पूर्वी रुपारेल महाविद्यालयातील मराठी विभागाकडून ‘शकुन्त’ नावाचे एक भित्तिपत्रक चालवले जात असे. ‘अभिज्ञानशाकुन्तलम्’ ह्या कालिदासलिखित संस्कृत नाटकात ‘शकुन्त’ हा शब्द आला आहे. शकुन्त पक्ष्यांनी मेनकेच्या मुलीचे पालन / संगोपन केले, त्यामुळे त्या मुलीचे नाव ‘शकुन्तला’ असे रूढ झाले. शकुन्तलेचे पालन करणाऱ्या ह्या पक्ष्याच्या पौराणिक संदर्भावरूनच ह्या भित्तीपत्रकाचे ‘शकुन्त’ हे नाव ठेवले गेले. काही वर्षांपूर्वीपर्यंत हे भित्तिपत्रक नियमितपणे सुरू होते, परंतु नंतर ते थबकले. ‘शकुन्त’नंतर मधे थोडा खंड पडून नव्या युगाचे नवे नाव घेऊन ‘संवाद’ हे भित्तिपत्रक पुढे काही काळ प्रकाशित झाले. दुर्दैवाने काही कारणांनी ह्या भित्तिपत्रकाच्या प्रकाशनातही खंड पडत गेला. ह्यानंतर मराठी विभागाचे, मराठी भाषा, साहित्य, संस्कृती ह्या विषयांना आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या लेखनाविष्काराला संधी देणारे असे काहीतरी माध्यम असावे, हे सतत वाटत राहिले.
ह्या जाणिवेतूनच पुन्हा एकदा भित्तिपत्रक सुरू करावे का, असा विचार २०१७-२०१८ ह्या शैक्षणिक वर्षात पुन्हा पुढे आला. आताच्या पिढीचा नवमाध्यमांकडे ओढा आहे; त्यामुळे साहजिकच ह्या पिढीच्या आविष्काराची माध्यमे बदलली आहेत. ह्या नवमाध्यमांमुळे अभिव्यक्त होण्यासाठी एक नवीन मार्ग आता सर्वांसाठी उपलब्ध झाला आहे. कदाचित ह्या नव्या मार्गाने नव्या पिढीला अभिव्यक्त व्हायला आवडेल आणि त्यामुळे हा उपक्रम सातत्याने चालू शकेल, ह्या विचाराने मराठी विभागाच्या नव्या नियतकालिकाची इ-आवृत्ती काढण्याचा निर्णय मराठी-वाङ्मयमंडळाच्या कार्यकर्त्यांनी एकमताने घेतला. ह्या निर्णयानंतर नियतकालिकाचे नाव काय असावे, ह्याबाबतच्या चर्चेला सुरुवात झाली. ‘नव-शकुन्त’ किंवा ‘नव-संवाद’ अशा एखाद्या नावाने पुन्हा एकदा हे नियतकालिक सुरू करावे का, असा विचार करण्यात आला. पण त्यासोबतच काही वेगळी नावेही सुचवली जाऊ लागली. खूप चर्चेनंतर ‘सहितौ’ हे नाव पुढे आले. ‘सहितौ’ ह्या शब्दाचा संदर्भ हा संस्कृत साहित्यशास्त्रात काव्याविषयी (साहित्याविषयी) भामहाने जी व्याख्या दिली आहे, तिच्याशी निगडित आहे. भामहाने ‘शब्दार्थौ सहितौ काव्यम् ।’ अशी साहित्याची व्याख्या केलेली दिसते. शब्द आणि आशय किंवा शब्द आणि अर्थ ह्यांचे सहितत्व म्हणजे साहित्य होय. ह्या नियतकालिकाच्या नावामागे फक्त शब्द आणि अर्थ ह्यांचे सहितत्व इतकाच संदर्भ नसून; त्यामागे अजून एक भूमिका आहे. आज जर मराठीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि मराठी भाषा, साहित्य, संस्कृती ह्यांच्या जतन-संवर्धनासाठी कार्य करायचे असेल; तर मराठीशी संबंधित असणाऱ्या वेगवेगळ्या घटकांनी – प्राध्यापक, विद्यार्थी, सामान्य मराठी माणसे, प्रसारमाध्यमे, साहित्यिक, कलाकार इत्यादींनी – सहित / एकत्र येणे ही गरजेची गोष्ट आहे. ह्याच भूमिकेतून नवीन नियतकालिकाचे नाव ‘सहितौ’ असे ठेवले गेले आहे.
मराठी मोबाईल होण्यासाठी
A students’ research-project ‘मराठी ‘मोबाईल’ होण्यासाठी !’ (A survey about use of Marathi Devanagari Script in mobile phones by youth; Students: Ms. Jyotsna Bhatwadekar, Ms. Radhika Surpur and Ms. Sanika Athavale, SYBA) was awarded First prize at Zone-1 Round in Aavishkar Research Convention. (December 2016.) These students were motivated and guided to write and publish an e-booklet ‘मराठी ‘मोबाईल’ होण्यासाठी !’ to make people aware about the availability of different Apps for Devanagari typing in mobile phones. The e-booklet was published by D. G. Ruparel College as a free and open source e-book in 2017. It was prepared in January, 2017 and was formally published at the hands of Dr. Anand Katikar, Director of Raajya-Marathi-Vikaas-Sansthaa, Mumbai on 23rd September, 2017.