Post date: Jun 03, 2011 8:10:25 AM
83, 26 जुलै
मेरी...
असेच अनंताची टिंबे देत कुठवर राहायचे ? ह्या टिंबांना काही अर्थ असतो ?
टिंबे...व्याकुळतेचे निदर्शन.
टिंबे...आर्ततेचे वाहक.
टिंबे...अव्याहततेची जाणीव.
असाच टिंबांचा अर्थ लावत असतो आपण. पण ह्या अर्थाला काही अर्थ असतो का ?
असलाच तर कोणाला गवसतो का ?
गवसला तरी व्यक्त होतो का ?
83, 28 जुलै
अर्थगर्भ ओळींचा शोध कधी संपणाराहे ? हा शोध म्हणजे तरी निश्चित काय ?
स्वप्ने अर्थ शोधत फिरतात अनंताच्या टिंबांवरुन...बेफाम धावत.
अगदीच निरर्थक !
अर्थवाही स्वर प्रसविणारा कंठ किती दांभिक !
83, 29 जुलै
सुरांसंगे डोलावे माणसाने.
पण मेरी...
ज्याचे सूरच हरवले असतील त्याने ?
हल्ली तुझ्या मनातले सूर माझ्या हास्याची झालर लेवून येताहेत. पण मी स्तब्ध आहे. नि तू भ्रमात आहेस.
माझ्या अस्तित्वाचे सत्य तुझ्यापासून दूर आहे; सध्यातरी.
तुला कशी यावी कल्पना ?
मी ऐकतोय तेच सूर.
तेव्हा एका अनामिक हुरहुरीने ऐकलेले.
नि आता मात्र पाणावलेल्या डोळ्यांनी. दाटलेल्या हुंदक्यांनी...
हल्ली हे हुंदके न् डोळे तुझ्यासमोर येत नाहीत.
83, 2 ऑगस्ट
येणा-या वसंताला सामोरे जा.
विधानार्थी प्रश्न करुन आशेची पाखरे उधळलीस.
पुन्हा पुन्हा विचारलेस.
माझे मौन. नंतर विषयांतर.
मी काय द्यावे उत्तर ?
...सभोवार भिरभिरताहेत नर्तनारी पाऊले.
दोन डोळे...खोल. कोरडलेल्या विहीरतळाचे.
दोन डोळे...समुद्रओढल्या सरितेचे.
तुझा प्रश्न. डोळे. यांची अखंड भिरभिर. यातच आज उगवला.
आज काहीसे स्थिरत्व आहे. प्रश्न पुन्हा निरखतोय.
आशेची पाखरे तुझी परत बोलाव.
माझी पाखरे मरुन गेलीयत.
क्वचित एखादा आभास. पाखरे जिवंत झाल्याचा. पुन्हा प्रत्ययास सत्य. पाखरांच्या मृततेचे.
मी तुला आभासांविषयी काहीच बोललो नाही ना ?
खरे तर मी हे बोलायला हवे होते. पूर्वीच.
काहीच न लपविण्याचे ठरविल्यानंतर आता का मी हे माझ्याजवळ ठेवतोय ?
आता मी वेगळा वाटतोय. वेगळा वागतोय. सगळ्यांच्या दृष्टीने.
मला हे पूर्णतः पटतेय. कारण मलाही मी आता वेगळाच जाणवतोय.
मीही शोधतोय हा बदल कसा ?
बदल मी घडविला नाही. अगदी आपसूक. श्रावणमेघांसारखा.
ही प्रक्रिया अजूनही चालूच आहे. कधी संपेल. कुठवर चालेल. यात मीही अनभिज्ञ.
फक्त बघतोय...ही निर्विकारता ? तटस्थता ? की अजून काही ?
ह्या प्रक्रियेत सतत रंग बदलत जाते माझे तत्त्वज्ञान.
नि ह्या बदलत्या तत्त्वज्ञानाचे उपयोजन होत गेले तर-
तर कदाचित कोणाच्याच दृष्टीत मी ‘मी’ उरलो नसेन.
तू मग उगीचच अन्वयार्थ लावत विद्ध होत जाशील.
ती एक संध्याकाळ होती. जेव्हा क्षितिज आरक्त झाले अचानक आषाढात.
कुठेतरी स्पर्शली हुरहूर...
पण स्तब्धता तशीच.
आणि ती रात्र....
मेरी...रात्र बरेच काही देऊन जाते. बरेच काही घेऊन जाते.
मी स्पष्टच का सांगत नाही सारं ? शब्दांची वेटोळी उगीचच वेटाळत जातात आशय.
.........................
.........................
83, 3 ऑगस्ट
कोणाचीच कदर करु नको. आलेल्या संधीचा फायदा घेत चल. ह्या बदललेल्या तत्त्वज्ञानाची कास मी धरलेली आवडेल तुला मेरी ?
.........................
पण मेरी...मी पूर्णतः स्तब्ध असतो. मला गुंतणे जमेनासेच झालेय मेरी. प्रयत्नांची पराकाष्ठा करुनही रुतलेले आतले मी काढून टाकू शकत नाही ग !
........................
हे सगळं तुझ्या अपरोक्ष घडतेय.
इथला वसंत तुझ्या लक्षात आलाय. मी मौन राहिलोय. मला गुंतता येत नाहीये. मी काय करु ?
बदलत्या तत्त्वज्ञानाप्रमाणे वागलो तर-
पण नाही...हे शक्य नाही.
माझ्यातला ‘बुद्ध’ मला कुरतडू लागलाय...
मेरी...
तुला मी हे प्रत्यक्ष सांगणार केव्हा ?
83, 10 ऑगस्ट
मेरी...
असं कसं सुरु झालं ग तुझं अनपेक्षित वागणं?
मेरी...माझ्यापासूनही दूर जावेसे वाटतेय तुला?
सगळं आभाळच कोसळून पडतंय असं वाटू लागलंय.
ही सगळी नाती मेणाची आहेत. तरीही कुठेतरी जपण्याचा प्रयत्न करायचा असतो मेरी...
मेरी...
मेरी...
83, 11 ऑगस्ट
अखेर मेरी माझी आहे. ती असा अविचार करणार नाही, हे मला पक्के माहीत आहे.
मेरी... पुन्हा रुळावर आलीस. तेच डबे-जोडलेल्या नात्यांचे. घेऊन भरधाव धावणार आहेस... खूप मोकळे वाटतेय... मेरी तशीच असणार आहे... पूर्वीचीच...
83, 16 ऑगस्ट
मेरी...
सभोवार अत्यंत वैभवसंपन्न नगरी. मोठमोठ्या हवेल्या. प्रासाद.
गवाक्षांतून डोकावताहेत डोळे.
कधीपासून रोखलेले...
धडकताहेत हृदयावर...
कसे सांगावे त्या डोळ्यांना हे हृदय आहे दगड ?
गगनचुंबी चबुतरे.
सर्व चबुत-यांवर बसलीयत गिधाडे...
ह्यांना हाकारु का ?
सगळ्या नगरीवर पडू देत तुटून...
पाडू देत फडशा सगळ्यांचा...
वाहू देत रक्ताच्या नद्या...
किती सुंदर दिसेल नाही !
अरिबाच्या कुरतडीने आक्रोशणा-या कैद्यापेक्षाही सुंदर !
चंद्र.
तारे.
उल्का.
रात्र पेटली की काय होईल ?
चंद्र, तारे... लाह्यांसारखे तडतडतील आकाशाच्या तव्यावर.
आज दोन डोळे गवसले.
ओळख पटली.
पण मी नाही दाखवली.
राजाने खांद्यावर घेतलेल्या प्रेतात वेताळाऐवजी मी शिरलो.
राजाला गोष्ट सांगितली.
एक राजकुमारी होती. तिचे कोणावर प्रेम नव्हते. तिचे स्वयंवरही होणार नव्हते. होती ती खूप सुंदर.
एके सकाळी दवाने डवरलेल्या पानावरुन तिने अलगद तर्जनी फिरवली. सुळकन एक दवबिंदू खाली घसरला.
ती शहारली. बावरली. गोंधळली... छान लाजली...
ती का लाजली ?
राजा, ह्या प्रश्नाचे उत्तर तुला माहीत असूनही तू दिले नाहीस तर परिणाम तुला ठाऊक आहे. तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील...
राजाचे मौन भंग झालेच नाही. राजाला उत्तरच ठाऊक नव्हते.
प्रेतातल्या मला निमूट बाहेर पडावे लागले...
आता कोणत्या प्रेतात शिरावे ?...
प्रेत...
प्रेत...
प्रेत... माझे. तुझे.
प्रेत... सर्वांचे.
प्रेत... सर्वस्पर्शी... जगङ्व्याळ...
मेरी... मी भूत होईन का भूत ?
कसे दिसेल माझे भूत ?
माझे भूत झाल्यावर तू मला कुशीत घेणार नाहीत कदाचित.
घेशील माझ्या भूताला कुशीत ?
83, 18 ऑगस्ट
रानात कावळा
एकटाच कर्कशतोय...
का नाही पेटत झाडे ?
का पर्वत झालेत थंड ?
जळत का नाहीत मेरी तुझे डोळे ?
कोठून मिळालं हे अमरत्व तुला ?
83, 20 ऑगस्ट
मेरी... आपलीच नखं खोल रुतलेली असतात आपल्या आतड्यामांसात.
वाकडीतिकडी.
उपसून काढावी तर यातनाजल्लोषात
तुषारतात रक्ताची कारंजी...
आतड्यामांसाचा छिन्न चिखल...
मेरी... आता तरी तुझ्या शब्दांचे फोलत्व मान्य कर !
83, 27 ऑगस्ट
उडत गेले सगळे !
मी कुणाचाही नाही
माझेही कोणी नाही.
...ह्या ओळींच्या तीव्रतेचे शिखर गाठत निघालोय मी.
भुकीस्त रात्री बेफामत निघतात तेव्हा मी मुळासकट उखडून काढतो वधस्तंभ नि खांद्यावर घेऊन उतरु लागतो त्या अपार दरीत.
दरी...
ह्या शिखरावरुन त्या शिखराआड इतक्या चोरपावलांनी सरकतो सूर्य की दरीला अजूनही अज्ञात राहावा सूर्य.
लांडगे मला हाकारताहेत
मी बेछूट सामोरा जातोय...
वखवखलेले जबडे माझ्या अंगभर...
रान...
गुहा...
मेरी...
क्षणांपूर्वीचे आपण क्षणानंतर नसतो. नाती मेणाची असली तरी जपायची असतात. हे माझंच वाक्य आता सपशेल डोक्यावर उभं राहिलंय. त्याने शीर्षासन घातलंय.
कोणतीच नाती जपायची नसतात
नाती ...कशासाठी ?
निव्वळ भास !
आपलेपणाची एक भ्रांती !
मी उतरवू पाहतोय ती...
वाटा उरफाट्या...
जिने उरफाटे...
तूही आता परकी आहेस मेरी...
83, 2 सप्टेंबर
शांत, संथ कुरण
गवताचे .
कुठून आली झुळूक ?
गवतात का अचानक सळसळ ?
नयनक्षेत्राच्या कोनातून
दोन तीर अचानक !
नंतर अविरत लाटा कटाक्षांच्या
डुचमळवत गवतडोह...
केसांच्या सरीतून भिरभिरली बोटे;
सरींच्या कोशात तीरही तीव्र !
हा आजचा मत्स्यकोन
दिसेल का पुन्हा ?
मेरी...
पाय-या उतरणारी पावलं...
संथ गवताचे टोकही न लवविणारी.
एका गुहेच्या तोंडाशी
जाळ होऊन उभी.
एक अजस्र पोळणूक...
द्वार सारण्यास न धजणारी.
नयनकिरणांची सन्मुखता नाकारणारी...
त्यादिवशी-
ते द्वार. खाडकन बंद.
डोळे धडकत राहिले त्यावर काही क्षण.
संपली प्रतीक्षा घरट्यातल्या जीवाची ?
की पिसांत लपविली मान रागाने ?
स्मृतींचे विवर
हसले भयाण
पावले द्वारविन्मुख...
हेलकावे...
चुंबकत्व...
मला अपेक्षित.
प्रवासाचे हेच वैशिष्ट्य असते.
मत्स्यकोन तो
पुन्हा...पुन्हा...
चालेल. थांबेल. संपेलही.
83, 6 सप्टेंबर
हरितगंध
रक्तमृत्तिकेवर चकाकतो
कोवळी चमक. पर्णवेली शीत.
सुवर्णसाळ लखलख हलते.
मेरी गोंजारशील ती ?
ताम्रधूल स्पर्शशील तू ?
कपोत पाहिलाहेस तू ?
कावळ्याचा डूख तुला माहीत नसावा.
चंद्रसावल्या...
तरंग... तरल...
भरारशील तू ?
दीर्घकाळ लोटला
मी तिकडे गेलोच नाही.
ती स्थिर असेल ?
द्वार नकळत उघडले असेल ?
मेरी केव्हा दिसेल ती तुला ?
मी अपराधी आहे तिचा ?
गुलमोहराखाली ती असावी
असे वाटतेय का मला ?
कारंजे गोठून गेलेय...
का हा हिमप्रपात ?
मेरी... फ्रीजमध्ये बाटलीत पाणी गोठले तर-
तडकते ना बाटली ?
पावा घुमतोय...
मी का नाही निर्देशवत तो ?
83, 9 सप्टेंबर
अंतराय...
महाप्रचंड.
चेह-यावरील रेषांत सूक्ष्म हालचाल.
थरथरल्या लाटा.
दोलते स्मित ?
कशासाठी डोळे भेदताहेत डोळे ?
मला सापडली नाही ग ती कवटी !
कोणत्या पिशाच्च्याने पांघरली ती ?
चितेवरील कवटीचा फटाक्यासारखा
आवाज ऐकलायस मेरी ?
रोज सकाळी वाटेतल्या झाडावरचा
कर्कश्यणारा कावळा
मरुन पडलेला
माझ्याच वाटेवर...
घळर्इत मी उभा असतो
एका अनामिक प्रदेशात.
एक प्राणांतिक आरोळी...
रोम न रोम
सुखदतेने झंकारत...
असे का बनले कातळकडे हिमनग ?
का झालेत प्रवाही वितळून ?
मी वाहणार नाही.
मला पोहायला चांगले येते.
पण कुठवर पोहू ?
हा तर अथांग सागर झालाय !
बेट.
बेटावरील नरभक्षक राक्षस.
पंख आहेत त्याला
उंचही तो खूप खूप आहे.
नखांची लांबीही खूप खूप आहे.
भोजराजा आणि कालिदास,
सिंहासन बत्तिशी,
वेताळ पंचविशी,
गुलबकावली,
राजपुत्र ठकसेन,
तोता मैना,
कामशास्त्र,
कामसूत्र,
कोकशास्त्र,
वात्स्यायन,
कोकापंडित.
स्निग्ध ओठांची परी
लावण्याचा डोंब उसळवत
समुद्रातून बाहेर पडते. नग्न.
जहाज उध्वस्त.
सुकाणू छिन्न.
83, 15 सप्टेंबर
ती हसली. खुलली. रेंगाळली.
चांदण्यांची फुले उधळली.
बाहेर सूर्य.
कलत्या क्षणांचा सोबती असावा.
ढगाळून बरंच आलंय.
कोंदटता किती अभेद्य !
भेदण्यास असमर्थ
हास्यशलाका.
तिला अजून बरंच अज्ञात असावं !
वर्षणारा गुलमोहर
खैर झाला की मला नक्की ज्ञात होईल,
तिलाही बरंचसं ज्ञात झालंय.
काल मी दरवाजाजवळ होतो.
पण घरालाच मी अज्ञात होतो.
83, 17 सप्टेंबर
भुरके भुरके पुंजके ढगांचे आकाशात.
किती छान दिसतात !
मग नजरांची कोळिष्टकं का वाटतात ?
एक चाफा.
शुभ्र. सगंध. वर्षभर बहरलेला.
अंगणात बाहेर फणसाशी लगडलेला.
दवात चाफा न्हाऊन धुंद.
चिवारीत उभा ओलेता.
वादळाचे सूर दूर दूर चाललेत.
चंद्र सापडला जर आवर्तात-
ती बेछूट वाटतेय...
खूप उसळतेय...
ही भरती मला नवी नाही !
पण ओहोटीच्या यातना तिला नव्याच असतील....
मेरी
मी दुर्बोध झालोय असे वाटतेय ना तुला ? पण मी मला दुर्बोध झालो नाही, असे राहून राहून वाटतेय. की मलाही मी दुर्बोध झालोय ?
सतारीच्या तारेवरुन आता कोणीच जात नाही. तारेची कंपनेच जोरदार. कोण सांभाळेल चालताना तोल ?
दिवसेंदिवस मी समर्थ होत चाललोय. हे कळलं तर तुला खूप खूप आनंद होईल ना मेरी ?
पण मी हे सांगून तू विश्वास ठेवणार आहेस का ?
पण मी सांगणार तरी केव्हा ?
हल्ली तुझा पान्हा दूर आहे माझ्यापासून.
तुफानलेले आसमंत.
घोंघावणारा समुद्र.
आक्रोशणारी रात्र.
आदिवासींचा नाच. बलिस्थानाभोवती फेर.
भाल्यांची पाती. रक्ताळलेले डोळे...
खरंच मी समर्थ आहे का मेरी ?
83, 4 ऑक्टोबर
मेरी...
दिलासणारी ही अक्षरे पुन्हा वाटली.
आपण एकमेकांस शब्द देऊ लागलो पुन्हा.
पण फक्त शब्दच.
माझा किनारा दूरच.
अजूनही.
मी थांबलोच नाही.
कोण दुखावलं पाहिलंच नाही.
बराच बधीर काळ
मला भासलेला आनंदाचा.
पण आज मीच दुखू लागलोय...
मनात लुसलुशीतपणा जाणवतोय
मेरी...
तुझ्या कुशीत...
मेरी... मेरी...
बेटावरचा राक्षस
मला पंजात धरु पाहतोय.
ती किती वेळा डोकावली असेल ?
किती निमित्ते झाली असतील तिची ?
डोकं फोडून टाकावं
छिन्न कवटीला कॅनव्हासवर चोपडावं
राक्षसाच्या दिवाणखान्यात
तेवढंच एक मॉडर्न आर्ट.
कळसांची रांग
भाल्यांची टोकं
ही कोण गणिका सांजप्रहरी
बुद्धविहारी ?
मेरी...
तू तरी सांग ग तिला
'मी आयुष्य कधीच हरवलोय'.
83, 13 ऑक्टोबर
निश्चलता खंबीर...
मेरी...
यातनाहीन...
83, 20 ऑक्टोबर
निश्चलता किंचित भंग...
मेरी
मी यातनांसमीप.
पण गलितगात्र होऊन पारंब्या
अधोमुख नाहीत.
किंवा विस्मरणाच्या प्रयत्नांचे तकलादू ढोल नाहीत.
निमित्ते. टिंक्चर आयोडीन
कशाची गरज नाही.
तोंडावर रुमाल गुंडाळून ऑपरेशन कधीच नाही.
सरळ घाव
मुक्त रक्तओहोळ...
धमनी दाबण्याचा निष्फळ प्रयत्न पूर्ण बंद.
अजस्र, महाकाय
गुदमरवणारे मेघ
हल्ली संपूर्ण सीमाबाह्य. हद्दपार.
मीनाच्या 'दुकानांत कधीच न जाण्याचे ठरवून भागते का ?
किंमत तर मी ठरवतच नाही.
काही विकत घ्यायचे आता राहिलेच नाही.
पण येणा-या नजराण्यांचे काय ?
83, 21 ऑक्टोबर
चांदण्याची विक्री कोण करतो ?
चांदणे...
शारद सुंदर चंदेरी राती...
नभातून गिरक्या घेत कोण बडवतं पडघम ?
वाद ळाने प्राणायामासाठी कुठे जावे ?
83, 24 ऑक्टोबर
नौकेच्या शीडाचं
टोकही लुप्त...
नभातल्या चंद्राने आता कोणावर बरसावं ?
मेरी...
मी स्तब्ध. समुद्रासारखा.
समुद्र कोण देशीचा ?
मी प्रतीक्षेत ?
काय पण भ्रम तुझा !
वळणावरच्या झाडाखाली
कोणीतरी उभे असेल...
पण मला वळणच नाही ग !
एक उभा चढ.
काटकोनात चढणे मलाच ठाऊक.
व्यवहार...
माझ्यात. तुझा आरोप.
कांचनमृग मला मिळवायचा नाही.
पेटलेली शेकोटी
विझवलीय मी.
व्यवहाराच्या निकषावर पुन्हा पेटवू शकतो मी !
पण ज्वाळा नाहीत, हे तुला दिसत असताही
का प्रयत्नशील तू
क्रूसावरील हातात रुतलेले खिळे काढण्यासाठी ?
मेरी...
अजूनही अखेरचा टाहो
फोडला नाही मी, हेही लक्षात ठेव.
83, 25 ऑक्टोबर
सगळे प्रवासी
उतरते झाले बोटीतून.
बेट तसं निर्मनुष्य
आता मात्र समनुष्य.
पिवळ्या मेघांतून सुवर्णाचा शिडकावा
ते अंग अंग शहारले.
तंबू कोठे ठोकावे ?
परतीचा प्रवास कसा असतो ?
दरवाजाची वीण पूर्ण उसवेल जेव्हा
कारंजे उसळेल का तेव्हा ?
कारंजे...
नक्षत्रं उधळतंय सातत्याने.
नेणिवांच्या गर्भाशयात
का पाखरे हुंकारताहेत ?
बर्थ डे.
एक की दोन देऊ ?
नको. एकच पुरे.
माझ्या बर्थडेला दोन हं !
हो. हो.
एक मोठा तुकडा. चिमटीत
तळहात स्पर्शित बोटांनी.
थरथर.
मनभर, अंगभर,
स्वैरपणे.
स्वैरता.
कोप-यात,
दारात,
माजघरात.
इत्यादी. वगैरे.
बर्थ डे आधी दीर्घ अपारदर्शित्व.
83, 27 ऑक्टोबर
अपारदर्शित्व झटकन दूर.
मोकळा रंगमंच.
ओळख आहे ना ?
बस्स काय...
तुम्ही काय मोठी माणसं ! आमचं काय ?
गुहेत शिरताना
भुयारपार होणारी पावलं वेगात असतानाही स्तब्ध.
मला हे अभिप्रेत.
त्यानंतरचं वगैरे वगैरे, इत्यादी, आणि, व.
सारं अभिप्रेत.
चित्रमालिका
अपेक्षा सापेक्ष.
पुन्हा दीर्घ अपारदर्शित्व.
माझी अव्यक्तता
कशी कळावीत तिला प्रयोजनं ?
पुनवेच्या चंद्रानं
गरगर फिरावं क्षितिजावरनं भुईचक्रासारखं.
चांदण्यांची फुलं मुक्त उधळावी न्
घुसमटावं धसमुसळत बेभानतेनं.
ती जपेल प्राजक्त ?
अट्टाहास कारंज्याचा विरेल का कधी ?
गती अग्निबाणाची
गुरुत्वाकर्षणकक्षा भेदण्याची,
निष्कर्ष सद्यक्षणीचा.
पण लक्ष्य अजूनही
अस्पर्श. अभेद्य.
का ?
पण असे का ?
मेरी तुझा सध्याचा वारंवार प्रश्न.
दबा धरुन भक्षकाच्या पवित्र्यात.
83, 28 ऑक्टोबर
विराट, कभिन्न
पडदा.
प्रयत्न व्यर्थ.
बराच झिरझिरला.
पाय-यांवरुन लोळ
एकांतात माझ्यावर.
चकवा.
माझे पलायन.
झिरझिर पुन्हा.
विणू पाहतोय.
दिव्यांची आवली.
दीप
ती लावेल.
मंद ज्योत.
समुद्रपार बेटातील गुहेत. जल्लोष.
मला जायचेय गुहेत.
ओढ वेगवान.
याक्षणी.
83, 22 नोव्हेंबर
मेरी
काळ बराच गतिमान.
टोकं संपत नाहीत पण बोथट होतात.
कवितेचं अनपेक्षित आगमन.
हे याचंच लक्षण.
तू बरीच हलकी झाली असशील मेरी...
संपल्यापैकी एक सुरु झालं.
तू दिलासली असशील
कदाचित असाच दुस-याचाही प्रारंभ...
पण गुहेतले दिवे याची साक्ष नव्हेत.
बोथटलेल्या टोकांना पुन्हा कधी धार येईल, हीही शक्यता असते.
83, 23 नोव्हेंबर
मेरी...
माणसं सापासारखी कात टाकतात नि पुन्हा तेजोमय होतात. शिशिराची अवकळा फार काळ सृष्टीही सोसत नाही. तीही पुन्हा मोहरते, बहरते.
हे बदल आपणास सहज दिसतात. पण कोकीळाची साद मी ऐकतो. पण आवाजामागील भावनेचं दर्शन होत नाही. नेहमीच कोकीळा आर्त असते की ती नेहमीच आनंदी असते ? काही कळत नाही. आवाज तोच असतो. मात्र आपण आपल्या भावनांना त्या आवाजाचा साज देतो. आर्त किंवा आनंदीही.
मला कात टाकणं जमत नाही, याचा मला खेद नाही. तर कात टाकतात याचा हेवाही नाही. माणसाने कात टाकावी. जरुर टाकावी. तरच तो माणूस समाजयोग्यरीतीने जगू शकतो. अन्यथा नाही. जसा मी.
कोणाविषयी सूक्ष्म अढी बाळगावी, हेही जमत नाही. पण तसा समज होत असेल, हे मी नाकारत नाही. तो दूर व्हावा असे वाटते. पण तसा प्रयत्न करणे आवडत नाही.
माणसं अंतर्बाह्य कात टाकून सळसळतात पुन्हा त्याच प्रदेशात. अगदी ओळखसुद्धा दाखवत नाहीत. जुनी ओळख हीही कातच असते. तिचं अस्तित्व म्हणजे मुक्त सळसळण्यातला अडथळाच. ती सोयिस्करपणे टाकून देणेही माणसाला जमते. माझ्या अंगावर प्रत्यक्ष वारुळं दिसत नाहीत, एवढंच. आत त्यांचा हिमालय झालाय. काहीवेळा तो कंप पावतो. लाव्हा उसळतो. डोळ्यांत नाचतो. ओसंडतो नि बराच काळ चेह-यावरही राहतो.
हेही तेवढ्यापुरतंच. पुन्हा ते शिलाखंड आत रचतो. चेहरा समुद्र बनवतो.
गरुडाचे पंख मला आहेत. गिरिकंदरांची झेप मला अपेक्षित आहे. पहिल्या पावसाची नांदी देणारे मेघ दिसू लागले की मोर होणंही मला आवडतं. नव्हे, अपरिहार्यपणे मी होतोच. पण बहारप्रदेशात स्थलांतरित होणारा पक्षी बनणं मला कठीण आहे. बाग कुंपणातून कधीतरी बाहेर पडेल, ही प्रतीक्षा मी करीत नाही.
कितीतरी वेळा मी स्वतःबद्दलच संशयी होतो. मी बोलतो, लिहितो त्यापेक्षा वेगळाच आत नाही ना ?
कधी खात्री होते, तसं नाही. कधी सीमेव आंदोलनं होताहेत असं कळतं. नि लगेच त्या आंदोलनाला जोराचा धक्का देऊन निश्चित प्रदेश देतो. यात बहुधा मी लिहितो, बोलतो तोच प्रदेश असतो.
याक्षणी कितीही वारुळं साचली. कितीही वादळं, तुफानं भोवताली घुमली; तरीही मी अचल, स्थितप्रज्ञ राहीन, असं वाटतं.
जगण्यासाठी आशा हवी असते. तरच दिशा मिळते. ह्या दिशेने जाताना क्षणांची असंख्य बंदरं लिलया पार होतात.
'क्षणांची बंदरं' हा शब्द मी मुद्दाम वापरलाय. ज्याला दिशा असते, त्याला गती असते. दिशा नसते तो गतिहिन असतो. तिथल्यातिथे खचतो. साचतो. 'क्षणांची बंदरं' लिलया पार करणं त्याला जमत नाही. क्षणाची व्याप्ती त्याच्या साचलेपणावर अवलंबून असते. हा प्रत्येक क्षण म्हणजे यातनांचा अणू असतो.
माझ्यात ही दोन्ही विद्यमान आहेत. प्रमाण मात्र सम नाही. मध्येच गती, मध्येच स्तब्धता. क्षणाचा अणू तितकासा विस्फोटक सध्यातरी नाही.
खरं तर हे लिहिताना मी संशयी आहे. मी सीमेवर आहे, असे राहून राहून वाटतेय. हल्ली विकलता तीव्र नसते. जाणिवेची दरी पोखरत निघाली की स्थितप्रज्ञतेचा गिरी उंच होऊ लागतो. क्षणांची बदंरं वेग घेऊ घेतात.
83, 24 नोव्हेंबर
गुहेतले दिवे नाकारले ?
खरंच नाकारले ?
हो. पण का ?
पक्ष्यानं अलगद स्थलांतर केले.
पक्षी परतणार नाही का ?
परतला तरी पिसांचा रंग तोच असेल का ?
मेरी...
फक्त 'मेरी...' अशी एक आर्त साद अखेरची घालून संपेल सारं ?
मेरी...
'मेरी' ही दोन अक्षरं लिहून
एक मोठा निःश्वास सोडतो
नि पुन्हा सुळाचा अंदाज घेऊ लागतो.
कांरजं उसळतं... मेंदूला भेदणारी रक्तचिळकांडी...
छिन्न मेंद्र... सर्वदूर.
दिवाळी कशी चाललीय ?
किंवा दिवाळी कशी गेली ?
प्रश्नांची उत्तरं सत्याची कास धरतच नाहीत.
सुनसान हवेली...
बाहेर रातकिड्यांची सामूहिक रडारड.
येशूचा रक्तस्राव संपला का नाही अजून ?
कोठून येतंच एवढं रक्त ?
येशू का होत नाहीये निस्तेज ?
येशू अखंड तेवतो
चर्चबेल देतो.
मंद सूरात तनमन व्यापतो.
तिनेच नाकारलेले शब्द
ऐकण्याचा हट्ट धरते.
अट्टाहास करते.
मी मी दुजोरा देतो.
आतून खोल हसतो...
उध्वस्त गलबताच्या किना-यावरील वाळूत रुतलेल्या शीडाच्या टोकाकडे बघून कप्तान हसावा तसा.
सूर्याची आग
किती समुद्रस्नानांनी विझेल... ?
गुहेचा वेध मध्येच तुटतो
'सांजावताना' अंधारुनच गेलंय.
वेलींविना मांडव का वाटतोय बोडका ...?
83, 28 नोव्हेंबर
आज
अस्फुट टणत्कारात
वेगात सुटली तीर
...क्षणभर अस्मानच विस्कटले
घुमले बेभान विश्वभर.
अस्फुटतेने उधळले सप्तरंग
कारंज्यांची आरास
फुलांचा बहार
...अशी कशी अचानक कोकिळेने घेतली तान ?
'अचानक ?' प्रश्नचिन्ह का ?
सप्तरंग, बहार, आरास
अशात
कोकिळा तान घेणारच !
स्पर्शाची वाट मनात जाते.
अलगद शहारणं...
तरंगणं...
कुठवर असेल आज तिच्यात ?
वीण नकळत पडत जाते.
धागे कुठून येतात,
टाका कोणता पहिला,
यातलं काही कळतच नाही.
वीण वाढतच जाते.
वीण...
सुबद्ध्ा गुंता.
वीण अलगद उसवते एका बाजूने
सैलपणा पसरत जातो.
मग
निःबद्ध गुंता
सर्व व्यापून.
असाच गुंता 'सांजावताना'
आता
गुहेतही.
एकाच रुळावर
अनेक गाड्या...
कोठून मिळाला असा हा सिग्नल ?
गाड्या एकमेकांना अपरिचित
एकमेकांतून आरपार
अगदी अदृश्य.
जणू आपण एकटेच चाललोय
ह्या रुळावरुन...
चर्चमध्ये
कमाल स्तब्धता.
गुंता सुटत नाही
बळकट होतो.
चर्चमधील शांतता
नि
स्मशानातील शांतता
...फरक ओळखणं कठीण वाटतंय !
मेरी,
गुंत्यांचा पोशाख करुनच
वावरतोय मी.
कधीतरी
गुत्त्यात सोडवू पाहतो गुंता.
गुंता सुटल्याचा आभास
प्रचंड हलकेपण
अश्रूंत वितळतो गुंता.
गुत्त्यातून बाहेर,
आसवं कोरडवून
पाहतो पुन्हा...
तर
गुंता अजूनही तसाच !
कदाचित
वितळणारा गुंता
आसवांतील प्रतिबिंब असावा.
आजच्या अस्फुटावरुन
बराच आत गेलो नाही !
मेरी...
अस्फुटही तसंच होतं.
तुला ते कसं दर्शवू ?
अस्फुट हे अस्फुटच असतं.
स्फुटतं
ज्याच्यासाठी असेल. त्याच्याचसाठी.
मेरी...
डोळ्यांचे डोह असतात.
'सरोवर' हे वरचं प्रतिबिंब.
पण मेरी...
काही डोळे सरोवरच वाटतात ग !
अगदी माझ्यासारख्या पाणबुड्यालासुद्धा !
तुझ्या डोळ्यांविषयी बोलायचं झालं तर
मेरी...
दोन्ही प्रकारांत तुझे डोळे नाहीत.
तिथे आहे धबधबा
अखंड ओसंडणारा.
त्याला डोह नसतो. त्याला सरोवरही नसते.
तो असतो फक्त धबधबा
'आतलं;बाहेरचं'
असं काही नसलेला.
मेरी...
हा धबधबा प्रंचड सुरक्षित.
वेगात ओसंडणा-या धारांत
मी सामावतो विद्युत.
सरोवरच असणारे डोळे
तसे उत्तम असतात वसंत व्हायला.
पण मेरी...
वसंत नाकारलेल्याला
हे कळूनतरी
काय उपयोग... ?
ही थडगी
अन् त्यावरील क्रूस
कशासाठी...?
का ठेवावं पेटीत प्रेत...?
दरवर्षी
अर्पित होतात फुलांचे हार,
चक्र, फुलं...
थडग्यावरील क्रूसावर.
पेटीतला मी मात्र
माझाच विस्कटलेला सांगाडा
जुळवत
पेटीला टकरा देत.
83, 29 नोव्हेंबर
सुनसान रात्रीतून
फेसाळत निघतात
समुद्राची गहनगंभीर
रहस्ये...
मेरी-
मी कठड्यावर होतो.
हुळहुळता गारवा अंगभर.
चंद्र अस्ताची प्रतीक्षा करीत होता की नव्हता,
मला माहीत;
पण
मी मात्र करीत नव्हतो.
अंधारयात्रेचा
गूढ प्रवासी
हरवल्या नभाच्या
शोधातः
नभ
स्वतंत्र तपशील नसलेले.
भटकंती
क्षितीजभर...
अपेक्षाविहिन (?)
रात्र चढत जाते
मी आकस्मिक परततो
गतिमान तरंग
हळूवार मनात पसरत...
83, 1 डिसेंबर
किलबिलत्या सकाळी उठतो.
रानात जातो.
आंब्याच्या खोडावर
सुतारपक्षी
घाव घालत असतो.
मी थांबतो.
घाव मोजतो.
बराच वेळ जातो.
सुतार थकत नाही.
मी थकतो.
कोठून तरी 'कुहू'ची साद येते.
मी वळतो.
त्या दिशेने चालू लागतो.
ती
हळूवार खुलते.
हसते.
नि सारं वृंदावन
नजर करु पाहते.
वृंदावन.
आयुष्य क्षणभर स्तब्धतं.
83, 2 डिसेंबर
मेरी...
चर्चमध्ये
देवळातल्या असंख्य घंटा
लावल्या जातात
अत्युच्च बेभानतेत
बडवल्या जातात...
क्रूसावरचे खिळे
हादरा बसून
येशूच्या हातापायांच्या जखमा
पोखरु लागतात...
आनंदाची बेभानता
अशीही असते-
बहरल्या फुलांवरुन
झेपावत असता
ती थांबते
कोमेजल्या फुलाजवळ.
विचारते.
त्याला आज्ञा करते,
'मला गाऊन दाखव
तुझी मलुलता.'
कोमेजले फूल
हवालदिल...
'हिच्या बहारास ही
कलंकतेची
तहान कशाला...?
अजूनही
सैलता
तिच्या
हातात,
आंदोलनात. अगदी तिच्या मनासारखी.
मेरी...
कधीतरी
तिने
खंबीरता
पेरली पाहिजे ग !
हातात
तशीच मनात.
मागच्या स्थानी
परतणे,
हा आंदोलनाचा
तत्त्वधर्म
बदलायला हवा तिने
कधीतरी...
निदान कधीतरी...
83, 6 डिसेंबर
मेरी...
निर्वाणस्थ सूर्याच्या छायेत
बहरावी स्वप्नता-यांची मैफील...
त्यानेच उधळवली
निखा-यांवरची धूळ
आपल्या ऊर्जस्वल
फुंकरीने.
ठिणग्यांचं स्वयंप्रकाशित्व
झळाळलं दीप्तीमानतेने.
मठातल्या घंटा
घणघणल्या नागानंदाने.
जरी सूर्य निर्वाणस्थ
वेदनायुक्त नाही मी-
ठिणग्यांस पाखर घालून
माझ्यात
तेजाळतोय...
स्थिर... अभंग...!
'पण तू वाटत नाहीस रे तसा !'
अगदी, अभावित शब्द सटकले.
अपेक्षांच्या बागा
नंतरच्या मोसमात...
मेरी...
पावलं आक्रमण करतात
ती अशी.
83, 12 डिसेंबर
एका प्रचंड आरोळीने
उधळून द्यावीत
लगटणारी
स्वप्नांची
लक्तरे...
आयुष्याच्या सीमेबाहेर.
असं कसं झालं तिच्या हातून ?
सांजावताना,
केलेल्या प्रतीक्षेतून
विद्ध होत असताना.
मेरी...
शब्दांची तळी
नितळ असती तर-
मेरी...
शब्दांची तळी
तिच्या डोळ्यांसारखीच.
'दोष कोणाचा'
ह्या प्रश्नाच्या शोधात
आयुष्य संपेल.
सगळा तपशीलाचा पट
समोर मांडून
फोल आहे आता
आडव्या तिडव्या चालींचे मोजमाप.
पक्षी
स्थलांतरित होईल,
शक्यता नव्हती.
पण पक्ष्यांचे स्थलांतर उद्देश
बहारदर्शक असतात ना !
मग
शिशिरप्रवाहावर
भरारणा-या पाखराचे
स्थलांतर
मला का असावे
अगृहीत... ?
83, 15 डिसेंबर
मेरी...
सारे शब्द तुला पोच झाले.
पण शब्दांची जुळवण
पूर्णतः तुला साधली नाही.
अर्थात ते स्वाभाविक होतं.
तुझ्या स्वप्नफुलांच्या पंखांची कदर
मी करु शकत नाही.
उगवणा-या उद्याला
स्वप्नांनी रंगविण्याचा
मला षौक नाही.
बेफिकीर आयुष्याचा साज
माझ्यावर,
असं आता तुझ्या लेखी.
खरंय...
चारदोन शब्दांची उधळण
चौकशीपुरती
कोण्या आपल्याकडून
आता अपेक्षित नाही.
जखम मुक्तपणे वाहू द्यावी...
शुष्क मांसात
चोपडावी माती
पाहिजे तर 'निर्दय' या संज्ञेने.
राखेला
खाक होण्याची भीती
आता कशासाठी... ?
अंगणातला गुलमोहर
धडधडा पेटला,
तरी खंत नाही.
निःश्वासाची गोष्टच दूर
विझविण्याचा प्रयत्न्ा नाही.
वैफल्य
स्थितप्रज्ञतेचा पाया भरतं का... ?
मेरी...
बालिशतेच्या हंगामातच
प्रौढतेची वारुळं चढवली मी...
लुटूपुटूच्या वयात कट्यारींचे अस्सलत्व
पारखलं मी...
चिलखताची
चाहूलही नव्हती...
आता शिलेदारी करीत होतो.
करीन यापुढेही...
पण तितकीशी आतून नाही.
कालपरवापर्यंत
दूरवर का होईना,
एक 'घर' होतं
माझ्या दृष्टिक्षेपात...
आज अखंड
मुशाफिरीची दीक्षा...
कुठले कवडसे ... ?
कुठल्या तिरीपी...?
कुठलीच शलाका
जोजारणं नाही.
पायलीभर चांदण्या ओतून
अवकाशाचे मापन नाही.
समाधान,
खेद,
हर्ष,
दुःख,
सारे पडद्याआड.
मला अनोळखी
आहेत
ते...
83, 21 डिसेंबर
उल्हसित फुलांची
कारंजी... सभोवार.
मेरी...
ती कोणत्या फांदीवर असेल... ?
वर्षाची सुरुवात...
अखेरही...
फुलं अशीच उसळत राहतील... ?
निरोपाचं
जडशीळत्व
तिच्यात कुठवर भिनेल... ?
गोठलेपणास
कधीही आच लागू शकते...
बधीरतेचे हिमनगही
उष्णतेपुढे शरमिंदे होतात...
83, 24 डिसेंबर
निघण्यासाठी
पावलांनी तयार असावं.
पावलं तशी थांबलेली.
नसतातच मुळी,
ती चाललेलीच असतात
अखंडपणे
ती निघतच असतात
ह्या प्रदेशाकडून
त्या प्रदेशाकडे...
मेरी...
येशूच्या आगमनाचे हे दिवस...
मंद, धुंद
चर्चलयीत
प्रेयसीच्या कमरेस विळखा घालून
कधीच का नाचला नाही येशू
बेहोश,
बेधुंद
होत...?
किनारे अवघडून जातात
पूर्णचंद्र माथ्यावर येतो तेव्हां
जथे थबकतात
शोधात वाळूच्या
विसावण्यास.
निनावी वाटांचे
बेनाम संदर्भ.
कुठवर सजवावा
तपशीलाचा साज ?
अनाम रात्रींचे
गहिरे कढ
कुठवर जोजवावे शब्दांत ?
तिच्या सरळसोट
वाटेची किनार
जातही असेल
माझ्या वळणाचा
एखादा कोपरा उसवून...
पण म्हणून
तेवढ्यासाठी
थांबावे का मी
जरीचा धागा घेऊन... ?
काल
चाणाक्षपणे हेरलं
मी वितळतोय...
चटकन पकडली अजस्र पंजात
माझीच मानगुट,
उकळत्या लोहरसात
घुसळून काढलं स्वतःला
नि मग
खूपच थंड झालो
बर्फाशी
नातं
जुळवण्याइतपत.
84, 3 जानेवारी
क्षणात किनारे जवळ
भ्रमण दिशांचे
नि उड्डाण अवकाशात...
....नव्या वर्षाच्या
अगदी प्रारंभात,
रात्रीच्या चढत्या
उन्मादात
कारंजलेल्या शुभ्रशब्दांनी.
दबल्या मनात
अस्पष्ट चाहूल, अपेक्षा;
पण अनपेक्षित
प्रतीक्षा;
तीही रात्रीच्या चढत्या प्रहरात.
विरघळत जाताहेत तरंग...
किती फोल ठरला माझा तर्क !
अजूनही वलयं...
ताजी
नव्या बहरानं.
मी शंकित
माझ्या प्रवाहधारी प्रदेशउतारानं...
हा आत्यंतिक प्रारंभक्षणीचा शब्दोत्सव
वर्षांच्या मंजूषेत
कुठे बरे विराजित करु... ?
84, 4 जानेवारी
मेरी...
एक अत्यंत संथ समुद्र.
उकळत कसा नाही
सूर्याच्या तप्त किरणांनी ?
दूरवर एक गलबत
शीड आखडून
निपचित पहुडलेलं...
अशी कशी विजनभयाणता ही
मौनात चिडीचूप पाखरंही !
सकाळचा दहिवर गोठून
आसमंत सारे विद्ध...
अचानक का ही परिक्रमा
सगळ्या अतीत बेटांची... ?
धुंद सावल्यांचे
बद्ध अस्तित्व...
कंपतही नाही कोणताच वृक्ष...
झंकारत नाही वीणा किनारी... !
मेरी...
तप्त दुपारी एक नशा भिनते
माझ्या प्रत्येक पेशीकेंद्रात...
घडलं त्यावेळच्या
कोवळिकीला 'दुपार'चाच संदर्भ तर होता !
किरणे.
कोवळी,
तप्त,
मलूल;
रात्र शोषत असते मदिरा म्हणून.
मेरी...
नशा चढली की बेभानता येते...
मेरी...
चढत चाललीय मला...
आक्रोश आवरतोय मी आतला...
सगळ्या भावनांचं गाठोडं
बांधून
जाळावं चितेत स्मृतींच्या
अगदी
ढोसून ढोसून.
व्रणही राहू नये पिळाचा म्हणून
कुटावं अगदी... कशासारखं मेरी... ?
कशासारखं .... ?
शब्द, उदाहरणं, योजना...अधुरं सारं...
अधुरं... मेरी...
दात आवळले जाताहेत...
मुठी वळताहेत...
डोळ्यांत रक्त कुटतंय...
कशासाठी... मेरी...
कशासाठी.... ?
84, 12 जानेवारी
नगराच्या वेशीवर
एक कभिन्न छाया पंख फैलावून...
रात्र टक्क उघड्या डोळ्यांत
पहाट फटफटते तरीही...
दुस-याच्या मृत्युशय्येची आच
का बसवते पोलादी गजांचा बंदोबस्त
माझ्या बेफिकीरीभोवती... ?
वणवाग्रस्त रान घेऊन
मी फिरु लागतो तेव्हा-
सारे समुद्र
संथ
आकाशाची निळाई शोषून...
उगवतीची स्वप्ने
अभ्राच्छादित
सोसाटली पाने सर्वभर...
ही तुफानाची चाहूल... ?
84, 17 जानेवारी
पाया पडू ?
नको. नको !
नंतरचा हस्तस्पर्श...
84, 18 जानेवारी
नभातून चांदण्याची
झिमझिम बरसात.
मेरी...
सहज प्रतिसाद दिला.
नि नंतर
खूप मोकळा झालो...
गुंजत राहिला
पाखरांचा हर्षकल्लोळ रानभर...
अगदी पहिल्यांदाच.
निर्झरांचे
कारंजे व्हावे;
नि नंतर
सारे अवकाशच सप्तरंगी व्हावे...
अशीही शक्ती असते
मोकळे होण्यात
मेरी...
पण हे एकदाच.
अवकाशाचे सप्तरंग
वणव्याचे इंधन असते,
अन्
मी ते पुरवू इच्छित नाही.
84, 30 जानेवारी
मेरी..
अपरिहार्यपणे
तर मी स्थिर होत गेलो नाही ना ?
नोंदींची उत्कटता
हरपत तर नाही ना ?
स्वतःचा व्यवहारदर्शी आनंद
सर्वोत्तम असतो का ?
मेरी,
मी दोष देत नाहीये तुला;
दिला नाही.
कदाचित देणारही नाही.
फक्त अंतर्मुख झालोय;
समजावतोय स्वतःलाः
'मेरीसुद्धा माणूस आहे.
आणि म्हणून तीही
आस्वादते, अपेक्षिते
सारं मानवसापेक्ष.'
मेरी...
एका निखळ आनंदावर,
प्रतीक्षेवर
दरड कोसळल्याची तीव्रता
मला भासली.
हेच कारण होतं ना
तुझ्याविषयी अंतर्मुख होण्यात ?
मेरी...
हे अंतर्मुख होणं
योग्य होतं की अयोग्य... ?
मेरी...
अशीच एक नोंद.
26 जानेवारी.
तिच्या आश्वासनांच्या मेघांचा
वाढदिवस.
टाळण्याच्या प्रयत्नात
कातरवेळ झाली नि
नकळत करु लागलो
रोषणाई...
मेरी...
किमान स्मरलं असेल का तिने
तिच्या त्या
क्षितीजपार
रित्या मेघांना... ?
अपेक्षांचा वडवानळ नाही.
तरीही
जिवंतपणाची खूण म्हणून
ही नोंद करावीशी वाटली का ?
84, 8 फेब्रुवारी
निखळत्या क्षणांची
लक्तरं
बांधून ठेवलेल्या गठ्ठ्याची
गाठ अगदी सैल;
कधीही सुटेल...
मेरी...
निरर्थकतेच्या
कोशातून
बाहेर पडण्याचा प्रयत्न
किती ग सार्थ ... ?
निरोपाचे
वेध
आतापासून लागलेत...
मेरी...
प्रचंड कुचंबलोय.
84, 1 मार्च
शेवटची निरवानिरव...
सामान चढवलं जातंय...
...बोट आता सुटेल...
बेटाचे किनारे कायमचे अंतरतील...
84, 7 मार्च
बेटावरील अनभिज्ञ झाडांच्या फांद्या
अशा शेवटच्या क्षणी आरक्त होऊ लागल्याहेत.
बोट सुटणे तर अपरिहार्य....
निरोप देतील ह्या आरक्त फांद्या... ?
मेरी...
व्यूहांची अखंड मालिका...एका पाठी एक...
एक सलग व्यूह. अभेद्य.
दुर्लक्षित क्षेत्रं
आताच कशी हिरवटली... ?
मोजदाद नाही;
परंतु दखल तरी... ?
84, 26 मार्च
मेरी...
रिक्तता वादळास आमंत्रण देते.
जहाज सुटताना
निदान किना-याशी वावटळ नको.
सरते दिवस...
किनारा.
बंदर.
खडकांवर फुटणा-या लाटा...
दूर काळोख समुद्रात
संथ चंद्रबोट...
एकाकी पारवे
कलकलतील...
चंद्र धूसर होईल.
वाळवंट बेधुंद गाईल.
चंद्रकोरींचा निर्देश तिचा
संधिप्रकाशातून लोळ होतोय आता.
चर्चही कुलुपबंद होतं.
सुनसान आवारात
पाय-यांवर येशूचे
रक्तओहोळ
मी शोधू लागतो.
वेदनांचे ठसे उमटत नाहीत.
पावलांचा आवाज
काळोख चिरीत दूर दूर होतो...
84, 27 मार्च
मेरी...
गॉर्कीचे बालपण... प्रवास... टॉलस्टॉय...
'असा किती काळ भावना गुदमरवणाराहेस ?
हा प्रश्न.
ध्येयवाद शुष्क असतो का ?
गॉर्कीला का अनुभवावाव लागला कोंदटपणा ?
'आई' अणुबॉम्ब झाली.
पावेलचा ग्रुप... ओसाडीत उगवणारा तृण....
बर्फ.... कोळसा...
इंजिन...
पण गॉर्की असा का जगला ?
इंधनः
हमीदची मैत्रिण... पहाटेपर्यंतची बोलणी...
हमीद परंपरेचा दुष्मन...
पण शेवटी अर्ध्यातच का कळी गळली ?
रणांगणात हिरवळ शोधणं अत्यंत अयोग्य का ?
'हॅर्टा'ने ही चूक केली.
प्रायश्चित घेतलं.
हे प्रायश्चित होऊ शकेल का ?
प्रायश्चित वेदनादायक असतं. पण हॅर्टाने अंतिम पर्याय, वेदनांचा शेवट म्हणून स्वतःला संपवलं.
फक्त एक अध्याय तर संपणार आहे !
मग का उगीच शब्दकल्लोळ भाववाही ?
आताशा तयारी पूर्ण होतेय...
खरी चढाई यानंतरच.
मेरी...
एकाकी चर्चमध्ये तुझ्या अबोल पुतळ्याशी
माझा हा एकतर्फी संवाद-
माझेच प्रश्नः उत्तरेही माझीच -
कदाचित संपणार तर नाही ?
तसं एक चर्च असंख्यांनी तुडुंब.
पण एकटक 'मेरी'च्या डोळ्यांत विरल्यानंतर
मी एकाकी. चर्च एकाकी. मेरी एकाकी.
चर्चची सर्वात मौल्यवान देणगी 'मेरी'.
रक्तओहोळातही सजीवत्व माझं तिनेच
जपलं-
मेरी नसती तर-
खूप भयानक !
चर्चच्या ज्वालामुखीतून
मीही बाहेर पडून निश्चल झालो असतो
एक अग्निजन्य खडक म्हणून.
खडकः
संवेदनांस नकार.
स्थितप्रज्ञ.
अविकारी.
84, 28 मार्च
मेरी...
ती विचारते-
तू इतका मागे का ?
बघतेः
हे बरं नाही. तुला खूप पुढे जायचंय.
मी हसतो. बोलतो. चटकन निघतो.
मेरी, अस्थी वेचेल ती... ?
84, 30 मार्च
नांगर उचलले जाताहेत...
मेरी,
आहार तिने दिला स्वहस्ते...
अगदी शेवटचा... ?
सूर फडफडत गेले शेवटची शीळ म्हणून...
यानंतर-
कमाल बधीरता...
अचाट स्थितप्रज्ञत्व...
मेरी...
मेरी...
मेरी...
मेरी...
मेरी...
मेरी...
मेरी...
मेरी....
सरलं ग शेवटी... कायमचं... कायमचं... कायमचंच !