असहाय

सामिधासाठी जमीन शोधण सुरु आहे. सध्या त्यासाठी बरच फीरण होतंय. त्याच कामाने नागपुरला गेलो होतो. परतीच्या प्रवासात एक लहान मुलगा भेटला. इतर लोक त्याची चौकशी करत होते, त्यावरून कळल तो पळून आलाय. बातमी फार पसरण योग्य नाही हे बघून त्याला सोबत घेतलं आणि माझ्या जागेवर आलो. माझ वरच बर्थ होता. त्याला वर बसवलं. घरून निघतांनाच अपर्णाच्या आईने डबा दिला होता. त्यातलाच थोड त्यालाही खायला दिल. त्याला भुकेपेक्षा तहान लागली असावी. त्याने पाण्याच्या बॉटल कडे फक्त इशारा केला. बराच वेळचा घरा बाहेर आहे हे त्याच्या पाणी पिण्याच्या आणि जेवण्याच्या घाई वरून लक्षात आल. मग आमच्या गप्पा सुरु झाल्या. फार चौकशी करतोय अस वाटू देऊनही चालणार न्हवत, म्हणून मी आपल उगाच पुस्तक वाचता वाचता मधेच एखादा प्रश्न विचारात होतो.

सुरुवातीच्या बोलण्यातच त्याच नाव, गाव, घराची परिस्थिती लक्षात आली. तो इटारसी जवळच्या एगडी छोट्याश्या गावाहून आला होता. घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. वडील बिगारी कामगार होते. आई धुनी भांडी करते. घरात २ बहिणी आहेत. आजोबा आजारी असतात. डायबिटीस मुळे त्यांचा पाय कापावा लागला. वडिलांना दारू पिण्याची सवय आहे. त्यासाठी ते आईला आणि त्याला मारतात. त्याने पैसे कमावून आणावे ह्यासाठी त्याला घरातून काढल आणि तो १४ वर्षांचा जीव स्वाभिमानाने पेटून घरातून निघून आला. मी थोडा समजावण्याचा प्रयत्न करताच त्याने त्याची भीष्मप्रतिज्ञा पुन्हा बोलून दाखवली, "अब घर नाही जाऊंगा... पैसा कामाकेही घर जाना है...".

त्याचा तसा जगाशी फारसा सामना अजून झालाच न्हवता. त्याची जगाशी ओळख ती काय फक्त दीड दिवस जुनी. ४ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता तो घरातून निघाला. जवळच्याच बेतुल स्टेशनवर येऊन त्याने नागपूरची गाडी पकडली. तेथून हैद्राबादच्या गाडीत प्रवास करतांना ५ फेब्रुवारीच्या संध्याकाळी तो मला भेटला. देवाच्या कृपेने त्याला कुठलाही वाईट अनुभव आलेला न्हवता. त्याच्या निर्णयाला तडा देऊ शकेल एवढी सहन न होणारी भूक सुद्धा अजून त्याला लागली न्हवती. अस काही सहन करण्याची वेळ त्याच्यावर येऊ नये अशी माझी इच्छा, त्यामुळे आम्ही एकत्र एका बर्थ वर बसून प्रवास करत होतो.

पुरेशी माहिती मिळाल्यानंतर मी माझे प्रयत्न सुरु केले. तोपर्यंत आम्ही बल्हारपूर स्टेशन जवळ पोहोचलो होतो. त्याला झोपायला सांगून मी खाली उतरलो. त्याला लगेच पोलिसांच्या हातात देऊन सुटका करून घेण मला शक्य होत. पण अशी जबाबदारी ढकलून निघून जान योग्य न्हवत. पोलिसांना बघून तोही घाबरला असता. म्हणून मी इतर मार्ग शोधायला सुरुवात केली. नेहमी प्रमाणे मी पहिला फोन अपर्णाला केला. तिला संपूर्ण परिस्थिती (समाजसेवकांच्या भाषेत 'case history') समजावून सांगितली. तिने पुढे कुठ-कुठले स्टेशन्स येतील ह्याची चौकशी करायला सांगितली आणि तिने चिल्डलाईनला फोने करून काही मदत मिळू शकते का ते बघण्यास सुरुवात केली. देवा (माझा रूममेट) बल्हारशाह मधेच होता. त्याला पुढच्या स्टेशन्स बद्दल माहिती विचारली. ह्यानंतर कागझनगर मग मन्चेरिअल स्टेशन्स येतील अस कळल. म्हणजे आम्ही लगेच आंध्रप्रदेश मध्ये पोहोचणार होतो. आता केस तीन वेगवेगळ्या राज्यांमध्ये फिरणार आहे एवढ माझ्या लक्षात आल. थोड्यावेळाने अपर्णाचा फोने आलाच. तिला मिळालेल्या माहिती नुसार कागझनगर, मन्चेरिअल मध्ये चाईल्डलाईन नाही त्यामुळे तिने हैदराबाद चाईल्डलाईनची माहिती मला दिली. तिथल्या काही कर्मचाऱ्यांचा फोने नंबरही मिळाला. आता सर्व परिस्थिती सांभाळण्याची जबाबदारी माझी होती. तो मुलगा कुठे जाऊ नये ह्यावरही लक्ष ठेवण गरजेच होत आणि त्याच्या लक्षात येऊ नये अश्या पद्धतीने चालू गाडीत सर्व व्यवस्था करण्याशिवाय पर्याय ही न्हवता. हैदराबाद चाईल्डलाईनला फोन लावला. त्यांना उडत उडत खबर मिळालेली होतीच. मी त्यांना सविस्तर माहिती दिली. सकाळी ४ वाजता गाडी हैदराबाद स्टेशनला पोहोचेल आणि तिथून ते मुलाला घेऊन जातील एवढा सरळ सोपा प्लान ठरला.

मी रात्री झोपण्या आधीच सर्व माहिती एका कागदावर लिहून ठेवली. तसच, माझी सर्व माहिती, खासकर फोने नंबर आणि पत्ता वैगेरे लिहून त्याला दिली. त्याला बजावून सांगितलं कि कुठे, कसलीही गरज पडली तर मला कुठल्याही नंबरवरून फक्त मिस कॉल दे. मी त्याची माहिती का लिहून ठेवतोय ह्याची उतकांठा त्याला होतीच. तो सकाळी एकदम बावचळून जाऊ नये ह्या विचाराने मी त्याला थोडी पूर्व कल्पना ( पण अंधुक) द्यायला सुरुवात केली. मी त्याला सांगितलं कि माझ इथे घर नाही, आम्ही इथे नौकरी करतो. त्यामुळे मी त्याला घरी नाही घेऊन जाऊ शकत. सकाळी स्टेशनवर एक काका येतील. लहान मुलांना सांभाळण्यासाठी असणाऱ्या शेल्टर होम मध्ये त्याला ठेवतील. त्याला शेल्टर होम ही माहित असाव कदाचित हे त्याच्या बोलण्यावर मला लक्षात आल. पण त्याने फार काही आक्षेप घेतला नाही म्हणजे त्याची तयारी असावी. घरी जाव लागणार नसेल तर कुठेही राहायला तो तयार होता.

कुठलाही सरळ वाटणारा प्लान हा तेवढाच अवघड किव्वा फसवा तरी असतो ह्याची लवकरच मला प्रचीती आली. सकाळी ४ वाजता गाडी स्टेशनला पोहोचली पण चाईल्डलाईन मधून कोणीही आलेलं न्हवत. मी त्यांच्या कर्मचाऱ्याला फोन केला. त्याची तेलगु मिश्रित हिंदी, इंग्रजी मला कळत न्हवती. तो झोपेत बोलल्यामुळे तर आणखीच अवघड होत. एकंदरीत, तो ७ वाजेच्या आधी स्टेशनावर येऊ शकणार नाही आणि लवकर निघायचं असेल तर रेल्वे पोलिसांकडे किंवा चाईल्डलाईनच्या ऑफिस मध्ये मुलाला सोडव लागेल, अस काहीस मला कळल. मी जाणून बाजून इंग्रजीत बोलत होतो जेणेकरून त्या मुलाला फार काही कळू नये. तरीही रेल्वे पोलीस (RPF) हा शब्द त्याने बरोबर हेरला. त्याला रेल्वे पोलिसांबद्दल बरीच माहिती आहे हे नंतर त्याच्याशी बोलतांना मला कळल. त्याचे काही मित्र असच पळून जाण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळेस रेल्वे पोलिसांनी त्यांना खूप मारलं होत. आता त्याला पोलिसांकडे सोडन योग्य नाही, हे मला परत जाणवलं. त्याला ह्या गोष्टीचा बराच धक्का बसू शकला असता. देवा पुढच्याच गाडीने हैदराबादला पोहोचणार होता. म्हणून मी तिथेच थांबून त्याची वाट बघण्याचा निर्णय घेतला. देवाही ४.४५ पर्यंत पोहोचला.

आता पुढे काय हा प्रश्न होताच. नुकत्याच झालेल्या रहदारीच्या नियमांबद्दलच्या एका कार्यक्रमाची परवानगी घेण्यासाठी मी ट्राफिक कमिशनरांच्या ऑफिसला गेलो होतो. तेथेच चाईल्डलाईनच ऑफिस आहे एवढ मला आठवत होत. शेवटी मुलाला तिकडेच घेऊन जाव असा निर्णय झाला. मी तसा फोन करून त्यांना कळवलं. एवढ्या सकाळी त्याबाजूला काही दळणवळणाच साधन मिळण अवघड होत, म्हणून आधी घरी जाऊन सर्व समान ठेवून मग दुचाकी घेऊन जायचा विचार केला. सकाळी ६ वाजल्याच्या दरम्यान मी चाईल्डलाईन ला पोहोचलो. त्यांना सर्व कागदपत्र आणि मुलगा ताब्यात दिला.

आतापर्यंत त्या मुलाचा बराच विश्वास मी संपादन केला असावा. तो मला सोडून एकटा राहायला तयारच होत न्हवता. मी संध्याकाळी नक्की भेटायला येईल ह्या अटीवर त्याने मला तेथून निघू दिल. त्याचा माझ्यावरचा विश्वास बघून मला बर वाटल. त्याचे आई-वडील त्याचा सांभाळ करू शकत नसतील तर मीच का त्याला सोबत ठेवू नये, असाही विचार मनात येऊन गेला. पण अस मी त्याला माझ्या सोबत ठेवून घेण हा एक गुन्हा ठरू शकतो हे मला माहित होत. मी मनाला आवारात घेतलं आणि तेथून निघालो. पण त्याच्यावर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही एवढ मी मनाशी ठरवलं.

घरी आल्याबरोबर इ-मेल लिहून ठेवला. आवरून ऑफिसला पोहोचताच आधी मध्यप्रदेश मधील सर्व चाईल्डलाईन शोधून त्यांना इ-मेल केला. नंतर हैदराबाद ऑफिसला फोन केला. तिथे तर आणखीनच गोंधळ होतो. त्या मुलाबद्दल कुणालाच काहीही माहित न्हवत. त्यांनी थोड्यावेळाने फोन करायला सांगितलं. थोड्या वेळाने मला आणखी एका व्यक्तीचा फोन नंबर देण्यात आला. तेथून कळल कि त्या मुलाला शेल्टर होम मध्ये ठेवण्यात आलय. पण शेल्टर होमची माहिती त्यांच्याकडे न्हवती. थोड्यावेळाने फोन करून त्यांनी तिथला फोन नंबर मला दिला. तिथे फोन केल्यावर अश्या नावाचा कोणीच मुलगा तेथे नसल्याच कळल. ह्या फोन-फोनीत एक दीड तास निघून गेला होता. आता माझा पारा चढत होता. मला त्या मुलाची ही काळजी वाटत होती. लवकरात लवकर त्या मुलाला शोधन गरजेच होत. रात्र पाळीवर असणारा तो व्यक्ती सुद्धा फोन उचलत न्हवता. मी पुन्हा त्यांच्या ऑफिसला फोन केला आणि झापायला सुरुवात केली, "तुम्ही एक जबाबदार संस्था आहात म्हणून मी मुलाला तुमच्या इथे सोडून गेलो होतो. काहीतरी करून मुलाला शोधायला हवाय". "tumhi मुलाला तेथे आणून दिल आणि तुमच काम संपल. आम्ही बघून घेऊ त्याच पुढे काय करायचं ते", येवढ बोलून त्यांनी फोन ठेवला. आता माझा साय्यमाचा बांध फुटला होता. मी लगेच पुन्हा फोन लावला आणि सरळ धमकीच दिली, "तो मुलगा माझी जबाबदारी आहे. मी सकाळी त्याला तुमच्या ऑफिस मध्ये सोडून आलोय. तशी रजिस्टर मध्ये नोंद आहे. जर १०मिनिटात मला त्या मुलाशी बोलायला नाही मिळाल तर मी सरळ तक्रार करेल.". आता त्यांनी खरे प्रयत्न सुरु केले असावेत. रात्र पाळीकरून घरी गेलेल्या व्यक्तीला त्यांनी संपर्क साधला. १० मिनिटातच मला त्याचा मेसज आला. त्याने ह्या केस वर लक्ष ठेवणाऱ्या दुसऱ्या एकाचा नंबर दिला. मी त्या व्यक्तीला फोने केला. सकाळी १० च्या सुमारासास त्यांनी बाल कल्याण समिती* समोर त्या मुलाला उपस्थित केल आणि त्याला एका शेल्तर होमे मध्ये पाठवलय. त्याने आश्वासन दिल कि लगेच तो मुलगा कुठे आहे ह्याची चौकशी करून सांगतो. मला लगेच शेल्तर होमेच्या मुख्यांचा मोबिल नंबर आणि इतर माहिती मिळाली. शेल्तर होमे च्या नियमानुसार फक्त पालकाच मुलांशी बोलू शकतात, त्यामुळे मला त्याच्याशी बोलू दिल गेल नाही. पण तो व्यवस्थित ठिकाणी होता त्यामुळे मला हायस वाटल.

अजून पर्यंत माझ्या इ-मेलला कोणीच उत्तर दिलेलं न्हवत. हे सुद्धा दिरंगाई करताय अशीच माझी समजूत होती. म्हणून मी लगेच मुख्य कार्यालयाला तोच इ मेल पाठवून त्यांना जाब विचारला. ४ तास झालेत कोणीच का प्रतिउत्तर देत का नाहीये ह्याची मी विचारणा केली. लगेच मला उज्जैन वरून फोन आला. त्यांनी माहिती दिली कि ते गाव भोपाल पासून जवळ आहे. त्यामुळे तिथल कार्यालयच काहीतरी करू शकेल आणि त्यांना संपर्क करण्याच्या प्रयत्न सुद्धा करत होते. थोड्याच वेळात मला भोपाळ वरून एका वरिष्ठ व्यक्तीचा फोन आला. त्यांचे सर्व कर्मचारी एका महत्वाच्या केससाठी बाहेर होते त्यामुळे त्यांना इ-मेलला उत्तर देता आल नाही, अस त्यांनी सांगितलं. संध्याकाळपर्यंत त्यांच्या कळून फोन येईल असे मला सांगण्यात आले. त्याप्रमाणे मला फोन आला. भोपाल पासून सुधा ते गाव बरच दूर आहे आणि त्याच्या घरच्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अजून १-२ दिवस तरी लागतील असे त्यांनी सांगितले.

ह्या सर्व धावपळीत संध्याकाळ केव्हा झाली ते कळलच नाही. ऑफिस सांभाळून हे करतांना मीही थोडा थकलो होतो. पण त्या मुलाला भेटायला येणार अस आश्वासन दिल होत. शेल्टर होमच्या मुख्यांनी आधीच सांगितलं होत कि मी त्याच्याशी फोन वर बोलू शकत नाही. मग भेटण्याची परवानगी मिळण थोड अवघडच होत. तरी प्रयत्न करण्याशिवाय पर्याय न्हवता. मी शेल्टर होमला फोन केला. तेथून कळल कि ते घरी निघालेत आणि भेटण्याची वेळ ५ पर्यंतच आहे, त्यामुळे आता ते शक्य नाही. मी त्यांच्या मोबाईलवर फोन केला. त्यांना सकाळी झालेला घटनाक्रम सांगितला आणि फक्त २ मिनिट त्याच्याशी बोलायला मिळाव अशी विनंती केली. त्यांना ती फेटाळण अवघड झाल असाव. मला परवानगी मिळाली. शेल्टर होमचा पत्ता घेऊन मी निघालो. ते ५० कि मी दूर असेल. मला तेथे पोहोचण्यात जवळपास २ तास लागले.

मला बघतच त्याच्या डोळे पाणावले. मी हि थोडा भावनिक झालो. त्याने दिवसभरात काय घडल ते सांगायला सुरुवात केली. शेल्टर होमच वातावरण बघून तो घाबरला होता. तेथे राहणाऱ्या मुलांकडून त्याला कळल होत कि एकदा इथे आलेली मुल परत बाहेर निघू शकत नाही. ती मुल वाईट वाईट बोलतात आणि शिव्या पण देतात. ते ऐकून तो घाबरला होता. त्याने दुपारी मला फोन करण्यासाठी विनंती केली पण त्यांनी माझ्याशी बोलू दिल नाही. आता त्याचा निर्णय बदलला होता. त्याला घरी जायचं होत. हे सांगतांना त्याला रडण थांबवला जात न्हवत. मी भेटण्याच्या वेळेनंतर गेलो होतो त्यामुळे मला एका गेटच्या बाहेरून त्याच्याशी बोलाव लागत होत. मी त्या गेट मधूनच आत हात घातला आणि त्याच्या गालावर ठेवला. अलगत एक अश्रूंचा थेंब माझ्या हातावर पडला. त्याच्या अश्रूंच्या थेंबातून त्याच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचत होत्या. मी पुन्हा मनाशी खून घाठ बांधली कि त्याच्यावर कुठलाही अत्त्याचार, अन्याय होऊ देणार नाही.

मी त्या मुलाकडून सर्व माहिती आधीच काढून घेतलेली होती. अगदी त्याच्या घराचा पत्ता, फोन नंबर सुद्धा. त्यामुळे लगेच दुसऱ्याच दिवशी (७ फेब्रुवारी, मंगळवार) त्यांना त्या मुलाच्या घरी संपर्क करता आला. त्याच्या आईचा मोबाईल नंबर सुधा मिळाला. (मोबाईल असण हे भारतात खरच काही विशेष राहिलेलं नाहीये. हल्ली प्रत्येकाकडे तो असतोच. बरय म्हणा... वाईट काय त्यात...). मी लगेच त्याच्या घरी फोन लावला. त्याच्या आईशी, बहिणीशी आणि आजोबांशी बोललो. त्यांना आश्वासन दिल कि त्यांचा मुलगा लवकरात लवकर आणि व्यवस्थित घरी पोहोचेल. ८ फेब्रुवारीला (बुधवार ) हैदराबाद चिल्ड लाईनलाहि फोन करून हि माहिती दिली. आता पुढे काय करायचं ह्याची विचारणा केली. दर गुरुवारी चाईल्ड लाईन आणि बाल कल्याण समितीची बैठक असते. तेथे सर्व माहिती पुरवली जाईल. त्यांना निर्णय घेतांना काही शंका राहू नये म्हणून मी आधीच्या कागदपत्रांमध्ये सर्व नवीन घडामोडी सुधा लिहिल्या. त्याच्या घरचे नवीन फोन नंबर, भोपालच्या चाईल्डलाईन डायरेक्टर आणि ऑफिसचा नंबर, त्याच्या गावातल्या पोलीस स्टेशनचा नंबर आणि इतर सर्व माहितीही. ती कागद पत्र बनवून हैदराबाद चाईल्ड लाईनला इ-मेल केला. ९ फेब्रुवारी (गुरुवार) केस पुन्हा बाल कल्याण समितीपुढे मांडण्यात आली. केस सरळ होती. त्यामुळे लगेच निर्णय मिळाला. त्यांनी पालकांना मुलाला घेऊन जाण्याची परवानगी दिली. पालकांना जमत नसल्यास शेल्टर होम वर ती जबाबदारी दिली. सर्व सुरुळीत होतंय अस मला वाटल.

पण ती ९ तारीख आणि आजची २८ तारीख, २५ दिवस उलटून गेलेत मी काहीच करू शकलेलो नाही. अजून ही मी त्या मुलाला घरी पोहोचू शकलेलो नाही. मी त्यानंतर बऱ्याचदा शेल्टर होमला फोन केले. त्या मुलाशी मला बोलू दिल जात नाही. त्याच्या बहिणीला ब्रेन टुमर आहे आणि आजोबांना पाय नाही, त्यामुळे त्याची आई हैदराबादला येऊ शकत नाही. शेल्टर होमकडे त्या मुलाबरोबर पाठवायला सध्या कोणी नाही. वाट बघण्याशिवाय सध्या माझ्याकडे काही पर्याय नाहीए.

धावपडीत संपणाऱ्या प्रत्येक दिवसानंतर झोपतांना, माझ्यावर विश्वास ठेवून वाट पाहणारा तो चेहरा दिसतो, त्याच्या आई-बहिणीचे ते शब्द आठवतात आणि मी किती 'असहाय' आहे ह्याची जाणीव करून देतात.


* बाल कल्याण समिती (चाईल्ड वेल्फेअर कमिटी) (CWC): बाल कल्याण कायद्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात बाल कल्याण समिती असणे गरजेचे आहे. त्यात एक अध्यक्ष व ४ इतर सहकारी असतात. ४ पैकी एक महिला सहकारी असण गरजेच असत.