सारासार विचारातून सामाजिक संवेदनेचा विकास

सारासार विचारातून सामाजिक संवेदनेचा विकास (Critical Thinking for Social Sensibility):
परिचय:

समिधा पुण्यातील कर्वे नगर ह्या भागात वस्ती पातळीवर एक शैक्षणिक केंद्र चालवते. ह्या केंद्रामध्ये इतर बऱ्याच गोष्टींवर लक्ष केंद्रित केले जाते पण त्या सोबतच सामाजिक जाणीव वाढवण्यासाठी हि प्रयत्न केले जातात. सामाजिक जाणीव/संवेदना ह्या विषयाचा विचार करतो तेव्हा त्यातील सर्वात पहिला टप्पा म्हणजे एकूणच समाजातील प्रत्येक गोष्टी कडे एका त्रयस्थ नजरेने बघणे. मुलांना हि दृष्टी मिळणे हे सामाजिक संवेदना किव्वा सामाजिक जाणीव निर्माण होण्यासाठी खूपच गरजेचं आहे. अन्यथा आपण रोजच्या जगण्यात रुळलेल्या सर्वच गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतो. मुलं सोडूयात आपण वयस्क सुद्धा कितीतरी गोष्टींचा विचारच करत नाही. म्हणजे अगदी घरात आजही बाई/मुलगीच का स्वयम्पाक बनवते इथं पासून सुरु करून, उपवासाच्या दिवशी साबुदानाचं का खायचा, मोठ्यांचे पाय का पडायचे, अमेरिकाच का श्रीमंत देश आहे, वैगेरे. जो पर्यन्त रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या ह्या सर्व गोष्टींकडे आपण चिकित्सक नरजरेने बघत नाही तो पर्यंत आपण खोलवर जाऊन त्याचा विचार करणारच नाही. तर अश्या रोजच्या गोष्टींकडे त्रयस्थ नजरेने बघून सर्वांगीण आणि सर्जनशील विचार करण ह्यालाच आपण सारासार विचार असं म्हणूयात.

सारासार विचार ते सारासार व्यक्तिमत्व (Critical Thinking to Critical Being):

सारासार विचार (critical thinking) च्या बऱ्याच वेगवेगळ्या व्याख्या केल्या जातात. इनिस च्या व्याख्येप्रमाणे, "वाजवी (reasonable) आणि चिंतनशील (reflective) विचार शैली जी कशावर विश्वास ठेवायचा ह्यावर आणि कृतीवर (what to believe and do) केंद्रित आहे." लिपमैन ने परिभाषित केल्याप्रमाणे "कुशल(skillful), जबाबदार (responsible) विचार करण्याची शैली जी चांगला निर्णय घेण्यास मदत करते कारण ती निकषांवर (criteria) आधारित असते, ती स्वतः सुधारित होते (self-correcting) आणि संदर्भाशी सुसंगत (sensitive to context) असते". बैलीन आणि तिच्या सहकाऱ्यांनी मांडल्या प्रमाणे ," कशावर विश्वास ठेवावा आणि काय कृती करावी ह्यावर अवघड परिस्थिती केलेला विचार, जेथे विचार करणारी व्यक्ती उच्च दर्जाचे विश्लेषण (quality thinking) करून वाजवी निर्णय (reasoned judgments) घेतो (Darling & Wright 2004, 249). ह्या सर्व व्याख्या सारासार विचाराकडे फक्त तर्क आणि कारणमीमांसा ह्या दृष्टिकोनातून बघतांना दिसतात. ह्या मध्ये आपण इतर काही पैलूंकडे दुर्लक्ष करतो. प्लेटो च्या म्हणण्यानुसार व्यक्ती हि क्षुधा (appetites), भावना (emotions), आणि बुद्धी (mind) ह्या तीन गोष्टींपासून बनलेली आहे. त्यातही तार्किक बुद्धीला प्लेटो जास्त महत्व देतो (प्लेटो, १९९९). त्यामुळे आपण बौद्धिक क्रियांच्या पलीकडे जाऊन सारासार विचार ह्या विषयाचा विचार करणार आहोत. कैथरीन ब्रूम ह्यांच्या म्हणण्या प्रमाणे आपण फक्त सारासार विचारला स्वतंत्र न बघता, मुलांचे एकूणच व्यक्तिमत्व हे सारासार (Critical Being) कसे होऊ शकेल हे बघायला हवं आहे. आपण सामाजिक बदलासाठी जेव्हा सारासार विचारांबद्दल बोलतो तेव्हा त्याची गरज (क्षुधा) आणि भावना ह्यांना हि महत्व आहे. मुलांच्या मनामध्ये त्याची गरज निर्माण होणं, त्यांना काही प्रश्न भेडसावन आणि इतरांच्या परिस्थिती समजून घेण्यासाठी लागणारी भावनिक तयारी होणं, हेही गरजेचं आहे. परानुभीती (empathy) हि कुठल्याही सामाजिक जाणीवे साठी मह्व्ताची आहे. सारासार विचार करतांना व्यक्तीच्या भावनांना विसरून चालणार नाही. त्यामुळे सामाजिक जाणिवेसाठी अश्या सारासार व्यक्तिमत्वाची गरज आहे. मुलांना तशी संधी देणं हेच कदाचित शिक्षणाचे एकूण उद्दिष्ट असेल.

सारासार विचारावर आधारित अध्ययन पद्धती (Critical Pedagogy):

मुलांचे असे सारासार व्यक्तिमत्व वाढवण्यासाठी आपण पाउलो फ्रेरे ह्या ब्राझीलच्या शिक्षण तज्ञाची मदत घेऊयात. त्याच्या 'उतपीडितांचे अध्यापनशास्त्र' (pedagogy of the oppressed) ह्या पुस्तकात आणि इतर लेखनात त्याने समाजाच्या ज्वलंत प्रश्नांना आपण अध्यापनाचा माध्यम कस बनवू शकतो ह्याबद्दल चर्चा केली आहे. ह्या विचारधारेला सामाजिक पुनर्रचना वाद (Social Reconstructivism) असेल म्हटले जाते. मुलांमध्ये चिकित्सक सचेतन (Critical Conscious) हे विचार करणे, वाचणे, लिहिणे, खोलवर समज वाढवणे आणि अभिव्यक्ती च्या साहाय्याने करू शकतो. मुलांनी समज, मान्यता, अंधश्रद्धा, जुजबी मत ह्या पलीकडे जाऊन सखोल विचार करण ह्यात अपेक्षित आहे. प्रत्येक प्रश्नाच्या मुळाशी जाऊन मुलांनी त्यावर उत्तर शोधावे असे इरा शोर, 'शिक्षणाचे सबलीकरण' (Empowering Education, १९९२) ह्या पुस्तकात मांडतो. सामाजिक पुनर्रचना वादाच शैक्षणिक क्षेत्रात कसा वापर करून घेता येईल हे बऱ्याच विचारवंतांनी 'चिकित्सक अध्ययन पद्धती'मध्ये (Critical Pedagogy) मांडले आहे. माझ्या दृष्टिकोनातून चिकित्सक अध्ययन पद्धतीचे खालील महत्वाचे टप्पे असू शकतात. ह्या टप्प्यांची मांडणी हि गोलाकार पद्धतीने (Spiral) असते आणि हे एक सतत (Continuous) चालणारी प्रक्रिया आहे.

१. सामाजिक सहभागाच्या संधी (Opportunity to experience)

२. वेग-वेगळ्या विषयांवर चर्चा (Dialogical or conversational)

३. वादग्रस्त विषयांचे अन्वेषण (Exploration of the issues in debate)

४. नवीन आणि सुधारित जगाची कल्पना करणे (Imagine/Visualize)

५. सामाजिक बदलासाठी कार्यक्रमांची आखणी करणे (Critical Praxis)

६.समाजात चेतना निर्माण करणे (Developing consciousness)


१. सामाजिक सहभागाच्या संधी (Opportunity to experience)

समिधा जेव्हा सामाजिक जाणिवेचा विचार करते तेव्हा मुलांना त्यांच्या आजूबाजूचे प्रश्न त्यांना दिसावे हि महत्वाची पायरी वाटते. त्यासाठी मुलांना वेगवेगळ्या रोज घडणाऱ्या गोष्टीं मध्ये सहभाग घ्यायला लावणं किव्वा त्यांना त्याच स्वरूपाच्या इतर उपक्रमातून संधी देणं गरजे आहे. त्यासाठी बाहुला-बाहुलीचा लग्न, शिवण काम, सण साजरे कारण, किव्वा भेळ बनवणं असेही काही उपक्रम केले जातात. ह्यात मुलांना सध्याच्या सर्वमान्य पद्धतीने वागण्याला एक संधी मिळते. पाउलो फ्रेरे च्या अध्यापन पद्धती मध्ये त्याला हि पायरी अध्याहृत आहे. कारण त्याने उतपीडित समाजासाठी ह्या पद्धतीची मांडणी केली गेली होती. त्यामुळे त्यांना समाजाची (कदाचित वाईट अनुभवातून) ओळख आहेच असे त्याचे म्हणणे होते.


२. वेग-वेगळ्या विषयांवर चर्चा (Dialogical or conversational)

पाउलो फ्रेरेने ह्याला सामाजिक बदलाची पहिली पायरी मानली आहे. मुलांना शक्य त्या सगळ्या विषयांबद्दल विचार करण्याची संधी देणे इथे अपेक्षित आहे. ह्यात एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर दबाव ना टाकता सन्मानपूर्वक चर्चा करावी. मुलांना शिक्षण देतांना अश्या चर्चां मध्ये सहभागी करून घेणं गरजेचं आहे. शिक्षण हे एकतर्फी असू शकत नाही. मुलांचाही त्यात सहभाग हवा. अश्या प्रकारच्या चर्चां मधून मुलं स्वतःच्या विचारांना एकत्रित करून इतरांसमोर मांडू शकतात. त्यासाठी त्यांना विषयाची व्याप्ती समजून घ्यावी लागते. त्यात त्यांचा सर्वंगीण विकास होतो. तसेच अश्या चर्चांमध्ये मुलं एक-मेकांकडून बऱ्याच गोष्टी शिकतात. ह्या चर्चेच्या परिणामांपेक्षा (results) त्याच्या प्रक्रियेवर (process) लक्ष केंद्रित करण हे महत्वाचं आहे. अनौपचारिक शिक्षणासाठी (informal learning) अशी चर्चा महत्वाची असल्याचे फ्रेरेचे मत होते.

३. वादग्रस्त विषयांची अन्वेषण (Exploration of the issues in debate)

हा एक अतिशय महत्वाचा टप्पा आहे असं मला वाटत. ह्यात मुलं समाजातील वादग्रस्थ विषयांवर खोलवर विचार करतात. पण त्यासाठी त्यांना वादग्रस्थ विषयांपर्यंत नेने हि गरजेचे असते. काश्मीर प्रश हा एक वाद ग्रस्त मुद्दा आहे पण तो महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या मुलांच्या दृष्टीकोनातून तेवढा महत्वाचा नसेल. पण कदाचित शनिशिंगणापूर येथील मंदिरामध्ये महिलांचा प्रवेश हा विषय त्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाचा असू शकतो. त्यामुळे असा कुठल्याही विषय घेऊन सुरुवात केली जाऊ शकते. पण हळू हळू त्यांना इतर दूरचे वाटणारे विषय सुद्धा त्यांच्या आयुष्यावर कसे परिणाम करतात ते सांगणं गरजेचं आहे. त्यासाठी 'पेट्रोल ची किंमत कशी वाढते' ह्यासारख्या विषयांवर चर्चा होऊ शकते. अश्या प्रकारे त्यांच्या विचारांची व्याप्ती वाढणं गरजेचं आहे. कधी-कधी काही विषय हे समाजाच्या दृष्टीने वादग्रस्त नसतातच. जसेकी मुलींनी केस का वाढवावे, सर्वांनी लग्न का करावे, रोज दोनदा जेवण का करावे, एखादा सन असाच का साजरा करावा, वैगेरे. अश्यावेळेस मुलांना बऱ्याच चर्चेची गरज असते. पाउलो फ्रेरे आंतरिक नैतिक कलहाला एक सामाजिक बदलाचे साधन मानतो. त्यामुळे मुलांना सामाजिकरित्या संवेदनशील बनवतांना, त्यांना नैतिक प्रश्न विचाराने हि सुद्धा एक चांगली युक्ती असू शकेल.


४. नवीन आणि सुधारित जगाची कल्पना करणे (Imagine/Visualization)

एकदा का सामाजिक प्रश्न समाजाला, त्याची कारणमीमांसा झाली, सर्वांना तो विषय हाताळण्याची गरज आहे असं वाटलं कि मग त्याच उत्तर शोधन हे काम हि खूप महत्वाचं आहे. अन्यथा हे प्रयत्न अधांतरीच राहतील. तसेच जग ह्या समस्यांशिवाय कस दिसेल हे जो पर्यंत मुलांना कळत नाही तो पर्यंत त्यावर विश्वास ठेवून कृती करण शक्य नाही. ह्या संपूर्ण प्रक्रियेत सर्जनशील विचार (creative thinking) करण्याची गरज असते. मुलं नव-नवीन भन्नाट कल्पना सांगतात. त्यांना प्रोत्साहन देणं आणि त्याच सोबत त्यांच्या कल्पनांची व्यवहारात (feasibility) बघायला प्रवृत्त करायला हवं.


५. सामाजिक बदलासाठी कार्यक्रमांची आखणी करणे (Critical Praxis)

एकदाका सर्वानुमते नवीन काल्पनिक जगाची मांडणी झाली कि मग मुलांना त्यासाठी काही कार्यक्रमाची आखणी करायला लावली जाते. जेणे करून मुलं त्यांच्या विचाराची व्याप्ती वाढवू शकतील. पण ह्या प्रयत्नांची पहिली पायरी हि स्वतःच्या आचरणातल्या बदला पासून केली पाहिजे असा समिधाचा आग्रह असेल. जेणे करून मुलांना त्या बदलामुळे येणाऱ्या अडचणी कळू शकतील. तसेच ते फक्त सल्ले ना देता स्वतः तसे प्रयत्न करताय हे बघून इतरांची मान्यता सहज मिळू शकते. हि कृती नेहमी ज्ञानावर आधारित आणि समाजाने ठरवलेल्या तत्वांशी सुसंगत असावी.


६. समाजात चेतना निर्माण करणे (Conscientization or Developing consciousness)

ह्या शिक्षण पद्धीतीने फक्त विद्यार्थीच नव्हे तर सम्पुर्ण समाजात नव चेतना येऊ शकते. शिक्षण हे समाजापासून वेगळे असू शकत नाही, त्यामुळे ह्या प्रयत्नांना खऱ्या अर्थाने समाजासाठीचे शिक्षण असे म्हटले गेले. अश्या प्रकारे समाजासमोर उभ्या राहणाऱ्या प्रश्नांना उत्तर शोधणारा विचारवंतांमुळे आपण सुदृढ समाज व्यवस्थेची कल्पना करू शकू असा फ्रेरेचा विश्वास होता.


समिधाचा मुलांना सारासार व्यक्तिमत्व विकास करण्याचा साठीचा एक प्रयत्न:

आधी सांगितल्या प्रमाणे समिधा संचालित केंद्रावर आपण मुलांमध्ये सामाजिक संवेदना कशी वाढू शकेल ह्यासाठी प्रयत्न करतो. मुलांनी समाजातल्या वेगवेगळ्या समस्या/अडचनींना समजून घ्याव्या आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी स्वतःच्या परीने जमेल ती कृती करावी हि माफक अपेक्षा. अगदी मोठ्या सामाजिक बदलाची गरज किव्वा पॆक्षा हि नाही. पण स्वतःच्या आयुष्यापुरता किव्वा छोट्याश्या परिघा पुरता काही बदल करून, त्या समस्यांना खत पाणी घातलं जात नाहीये एवढं बघणं फक्त अपेक्षित आहे. हे सामाजिक प्रश्न खूप खोलवर रुजलेले/गाडलेले असतात आणि त्यांच आकलन इतक्या सहज होणं शक्य नाही. पण हि सुरुवात खूप महत्वाची आहे असं आम्हाला वाटत. जस जस प्रत्येक व्यक्ती विचार करू लागेल तस तस आपण त्या सामाजिक समस्यांचा खोलावर पोहोचू शकू. तसेच प्रत्येक प्रश्न हा इतर काही प्रश्नाशी जुळलेलं असतो. म्हणजे मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण खूप वर्षापर्यंत कमी होते. पण हा प्रश्न शैक्षणिक क्षेत्रा पुरता मर्यादित नाही, तो आपल्या सामाजिक रचणे बद्दल, स्त्री-पुरुष असमानता, आर्थिक स्थिती, वैगेरे बऱ्याच इतर प्रश्नांना सोबत घेऊन चालतोय. त्यामुळे हळू हळू मुलांना त्या इतर पैलूंचा हि विचार करावं लागेल. मुलं लहान पणीच त्यांच्या परीने ह्या विषयांचा विचार करू लागले तर मोठ्या पणी त्यांना एक सजग नागरिक बनता येईल. प्रत्येकाने आचरणात योग्य बदल सुरु केलं तर समाजातले बरेचसे प्रश्न तसेच नष्ट होतील असा समिधाचा युक्तिवाद आहे. असे सकारात्मक बदल कधी होतील हे माहित नसल तरी त्यांची सुरुवात होणं नगरजेच आहे हे मात्र नक्की आणि ती सुरुवात होते सारासार विचार किव्वा व्यक्तिमत्व ह्या एका मुद्द्या पासून. समिधाच्या दृष्टिकोनातून सारासार विचार म्हणजे,


१. प्रत्येक प्रश्नाचा भूतकाळ चाचपडण्याची आणि भविष्यातील परिणाम बघण्याची सवय लावणे

२. सभोवतालच्या परिस्थिती पलीकडे बघणे आणि विचारांची व्याप्ती वाढवणे

३. वेग-वेगळ्या सामाजिक प्रश्नाचा एकमेकांवरचा प्रभाव ओळखणे


समिधा पुण्यातील एका झोपडपट्टी सम वस्तीत आपले शाळाबाहय केंद्र चालवते. ह्या केंद्रात येणाऱ्या मुलांचे पालक हे घरकाम, गवंडीकाम, ड्राइवर, सफाई कामगार आणि छोटे व्यवसाय ह्यातून उदरनिर्वाह करतात. आर्थिक परिस्थिती हा एक मोठा प्रश्न त्यांच्या समोर असला तरी इतर बऱ्याच सामाजिक समस्यांना त्यांना रोज तोंड द्यावे लागते. अश्या परिस्थितीही मुलांनी स्वतः सोबतच संपूर्ण समाजाचा विचार करावा आणि उद्याचे सजग नागरिक बनण्यासाठी लागणाऱ्या कौशल्यांचा विकास व्हावा असा प्रयत्न समिधा अश्या केंद्रातून करते. सोबतच ह्या माध्यमातून इतर दक्षता (competencies) मुलांना मिळाव्यात ह्याकडेही लक्ष केंद्रित केले जाते. मुलांना त्याचा रोजच्या व्यवहारात आणि शैक्षणिक उद्दिष्ट्य सध्या करण्यातही त्याची मदत होते.


१. सामाजिक सहभागाच्या संधी (Opportunity to experience)

समिधा केंद्रात आपण मुलांना समाजाचा एक अनुभव घेण्याची संधी देतो. त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये गुंतले जाते. कधी कधी मुलांना केंद्रा बाहेर नेऊन समाजातील काही विषयांची ओळख करून दिली जाते. त्यांना हवे ते सण साजरे करू दिले जातात. इतर देशांमधून, वेग-वेगळ्या क्षेत्रांमधून येणाऱ्या वक्तींशी भेट घालून दिली जाते. ग्रीटिंग, सजावट करणे, पणत्या रंगवणे असे उपक्रम आयोजित केले जातात. मुलं खोलीतच किव्वा बाहेर वेग-वेगळी खेळ खेळतात. जादूचे प्रयोग दाखवले जातात. कॉम्पुटर वर एखादा माहिती पट/सिनेमा दाखवला जातो. मोठ्यांबरोबर चर्चा केल्या जातात. अश्या अगणिक संधी मुलांना दिल्या जातात. ह्याचाच एक भाग म्हणून मुलांनी एकदा गणेशत्सोव साजरा करण्याचे ठरवले होते.

२. वेग-वेगळ्या विषयांवर चर्चा (Dialogical or conversational)

वरील संधींसोबत मुलांना आवडेल त्या विषयवार चर्चा करायला वाव दिला जातो. चर्चा ह्या अगदी त्यांच्या रोजच्या आयुष्यातल्या विषयांशी निगडित असतात. नेहमीच त्या खूप शिस्तबद्ध पद्धतीने नियोजित असतात असे नाही. कदाचित जास्तीत जास्त वेळेस त्या उत्स्फूर्त असतात. मुलं हनी सिंगचे ची गाणी ह्या पासून सुरु करून नुकताच वस्तीत झालेला हाफ मर्डर इथं पर्यंत कुठल्याही विषयावर चर्चा करतात.

चर्चेच्या सवयी प्रमाणे त्यांनी गणपती उत्सव कसा साजरा करावा ह्यावरही चर्चा सुरु केली. ताई-दादा प्रत्यक्ष कुठली हि मदत करणार नाही, त्यामुळे सर्व काही मुलांनाच करावं लागेल, हा एक नियम ठरला. त्यानुसार त्यांनाही चर्चा केली. खर्चाची मांडणी, आरास कशी करायची, प्रसाद काय द्यायचा, किती दिवसांचा गपती बसवायचा, अश्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. अश्या प्रकारे प्रत्येक वर्षी गणेश उत्सवा आधी मुलांनी चर्चा केल्या. दरवर्षी त्या चर्चांचे विषय आणि विषयांची खोली वाढत होती.मुलं कधी स्वतःला पडलेल्या, तर कधी इतरांनी मांडलेल्या प्रश्नांवर चर्चा करत होते.

३. वादग्रस्त विषयांची अन्वेषण (Exploration of the issues in debate)

समिधाच्या केंद्रात येणारी मुलं नेहमीच समोर येणाऱ्या प्रश्नांवर चर्चा करून त्यांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत असतात. बऱ्याचदा त्या प्रश्नांवर बराच मोठ्या विचारवंतांची चर्चा (Social Debate) सुरु असते, कधी कधी ते विषय त्यांच्या छोट्याश्या भावविश्वपुरते मर्यादित असतात, आणि काही वेळेस तर ते फक्त त्यांच्याच मनातले कलह असतात. पण ह्या पैकी काहीही असाल तर मुलांनी त्या सोबत आणखी गुंतणं आणि अस्पष्टता दूर करण अपेक्षित आहे.

पाहिल्यावर्षी गणेश उत्सव काही अपवाद वगळता नेहमी सारखाच झाला. पण त्या पुढच्या वर्षी ह्याच स्वपूर काहीस वेगळं होत. मुलांनी काही गणपती बसवण्या सोबतच इतर काही महत्वाच्या विषयांना हात घातला. गणपती विसर्जन हि हौदात करणे योग्य कि अयोग्य असा तो चर्चेचा विषय. बऱ्याच मुलांनाचे सुरवातीला हे मत होते कि आपण हौदात गणपती विसर्जन करावं, जेणे करून वातावरणच प्रदूषण होणार नाही. त्याच सोबत खेळघरातून आलेल्या ताईंसोबत वेगवेगळ्या प्रकारच्या प्रदूषणाबद्दल चर्चा झालेली होती. त्यामुळे मुलं ध्वनी प्रदूषण, हवेच प्रदूषण अश्या सर्वच विषयांवर विचार करत होते. पण त्या पेक्षा हौदाचा वापर हाच विषय मुलांना जास्त सतावणारा होता. त्यात एक नवीन युक्तिवाद असा होता कि आपण हौदात गपणपती बुडवला तरी ते पाणी शेवटी कुठेतरी फेकावं लागणार आणि मग प्रदूषण हे होणारच. मग हौद हा प्रदूषण टाळण्याचा मार्ग कसा होऊ शकतो.

प्रदूषणा पलीकडे जाऊनही मुलं एकंदरीत सर्व रूढी परंपरांना प्रश्न विचारात होते. दुरवा का ठेवायच्यात, गपणतीचे डोळे झाकून का आणल पाहिजे, असे मुद्दे चर्चेला येत होते. मुलांनीच का गणपती बसवायचा हा एक विषय होताच. त्यात गणपतीची मिरवणूक असतांना मोठ्यांनीच गणपती पकडायचा असे ठरले होते. त्यामुळे आता ताई गणपती ची मिरवणूक काढू शकतात का हा विषय चर्चेला होता.


४. नवीन आणि सुधारित जगाची कल्पना करणे (Imagine/Visualize)

मुलं फारच सर्जनशील असतात आणि कदाचित जगाच्या ठरलेल्या चौकटींमध्ये त्यांना बांधणं शक्य नसत. त्यामुळेच त्यांच्या वागण्याचा, गोंधळाचा, प्रश्नांचा मोठ्यानं त्रास होत असावा. पण त्यांना मुक्तपणे विचार करू दिला तर ते खरंच भन्नाट कल्पना घेऊन येतात आणि त्यातून जग बदलण्याचा एक प्रयत्न करतात. त्यांची हि सर्जनशीलता शाबूत राहणं हे कदाचित एका सुदृढ समाजाची गरज आहे. समिधा मध्ये मुलांना अश्या पद्धतीने सर्जनशील विचार करण आणि त्याला टिकवून ठेवण्यासाठी बरच प्रोत्साहन दिल जात. मग कदाचित मुलं त्यांच्या कल्पना विष्कारातून नवीन जगाची मांडणी करतील किव्वा कधी कधी अगदीच असंबंध अश्या काल्पनिक गोष्टीहि मांडतील. त्या सर्वच गोष्टींना प्रोत्सहन देत राहणं हे आपलं कर्तव्य आहे असं आम्हाला वाटत.

गणेशोत्सवा दरम्यान बऱ्याच प्रश्नांवर चर्चा होत होत्या. समोर असणारे सामाजिक प्रश्न कसे सोडवावे ह्या साठी बऱ्याच कल्पना मांडल्या जात होत्या. शेवटी गणपती हौदात बुडवावा हा निर्णय झाला. पण प्लास्टर-ऑफ-पॅरिस मुळे होणारं प्रदूषण टाळण्यासाठी शालूच्या मातीची मूर्ती आणली जावी असं ठरलं. पण हा प्रश्न पुढच्या वर्षीच्या चर्चां मध्ये पुन्हा आला. कारण अजून हा प्रश्न पूर्णपणे सुटलेला न्हवता. जरी प्लास्टर-ऑफ-पॅरिस प्रदूषण होणार नसल तरी त्यावर लावण्यात येणाऱ्या रासायनिक रंगामुळे प्रदूषण हे होणारच होत. त्यामुळे एक असा उपाय हवा होता कि हे प्रदूषणही टाळता येईल. न रंगवलेला गणपती हा एक सोपा उपाय असू शकला असता पण तो मुलांना तेव्हातरी मान्य न्हवता. आणि अशी शालू ची माती किती दिवस मिळणार हा प्रश्न हि समोर आला होता.


५. सामाजिक बदलासाठी कार्यक्रमांची आखणी करणे (Critical Praxis)

मुलांना प्रश्नांची उत्तर मिलाळायला लागली कि त्याचा आणखी विस्तार करण, व्याप्ती वाढवणं हे एका अनुभवी शिक्षकाच काम असत. जेणे करून मुलं त्या उत्तरांना चौहीबाजूने बघू शकतील आणि योग्य तो निर्णय घेऊ शकतील. त्यांना योग्य वाटणाऱ्या गोष्टी मध्ये काही अडचणी असू शकतात. त्याची व्यवहारात तपासणे गरजेचे असते. पण त्याच सोबत मुलांच्या निर्णयावर आपण अविश्वास दाखवतोय असा त्यांचा समज होऊ नये हे बघणं हि गरजेचं आहे. समिधा मध्ये आपण मुलांना पूर्ण मोकळीक देतो. त्यांना बाजारात जाऊन वस्तू घेण्या पर्यन्त ची मुभा दिली जाते. त्यात काही त्रुटी राहत असतील तर ताई-दादा त्यांच्या निदर्शनास त्या आणून देतात, पण शेवटचा निर्णय हा मुलांचाच असतो.

गणेश उत्सवात हि तसे आधीच ठरले होते. मुलेच योग्य तो निर्णय घेतील. प्रहिल्या वर्षी शालूच्या मातीची मूर्ती आणण्याचा निर्णय घेऊन प्रश्न सुटला होता. त्याचा बरोबर मुलींनी हि गपतीची स्थापना केली तर चालू शकेल असं हि ठरलं होत. त्यानुसार समिधा मधील ताईंनी मिरवणुकीत गणपती हातात घेतला आणि स्थापनाही केली. पुढच्या वर्षी उपस्थित झालेल्या प्रश्नांना उत्तर शोधणं अवघड होत. मुलांना काय हवय ते माहित होत. पण ते कस मिळवायचं हा खूपच गहण प्रश्न होता. शालूच्या माती असतांनाही पाण्याचे होणारी प्रदूषण टाळणं कस शक्य होईल हा तो प्रश्न. शेवटी त्यावर उपाय म्हणून सुचला. मूर्तीला विसर्जितच करू नये असा निर्णय घेतला. तसा हा खूप मोठा निर्णय होता त्यामुळे परत चर्चा आणि तर्क-वितर्क होणं साहजिक होत. मुलांनी त्यामूर्ती पण फक्त पाण्याचे शिंतोळे उडवून ती मूर्ती परत तशीच ठेवण्याचा निर्णय घेतला. तीच मूर्ती पुढच्या वर्षी वापरण्याची तयारी त्यांनी दाखवली.


६. समाजात चेतना निर्माण करणे (Developing consciousness)

अश्या प्रकारे मूल स्वतः केलेल्या गोष्टींतून आणि घेतलेल्या निर्णयातून खूप काही शिकतात. अश्या प्रकारे शिकलेल्या गोष्टी त्यांच्या लक्षात हि राहतात. त्यांची एक संपूर्ण नागरिक म्हणून वाढ हि होते. मुलं खऱ्या अर्थानं सजग आणि जागरूक होतात. हि जी चेतना त्यांच्यात आणि एकंदरीत समाजात येते हेच फ्रेरेला अपेक्षित असावं.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून लगेच काही समाज प्रबोधन झाले असे म्हणता येणार नाही. वस्तीतल्या इतर लोकांनी त्याची खूप दाखल घेतली असे हि काही नाही. पण त्यात मुलांना स्वतंत्र आणि सारासार विचार करता आला हा सर्वात महत्वाचा उद्देश त्यातून सध्या झाला. त्याची परिणीती पुढील काही वर्षात यायला लागली. कदाचित मुलांसोबत काम करण्याचा हाच आनंद असतो. त्याचे परिणाम काही वर्षांनीही असेच अचानक दिसायला लागतात. २०१५ मध्ये सर्वत्र दुष्काळ ग्रस्त परिस्थिती असतांना ह्या सारासार विचार शक्तीची प्रदर्शन करतांना काही मुलं दिसली. त्यावर्षी त्यांनी एकत्र येऊन रंगपंचमी खेळू नये असा निर्णय घेतला. फक्त सुका रंग खेळुयात असाही एक मत प्रवाह होता. पण त्यातही पाणी वाया जातेच त्यामुळे रंग खेळूच नये असा निर्णय झाला. निर्णय किती मोठा होता, किव्वा आजूबाजूच्या वातावरणाच्या त्यावर किती प्रभाव होता ह्या गोष्टी माझ्या दृष्टिकोनातून दुय्यम आहेत. मुलं सारासार विचार करायला लागलीत आणि अश्या बऱ्याच सामाजिक प्रश्नांची उत्तर ती येत्या आयुष्यात देऊ शकतील ह्याची मला खात्री वाटते.

निष्कर्ष:

ह्या अध्यापन पद्धती मध्ये संपूर्ण समाज, शिक्षक आणि विद्धयार्थी एक रूप होऊन जातात. सर्वजण समाज प्रबोधनाचा आणि बदलाच्या दिशेने एकत्र पाऊल उचलतात. शिक्षण हि एखादी वेगळी प्रक्रिया न राहता समाजाच्या जगण्याचा मार्गच बनून जातो. शिक्षक हि नव-नव्या पद्धतीने मुलांना समाजाच्या निकडीच्या प्रश्नांची ओळख करून देतात. त्याच सोबत संपूर्ण अभ्यासक्रम हा प्रश्नांची उत्तर शोधण्याच्या प्रक्रिये भोवती फिरतो. फ्रेरेने उतपीडित समाजाला दिशा देऊ शकणाऱ्या शिक्षकांना ह्या संपूर्ण अध्यानपण पद्धती मध्ये महत्वाचा दुआ मानलंय. त्यामुळे शिक्षक हा सुद्धा एक समाज कार्यकर्ता, प्रबोधनकार आणि विचारवंत होऊन राहतो. कदाचित असा कुठलाही सक्रिय/सजग नागरिकच ह्या शिक्षण पद्धती मध्ये शिक्षकाची जबाबदारी पार पडू शकतो. ह्यातून संपूर्ण समाजाला ज्ञान, कारणमीमांसा करण्याचे कौशल्य आणि खर ज्ञान मिळू शकेल. स्वतःच्या हक्कासाठी आणि समाजाच्या भल्यासाठी प्रत्येक नागरिकात सारासार व्यक्तिमत्व फुलवणं हे चिकित्सक अध्ययन (Critical Pedagogy) पद्धती मधून साधता येऊ शकत.