मत्स्योदरी शिक्षण संस्था जालना
सुवर्ण महोत्सवी वर्ष २०२३-२४
मत्स्योदरी शिक्षण संस्था जालना
सुवर्ण महोत्सवी वर्ष २०२३-२४
कर्मयोगी अंकुशरावजी टोपे
माजी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य .
अध्यक्ष मत्स्योदरी शिक्षण संस्था जालना .
सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मत्स्योदरी शिक्षण संस्थेतील सर्व माजी विद्यार्थ्यांना आवाहन
'शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे व आर्थिक विकासाचे एक प्रभावी साधन आहे, हे सूत्र डोळयापुढे ठेवून, या भूमिशी आपले नाते अधिक घट्ट करण्यासाठी, इथल्या समाजाचे आपण काही देणे लागतो या आंतरिक जाणिवेने, बहुजन समाजातील मुले-मुली खूप खुप शिकली पाहिजेत, या तळमळीतून आणि जालना जिल्ह्याचे शैक्षणिक मागासलेपण घालविण्यासाठी या विभागाचे दैवत असलेल्या श्री मत्स्योदरी देवी, अंबड जिल्हा जालना या पूज्य स्थानाच्या साक्षीने कर्मयोगी अंकुशरावजी टोपे यांनी 1974 साली मत्स्योदरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. तेव्हापासून जालना जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा नवा अध्याय सुरु झाला.
महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या आधुनिक काळातील युगप्रवर्तक महापुरुषांच्या विचारधारेनुरूप संत गाडगेबाबा, कर्मवीर भाऊराव पाटील, यशवंतरावजी चव्हाण, वसंतदादा पाटील, शरदरावजी पवार अशा अनेक महान समाजपुरुषांनी सर्वसामान्य माणसांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि उन्नतीसाठी शिक्षण हे तळागाळापर्यंत पोहचले पाहिजे, त्याशिवाय त्यांचा उध्दार होणार नाही. या शब्दात सामाजिक जाणिवेतून केलेले ठोस प्रतिपादन हेच आमच्या शिक्षण संस्थेने मूलभूत ध्येय मानून आधुनिकतेबरोबरच वैचारिक व सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे अखंड व्रत मनोभावे स्वीकारले आहे. हे येथे अभिमानाने नमूद करावेसे वाटते |
1974 साली लावलेल्या मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या या रोपट्याचे आज वटवृक्षात रुपांतर झाले आहे. मागील पाच दशकाच्या काळात केवळ संख्यात्मकच नव्हे; तर गुणात्मक शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या मत्स्योदरी शिक्षण संस्थेने मराठवाड्याच्या शैक्षणिक वर्तूळात आपली स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण खास परंपरा निर्माण केली आहे. आज मत्स्योदरी शिक्षण संस्थेअंतर्गत 10 प्राथमिक शाळा, 22 माध्यमिक शाळा, 06 पदवी महाविद्यालये, 17 पदव्युत्तर विभाग, 01 विद्यार्थी वसतिगृह, 03 विद्यार्थिनीचे वसतिगृह, डी. एड., बी.एड. आणि बी.पी. एड. महाविद्यालय, सैनिकी शाळा, विधी महाविद्यालय, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, इत्यादी विविध शाखा कार्यक्षमपणे सुरु आहेत. या संस्थेच्या विविध शाखांतर्गत सुमारे 35,000 विद्यार्थी विद्यार्थिनी घडविण्याचे अव्याहत कार्य 1250 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संपूर्ण निष्ठेने व प्रामाणिकपणे करीत आहेत.
ग्रामीण बहुजन समाजातील मुला मुलींना गुणवत्तापूर्ण शिक्षण घेता यावे, यासाठी कर्मयोगी अंकुशरावजी टोपे साहेब यांनी अतिशय महतप्रयासाने सुरु केलेल्या, मत्स्योदरी शिक्षण संस्थेवर त्यांचे जीवापाड प्रेम होते. म्हणूनच शाळा-महाविद्यालयाच्या गुणात्मक विकासावर त्यांनी खूप भर दिला ते नेहमी म्हणत असत की गुणवत्ता हीच उत्कृष्टता-साधण्याची गुरुकिल्ली आहे. गुणवत्तेशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. त्यांचा आचार विचारांचा वारसा माजी सार्वजानिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा. आ. राजेशभैय्या टोपे साहेब व संस्थेच्या सचिव आदरणीय श्रीमती मनिषाताई टोपे अतिशय नेटाने व निष्ठेने पुढे चालवित आहेत, याचे आपण सर्व साक्षीदार आहात.
आम्हाला अभिमान आहे की, आपण मत्स्योदरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेऊन जीवनाची यशस्वी वाटचाल करीत आहात. सन 2023-24 हे मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून आपण साजरे करीत आहोत. त्यामुळे आपण विविध कार्यक्रम उपक्रमांच्या निमित्ताने एकत्र भेटणार आहोतच परंतु माजी विद्यार्थ्यांचा एक महामेळावा आयोजित करण्याचा देखील आमचा मानस आहे. तेंव्हा आम्ही सोबत दिलेल्या नोंदनी फॉर्ममध्ये आपली माहिती मागवत आहोत. कृपया ही माहिती भरून द्यावी व सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करण्याच्या दृष्टीने व संस्थेच्या विकासाच्या दृष्टीने काही अनमोल सूचना असतील तर त्याही नमुद कराव्यात, ही विनंती.
डॉ. बी. आर. गायकवाड( प्रशासकीय अधिकारी )
श्री. राहूल भालेकर(सहाय्यक प्रशासकीय अधिकारी )