ज्ञानदेवांच्या व्यक्तिमत्वाचा वेध

ज्ञानदेवांचे व्यक्तिमत्व कसे असेल ? ते कसे बोलत असतील ? यांसारखे असंख्य प्रश्न माझ्या तसेच ज्ञानदेवांच्या जगभरातील चाहत्यांच्या आणि भक्तांच्या मनात येत असतील. आपण त्यांना श्रीकृष्णाप्रमाणे युगानुयुगे बालरूपातच पाहात आलो आहोत. ज्ञानदेवांच्या चरित्रामधून आणि काव्यासंपदेमधून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलु उलगडतात, ते सारांशरूपाने या लेखामध्ये सादर कराण्याचा प्रयत्न केला आहे.

१) शिष्योत्तम

ज्ञानदेवांनी अनेक ठिकाणी आपले ज्येष्ठ बंधु आणि सदगुरु श्री निवृत्तीनाथ यांचे ऋण व्यक्त केले आहे. त्यांच्या आदेशावरुनच ज्ञानदेवांनी गीतेचा मराठी भाषेमध्ये विस्तार केला. त्यांचे निवृत्तीनाथांवर नितांत प्रेम हाते हे ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी नमूद झाले आहे. आई वडिलांच्या माघारी श्री निवृत्तीनाथांनी या लहानग्या आणि पोरक्या भावडांचे पालकत्व स्विकारून त्यांचे संगोपन केले आणि त्यांना ज्ञानमार्गाला लावले. पण स्वतः निवृत्तीनाथ देखील वयाने लहानच होते हे लक्षात घेण्यासारखे आहे !

ज्ञानदेवांचे श्रेष्ठत्व जगभर ज्ञात आहे, परंतु त्यांचे सद्गुरू निवृत्तीनाथ यांनी ज्ञानदेवांच्या जीवनाला दिशा देणारा, एक मार्गदर्शक म्हणून केलेले अमूल्य योगदान, आपल्याला तितकेसे कळलेले नाही असे वाटते. ज्ञानदेव आपल्या सदगुरुंना सूत्रधार तर स्वतःला त्या सूत्राला बांधलेला बाहुला म्हणतात ! तुम्ही चालवाल तसा मी चालेन आणि बोलवाल तसा मी बोलेन असे ते आपल्या गुरुंना सांगतात. माझे गीतेवरचे भाष्य तुम्ही गोड मानून घ्या असे ते आपल्या गुरुंना अजिजीने विनवतात.

नातरी बालक बोबडां बोलीं ।

कां वाकुडां विचुकां पाऊलीं ।

तें चोज करूनि माऊली ।

रिझे जेवीं ॥

अनेकदा ते आपले निरूपण हे तान्ह्या बाळाच्या बोबड्या बोलांप्रमाणे तर स्वतःची कृति ही त्याच्या धडपडत चालण्यासारखे आहे (वाकुडां विचुकां पाऊलीं), असे ज्ञानदेव विनयाने म्हणतात. परंतु हे सर्व पाहून आईला आपल्या बाळाचे कौतुक वाटून (तें चोज करूनि माऊली) आनंदच होतो (रिझे जेवीं) तद्वत हे सर्व तुम्ही कौतुकाने स्वीकारा अशी विनवणी ते आपल्या गुरुंना करतात.

तुमचेया दिठिवेयाचिया वोले ।

सासिन्नले प्रसन्नतेचे मळे ।

ते साऊली देखोनि लोळें ।

श्रांतु जी मी ॥

एका ओवीमध्ये ते श्री निवृत्तीनाथांना अत्यंत प्रेमाने म्हणतात, तुमच्या दृष्टिमधल्या ओलाव्यामुळे (दिठिवेयाचिया वोले) माझ्या मनामध्ये प्रसन्नतेचे हिरवेगार मळे फुलले आहेत (सासिन्नले) आणि त्या मळ्यातल्या थंडगार सावलीमध्ये दमलेला भागलेला असा मी (श्रांतु जी मी) विश्रांती घेत निर्धास्त पहुडलेलो आहे !

कां जे लळेयांचे लळें सरती ।

मनोरथाचे मनोरथ पुरती ।

जरी माहेरें श्रीमंतें होती ।

तुम्हा ऐसी ॥

ज्ञानदेव श्रीनिवृत्तीनाथांना म्हणतात, आहो, तुमच्या सारखे ज्याचे माहेर श्रीमंत आहे त्याचे सर्व लाड आणि हट्ट शिल्लकच रहात नाहीत (लळेयांचे लळें सरती). आमच्या सर्व इच्छा, अंतरातम्याची भूक सुद्धा पूर्ण होते (मनोरथाचे मनोरथ पुरती). म्हणजे तुम्ही आत्मज्ञान प्राप्त करून देता, ज्यामुळे जीव आंतरबाह्य तृप्त होऊन जातो. कसलेही मागणे, अतृप्त इच्छा शिल्लकच राहत नाही !

वडील बंधु म्हटले तरी निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव यांच्या वयामध्ये फारसे अंतर दिसत नाही परंतु संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानदेवांनी निवृत्तिनाथांचा उल्लेख हा नेहमीच आदरवाचक असा केला आहे. ज्ञानदेव स्वतःचा उल्लेख निवृत्तिदास म्हणून करतात. ते निवृत्तिनाथांना अनेकदा मायबाप, प्रभु, श्रीगुरु असे म्हणतात.

येवढ्या लहान वयाच्या दोन भावंडांमधले गुरुशिष्याचे हे अनोखे नाते खरोखर “न भूतों न भविष्यती असे आहे” ! ज्ञानदेवांचे शिष्योत्तम म्हणून गुण एकत्रित करताना श्री निवृत्तीनाथ हे आपसुकपणे त्या गुणवर्णनामध्ये समाविष्ट होतात, त्यातून त्या दोघांचे अद्वैत स्वरूप सिद्ध होते !

२) क्रांतिकारक

ज्ञानदेव हे निर्विवाद मोठे क्रांतिकारी होते कारण भगवद्गीतेवर प्राकृत मराठीमध्ये भाष्य करून त्यांनी एक प्रकारे संस्कृत भाषा जाणणा-या मुठभर पंडितांची मक्तेदारी मोडली ! त्यांनी भगवद्गीता तळागाळातल्या लोकांना समजेल अशा त्यांच्या रोजच्या व्यवहारातल्या मराठी भाषेमध्ये आणली. या क्रांतिकारी घटनेचे असाधारण महत्व त्यांच्या आई वडिलांच्या संघर्षाची पार्श्वभूमी जाणून घेतल्यावर कळते. त्यांचे वडील श्री विठ्ठलपंत यांनी विवाहानंतर काशीला जाऊन संन्यास दिक्षा घेतली, त्यानंतर आपल्या गुरुंच्या आदेशावरून ते परत आळंदीला आले व आपल्या पत्नीबरोबर संसार करू लागले. त्यानंतर त्यांनी निवृत्ति, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई या चार मुलांना जन्म दिला. त्या काळाच्या रुढीवादी समाजाला असे हे संन्यास घेतल्यानंतर पुन्हा गृहस्थाश्रमामध्ये परत येऊन आपल्या पत्नीबरोबर संसार करणे रुचले नाही, आणि त्यात ह्या मुलांचा जन्म म्हणजे अगदीच त्याज्य गोष्ट होती. अशा परिस्थितिमध्ये विठ्ठलपंतांच्या कुटुंबाला समाजाने वाळीत टाकले, जातीभ्रष्ट ठरविले. त्यांना आपल्या कुटुंबाला घेऊन गावबाहेर सिद्धबेटावर राहायला लागत होते. या कुंटुंबाला अन्न पाणी मिळवताना खूप संघर्ष करावा लागत होता. लोक भिक्षा देखील घालत नव्हते.

अशा बिकट परिस्थितिमध्ये विठ्ठलपंतांनी आपली मुले थोडी मोठी झाल्यावर त्यांची विधिवत मुंज करायचे ठरविले. पण त्या काळच्या पंडितांनी, धर्मपिठांनी या मुलांचा व्रतबंध करण्यास मनाई केली. संन्याशाला झालेली मुले म्हणून त्यांना अशुद्ध, अपवित्र ठरविण्यात आले. या धर्मपिठांनी विठ्ठलपंतांना पापक्षालनासाठी देहांत प्रायश्चित्त घेण्यास सांगितले. तसे केल्यास तुमच्या मुलांना समाजामध्ये स्वीकारू, सामावून घेऊ असे आश्वासन दिले. प्राणत्याग करावे लागले तरी चालेल पण आपल्या मुलांना तरी समाजाने स्वीकारावे असे विठ्ठलपंतांना वाटत होते ! पण आपल्या माघारी या लहान मुलांचे कसे होणार याची चिंता देखील भेडसावत होती. परंतु इतर कोणताही पर्याय दिसत नसल्यामुळे, अत्यंत जड अतःकरणाने विठ्ठलपंत आणि त्यांची पत्नी रुक्मिणीबाई या दोघांनी इंद्रायणी नदीच्या डोहामध्ये देहार्पण केले. निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेव हे दोघेही बंधू त्यातल्या त्यात कळते सवरते म्हटले तरी साधारणतः १० ते १५ वर्षें वायाचे असतील. सोपान आणि मुक्ता तर त्याहून चिमुकले असतील. आपले आई वडील आपल्याला कायमचे सोडून जाणार हे त्यांना कळले असेल का ? ही अतिशय हृदयद्रवक आणि भावनांचा कडेलोट करणारी परिस्थिति होती. त्या काळच्या धर्मांध समाजाने विठ्ठलपंतांना आणि त्यांच्या पत्निला, तसेच या अत्यंत कोवळ्या वयात पोरक्या झालेल्या भावंडांना अतिशय अमानुषपणे, क्रूरपणे वागविले. त्यांच्यावर घोर अन्याय केला.

या पार्श्वभूमीचा विचार केला की आपल्या ध्यानात येते, की त्याच रूढीवादी समाजामध्ये राहून, आधीच जातीभ्रष्ट ठरविले गेले असताना, ज्ञानदेवांनी तळागाळातल्या लोकांसाठी बोलीभाषेमध्ये भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ लिहीला हे खरोखर पठडी बाहेरचे होते ! रूढीवादी समाजाचा स्वतःवर आणखीनच रोष ओढावून घेणारे होते. संस्कृत भाषेच्या जोरावर समजामध्ये वर्चस्व मिळवणा-या एका विशिष्ट वर्गाविरुद्ध टाकलेले ते बंडाचे पाऊल होते यात शंका नाही ! परंतु ज्ञानदेव हे शांतिदूत होते. ते सहिष्णू आणि अहिंसेचे पाईक होते. त्यांनी वांङमयाच्या, मनःपरिवर्तनाच्या ज्ञानमार्गाने, क्षमाशीलतेने, शांतिदायक संदेशातून क्रांती घडवली ! ज्ञानेश्वरीमधून त्यांनी कोणावरही क्रोध व्यक्त केलेला नाही, कोणालाही शिव्याशाप दिले नाहीत. पण त्यांनी आत्मज्ञानाची कवाडे सर्वांना खुली केली. संस्कृत भाषेमधले ज्ञान जनसमान्यांच्या भाषेमध्ये आणून त्यांनी समाजाला परिवर्तानाची नवी दिशा दिली ! ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ निर्माण करून त्यांनी मराठी साहित्य जगतामध्ये नवा मानदंड स्थापित केला !

३) समाज परिवर्तक

याचा परिणाम म्हणून वारकरी संप्रदायासारखी प्रचंड मोठी भक्तिपरंपरेची चळवळच उभी राहीली. वारकरी संप्रदायाच्या उज्वल भक्तिपरंपरेनी सर्व जातीजमातींमधला समाज एक केला. एकदा का या नश्वर देहावर तुळशीची माळ परिधान केली आणि विठ्ठल नामामध्ये जीव रमवला की देहाबरोबर येणारी जात देखील मागे पडते हे वारकर्यांनी समाजाला दाखवून दिले ! ज्ञानदेवांच्या बरोबरीने वारकरी संप्रदायामध्ये अनेक संतांनी बहुमूल्य योगदान केले त्यामध्ये प्रमुख्याने संत नामदेव, संत जनाबाई, संत चोखोबा, संत कान्होपात्रा, संत सावता, संत गोरोबा अशी मोठी संतांची मांदियाळीच होती. त्यानंतर पुढच्या पिढ्यांमध्ये संत तुकाराम, संत एकनाथ यांसारख्या अनेक संतांनी वारकरी संप्रदायाची वृद्धि केली. वारकरी संप्रदाय हे समाजाला एकरूप करण्याचे सर्वात यशस्वी उदाहरण आहे ! ज्ञानदेवांच्या पालखीबरोबर सर्व वारकरी उन्हातान्हामध्ये अनवाणी पायांनी चालत, टाळमृदुंगांच्या गजरात खेळत, नाचत, पंढरपुरला विठ्ठलाच्या दर्शनाला जातात. सर्व वारकरी एकमेकांना ज्ञानेश्वर माऊलींच्या रूपामध्ये पाहतात, एकमेकांना माऊली म्हणून त्या सर्वात्मक ईश्वराला हाक मारतात ! सातशेहून अधिक वर्षें होऊन गेली तरी आषाढीच्या वारीला लक्षावधी वारकरी पुरुष महिला, तरुण आणि वयोवृद्ध, गरीब आणि श्रीमंत, आडाणी आणि उच्च शिक्षित असे समाजामधल्या सर्व स्तरामधले लोक एक होऊन, हा मराठी भाषेमधला ज्ञानेश्वरी ग्रंथ अक्षरशः डोक्यावर घेउन नाचतात, कृतकृत्या होतात ! ज्ञानेश्वरीचे हे आकर्षण आजही तसेच तेजस्वी आहे, निरंतर आहे आणि साधकाला मुक्ती देणारे आहे !

४) अभ्यासक

ज्ञानेदेव हे केवळ भक्तिमार्गाचे पाईक नव्हते तर ते फार मोठे अभ्यासक होते. ज्ञानेश्वरीच्या सुरूवातीला ज्ञानस्वरूप गणेशाचे रसभरीत वर्णन करीत असताना जवळपास ७० प्राचीन तत्त्वज्ञान विषयावरच्या ग्रंथांचा उल्लेख आलेला आहे. त्यामध्ये वेद, उपनिषदे, पुराणे, षड्दर्शने, स्मृति, विसंवादी दर्शनांमध्ये प्रमुख्याने तर्क शास्त्र, नीति शास्त्र, बौद्ध तत्तवज्ञान तसेच मीमांसा, प्रस्थानत्रयींमध्ये उत्तर मीमांसा, ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता आणि त्या शिवाय काव्य, नाटक या सारख्या ग्रंथ प्रकारांचा उल्लेख आहे. ज्ञानेश्वरीमध्ये इतर ठिकाणी आयुर्वेद, योग शास्त्र, वैद्यक शास्त्र, व्याकरण, भाषा शास्त्र, अलंकार शास्त्र यांचाही उल्लेख आलेला आहे. यावरुन ज्ञानदेवांना त्या काळामध्ये उपलब्ध असलेली जवळपास सर्व ग्रंथसंपदा ज्ञात होती.

त्यामधल्या अनेक प्रमुख तत्त्वज्ञान विषयक ग्रंथांचा त्यांनी सखोल अभ्यास केला असावा हे देखील निश्चित आहे. त्यांनी सर्व धर्मग्रंथांचाही अभ्यास केलेला दिसतो. त्या मागचे कारण त्या काळच्या पंडितांनी, धर्मपिठांनी त्यांना नाकारलेल्या शुद्धिपत्रामध्ये असावे. त्यावर ज्ञानदेवांनी ठीक आहे मी स्वतः धर्मग्रंथांचा अभ्यास करून तुमचे धर्मशास्त्र काय सांगते ते समजावून घेतो, असा कयास बांधला तर ते सर्वथा चुकिचे ठारू नये. अर्थात या बद्दल इतर मतेही असू शकतात.

यावरुन त्यांचे संस्कृत भाषेवर प्रभुत्व होते हे देखील निर्विवाद दिसून येते. आदि शंकराचार्यांनी हिंदू धर्माला पुनर्स्थापित करण्यासाठी अद्वैत तत्त्वज्ञान पुन्हा शुद्ध स्वरूपात पण संस्कृत भाषेमध्ये समाजापुढे मांडले. त्याचप्रमाणे ज्ञानदेवांना संस्कृतमध्ये तत्त्वज्ञानावर भाष्य करणे सहज शक्य होते, परंतु त्यांनी समाजाभिमुख विचार करून वेगळा रस्ता निवडला आणि आपल्या मातृभाषेमध्ये ग्रंथनिर्मिती केली !

५) साहित्यिक

त्यांनी निर्माण केलेले साहित्य हे प्रचंड मोठे, आशयघन आणि सामान्य माणसांच्या हिशोबने अशक्य कोटीतले आहे ! समजा ज्ञानदेवांनी रोज १० उत्तम ओव्यांची रचना केली असे गृहीत धरले तर ज्ञानेश्वरी पूर्ण होण्यासाठी साधारणतः ३ वर्षें लागली असावीत असे म्हणता येईल ! रोज दहाच्या हिशोबाने वर्षाला ३६५० ओव्या पूर्ण होतात. ज्ञानेश्वरीमध्ये एकून ९०३४ ओव्या आहेत ! एखादा म्हणेल रोज दहा ओव्या रचण्यात काय अवघड आहे ? ज्ञानेश्वरीतील ओव्यांमधली शब्दरचना आणि दैवी वाटेल अशी प्रतिभा पाहिल्यावर कोणालाही पटेल की हे असामान्य कार्य आहे ! ज्ञानदेवांनी त्यांच्या अभंग गाथेमध्ये साधारणतः ९५० रचना केल्या आहेत. म्हणजे अगदी रोज एक अभंग रचला असे गृहीत धरले तरी ३ वर्षें लागतील एवढे प्रचंड काम आहे ! अनुभवामृत, चांगदेव पासष्ठी, हरीपाठ हे तुलनात्मक दृष्ट्या खूप लहान ग्रंथ असले तरी हे ग्रंथ वैचारिकदृष्ट्या विशाल आणि सखोल आहेत ! ज्ञानदेवांचे भौतिक जीवनातले आयुष्य फक्त २१ वर्षांचे ! ज्ञानदेवांनी अगदी कळायला लागल्यापासून सातत्याने काव्यरचना केली असे म्हटले तर मग अभ्यास केव्हा केला, चिंतन केव्हा केले ? शब्दांची जुळणी केव्हा केली ? येवढी सुंदर भाषा कशी आत्मसात केली ? समजा हे सर्व एखाद्याने केले, तरी असे दैवी स्पर्श असलेले काव्य आणि शेकडो वर्षें निघून गेली तरी टिकून राहतील असे विचार समाजापुढे ठेवणे हे केवळ असामान्य कार्य आहे ! आजच्या काळात साहित्य अकादमी नाहीतर सर्वोच्च नोबेल अथवा बुकर पुरस्कार मिळाले तरी ते साहित्य दहा पंधरा फार तर पंचवीस वर्षांमध्ये कालबाह्य होते ! थोड्या काळातच आपल्या साहित्याला वाचक भेटेनासा होतो.

ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ त्याची भाषा पुरातन झाली तरी देखील आज लाखो लोक त्या अक्षरांवरून प्रेमाने डोळे फिरवतात. आळंदीला अजानवृक्षाजवळ रोज असंख्य खेड्यापाड्यातले भाबडे वारकरी ज्ञानेश्वरी ग्रंथाचे भक्तिभावाने पारायण करताना दिसतात. ज्या शब्दांना ज्ञानोबांचा विचार स्पर्श आहे, त्या परतत्त्वाला आपण देखील नजरेने, ओष्ठ स्पर्श करावा, फार कळले नाही तरी चालेल पण ते शब्द आपल्या मुखातून उच्चारले जावेत आणि आपले जीवन पावन होऊन जावे, कृतार्थ व्हावे या भावनेतुन आजही असंख्य लोक ज्ञानोबांच्या ग्रंथसंपदेमध्ये परमात्म्याचा शोध घेतात !

६) माऊली

ज्ञानदेव एवढे ज्ञानी असूनही ईतके प्रेमळ आणि भाबडे कसे असू शकतात ? ज्ञानेश्वरीमधून त्यांचा आईच्या मायेसारखा गाढ आणि वात्सल्यापूर्ण स्वभाव सतत अनुभवाला येतो. त्यांनी तर शब्दांनापण बालरूप दिले आहे, मायेने गोंज़ारले आहे. ते ‘बिंदु’ ला ‘बिंदुले’ म्हणतात, तरंगाला ‘तरंगु’ तर छोट्याला ‘थेकुले’ नाही तर ‘सानुले’ म्हणतात, ते परमात्म्याला प्रेमाने ‘दादूल्या’ अशी हाक मारतात ! ते शब्दांना टिट लावून, टोपडे घालून त्यांचे बाळ करून टाकतात ! त्यांच्यातले मातृत्व अनेक अंगांनी आपल्या समोर येते आणि स्पर्श करून जाते.

निम्न भरलियाविणें ।

पाणी ढळोंचि नेणे ।

तेवीं श्रांता तोषौनि जाणें ।

सामोरें पां ॥

ते म्हणतात, पाणी ज्याप्रमाणे वाटेत आलेला प्रत्येक खळगा भरल्याशिवाय कधीही पुढे जात नाही. त्याप्रमाणे आपण कोणत्याही दमलेल्या भागलेल्या अथवा रंजाल्या गांजल्यांचे दुःख दूर केल्याशिवाय पुढे जाऊ नये. इतर जीवमात्रांच्या सूख दुःखाची येवढी काळजी करणारे ज्ञानदेव त्यांच्या एका अभंगामध्ये “विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशिले” असे म्हणतात तेव्हा त्यांचे मातृत्व मानवजातीपुरते संकुचित नव्हते याची आपल्याला प्रतिती येते !

जो जे वांछिल तो ते लाहों प्राणीजात” असे सर्वात्मक ईश्वराकडे पसायदान मागून आम्हा स्वार्थी लोकांच्या सुखात ते आपले पूर्णत्व पाहतात. असे केवळ एखादी आईच करु शकते ! एका परीने ज्ञानदेवांनी स्वतः अपूर्णत्व स्वीकारले आहे. कारण ही मानवजात कधी सुखी होणार ? याची त्यांना चिंता आहे. आम्हाला तरी याची आशा वाटत नाही पण ते मात्र आमच्या तृप्तिची याचना करतात. आपण सारे जन्माला येण्याच्या आधी, सर्व जीवांच्या आणि विश्वाच्या कल्याणासाठी, सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून येवढं समृद्ध पसायदान मागुन ठेवणारे ज्ञानदेव हे सा-या विश्वाचे पालकत्व आपल्याकडे घेतात. ते सा-या विश्वाची माऊली होऊन जातात !

७) ज्ञानयोगी

आत्मतत्त्व हे अनंत, अमर्याद (infinite) आहे. ज्ञाता जेव्हा त्या स्वसंवेद्य ज्ञेयाशी एकरूप होतो तेव्हा तो ज्ञानस्वरूप होतो. हे त्या अनंताशी एकरूप होणे आहे. तिथे व्यक्तिरूप जाणिव विश्वरूप होऊन जाते ! ज्ञानदेवांनी १२९६ साली आपले उपदेशकार्य पूर्ण केले. आपल्या सद्गुरुंचा आशीर्वाद घेऊन मग अनंत ज्ञानस्वरूपात प्रवेश केला, संजीवन समाधी घेतली ! या ज्ञानस्वरूप अवस्थेचे वर्णन ज्ञानदेवांनी अत्यंत स्वर्गिय उपमा देऊन केले आहे.

कां वोघ सांडूनि गांग ।

रिघोनि समुद्राचें आंग ।

निस्तरली लगबग ।

खळाळाची ॥

गंगा नदीचा खळखळाट, पाण्याचे उसळत डोंगरद-यामधून वाहात जाणे, तिचे हे चंचल, खेळकर रूप आपल्याला ती नदी समद्राला जोवर मिळत नाही तोवर पहायला मिळते. गंगेचे व्यक्तिरूप हे ती समुद्राशी एकरूप होईपर्यंतच असते. गंगा समुद्राला जाऊन मिळते (रिघोनि समुद्राचें आंग) तेव्हा तिचे खळखळणे थांबून ती समुद्रासारखी धीर गंभीर होते (निस्तरली लगबग). नदी समुद्राशी एकरूप झाल्यावर केवळ अथांग समुद्रच बाकी उरतो. समुद्रामध्ये नदीचे व्यक्तिरूप, नाव, गाव संपून जाते !

कां लवणाची कुंजरी ।

सूदलिया लवणसागरीं ।

होयचि ना माघारी ।

परती जैसी ॥

मिठापासून बनविलेली हत्तिणीची मूर्ति (लवणाची कुंजरी) समुद्राच्या खा-या पाण्यामध्ये (लवणसागरीं) सोडून दिली तर ती कधीच माघारी येत नाही (होयचि ना माघारी). कारण ती समुद्रामध्ये लगेच विरघळून जाते आणि समुद्रमय होऊन जाते ! तद्वत ज्ञानदेवांनी संजीवन समाधी घेतली तेव्हा ते ध्यानमुद्रा लावताक्षणी ज्ञानस्वरूपात विलीन झाले. या लौकिक जगामध्ये देहरूपाने परतण्याची गरज संपून गेली, ते विश्वरूप होऊन गेले !

हो कां तरंगु लहानु ।

परी सिंधूसी नाहीं भिन्नु ।

तैसा ईश्वरीं मी आनु ।

नोहेचि मा ॥

ज्ञानदेव समाधिस्थ झाले पण आपल्याला केवढी तरी आशा, मार्गदर्शन आणि विश्वास देऊन गेले, हे या ओवीमधून आपल्याला कळते. ते म्हणतात, मी जरी एखाद्या छोट्याशा तरंगायेवढा असलो (हो कां तरंगु लहानु) तरी मी या अथांग सागरापासून भिन्न नाही (सिंधूसी नाहीं भिन्नु). समुद्रावरच्या लाटा आणि तरंग हे त्यापासून वेगळे दिसले तरी ते साक्षात समुद्रच असतात. त्याप्रमाणे मी या ईश्वरापासून वेगळा (आनु) नाही ! मी त्या ईश्वराचाच एक अंश आहे ! साक्षात ईश्वरस्वरूप आहे. ज्ञानदेव हे केवळ स्वतःविषयी बोलत नसून ते आपणा सर्वांना हे सांगत आहेत. ही ओवी प्रत्येकाने स्वतःला उद्देशून पुनःपुन्हा गाऊन पाहावी. आपल्याला नवा आत्मप्रत्यय येऊन गहिवरून आल्याशिवाय राहाणार नाही !


या लेखातील ओव्यांची सूची

अध्याय ९

कां जे लळेयांचे (३)

तुमचे या (४)

नातरी बालक (६)

अध्याय १४

कां वोघ सांडूनि (३५३)

हो कां तरंगु (३८६)

अध्याय १५

कां लवणाची (३१८)

अध्याय १६

निम्न भरलियाविणें (५८)