भंडारा हा ‘भनारा’ या शब्दाचा अपभ्रंश असावा कारण रतनपूर येथील उत्खनात इ.स.११०० मध्ये मिळालेला शिल्पलेखात ‘भनारा’ असा शब्दप्रयोग आढळतो. भंडारा जिल्हा हा वैनगंगेच्या खोऱ्यात उत्तर अक्षांश २१.१७° आणि पूर्व रेखांश ७९.६५° च्या दरम्यान वसलेला आहे. भंडारा जिल्ह्याचा उत्तरेस मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्हा, पूर्वेस गोंदिया जिल्हा, दक्षिणेस चंद्रपूर जिल्हा व पश्चिमेस नागपूर जिल्हा आहे. या जिल्ह्यात दर हजार पुरुषामागे स्त्रियांची संख्या ९८२ आहे. हेच प्रमाण ग्रामीण भागात ९८३ व शहरी भागात ९८१ आहे. तुमसर, लाखांदूर तालुक्यात हे प्रमाण सर्वात जास्त ९९२ तर मोहाडी, लाखनी तालुक्यात सर्वात कमी ९७४ इतके आहे. या जिल्ह्यात ८३.८% लोक साक्षर आहेत. त्यापैकी पुरुष व स्त्रियांची टक्केवारी अनुक्रमे ९०.४ % व ७७.१ % इतकी आहे. नागरी भागात ९०.७ % व ग्रामीण भागात ८२.१ % साक्षरता दिसून येते. जिल्ह्यात धर्मानुसार हिंदू ८४.१%, बौद्ध १२.९%. मुस्लिम २.२%, खिश्चन ०.२%, जैन ०.१%, शीख ०.१%, इतर ०.३% आणि धर्म निर्देशित न केलेली लोकसंख्या ०.२% आहे. जिल्ह्यात भंडारा, तुमसर आणि साकोली असे 3 उपविभाग आहेत. भंडारा उपविभागात 2 तालुके असून , तुमसर उपविभागात 2 तालुके असून ,साकोली उपविभागात 3 तालुके असून 878 गावे आहेत. वैनगंगा ही जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. या नदीचा जिल्ह्यातील प्रवाह उन्हाळ्यातसुद्धा कोरडा पडत नाही. या जिल्ह्यात बावनथडी, चूलबंद, कन्हान, बाघ ही धरणे आहेत.
महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा! तलावांचा जिल्हा अशी या शहराची ओळख, जवळपास 3,648 लहान मोठी तळी या शहरात आहेत.
तलावांचा जिल्हा जशी या शहराची ओळख तसच हा जिल्हा ओळखला जातो तो सुगंधी तांदुळासाठी! मोठया प्रमाणात तांदळाचे उत्पादन या जिल्हयात घेतले जात असुन सुगंधी तांदुळाचे विपुल प्रमाणात उत्पादन घेतले जाते.
तांबे या धातुचे उत्पादन या जिल्हयात मोठया प्रमाणात होत असल्याने या शहराला ‘ब्रास सिटी’ देखील म्हंटल्या जाते.
भंडारा जिल्हयातील तालुके – Bhandara District Taluka List
1) भंडारा
2) साकोली
3) तुमसर
4) पवनी
5) मोहाडी
6) लाखनी
7) लाखांदुर
भंडारा जिल्हयाविषयी उपयुक्त माहिती – Bhandara District Information
लोकसंख्या 12,00,334
क्षेत्रफळ 3,716 वर्ग कि.मी.
1000 पुरूषांमागे 979 स्त्रिया
राष्ट्रीय महामार्ग 6 या शहरातुन गेला आहे.
सुगंधी तांदुळ आणि तांबे या उत्पादनाकरता हा जिल्हा ओळखला जातो.
येथील मुख्य व्यवसाय शेती असुन शेती आणि जंगलांपासुन मिळणाऱ्या उत्पन्नावर येथील अर्थव्यवस्था अवलंबुन आहे.
चिन्नोर, दुभराज, काळी कमोद या तांदळाच्या सुगंधी जाती विशेषतः भंडारा जिल्हयात होतात.
तलावांचा जिल्हा म्हणुन देखील हा जिल्हा प्रसिध्द आहे इतके तलाव महाराष्ट्रातील कुठल्याही शहरात नाहीत.
ऑर्डनंस् फॅक्ट्री या जिल्हयात असल्याने देखील या शहराला एक वेगळं महत्व आहे. भारतीय सशस्त्र बलाकरता तेथे दारूगोळा बनवण्यात येतो.
अंबागड किल्ला – Ambagarh Fort
भंडारा जिल्हयातील तुमसर तालुक्यातील हा अंबागड किल्ला तुमसर पासुन सुमारे 13 कि.मी. लांब आहे. या किल्ल्याचे निर्माण 1700 व्या शतकात देवगाध चे शासक बखबुलंद शाह यांच्या राजा खान पठाण यांनी केले होते त्यांनतर हा किल्ला नागपुर चे राजा रघुजी भोसले यांच्या ताब्यात आला. त्यांनी याचा उपयोग कैद्यांकरता जेल च्या रूपात केला त्यानंतर ब्रिटीशांनी हा किल्ला हस्तगत केला.
इंदिरा सागर प्रकल्प (गोसेखुर्द) – Indira Sagar Gosikhurd Dam
इंदिरा सागर प्रकल्प ज्याला गोसेखुर्द धरण म्हणुन देखील ओळख आहे. या धरणाचे भुमीपुजन तत्कालीन प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी यांनी 23 ऑक्टोबर 1984 रोजी केले होते.
नागपुर भंडारा आणि चंद्रपुर जिल्हयातील शेती ओलीताखाली यावी याकरता या धरणाची निर्मीती करण्यात आली. सध्या या पाण्यामुळे येथील शेतीला तर फायदा झालाच आहे शिवाय या पाण्यावर वीजनिर्मीती देखील केली जात आहे.
या प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्रातील गावांजवळ वैनगंगा नदीवर सुमारे 11.35 कि.मी. लांबीचे धरण बांधण्यात आले आहे. यामुळे भंडारा नागपुर आणि चंद्रपुर जिल्हयातील सुमारे 2,50,800 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.
श्री भृशुंडी गणेश मंदीर – Bhrushund Ganesh Temple
विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक श्री भृशुंडी गणेशाचे मंदीर एक पावन तिर्थस्थळ आहे. अतिशय प्राचीन अश्या या विनायकाचे नाव भृशुंड ऋषींमुळे पडले आहे. एका मोठया वडाच्या झाडाखाली ऋषींचा आश्रम होता, ऋषी भगवान गणेशाचे निस्सिम भक्त होते.
आज या ठिकाणी असंख्य भाविक दर्शनाकरता गर्दी करतात. या मंदीराव्यतीरिक्त हनुमानाचे आणि महादेवाचे देखील मंदीर या ठिकाणी आहे प्रत्येक महिन्यातील चतुर्थीला भाविक दुरदुरून या ठिकाणी भेट देतात.
नवसाला पावणारा अशी या विनायकाची ख्याती सर्वदुर पसरली आहे. या ठिकाणी भेट द्यायची असल्यास सर्व वाहनसुविधा उपलब्ध आहे.
उमरेड कहरंदला अभयारण्य – Umred Karhandla Abhayaranya
नागपुर पासुन साधारण 58 कि.मी. आणि भंडारापासुन 60 कि.मी. अंतरावर हे अभयारण्य वसलेले असुन निसर्ग सौंदर्याने मुक्त हस्ते उधळण केल्याने पर्यटकांची नेहमीच इथे गर्दी पहायला मिळते.
हे ठिकाण वाघांच्या प्रजनना करता सुरक्षीत केल्याने इथे वाघांची संख्या देखील गेल्या काही दिवसांमधे वाढलेली आढळुन आली आहे. दुर्लभ आणि नामशेष होत चाललेल्या प्रजाती देखील इथल्या सुरक्षीत आणि प्राकृतिक वातावरणात वाढलेल्या आढळतात.
वैनगंगा नदीच्या किनाऱ्याला लागुन असलेले हे अभयारण्य ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाला देखील जोडलेले आहे. या ठिकाणाला भेट देण्याचे जर तुमच्या मनात असेल तर राज्य परीवहन महामंडळाच्या बसेस इथे येण्याकरता उपलब्ध असतात आणि शिवाय खाजगी वाहनाने देखील इथे पोहोचता येते.
कोरंभी देवी मंदीर – Pingleshwari Devi Temple
भंडाराचे ग्रामदैवत पिंगेश्वरी देवी! वैनगंगा नदीच्या तिरावर वसलेली ही देवी बोम्बलेश्वरी देवीचे प्रतिरूप असल्याची भाविकांची श्रध्दा आहे. भंडारा शहरापासुन अवघ्या 5 कि.मी. अंतरावर असलेल्या उंच डोंगरावर विराजमान झालेली ही देवीची मुर्ती 400 वर्ष जुनी असल्याचं सांगितलं जातं.
एकाच शिळेपासुन देवीची मुर्ती तयार झाल्याचे बोलले जाते. चैत्र नवरात्रात देवीची मोठी जत्रा भरते त्यावेळी भाविकांची मोठया प्रमाणात या यात्रेला गर्दी झालेली पहायला मिळते. मंदीर उंच डोंगरावर वसलेले असुन जवळपास 251 पायऱ्या चढुन मंदीरात पोहोचता येतं.
देवी शिवपींडीवर विराजमान असल्याने तिचे नाव पिंगलेश्वरी पडल्याची आख्यायिका सांगितली जाते. देवी पुर्वाभिमुखी असुन सुर्याचे पहिले किरण देवीच्या मुखावर पडत असल्याचे सांगितले जाते.
देवीची मुर्ती इतकी पुरातन असुन नेमकी देवीची मुर्ती किती काळ आधीची आहे हे नेमके कुणालाही ठाउक नाही. जे भाविक छत्तीसगड राज्यात उंच टेकडीवर वसलेल्या बोंबलेश्वरी देवीचे दर्शन घेउ शकत नाहीत त्यांच्याकरता ही देवी खुप महत्वाची मानली जाते. छत्तीसगढ राज्यातुनही मोठया संख्येने भाविक या देवीच्या दर्शनाला येतात. भंडारा शहराला लागुन असल्याने सर्व रोड वाहन व्यवस्था या ठिकाणी येण्याकरता उपलब्ध आहे.
महासमाधी भुमी – Mahasamadhi Bhumi Bhandara
महासमाधी भुमी ची निर्मीती पवनी तालुक्यात 1987 ला केली गेली. पवनी एक प्राचीन ठिकाण असुन सम्राट अशोक यांच्या काळापासुन बौध्द संस्कृतीच्या मुख्य केंद्रांपैकी एक आहे, बौध्द धर्माच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रगतीकरता याची निर्मीती करण्यात आली.
दरवर्षी महासमाधी भुमीच्या धम्म मोहोत्सवाकरता लोक मोठया संख्येने एकत्र येतात. या ठिकाणी वैनगंगा नदीच्या तिरावर महासमाधी भुमी महास्तुपाचे उद्घाटन 8 फेब्रुवारी 2007 ला करण्यात आले. या उद्घाटना प्रसंगी उत्सवात सहभागी होण्याकरता बौध्द भिक्खु आणि देशविदेशातुन नामवंत व्यक्तिमत्व आले होते. ही महासमाधी भुमी बौध्द मुर्तीकलेचा एक उत्तम नमुना आहे.
कोका वन्यजीव अभयारण्य – Koka Wildlife Sanctuary
नागपूर-भंडारा हे 65 कि.मी. अंतर असून भंडाऱ्याहून चंद्रपूर हे प्रवेशद्वार 19 कि.मी. आहे. चंद्रपूर प्रवेशद्वारापासून 3 जिप्सींची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच स्वत:चे वाहनही जंगल सफारीसाठी वापरता येते.
भंडारा-गोंदिया जिल्ह्यात पसरलेल्या न्यू नागझिरा व नागझिरा अभयारण्याला लागूनच असलेले 10,013 हेक्टर वनक्षेत्र शासनाने 2013 मध्ये अभयारण्य म्हणून घोषित केले. या अभयारण्याला ‘कोका अभयारण्य’ असे नाव देण्यात आले. ब्रिटीश काळात ‘ओल्ड रिझर्व्ह फॉरेस्ट’ म्हणून जे जंगल ओळखले जात होते त्याच भागाला अभयारण्याचा दर्जा देण्यात आला आहे.
हे अभयारण्य वन्य जीवांसाठी उत्कृष्ट अधिवास असल्याचे निदर्शनास आल्यामुळेच या जंगलाला वन्य प्राण्यांसाठी ‘संरक्षित’ केले आहे. या अभयारण्याच्या क्षेत्रात वाघ, बिबट, गवा, अस्वल, काळविट, नीलगाय, सांबर, रानकुत्रे, चितळ, रानडुकर इत्यादी प्राणी आहेत. त्याचबरोबर अनेक पक्षांच्या अधिवासाने व जैवविविधतेने जंगल श्रीमंत झाले आहे.
या अभयारण्याचा विकास डिसेंबर 2013 पासून सुरु झाला असून 25 नैसर्गिक पाणवठे आहेत. ज्याठिकाणी वन्य प्राण्यांना पाणी उपलब्ध नाही, त्याठिकाणी विंधन विहीरी बांधण्यात आल्या आहेत. पाणी पिण्यासाठी सिमेंट टाक्या तयार करण्यात आल्या आहेत. टाकीत सतत पाणी रहावे म्हणून सौर ऊर्जेवर चालणारे पंप बसविण्यात आले आहेत. या अभयारण्यात जाण्यासाठी चंद्रपूर या गावी प्रवेशद्वार करण्यात आले आहे. पर्यटकांना जंगल सफारीसाठी 5-7 गाड्या सोडण्यात येत आहेत.
जंगल सफारीची वेळ
पर्यटकांना जंगल सफारीकरिता सकाळी 5 ते 9.30 आणि दुपारी 3 ते 6.45 या कालावधीत जाता येते.
कसे पोहोचाल?
विमान वाहतूक :
विमान वाहतूक व्यवस्था, हि डॉ बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल एअरपोर्ट, नागपूर ( महाराष्ट्र ) पर्यंत उपलब्ध आहे. विमानतळापासून भंडारा ६५ किमी अंतरावर आहे.
रेल्वे व्यवस्था :
नागपूर रेल्वे स्टेशन पासून वरठी रेल्वे स्टेशन, भंडारा. ( एक तास )
रॊड ने :
नागपूर – पारडी – भंडारा राष्ट्रीय महामार्ग एन एच – ६. ( ६० कि मी )
महासमाधी भूमी : जवळजवळ ४६ की. मी. रोड ने ( १ तास 3 मिनिट्स ) भंडारा पासून.
रावणवाडी धरण : जवळजवळ २१ की. मी. रोड ने ( ३६ मिनिट्स ) भंडारा पासून.
उमरेड – करंडला वन्यजीवन अभयारण्य : जवळजवळ 79 की. मी. रोड ने ( १ तास 52 मिनिट्स ) भंडारा पासून.
कोरंभी मंदिर : जवळजवळ ८ की. मी. रोड ने ( २२ मिनिट्स ) भंडारा पासून.
गोसेखुर्द धरण : जवळजवळ ४४ की. मी. रोड ने ( १ तास ४ मिनिट्स ) भंडारा पासून.
कोका वन्यजीव अभयारण्य : जवळजवळ २७ की. मी. रोड ने ( ४४ मिनिट्स ) भंडारा पासून