गीत ज्ञानेश्वरी

संकल्पना, संगीत, गायन

डॉ. दिनेश कात्रे आणि परितोष कात्रे

<geetdnyaneshwari@gmail.com>

Facebook Page - Geet Dnyaneshwari


Copyright 2019 © All Rights Reserved


गीत ज्ञानेश्वरी, नादचित्र क्र. १ - वायां मन हें नांव

वाया मन हे नाव या "गीत ज्ञानेश्वरी" मधल्या दुस-या नादचित्रामध्ये ज्ञानदेवांनी मानवी मनाच्या गुणधर्माचे अत्यंत सुंदर आणि अचूक वर्णन केले आहे. पहिल्या ओवीमध्ये आपण या मनाच्या संगतीमुळे अनंतरूपामधून व्यक्तीरूपामध्ये आलो आहोत असे तत्त्वज्ञान सांगितले आहे. दुस-या आणि तिस-या ओवीमध्ये संपूर्ण मानसशास्त्राचे सार पकडले आहे.

गीत ज्ञानेश्वरी, नादचित्र क्र. २ - सवर्म ह्रदयकल्हारी

"गीत ज्ञानेश्वरी" मधले दुसरे नादचित्र "सवर्म ह्रदयकल्हारी" या गाण्यात एकूण ४ ओव्या आहेत. या ओव्यांमध्ये ज्ञानदेवांनी अर्जुनाच्या ह्रदयातली द्विधा अवस्था, आपल्याच बांधवांशी युध्द करावे लागणार याची चिंता, त्यांच्या विषयीचा जिव्हाळा, उद्विग्नता, दुःख, हताशपणा अशा भावनांचा होणारा कल्लोळ यांचे अप्रतिम चित्रण केले आहे. अर्जुनाची अवघड मनःस्थिती ओळखून श्रीकृष्ण त्याच्या मदतीला कसा धाऊन येतो, ज्यामुळे अर्जुनाला आपल्या भावनांना आवर घालून प्राप्त परिस्थितीमध्ये युद्धाला सामोरे जायला हावे, असा आशय असलेल्या स्फूर्तीदायक, वीर रस निर्माण करणा-या या ओव्या आहेत. ज्ञानदेवांनी भावविवश अर्जुनाला उन्हाळ्यात वणवा लागलेल्या पर्वताची उपमा दिली आहे. परंतू आता नीळा मेघरूपी श्रीकृष्ण बरसेल आणि हा वणवा विझेल व या पर्वतावर पुन्हा नवीन उन्मेशाची, विचारांची हिरवीगार पालवी फुटेल, असे पुढील ओव्यांमध्ये अतिशय बहारदार वर्णन आहे...

गीत ज्ञानेश्वरी, अभंग १ आतसिकुसुमकोशशामघनु

परितोष, त्यानं यमन रागामध्ये रचलेली अत्यंत सुरेल आणि तालबध्द अशी धुन वाजवत होता. तल्लीन करणारी ती धुन कानावर पडताच मी म्हणालो यावर ज्ञानेश्वरांचा निळाईचा अभंग बसवायला हवा ! गाथा उघडली, दोनचार पाने उलटली, आणि एकामागून एक असे शब्दांचे मोती वेचत, आम्ही दोघांनी गायला सुरूवात केली .... आतसि...कुसुम...कोश...शाम...घनु .... या अभंगातून ज्ञानेशांचे शब्दसामर्थ्य आणि काव्यप्रतिभा वेगळाच अनुभव देऊन जाते. या शब्दांना यमनातूनच ओघळायचं असावं असं मला वाटलं ! या अभंगाचा अर्थ खालीलप्रमाणे ...

जवसाच्या निळसर रंगाच्या फुलांप्रमाणे आणि पावसाच्या मेघांप्रमाणे कांती असलेल्या श्रीकृष्णामुळे

तुळशीवृंदावनामध्ये ध्यानस्थ ऋषी मुनींची ह्रदयरूपी कमळे उमलून विशाल झाली आहेत

हा विश्वसागरामध्ये काळरूपी सर्पावर (शेषशायी) पहुडणारा, आणि ज्याच्यामुळे चंदनाला सुगंध आहे,

असा हा विठ्ठलु जो या विश्वाचा निर्माता आहे, तो केवळ अंतर्बाह्य आनंदमूर्ती आहे...

गीत ज्ञानेश्वरी, अभंग २ मन्ही बागलाणी भाष

गीत ज्ञानेश्वरीतले ज्ञानेशांचे बागलाणी भाषेमधले अतिशय अनोखे असे काव्यरत्न आपणापुढे सादर करीत आहोत. परितोषने या गाण्याला अप्रतिम संगीत दिले आहे, त्यामुळे हे गाणं हेडफोनवर ऐकल्यास जास्त प्रत्ययकारी अनुभव देऊन जाईल. ज्ञानेशांनी हे गाणे बागलाणी गवळणीच्या भूमिकेतून रचले आहे. बागलाणी भाषा गुजरात आणि नाशिकच्या सीमेवरील भागात बोलली जाते.

मे दुरर्थी कर जोडुं । ता-हो सेवा न जाणुं ।।१।।

मन्हा रे कान्हा मन्हा रे कान्हा ।

देखी कां न गिणा रे । मन्हा कान्हा रे ।।२।।

तन्हा मराठा देश । मन्ही बागलाणी भाष ।।३।।

घटि पटि विजार । खंडे भाले तरवार ।

बापरखुमादेविवरु जाण । ऐसें मन्हा कान्हा ।


या अभंगाचा सरल भावार्थ -

मी तुला दुरूनच हात जोडते,

तुझी सेवा कशी करायची, हे खरंच कळत नाही रे, माझ्या कान्हा !

तुझ्या अगणित रूपांची मोजदाद मी कशी करू

रे माझ्या कान्हा ?

अरे माझ्या कान्हा, तू महाराष्ट्र देशात राहतोस

मग माझी बागलाणी भाषा तुला कळणार का ?

म्हणून मी तुला दुरूनच हात जोडते.

घटामधले अवकाश घटाकार आणि वेगळे भासले तरी अवकाश हे एकसंध असते,

किंवा वस्त्रांचे आकार व रंग विविध भासले तरी त्यातलेे कापड केवळ एका धाग्यापासूनच बनलेलेे असते. (त्याप्रमाणे हे विश्व वैविध्याने भरले असले तरी त्यामागे एकच मूलतत्त्व आहे.)

असे अवघड तत्वविचार मला उमजत नाहीत.

अशावेळी तुझे नाम हेच माझे ढाल तलवार बनून माझे रक्षण करतात.

असा आहे माझा कान्हा !