रुपारेल महाविद्यालयातल्या मराठी विभागाने, विभागातील शिक्षकांनी आम्हाला विद्यार्थी म्हणून घडवले आहे. अभ्यासाची शिस्त, मूळातून संदर्भ पाहणे, संदर्भसाधनांचा शोध घेणे ह्या गोष्टी विभागामुळेच सहज आत्मसात झाल्या. आपल्या विषयाच्या अभ्यासाच्या विविध शक्यता लक्षात आल्या. अभ्यासक्रमाच्या चौकटीत राहूनही त्या चौकटीबाहेरचे जग शिक्षकांनी नेहमीच दाखवले. त्याची जाणीव करून दिली. शिक्षकांनी केवळ अभ्यासक्रमच शिकवला असे नाही तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातही आवश्यक तिथे मार्गदर्शन केले, प्रोत्साहन दिले.
सुशांत देवळेकर (2000-2001)
संशोधक,
राज्य मराठी विकास संस्था
मनाशी पक्कं ठरलेलं की मराठी घेऊन बीए व्हायचं नि नंतर पत्रकारितेचं शिक्षण. जणू मी नि पत्रकारितेतला पूलच झाला मराठी विभाग. मुळातच असलेली वाचनाची गोडी मराठीच्या अभ्यासक्रमामुळं दुप्पट झाली. आमच्या वेळच्या मराठी विभागप्रमुख डॉ. माधुरी पणशीकर आणि प्रा.वैशाली जावळेकर यांच्या मार्गदर्शनामुळं मराठीचा सांगोपांग अभ्यास करायची संधी मिळाली.पुढं एमए आणि पत्रकारितेतल्या लिखाणा पाठीमागं आहे तो मराठी विभागाचा मजबूत पाया. मैत्रीण म्हणून प्रा. अनघा मांडवकरचं आपुलकीनं वेळोवेळी केलेलं सहकार्य मोलाचं आहे. मराठी विभागाशी असलेला सुसंवाद असाच चालू राहावा, ही सदिच्छा.
राधिका कुंटे
(पत्रकार)
मी मराठी मधून पदवी २००९ साली प्राप्त केली. त्यानंतर शैक्षणिक तंत्रविज्ञान मधून पदव्युत्तर पदवी घेतली. मराठी मधून पदवी घेतल्याचा फायदा असा झाला की मुद्दे योग्य रीतीने कसे मांडायचे हे समजले. कोणत्याही गोष्टीला एकच एक बाजू नसते हे पदवी शिकताना इतकं मनावर ठसून गेलं होतं की पुढे शिकताना इतरांचे मुद्दे, त्यांचे विचार पण बरोबर असू शकतात हे माहित असल्यामुळे group work करताना, इतरांशी संवाद साधण कठीण पडलं नाही.नंतर बाहेर काम करताना पण या गोष्टीचा फायदा झाला. पदवी घेताना कोणत्याही गोष्टीचं मुळापासून विश्लेषण कसं करायचं याचे धडे दिले गेल्यामुळे कोणतही नवीन काम आलं कि त्याचं व्यवस्थित विश्लेषण करायची सवय आपोआप पडली. सध्या मी IL&FS मध्ये freelance करते आहे आणि गम्मत म्हणजे त्यांना मराठीत storyboards लिहून देतेय. मराठी उत्तम असेल तर मराठी शिकून कामे मिळतातच. मराठीत काही scope नाही असे म्हणणारे एकतर्फी विचार करतात असं मला वाटतं.
सीमा पेडणेकर 2008-2009
शैक्षणिक तंत्रवैज्ञानिक
मला निश्चितपणे मराठी विभागात केलेल्या अभ्यासाचा करिअर मध्ये आणि एकूणच व्यक्तिगत आयुष्यातही खूप उपयोग झाला व होत आहे. पत्रकारिता क्षेत्रात असताना कराव्या लागणाऱ्या लेखनासाठी तसेच हे लेखन करताना अपेक्षित असलेल्या जाणिवा व संवेदना मराठीच्या अभ्यासामुळे वृध्दिंगत झाल्या. तसेच जेव्हा मी स्वत: महाविद्यालयांमध्ये पत्रकारिता या विषयांतर्गत असलेला "स्त्रीवाद" हा भाग शिकवते तेव्हाही मला मी मराठी साहित्याचा जो अभ्यास शिकलेय त्याचा प्रत्यय येतो. एक व्यक्ती म्हणून जडणघडण होण्यात निश्चितपणे मराठी विभागाने मला खूप मोठे सहकार्य केलेले आहे.
गीतांजली राणे 2007-2008
संपादक, प्राध्यापक
मी सुनिता खरात कांबळे रुपारेल महाविद्यालयातून मराठी पदवी शिक्षण घेऊन बाहेर पडल्यावर मराठी घेतल्या नंतर मला इतका फायदा होईल असे वाटले नव्हते.हा फायदा फक्त मला माझ्या नोकरी पुरताच मर्यादित नव्हता तर ह्यातूनच मी पूर्ण पणे घडले एकंदरीत माझी संपूर्ण भाषा त्यामुळे बदलली ह्याचा प्रत्यय माझ्या घरच्यांना आणि मैत्रिणींना सुद्धा आला. बी.पी.ओ. कंपनीत मी मराठी कॉल रेकॉर्डर ची दोन वर्षे नोकरी केली.त्यानंतर मी इंग्लिश माध्यमाच्या शाळेत पहिली ते सातवी वर्गाचे मराठी विषययाची शिक्षिका होते.त्याचप्रमाणे नर्सरी वर्गाची शिक्षिकाही होते. जावळेकर बाई आणि अनघा बाई यांच्याकडून जे ज्ञानामृत मिळाले त्याचा नक्कीच मला खूप फायदा झाला.सध्या मी मराठी विषयात जावळेकर बाईंच्या मार्गदर्शनाने मराठी विषयात MA करीत आहे.
सुनिता खरात-कांबळे 2007-2008
शिक्षिका
नमस्कार, मी अनुजा मेस्त्री. रुपारेलमधून पदवी घेतल्यानंतर मी डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम केले. सोबतच ऑल इंडिया रेडिओवर निवेदने केली, संपर्क एनजीओची माध्यम अभ्यासावरची शिष्यवृत्ती पूर्ण केली. त्यानंतर 'मॅजेस्टिक', 'पॉप्युलर' आणि 'मैत्रेय' या वाङ्मयीन पुस्तक प्रकाशन संस्थांच्या संपादकीय विभागात उपसंपादक पदावर काम केले. काही काळ जाहिरात क्षेत्रातही काम केले आणि मागील दीड वर्ष 'टार्गेट' या शैक्षणिक पुस्तक प्रकाशनात संपादन विभागात कार्यरत आहे. माझी सर्वच क्षेत्रे भाषेशी निगडित असल्याने अर्थातच मला रोजगार मिळवून देण्यात मराठीच्या शिक्षणाचा मोठा भाग आहे. आज प्रसार माध्यमांत मोठ्या प्रमाणावर धेडगुजरी मराठी भाषा वापरली जाते, त्यांच्यात आजवर स्वतःचे वेगळेपण टिकवता आले ते रुपारेलच्या मराठी विभागातल्या संस्कारांमुळेच. जावळेकर बाई आणि अनघा बाई या दोन रसायनांच्या हाताखाली तयार झालेले विद्यार्थी फक्त भाषेचं, साहित्याचंच नव्हे तर आयुष्याचं शिक्षण घेऊन बाहेर पडतात. विशेषतः माध्यमात काम करताना असे अनेक प्रसंग आले जेव्हा भोवतालच्या जगात खरंच संवेदना उरल्यात की नाही असा प्रश्न पडावा, पण अशाही प्रसंगी स्वतःमधील संवेदनशीलता जागृत ठेवण्याचं कसब या विभागाने दिलं. किंबहुना या दोघींच्या हाताखाली मन असं घडलंय की काहीही झालं तरी संवेदना मरत नाहीत, माणूसपण संपत नाही. मराठीतून पदवीधर तर खुपजण होतात पण रुपारेलच्या मराठी विभागातून पदवीधर होण्याला म्हणूनच अनेक संदर्भ आहेत.
अनुजा मेस्त्री 2007-2008
मजकूर लेखक आणि संपादक
मी सोनाली सावंत सद्या बृहन्मुंबई महानगर पालिका बोरिवली मध्ये लेखनिक म्हणून काम करत आहे, महानगरपालिकेची काम ही बहुतांश मराठीत असतात तर मी मरोठीतून पदवी केल्याचा फायदा मला होत आहे.मराठी विभागामुळे झालेली जडणघडण, रुपारेल महाविद्यालयात शिकताना जावळेकर बाई व अनघा बाई यांच्या महत्वपूर्ण मार्गदर्शनामुळे मराठी विषयाबद्दलची आपुलकी वाढली व लोकांमध्ये खुप गैरसमज असतात तर त्यांना मराठीचे महत्व पटवून देण्याचे सार्मथ्य या मराठी विभागातून मिळालेल्या शिक्षणातून मिळाले आहे.
सोनाली सावंत 2007-2008
शासकीय कर्मचारी ,बृहन्मुंबई महानगर पालिका
मी 2008 साली मराठी विषयातून पदवीधर झाले. रुपारेलमध्ये झालेले संस्कार पुढील वाटचालीसाठी अतिशय मोलाचे ठरले. मराठी वाङ्मय विभागातर्फे होणाऱ्या विविध साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे इतर अनेक कौशल्ये सहज आणि नकळत आत्मसात झाली. कार्यक्रमांचे आयोजन करणे, संघात काम करणे, संवाद कौशल्ये, निवेदने , अहवाल तयार करणे इत्यादी अनेक गोष्टी कोणत्याही 'Personality Development' च्या क्लासला न जाताच जमू लागल्या.पदवीधर झाल्यानंतर मराठी साहित्यातूनच पदव्युत्तर झाले. काही काळ एका जाहिरात संस्थेत काम केले, इंग्रजी माध्यमांतील मुलांना मराठी शिकवले. नंतर 'शैक्षणिक तंत्रविज्ञान' ह्या विषयातून पदव्युत्तर पदवी घेतली. सध्या मी मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट ह्या संस्थेत 'Instructional Designer' म्हणून कार्यरत आहे. आधी शिकलेल्या खूप गोष्टी उदा. मजकुराचे पद्धतशीर विभागणी करणे, दिलेला मजकूर मुद्देसुत मांडणे, प्रत्येक गोष्टीचे विश्लेषण करणे, विविध लक्ष्य गटांनुसार मजकूराचे संपादन करणे इ. ही आणि अशी अनेक कौशल्ये आता उपयोगात येत आहेत. सध्या इंग्रजी भाषा माझ्या कामाचे माध्यम आहे. पण हळूहळू मराठीतून शैक्षणिक सीडीज, संगणकीय पॅकेजेस तयार करण्याचा विचार आहे. शैक्षणिक तंत्रविज्ञान आणि मराठी भाषेचे ज्ञान ह्या दोहोंचा सुगम मेळ साधून मराठी भाषा आणि तिचा अभ्यास ह्यासाठी काही लक्षणीय करू शकू अशी आशा आहे.
मानसी सावंत 2007-2008
शैक्षणिक तंत्रवैज्ञानिक
रूपारेलचा मराठी विभाग म्हटला की आठवणींची रेलचेलच सुरू होते. ११वी १२वी दोन्ही वर्ष चाचपडण्यात जातात. पण १३वी पासून या विभागाशी जो ऋणानुबंध जुळला तो कायमचा. पणशीकर बाई वैशाली तांबे यांच्या जोडीने शिकताना आपण हे गुणांसाठी अभ्यास म्हणून हे शिकतोय याचं कधी ओझं वाटलं नाही. कानांना मेजवानी देणारा प्रत्येक तास होता. मुख्य म्हणजे मोकळीक होती. पु.शिं.च्या सु-हुदगाथेवर झालेल्या चर्चा असोत वा कोणताही विषय...सांगोपांग चर्चा व्हायची. शेवटच्या वर्षी मराठी साहित्य विषय घेतल्यावर तर आमचं एक कुटुंबच झालं. त्या वर्षीचा प्रत्येक तास म्हणजे आनंदयात्रा होती.प्रत्येक विषयाचा अगदी कानाकोपरा लख्ख होईल याची दोघांनी घेतलेली काळजी मला वैयक्तिक सुवर्णपदकापर्यंत घेउन गेली.अभ्यास तर करतच होते मी पण त्यातला आनंद ,गंमत कळली. ज्याचा एम.ए.लाच नव्हे तर लेखनक्षेत्रातही फायदा झाला. त्यामुळे मराठी विभागाच्या रेशमी आठवणी कधीही न मिटणा-याच.
रश्मी वारंग 2000-2001
निवेदक