‘आषाढी वारी’ ही महाराष्ट्राची ७०० वर्षांची अनोखी परंपरा आहे. भक्ती, उत्साह, लोककला, संगीत आणि संस्कृती या सर्वांचा उत्कट सोहळा म्हणजे वारी. असं म्हणतात की माणसानं आयुष्यात एकदा तरी वारी करावी, भले तुम्ही आस्तिक असो वा नास्तिक. आषाढी वारी म्हणजे जन्माची शिदोरी आहे.

परदेशात राहून आपल्यासारख्या अनेक जणांना या वारीच्या अनुभवाला मुकावे लागते. ही उणीव भरून काढण्यासाठीच ‘वारी पंढरीची’ हा कार्यक्रम दिंडी, भजन, भक्तिगीते, भारूड आणि माहितीपूर्ण निवेदन यांच्याद्वारे ‘आषाढी वारी’ थेट अमेरिकेमध्ये घेऊन येतो.

‘आषाढी वारी’ हा जागतिक आकर्षणाचा विषय ठरला आहे, एवढेच नव्हे तर तो एक अभ्यासाचा विषय झाला आहे. अशा अद्वितीय, अवर्णनीय व अतुल्य परंपरेशी आपली नाळ जोडणे व त्याचबरोबर हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले आद्य कर्तव्य ठरते.

“सोडियले घरटे आस भरारीची, मन माझे चाले परी वारी पंढरीची” असे ब्रीदवाक्य असलेला हा कार्यक्रम, कर्मभूमी मानून अमेरिकेत आलेल्या मराठी मनांची अवस्था नेमकेपणाने जाणतो व “सूर गुंजती अभिनवतेचे, फुलवित नाते परंपरेचे” याची प्रत्यक्ष प्रचितीच देतो.

पंढरपूरचे रहिवासी, विठ्ठलाचे पारंपारिक पुजारी, वारकरी संप्रदायातील कीर्तनकार व प्रवचनकार, वर्षानुवर्षे पायी चालत जाणारे वारकरी इत्यादींच्या मुलाखती, प्रत्यक्ष वारीचा अनुभव आणि संत साहित्य या सर्वांचा सखोल अभ्यास व संशोधन करून या कार्यक्रमाची मांडणी करण्यात आली आहे. संपूर्ण वारीचा प्रवास उलगडून दाखवणारा असा हा एकमेव कार्यक्रम आहे.

‘वारी पंढरीची’ हा मानस वारीची अनुभूती देणारा वारीचा सांगीतिक प्रवास आहे. हा कार्यक्रम जुन्या जाणकारांच्या आठवणी पुन्हा जाग्या तर करतोच, त्याचबरोबर वारकरी संस्कृतीशी अपरिचित असणाऱ्या तरुण पिढीची नाळ महाराष्ट्राच्या या अद्वितीय परंपरेशी सहजपणे जोडतो.

दिंडी, अभंग, भक्तीगीते, भारूड, माहितीपूर्ण निवेदन, रंगमंचावरील सादरीकरण, संदर्भीय स्थिर व चलचित्रे, विठ्ठल-रखुमाई मंदिर, पंढरपुरी तिलक आणि खास पंढरपुरी प्रसाद अशा विविध पैलूंचा परिणामकारक वापर करून सभागृहात प्रत्यक्ष साकारते ‘वारी पंढरीची’.



This is one of the few programs from North America that has been loved and chosen to be hosted by various Mandals across USA and Canada (BMM Dallas, New Jersey, Philadelphia, Toronto, Los Angeles, Delaware etc.)