नवी पहाट

नेहमीचाच धायरीला जाणारा रस्ता. रोज त्याच रस्त्याने प्रवास करून हात आणि पायांनाही तो रस्ता अगदी पाठ झालाय. त्यामुळे त्या रस्त्याने गाडी चालवणे हे श्वास घेण्यायेवाढीच सहज क्रिया झाली आहे. असाच एकदा घरी निघालो होतो. वडगावच्या ब्रिजजवळ आल्यानंतर नेहमीपेक्षा जास्त गर्दी जाणवली. मेंदूला आणि डोळ्यांना जास्त काम नसल्यामुळे तिकडे लगेच लक्ष गेल. काय झाल असेल ह्याचाच विचार करत होतो तेवढ्यात उंचावर बांधलेली दोरी आणि कसरती करणारी एक लहान मुलगी नजरेस पडली.

डोक्यात कसलीतरी सनक गेल्यासारख झाल. तो एवढासा जीव रस्त्यावर कसले तरी जीवघेणे प्रकार करून दाखवत होत आणि लोक ते बघण्यासाठी वेड्यासारखी गर्दी करत होते. तेवढ्यात काही लोक पुढे येऊन तिला तोंडात पैसे देण्याचा प्रयत्न करायला लागले. ती एका दोरीवर उभी राहूनही पैसे घेतेय ह्या गोष्टीच कुतुहूल असाव कदाचित, सर्वजण तोच प्रयत्न करत होता. एक व्यक्ती ते सर्वकाही शूट करण्याचा प्रयत्न करत होता. हे सर्व बघून माझ्या गाडीचे ब्रेक आपोआपच लागले. आता मीही त्या गर्दीचा भाग झालो होतो. जवळून ते सर्वकाही बघून आणखीनच वाईट वाटत होत. जसजसे ती पैसे घेत होती, तसा लोकांमध्ये प्रोत्साहन देणारा वाढता आवाज ऐकू येत होता. त्याच बरोबर सोबत उभा असलेला ढोलकी वाजवणाऱ्या भावाचा हातही जास्त जोरात चालत होता. ती आणखी अवघड कसरती करू लागली. ते दृश्य ढोलकीच्या आवाजाबरोबरच माझ्याही विचारांची गती वाढत होती. काय कराव तेही काळत न्हवत. पण मनात खूप विचित्र गोंधळ सुरु होता.

अपर्णाने बालकामागरांवर थोडफार काम केलाय आणि समाजकार्यात पदवीत्तर शिक्षण झाल्यामुळे तिला बरीच माहिती होती. सरळ मोबाईल बाहेर काढला आणि तिला फोने लावला. घडलेली संपूर्ण घटना सांगितली. कदाचित तिला बालकामगारांना मुक्त करण्यासाठी केल्या जाणाऱ्या धडक मोहिमेंवरून माहित असाव की तिथे थोडाफार गोंधळ होण्याची शक्यता असते, म्हणून तिने पोलिसांना फोन करण्याचा सल्ला दिला. तिच्या सल्याप्रमाणे मी सरळ १०० वर संपर्क केला. मी त्यांना परिस्थिती सांगितली आणि लवकरात-लवकर हा सर्व प्रकार थांबवावा अशी विनंती केली. पण गरजेला कामी येतील ते भारतीय पोलिसच काय. कंट्रोल रूम मधून मला सांगण्यात आल की वडगाव हे ग्रामीणच्या हद्दीत येत आणि त्यासाठी वेगळा नंबर लावावा लागेल. त्यांनी तो नंबर लिहून घेण्यास सांगितला. आता त्या गर्दीत मी नंबर तरी कसा लिहून घेणार होतो. तिथेच थोड बाजूला भेल की कसलीतरी गाडी उभी होती आणि तेथे एक काका उभे होते. मी घाई-घाईत त्यांना पेन मागितला आणि हातावरच नंबर लिहून घेतला. गडबडीने फोन बंद करून, लगेच दुसरा नंबर लावला. (पोलिसांसाठी असा ल्यांड लाईन वर फोन करावा लागत असेल तर १०० चा उपयोग काय हा विचारही मनात येऊन गेला.) दुसरा नंबर ही एका कंट्रोल रूमचा होता. त्यांनी थोडी चौकशी केली आणि पुन्हा तेच केल. आणखी एक नंबर लिहून घ्यायला सांगितला. आता मात्र माझा पारा थोडा वाढत होता. पण तिथे ह्या विषयावर वाद घालण्यात काहीच अर्थ न्हवता. मी परत त्याच काकांना पेन मागितला. पार्किंग मध्ये जागा नसल्यामुळे मी गाडीवरच बसून हे सर्व उद्योग करत होतो. त्या गोंधळात व्यवस्थित ऐकू सुद्धा येत न्हवत. मी जमेल तसा तो नंबर लिहून घेतला. पण माझ किंवा त्या मुलीच नशीब वाईट असाव. तो नंबर चुकीचा होता. तरी एक भोळी अशा म्हणून मी तो नंबर लावून पहिला. पण तो ९ आकडी नंबर लागणार तरी कसा.

ब्रिजच्या पलीकडे असणाऱ्या पोलीस स्टेशनमध्ये जाण्याचा विचार केला. पण तिकडे जाऊनही असच दुर्लक्ष झाल तर काय ह्या विचाराने थांबलो. आता शेवटचे २ पर्याय उरले होते. एकतर स्वतः त्या घोळक्यात जाऊन ते सर्व थांबवावं किंवा सरळ गाडीवर बसून घराचा रस्ता गाठावा. पण दुर्लक्ष करून निघून जाण हा विचारच मनाला पटत न्हवता. बर ते थांबवायचं तर कुठल्या हक्काने मी ते थांबवणार होतो. कोणीही 'तू कोण?' हा साधा प्रश्न विचारला असतातरी मी निरुत्तर झालो असतो. पण निघून जायचं हा पर्याय काही केल्या मनाला पटतच न्हवता म्हणून गाडी लावण्याचा विचार केला. गाडी लावण्यासाठी थोडीही जागा न्हवती. पूर्ण पार्किंग आधीच भरलेल. "निघून जाव का?", परत एकदा मनात विचार आला. "नाही नाही... गाडी लावण्यासाठी जागा मिळाली नाही म्हणून त्या येवढ्याश्या मुलीला तसाच सोडून जायचं.. मी अस कस करू शकतो."

मग निर्णय झाला, जाऊन ते सर्वकाही थांबवायचं. निर्णय झाल्याबरोबर वेगळ्याच आत्मविश्वासाने अंग भारावून गेल. तो आत्मविश्वास प्रत्येक हालचालीत मलाच जाणवायला लागला. पार्किंग स्लॉटच्या बाहेरच गाडी लावली. गाडी वरून उतरून लेबर इन्स्पेक्टर असल्याच्या ऐटीत गर्दीत शिरलो. ढोलकी वाजवणाऱ्या मुलाच्या समोर गेलो आणि मुलीच वय विचारलं. त्याने सांगितलं, "८ वर्ष". माझ्या अंदाजापेक्षा ती मुलगी बरीच लहान होती. मग मी लगेच संपूर्ण परिस्थिती माझ्या हातात घेण्यास सुरुवात केली. आधी त्याचा ढोल बंद केला. त्या मुलीला खाली उतरण्यास सांगितलं. आता तिथे उभे असलेल्या प्रेक्षकांसाठी एक वेगळाच खेळ सुरु झाला होता. तिथेच उभा असलालेला त्या मुला-मुलीचा बाप लगेच माझ्याकडे चालून आला (आपल्या मुलांचा योग्य सांभाळ केला तरच ते वडील असतात अन्यथा फक्त बाप.). त्याच्या तोंडून येणारा दारूचा वास माझ्या डोक्यातच गेला. त्याचे शौक पूर्ण करण्यासाठी तो त्याच्या मुलांचा असा वापर करत होता. मी थोड्या वरच्या आवाजात बोलायला सुरुवात केली. 'पोलिसांकडे चल' वैगेरे असे शब्द ऐकल्या नंतर काहीतरी गडबड होईल हे त्याच्या लक्षात आल आणि त्याने मला परत त्याच्या मुलाशी बोलू दिल नाही. (मला त्याची ही वृत्ती आवडली.). त्यांनी तो खेळ आवरायला सुरुवात केली.

मला त्या डोंबाऱ्याचा खेळ बघणाऱ्या आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या प्रेक्षांशीही संवाद करायचं होता. म्हणून मी सर्व तमाशा बघणाऱ्यांना उद्देशून बोलू लागलो. वडगाव ब्रिज जवळच्या वर्दळीच्या रस्त्यावर सर्वांना माझ बोलन ऐकू येण शक्य न्हवत. म्हणून मी पुढे होऊन सर्वांशी प्रत्यक्ष संवाद करू लागलो. प्रत्येक दिशेला वळून-वळून जनतेला उद्देशून मी प्रश्न विचारात होतो, "बालकामगार म्हणजे काय माहित आहे का? हे चुकीच आहे. आपण असे रस्त्यावर उभे राहून त्याला समर्थन देतोय.". लोकांच्या लक्षात आल आपल्याला उद्देशून काहीतरी बोलाल जातय आणि आपण कदाचित काहीतरी चूक केलीये. त्यामुळे ती गर्दी कमी होऊ लागली. बऱ्याच लोकांनी काढता पाय घेतला. पण उरलेली गर्दी मात्र लक्ष देऊन माझ बोलन ऐकत होती. समोरची गर्दी हटताच ती मंडळी आणखी समोर आली. आता डोंबाऱ्याचा खेळ संपून एक नवीन खेळ सुरु झाला होता. प्रेक्षक तेच पण प्रयोग नवीन होता.

मध्यभागी मी आणि आजूबाजूला लोकांची गर्दी. त्यातल्या काही लोकांना त्या डोंबाऱ्याच कीव वाटत होती. ते त्याचा पक्ष समोर ठेवण्याचा प्रयत्न करू लागले. बघता-बघता अश्या समर्थकांचा गट विरुध्द मला समर्थन करणाऱ्यांचा गट अशी चर्चा सुरु झाली. त्यांचे स्पष्ट मुद्दे होते, "आज तुम्ही त्याचा खेळ थांबवला. जर त्याने ते नाही केल तर मग तो काय करणार? त्याच पोट कस भरणार? आणि त्याच्या मुलांनी काय कराव? त्यांना दुसरा काही व्यवसाय देण्याची सोय कोणी करणार आहे का? बरीच अनाथ मुल रस्त्यावर दिसतात त्याचं काय? सर्वांची काहीतरी मजबूरी आहे. नुकताच सरकारने गरिबी रेषेची मर्यादा ठरवतांना त्यांची खिल्ली उडवली आहे आणि तुम्ही त्यात भर घालताय". अशे अनेक प्रश्न त्या घोळक्यातून येत होते. आमची संस्था लहान मुलांच्या शिक्षणावर काम करते त्यामुळे मी निगडीत प्रश्नावर भर देऊन बोलण्याचा प्रयत्न करत होतो. पण विरोधक फार मोठ्या मोठ्याने त्यांची बाजू मांडत होते. मग त्यात सरकारवरही ताशेरे ओढले जात होते. विचार मांडण्यासाठी पहिल्यांदा एवढा मोठा मंच मिळाल्या मुळे सर्वजण बोलण्याचा प्रयत्न करत होत. त्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला होता.

माझ्याशी सहमत असणारे एक काका पुढे आले आणि त्यांनी समजवायला सुरुवात केली, "त्या मुला-मुलीच्या बापाने कस जगाव ह्यासाठी त्यांच आयुष्य असाच वाया जाऊ देण योग्य आहे का?", असा खडा सवाल त्यांनी सर्वांना विचारला. "कुठेतरी हे थांबण्याची गरज आहे. एक प्रश्नच उत्तर शोधतांना इतर उपप्रश्न येतीलच म्हणून मूळ प्रश्नच बाजूला ठेवून नाही चालणार. आपण आज ह्या मुलांचा प्रश्न सोडवायला सुरु करूयात. त्यांच आयुष्य अस वाया जायला नकोय. नाहीतर पुन्हा त्यांची मुलही रस्त्यावर हेच करतांना दिसतील.". मी त्यांना पूर्ण समर्थन देत होतो. मी सुरुवातीला सर्व शिक्षा अभियानाबद्दल बोललो होतो. त्यात लहान मुलांना संपूर्ण शिक्षण, जेवण, गणवेश कसे मोफत मिळतात हे सांगितलं होत. तोच संदर्भ त्या काकांनी दिला आणि त्या मुलांना शिकवण शक्य आहे अस मत मांडल. मग एक आणखी काकांनी प्रश्न उपस्थित केला, ह्या मुलांना त्यांचा बापाने शाळेत टाकाव अस आपण म्हणतोय, पण मग जी मुलं अनाथ आहे त्याचं काय. त्यावर मी त्यांना थोडक्यात चाईल्ड लाईन बद्दल माहिती दिली. तसेच त्यांचा मोफत नंबर ही दिला. ज्या मुलांना खरच राहण्याची सोय नाही त्यांच्यासाठी अनाथालय आहेत. त्यांना कसा संपर्क करावा हे कळत नसेल तर १०९८ वर माहिती मिळू शकेल हेही सांगितलं.

आता चर्चा बऱ्यापैकी आमच्या बाजूला झुकत होती. विरोधक थोडे नमत होते. तेवढ्यात कॅमेरा घेऊन शूट करणाऱ्या गृहस्तांनी अगदी पूणेरी (म्हणजे स्पष्ट) प्रश्न विचारला, "हे सर्व ठीक आहे.. शासनाच्या, वेगवेगळ्या संस्थांच्या बऱ्याच योजना आहेत. पण तुम्ही काय करताय ह्यासाठी. फक्त विरोध करायचा म्हणून करू नका. तुम्ही स्वतः काय करता ते सांगा.". हा प्रश्न मला, तिथे उभ्या असणाऱ्या सर्वांनाच अनपेक्षित होता आणि माझ्या आत्मविश्वासाच्या कवचाला तडा देणारा सुद्धा. मी खरच मुलांना सांभाळण्यासाठी किंवा त्यांच्या पालकांसाठी काहीच करत न्हवतो. पण मी लगेच स्वतःला संभाळल आणि त्यांना थोडक्यात समिधा बद्दल माहिती देण्यास सुरुवात केली. "मी सचिन मोहिते. समिधा ह्या संस्थेसाठी काम करतो. आमची संस्था लहान मुलांच्या शिक्षणावर काम करते. आमची संस्था अनाथालय चालवत नाही त्यामुळे मी इतर संस्थांबद्दल माहिती दिली. शिक्षणाच्या संदर्भात काहीही माहिती हवी असेल तर ती मी देऊ शकतो.".

आता सर्वांचा थोडाफार विश्वास बसत होता आणि लहान मुलांचे शोषण होईल अश्या कृत्यांना आपण अप्रत्याक्षारीत्याही दुजोरा देऊ नये अस त्यांच मत होतांना मला जाणवत होत. माझ काम झाल होत. मी सर्व उपस्थित प्रतीष्टीतांना नमस्कार केला आणि त्यांनी एकमेकांना ओळखत नसतांनाही एका सामाजिक विषयावर छान चर्चा केल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

तिथून निघतांना मनात सलणारी एकच गोष्ट होती. मी त्या डोंबाऱ्याच काय झाल ते बघितलं न्हवत. तो विषय अर्ध्यात सोडून जान मलाच माझ्याकडून अपेक्षित न्हवत. मी त्या मुला-मुलीच्या बापाला समजावण्याचा थोडातरी प्रयत्न करायला हवा होता. कारण आज माझ्या समोर नाही पण इतर कुठल्यातरी गल्लीत, शहरात, राज्यात ती मुलं पुन्हा तेच करणार होती.

त्याच बरोबर एक मनस्वी समाधान देणारी गोष्ट होती की आज बरीच लोक एक चांगला बोध घेऊन निघाली होती. मी जरी नसलो तरी त्यापैकी एकजण त्या मुलीला वाचवेल. कदाचित कोणी माझ्या पुढे जाऊन तिला शाळेत घालेल आणि तिच्या आयुष्याला योग्य दिशा देईल. त्या चर्चेत एवढी खात्री पटली की नवी पहाट येत आहे. समाजातला प्रत्येक घटक जागा होतोय. प्रत्येकजण सहकार्यरूपाने काही समिधा ह्या समाज प्रबोधनाच्या यज्ञात टाकेल आणि हा यज्ञ लवकरच पूर्ण होईल. जगातल्या, विश्वातल्या प्रत्येक घटकाला पूर्णत्वाला पोहोचण्याची संधी मिळेल, अशी अशा करूयात...