संकल्पना

“अवघा रंग एकचि झाला” ही केवळ एक नाट्यनिर्मिती नाही, तर नव्या सांस्कृतिक पर्वाची सुरुवात आहे. परदेशात स्थलांतरित मराठी कुटुंबे, नव्या पिढीतील तरुण, आणि भारतातील कुटुंबे यांना संगीत व नाट्याच्या माध्यमातून भावनिकरीत्या एकत्र आणण्याचा हा एक मनस्वी प्रयत्न आहे.

डॉ. मीना नेरुरकर लिखित आणि पं. रघुनंदन पणशीकर यांच्या संगीताने सजलेले हे दोन अंकी संगीत नाटक जुन्या आणि नव्या पिढीतील विचारांचा संघर्ष अत्यंत संवेदनशीलतेने उलगडते. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम साधत, कीर्तन-अभंगांच्या आध्यात्मिकतेशी पाश्चिमात्य आणि फ्युजन संगीताची सांगड घालते.

प्रत्येक पिढीला स्वतःचे प्रतिबिंब दाखवणारी, नात्यांचा अर्थ नव्याने समजावणारी आणि मराठी अस्मितेचा अभिमान जागवणारी ही निर्मिती प्रेक्षकांच्या मनात दीर्घकाळ रेंगाळते. “अवघा रंग एकचि झाला” हि सर्व कुटुंबाने एकत्रित अनुभवावी अशी कलाकृती आहे.