Science and Innovation Activity Centre (SIAC)

Dr. Panjabrao Deshmukh Memorial Science Centre

डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती विज्ञान केंद्र

डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती विज्ञान केंद्र

शिवपरिवारात एका नवीन संस्थेची भर म्हणून श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीच्या पुढाकारातून श्री शिवाजी शिक्षण संस्थेअंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती विज्ञान केंद्राची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आहे. विदर्भ तसेच श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या इतिहासात मैलाचा दगड ठरणारे विज्ञान केंद्र निर्मितीच्या प्रक्रियेची सुरुवात दिनांक १ मार्च २०१७ रोजी झाली व दिनांक २७ डिसेंबर २०१९ रोजी या केंद्रांचे लोकार्पण करण्यात आले. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात वावरणाऱ्या आजच्या विद्यार्थ्यांच्या चाणाक्ष बुद्धीतून डोकावणाऱ्या एकमेवाद्वितीय, अनन्यसाधारण, तसेच नाविन्यपूर्ण संकल्पनांची तपासणी प्रात्यक्षिकाच्या कसोटीवर करता यावी या भूमिकेतून राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाच्या वित्तीय सहाय्यातून एक अभिनव खुली प्रयोगशाळा श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीच्या माध्यमातून साकार करण्यात आली आहे. राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद, कलकत्ता व होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, मुंबई या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या संस्थांच्या समन्वयातून ही निर्मिती झाली आहे.

उद्दिष्ट्ये

विद्यार्थ्यांच्या विज्ञानपुरक कल्पकतेस चालना देऊन वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे तसेच त्यांच्या संशोधनवृत्तीस प्रोत्साहन देणे या मुख्य उद्देशाने प्रेरित नाविन्यपूर्ण केंद्र या माध्यमातून वैदर्भीय जनतेच्या सेवेत दाखल झाले आहे. विज्ञानाचे मानवी जीवनातील महत्व विद्यार्थ्यांना तसेच जनसामान्यांना समजावे; त्याचा वापर दैनंदिन जीवन शैलीत तथा विचारसरणीत व्हावा म्हणून विविध विज्ञानाधिष्टीत कार्यक्रमांचे आयोजनांद्वारे विज्ञानाचा प्रसार व प्रचार करून विद्यार्थ्यांमध्ये स्फुलिंग चेतविण्यासाठी या केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे.

भूमिपूजन

रामपुरी कॅम्प शिववाडी परिसरामधील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या २.५ एकर जागेवर या विज्ञान केंद्राची भव्य ईमारत राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद, कलकत्ता येथील तज्ञांच्या मार्गदर्शनात उभारल्या गेली आहे. या ईमारतीचे भूमिपूजन दिनांक १ मार्च २०१७ रोजी जगमान्य अणुशास्त्रज्ञ, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष, पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते करण्यात आले होते. याप्रसंगी राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद, कलकत्ताचे संचालक मा. डॉ. अनिल मानेकर; राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे सचिव, मा. डॉ. अरुण सप्रे; नेहरू विज्ञान केंद्र, मुंबईचे संचालक मा. शिवप्रसाद खेनेड, तसेच होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, मुंबईचे मा. डॉ. नरेंद्र देशमुख, इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. हा भव्य दिव्य भूमिपूजन सोहळा श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीच्या प्रांगणात पार पडला होता. याच निमित्ताने सुप्रसिद्ध वैज्ञानिकाचा संवाद आपल्या संस्थेच्या महत्वपूर्ण घटकांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी व्हावा म्हणून डॉ. अनिल काकोडकर यांच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

उदघाटन

राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद, कलकत्ता; नेहरू विज्ञान केंद्र, मुंबई आणि रमण विज्ञान केंद्र नागपूर यांच्या अथक प्रयत्नातून निर्माण अभूतपूर्व विज्ञान केंद्राचे उदघाटन व लोकार्पण दिनांक २७ डिसेंबर २०१९ या वंदनीय डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीउत्सवाच्या पावन पर्वावर रोजी डॉ अनिल काकोडकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. संस्थाध्यक्ष सन्माननीय श्री हर्षवर्धनजी देशमुख यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या या सोहळ्यासाठी अनेक गणमान्य अतिथी उपस्थित होते.

कार्यप्रणाली

विज्ञान केंद्रात उपलब्ध सर्व सुविधा विद्यार्थ्यांसाठी खुल्या आहेत. शाळा महाविद्यालये तसेच इतर शैक्षणिक संस्थांच्या सर्वाना विशेष सवलत देण्यात येणार आहे.