज्ञानदेवांनी या माझ्या कृतिला काय नाव दिले असते ? विचार करताना पटकन कल्पना सुचली “अक्षरचित्रांची रुपडी” ! ज्ञानदेवांच्या शब्दांमध्येच इतका अचूक अर्थ प्रकाशित करण्याची क्षमता असू शकते. या लेखमालेमध्ये काही निवडक अक्षरचित्रे समाविष्ट केली आहेत. प्रत्येक अक्षरचित्राचा अर्थ आणि त्या संदर्भातल्या ओवीची माहिती देण्यात आली आहे. या सर्वाचा उपयोग विशिष्ट ओव्यांचे रसग्रहण करण्यासाठी होऊ शकतो.

२) विषयवार ओव्यांमधून लेख

सर्वसाधारणतः लोक ज्ञानेश्वरीचा अभ्यास आठरा अध्यायांच्या विभागानुसारच करतात. ज्ञानेश्वरीतले अनेक अध्याय खूप मोठे आहेत, समजायला अवघड आहेत. संपूर्ण ज्ञानेश्वरी ग्रंथ आपल्या आवाक्याबाहेरचा वाटेल इतका मोठा आहे ! त्यामुळे मला असे वाटले की आपण ज्ञानेश्वरीमधल्या काही वेगळ्या अस्पर्शीत विषयांवर, पैलूंवर लेख लिहावेत. त्या विषयांवरील सर्व ओव्यांचा एकत्रित विचार करून, त्यावर लेख लिहून, ज्ञानदेवांचे वेगळे आणि पुरोगामी विचार प्रकाशात आणण्याचा प्रयत्न करावा. उदाहरणार्थ ज्ञानदेवांनी मराठी भाषेसंदर्भात अनेक अध्यायांमध्ये ओव्या लिहिल्या आहेत. परंतु मराठी भाषेवरच्या दोन तीन ओव्याच प्रचलित आहेत, सर्वश्रुत आहेत. त्यावर मी असा विचार केला की आपण ज्ञानदेवांच्या मराठी भाषेवरच्या सर्व ओव्या एकत्रित करून, ज्ञानदेवांचा मराठी भाषाविषयक दृष्टीकोण सुसंगत लेख स्वरूपात मांडला, तर ते जास्त उपयुक्त ठरेल. तो एक ज्ञानेश्वरीमधलाच पण मराठी भाषाविषयक अध्याय तयार होईल ! आपल्याला नवी दृष्टि मिळेल आणि ज्ञानेश्वरीच्या रसग्रहणाला नवी दिशा प्राप्त होईल ! या पुस्तकामध्ये सुरूवातिलाच ज्ञानदेवांनी वर्णन केलेल्या ज्ञानस्वरूप गणेशाच्या रूपकामध्ये जवळपास ७० प्राचीन ग्रंथांचा उल्लेख आला आहे, त्याचा सखोल आढावा घेण्यात आला आहे. आणखी एक उत्तम उदाहरण म्हणजे ज्ञानदेवांचे अहिंसेसंदर्भातले विचार लोकांना विशेष ज्ञात नाहीत. यामध्ये अहिंसेवरील लेखाच्या निमित्ताने ज्ञानदेवांच्या अहिंसेवरील सुंदर काव्याचे रसग्रहण सादर केले आहे ! तसेच या लेखमालेमध्ये ज्ञानदेवांच्या ओव्यांचा अलंकार शास्त्राच्या दृष्टिने अभ्यास करून त्यावर लेख लिहिला आहे. ज्ञानदेवांच्या कार्यामधून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा वेध घ्यायचा प्रयत्न केला गेला आहे. “परमात्म्याचि व्यथा” या लेखामध्ये ज्ञानदेवांनी एकप्रकारे अंधविश्वासावर टिका केली आहे त्यावर विस्तृत लेख लिहिला आहे. तसेच ज्ञानेश्वरीमध्ये दिल्याप्रमाणे तत्वज्ञानाच्या दृष्टिने ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान या संदर्भतल्या वेगळ्या विचारांना उजाळा दिला आहे. ज्ञानेश्वरीमधिल स्वधर्माविषयीची शिकवण तरूण पिढ्यांना विशेष उपयुक्त आहे त्या संदर्भातल्या सर्व ओव्यांचा विचार एका लेखामध्ये समग्रपणे केलेला आहे.

या पध्दतीने ज्ञानेश्वरीचे विषयवार विभाजन केलेले नवे स्वतंत्र अध्यायच तयार होतात ! त्यातून लोकांना ज्ञानेश्वरीचा आणखी सखोल अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त करता येईल. ज्ञानदेवांच्या शब्दांतुन प्रेरणा घ्यायची झाली तर या ओवीतुन खूप शिकण्यासारखे आहे “बालकाते वोरसे । माय जैं जेवऊ बैसे । तैं तया ठाकती तैसे । घास करी ।।“ जेव्हा आई आपल्या बाळाला प्रेमाने जेऊ घालते तेव्हा ती लहान घास तयार करून त्या बाळाला भरविते. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरी समजून घेण्यासाठी असे हे छोटे लेख उपयुक्त आणि परिणामकारक ठरतील ! तसेच या विषयवार लेखांमधुन अप्रचलीत, अज्ञात अशा ओव्यांना लोकांपुढे प्रदर्शित करता येईल या भावनेतुन हे लेख लिहिण्याचा खटाटोप केलेला आहे.

३) कल्पनाचित्रे

या लेखमालेमध्ये मी स्वतः काढलेली अनेक कल्पनाचित्रे समाविष्ट केलेली आहेत. त्यामध्ये ज्ञानस्वरूप गणेशाचे कल्पनाचित्र आणि ज्ञानदेवांची कल्पनाचित्रे आहेत. मी ज्ञानदेवांची कल्पनाचित्रे ही ज्ञानेश्वरीमधिल काही ओव्यांमधून प्रेरणा घेऊन काढलेली आहेत. अशी चित्रे या पूर्वी कोठही प्रकाशित झालेली नाहीयेत. ज्ञानेश्वरीच्या रसग्रहणामध्ये ज्ञानदेव स्वतः कसे असतील हे जाणून घेण्याची जिज्ञासा अनेकांप्रमाणे माझ्याही मनात आहे. माझी खात्री आहे की ही चित्रे वाचकांना नक्की आवडतील !

४) निमित्तकारण

माझे हितचिंतक आणि ज्येष्ठ पत्रकार डॉ. किरण ठाकूर यांनी पुढाकार घेऊन २६ ऑगस्ट २०१८ रोजी पुण्याच्या पत्रकार कॉलनीमध्ये आमच्या “गीत ज्ञानेश्वरी” कार्यक्रमाचे प्रथम आयोजन करून या सर्वाची सुरूवात करून दिली. त्यावेळी उपस्थितांबरोबर ज्ञानेश्वरीचा अर्थ समजाऊन घेण्यासाठी काय करावे, या विषयी अनेक विचारांची देवाण घेवाण झाली आणि तद्नंतर मी हैदरबादला माझ्या पुतण्याच्या लग्नासाठी रवाना झालो. तिथे माझ्यापुढे काय वाढून ठेवले होते याचा काहीच अंदाज नव्हता. अगदी अचानक, विशेष कसलेही कारण नसताना, मी तिथल्या हॉटेलच्या बाथरूम मध्ये घसरून पडलो आणि डाव्या पायाचे खुब्याचे हाड मोडले ! पायाचे ऑपरेशन करून त्या हाडामध्ये तीन स्क्रू बसवून ते जोडावे लागले. मग पुढचे काही महीने घरी अंथरुणात बसून विश्रांति घेण्याशिवाय पर्यायच नव्हता. हे सगळे का आणि कसे झाले याची काहीच संगती लागत नव्हती ! पण माझ्या मनाची अशी धारणा झाली की, हा अपघात सांकेतिक असावा, हे सर्व आपल्या हातून ज्ञानेश्वरीची लेखनसेवा व्हावी म्हणून झाले असावे ! एरव्ही मी खूप व्यस्त असतो, सतत प्रवास, वेगवेगळ्या प्रकल्पांचे काम, अंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये जाणे, यामधुन माझ्या हृदयात घर करून बसलेल्या ज्ञानेश्वरीसारख्या विषयासाठी मला सलग वेळ देता येत नाही. पण आता अचानक सर्व व्यापांतुन मुक्त होऊन हातात तीन महीन्यांचा कालवधी आला होता ! माझ्या दृष्टीने ही फार मोठी संधी होती ! मी अक्षरचित्रे, ज्ञानदेवांची कल्पनाचित्रे, गीत ज्ञानेश्वरीसाठी संगीत रचना आणि ज्ञानेश्वरीवर लेख लिहीणे हे सर्वकाही मनसोक्त करु शकणार होतो ! आनंदाची गोष्ट अशी की ठरविल्याप्रमाणे गेल्या काही महिन्यांचे फलित या लेखमालेच्या स्वरूपात तयार झाले आहे. माझी ज्ञानेश्वरीवरील लेखमाला लिहिण्याचे काम असेच चालू आहे, त्याला आता चालना मिळाली आहे.

अशा प्रकारे माझा ज्ञानेश्वरीचा अभ्यास हा ऐनिमेशन, अक्षरचित्रे, कल्पनाचित्रे, नादचित्रे (गायन) आणि लेखन असा अनेक माध्यमांतुन सुरू आहे. मी ज्ञानेश्वरीतील सहाव्या (६) अध्यायामध्ये “नादचित्रांचि रुपडी” असा शब्दप्रयोग वाचून थक्क झालो होतो ! त्याचा अर्थ Audio Visual असा होतो. ज्ञानदेवांना सातशेहून अधिक वर्षांपूर्वी हे कसे सूचले असेल ? मी “नादचित्रांची रुपडी” या ज्ञानदेवांनी लिहिलेल्या मूळ शब्दप्रयोगाचे रूपांतरण “अक्षरचित्रांची रुपडी” असे केले आहे.

डॉ. दिनेश श. क़ात्रे

पसायदान, ग्रीन पार्क,

आनंद नगर, ४११०५१, पुणे.