डायरी म्हणजे काय ?


दैनंदिन अनुभवांची लिखित नोंद राखणारा एक लवचिक वाङ्‌मयप्रकार.अनेकविध क्षेत्रांतील भिन्नभिन्न कर्तृत्वांच्या व्यक्तींना या प्रकारचे आकर्षण वाटत आले आहे.

आधुनिक काळात काही व्यावसायिक उद्दिष्टांतून छापील आकर्षक स्वरूपात दैनंदिन्यांच्या निर्मितीची व वाटपाची प्रथा रूढ झाली आहे. या दैनंदिन्या शासकीय कचेऱ्यांतून तसेच खाजगी उद्योगधंद्यांतून त्यांच्या कर्मचाऱ्यांना वा ग्राहकांना पुरवल्या जातात. त्यांचा उपयोग रोजच्या कामाचा अहवाल, कार्यपद्धतीविषयीची टाचणे, स्मरणार्थ नोंदी अशा विविध प्रकारांनी होऊ शकतो. काही दैनंदिन्या विशिष्ट क्षेत्रांमध्ये उपयुक्त ठराव्यात अशा हेतूनेच छापल्या जातात. उदा., प्रवाशांच्या सोयीसाठी पर्यटक दैनंदिनी, लेखक व लेखन-प्रकाशनविषयक सर्व व्यवहारांची नोंद ठेवणारी प्रकाशन डायरी, गृहिणींसाठी आवश्यक व नित्योपयोगी माहिती संकलित करणारी स्त्री-सखीसारखी दैनंदिनी इत्यादी.


नूतन वर्षारंभी भेटीदाखल दैनंदिन्या पुरवणे, हा अलीकडे व्यावसायिक विश्वातील जाहिरातीची आणि ग्राहक-समाधानाचा एक आकर्षक प्रकार बनला आहे.

प्रसिद्धीची अपेक्षा नसल्याने त्यांतून मानवी अनुमनाचा स्वच्छंद व मुक्त आविष्कार घडू शकतो. ललित निबंध व भावगीत या प्रकारांशी या दैनंदिनीचे निकटचे नाते जुळते. या नोंदी स्वान्तः सुखाय असल्याने परनिंदा, आत्मश्लाघा वा प्रतारणा यांना त्यांत वाव नसतो. त्यांतील मुक्त, प्रकट चिंतन वा निर्लेप आत्मपरीक्षण म्हणजे अप्रकट मनाचे रेखाचित्रच ठरते.


काटेकोरपणाचा अभाव व स्वैर विस्कळितपणा ही दैनंदिनीची सर्वसामान्य लक्षणे ठरतात. एखादा भाकड दिवस नोंदीवाचून कोराही रहातो. खाद्यपेये, वस्त्रालंकार, शकुनापशकुन, रीतिभाती यांविषयींच्या नोंदींतून व्यक्तिमनाप्रमाणेच प्रादेशिक समष्टिमनाचेही दर्शन घडते.

अन फ्रँकची डायरी ऑफ अ यंग गर्ल (१९४२–४४) हा कलात्मक दैनंदिनीचा उत्कृष्ट आविष्कार होय. ज्यूद्वेषाच्या सामाजिक पार्श्वभूमीवरील व्यक्तिगत अनुभूतींचे तसेच विलक्षण मनोधैर्य आणि आत्मिक सामर्थ्य यांचे अत्यंत भावोत्कट दर्शन तीमधून घडते.

लेखक : शैलजा करंदीकर