कॉम्प्युटर टायपिंग हा कोर्स नेमका कोणी करावा ?
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्याद्वारे संपुर्ण महाराष्ट्र राज्य आणि गोवा राज्यात राबविला जाणारा संगणक टंकलेखन अर्थात GCC - TBC हा अभ्यासक्रम केवळ शासन मान्य टाईपरायटींग इन्स्टिट्युट मध्येच राबविला जातो. हा कोर्स करण्यासाठी कमीत कमी आठवी पास शैक्षणिक पात्रता आवश्यक असून त्यापुढील शैक्षणिक पात्रता असणारे कोणतेही विद्यार्थी हा कोर्स करू शकतात. १० वी, १२ वी झालेले विद्यार्थी मोठ्या प्रमाणात हा कोर्स करतात. १० वी किंवा १२ वी ची परीक्षा झाल्याबरोबर सुट्टीत कॉम्प्युटर टायपिंग कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते.
ग्रॅज्युअट, पोस्ट ग्रॅज्युअट, स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी, सरकारी नोकरदार शिक्षक, वकील, इंजिनिअर यांचीही लक्षणीय ओढ या कॉम्प्युटर टायपिंग कोर्सकडे प्रामुख्याने पाहवयास मिळते. कारण सरकारी - खाजगी नोकरीमध्ये कॉम्प्युटरवर ऑफिस वर्क करण्यासाठी या कोर्सचा मोठा उपयोग होतो.
शिक्षक, वकील, इंजिनिअर यांना, त्यांच्या कामात कॉम्प्युटर टायपिंगचे अनन्य साधारण महत्व आहे. कारण कॉम्प्युटर टायपिंग हा कोर्स शिकलेल्या विद्यार्थ्यांना एम-एस ऑफिस, इंटरनेट याचे संपूर्ण संगणकीय ज्ञान आणि टंकलेखनात स्पीड आणि ॲक्युरसी येते. स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, शिक्षण सेवक, सरकारी, निमसरकारी अधिकारी कर्मचारी यांना कॉम्प्युटरचे ज्ञान अत्यावश्यक असून GCC - TBC हा कोर्स MS-CIT ला समतुल्य आहे. (राजपत्र - महाराष्ट्र शासन आदेश क्र. 201807161600222011 आदेश पारीत दिनांक 16 जुलै, 2018). स्पर्धा परीक्षेतील अनेक पदासाठी टायपिंग आणि कॉम्प्युटर या दोन्ही गोष्टींची आवश्यकता असते. कॉम्प्युटर टायपिंग या एकाच कोर्स मध्ये या दोन्हीही गोष्टींचा समावेश असून विद्यार्थ्यांना पुन्हा कुठलाही वेगळा कोर्स करण्याची आवश्यकता भासत नाही त्यामुळे कॉम्पयुटर टायपिंग या कोर्सकडे विद्यार्थ्यांचा मोठा ओढा आहे.
10 वी, 12 वी शैक्षणिक पात्रता आणि कॉम्प्युटर टायपिंग विषयाची इंग्रजी 30, 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि. किंवा हिंदी 30 श.प्र.मि. विषयाची परीक्षा पास असलेल्या विद्यार्थ्यांना अनेक शासकीय कार्यालयामध्ये क्लार्क टायपिस्ट ची नोकरी उपलब्ध असते. आजकाल बीसीए, एमसीए, सॉफ्टवेअर इंजिनियर तथा संगणकीय क्षेत्रात उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी, सायन्स आणि कॉमर्सचे विद्यार्थीही कॉम्प्युटर टायपिंग इन्स्ट्टियुट मध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश घेताना दिसतात कारण संगणकावर वेगाने बोटे चालविण्यासाठी आणि संगणकाचे मुलभुत शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये या कोर्सचे विशेष आकर्षण आहे.