भारतीय समाज क्रांतितील हरवलेले सोनेरी पान
न्यायमूर्ती केशवराव कोरटकर (1867 - 1932) यांचा जन्म एका गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला. स्वकर्तृत्वावर निजाम राज्यात ते मुख्य न्यायाधीश पदापर्यंत पोहोचले. केशवरावांची सामाजिक बांधिलकी आणि त्यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान अतुलनीय आहे. समाजाची प्रगती साधायची असेल तर प्रथम सामाजिक जागृती आवश्यक आहे व शिक्षण हाच समाज जागृतीचा पाया आहे हा केशवरावांचा दृढ विश्वास होता. समाजात आमूलाग्र बदल आणण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य प्रयत्न केले. तत्कालीन निजाम राज्यातील मराठी व हिंदू हृदयात त्यांनी आदराचे आणि प्रेमाचे स्थान मिळवले. भारतीय समाजक्रांतितील या हरवलेल्या सोनेरी पानाला माझा मानाचा मुजरा.
माझे पणजोबा केशवराव माझ्यासाठी सामाजिक बंधीलकीची जाणीव करून देणारे एक प्रेरणा स्थान आहे. त्यांचे पुरोगामी विचार आणि उमेद थोडेबहुत का होईना मला अंगिकारता यावे आणि समाजरूण फेडता यावे ही मी देवाचारणी प्रार्थना करतो. त्यांच्या अतुलनीय कार्याची छोटीशी ओळख करून देण्याचा मी इथे एक प्रयत्न करतो.
व्यावसायिक जीवन
केशवरावांचा जन्म 1867 साली तत्कालीन निजाम राज्यातील मराठवाड्यात एका अतिशय गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला. घराच्या आर्थिक परिस्थितीमुळे वयाच्या पंधराव्या वर्षीच गुलबर्गा येथे तहसील कार्यालयात त्यांना नोकरी करणे भाग पडले. नोकरी करत, अतिशय जिद्दीने केशवरावांनी वकिलीच्या परीक्षा दिल्या आणि वयाच्या तेविसाव्या वर्षी वकिलीची सनद मिळवली. जवळजवळ सहा वर्षे गुलबर्ग्याच्या सत्र न्यायालयात काम केल्यानंतर केशवराव गुलबर्गा सोडून हैदराबादेस उच्च न्यायालयात वकिली करण्यास आले. त्यांची अभ्यासू वृत्ती आणि उर्दू, मराठी व इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व या गुणांमुळे लवकरच ते एक नामांकित वकील म्हणून निजाम राज्यात प्रसिद्धीस आले. जवळजवळ पंचवींस वर्षे वकिली करून प्रसिद्धीच्या शिखरावर असताना निजाम सरकारने त्यांना उच्च न्यायाधीशपद देऊ केले. निजाम राज्यातल्या मराठी आणि हिंदूंच्या अस्मितेचा विचार करून केशवरावांनी हे पद मान्य केले. त्यानंतर पाच वर्षे न्यायाधिशपदी काम करून केशवरावानी निवृत्ती स्वीकारली.
शिक्षण व साक्षरता
शिक्षण व साक्षरता हा सामाजिक जागृतीचा पाया आहे या विचारांचे केशवराव होते. तत्कालीन साक्षरता तीन टक्क्यांहून अधिक नव्हती. या पार्श्वभूमीवर केशवरावांचे विचार निश्चितच उल्लेखनीय होते. वर्तमानपत्रे व नियतकालिकांद्वारे प्रौढ साक्षरता आणण्याच्या विचारांचे ते होते. आशा पुरोगामी विचारांनी प्रेरित होऊन केशवरावानी शिक्षण क्षेत्रात अतुलनीय योगदान केले आहे.
1907 मध्ये काही सहकर्यांना बरोबर घेऊन त्यांनी हैद्राबादेत विवेक वर्धिनी या शिक्षण संस्थेची स्थापना केली. पुढे ही संस्था खूप नावारूपाला आली. शंभर वर्षानंतरही ही संस्था हैद्राबादेत आज शिक्षण प्रसाराचे काम करत आहे. निजाम राज्यात अशा अनेक शिक्षण संस्थांच्या उभारणीत केशवरावांचे मोठे योगदान आहे. या संस्था आज शंभर वर्षानंतरही शिक्षण प्रसाराचे काम करत आहेत. उदाहरणार्थ नूतन विद्यालय गुलबर्गा, सरस्वती भुवन विद्यालय औरंगाबाद, शारदा मंदिर औरंगाबाद, एक्सलसीअर हायस्कुल हैदराबाद ही नावे प्रकर्षाने घेता येतील. वर्तमानपत्रे व नियतकालिके यातही केशवरावांचे योगदान उल्लेखनीय आहे. निजाम विजय, नागरिक, राजहंस, रयत, ज्ञानप्रकाश या वर्तमानपत्र व नियातकालिकांना केशवरावांचे कमालीचे प्रोहोत्सहन असे. बळवंत वाचनालय औरंगाबाद, आर्यभूषण पुणे या संस्थांना केशवरावांची मदत असे. महाराष्ट्र वाचनालय परिषदेचे ते कार्यकर्ते होते व 1926 साली परिषद त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. 1931 साली मराठी साहित्य संमेलनाचे उपाध्यक्ष पद त्यांनी भूषवले. 15 वे साहित्य संमेलन हैद्राबादेत भरले होते त्याची संपूर्ण धुरा केशवरावांच्या हाती होती. डेक्कन एज्युकेशन सोसायटीशी त्यांचा जवळचा संबंध होता आणि त्याचा त्यांना अतिशय अभिमान होता. केशवरावाना वसंत व्याख्यान मालेत वक्ता म्हणून आमंत्रित केले होते. वसंत व्याख्यानमाला ही तत्कालीन विचारवंतांसाठी विचारांच्या देवाणघेवाणीचे एक महत्वाचे व्यासपीठ समजली जात असे.
समाज परिवर्तन
केशवरावांचे तत्कालीन सामाज रचने बाबत पुरोगामी विचार होते. समाजातील रूढी व परंपरेत आमूलाग्र बदल आणण्याची आवश्यकता त्यांना भासत होती. सामाजिक बदल हाच विकासाचा एक मार्ग त्यांना मान्य होता.
केशवरावांच्या विचारावर आर्य समाजाचा प्रामुख्याने प्रभाव होता. अनेक वर्षे ते आर्य समाजाच्या हैदराबाद शाखेचे अध्यक्ष होते. आपल्या पुरोगामी विचारांची अमंलबजावणी करण्यासाठी आर्य समाज व इतर अनेक संस्थांशी ते निगडित होते. उदाहरणार्थ हैदराबाद सामाजिक सुधारणा संघ, सामाजिक परिषद हैदराबाद, महाराष्ट्र हिंदू धर्म परिषद, सोशल सर्व्हिस लीग हैदराबाद. निजाम राज्य कायदे मंडळावरही केशवरावांची नियुक्ती झाली होती.
केशवरावांनी पाठपुरावा केलेल्या काही सामाजिक बदलपर विषयांचा येथे उल्लेख करणे आवश्यक आहे. अस्पृश्यता विरोध, विधवा पुनर्विवाह, लग्नाच्या कायदेशीर वयात वाढ, बाल विवाहात नाबालिक शारीरिक संबंधास शिक्षा, विधवांना संपत्तीत वाटा आशा पुरोगामी विचारांची अमलबजावणी करण्याचा प्रयत्न केशवरावांनी केला. 1911 साली झालेल्या अस्पृश्य सहभोजनात केशवराव सहभागी झाले. घरी आणि समाजात अनेक काळ त्यांना बहिषकृती सहन करावी लागली. निजाम कायदे मंडळावर असल्याने केशवरावांना सामाजिक कायद्यात अनेक बदल आणता आले. त्याचा समाजात त्यांना रोष पत्करावा लागला. परंतु सनातनी सहकार्यांचा विरोध सामाजिक दबाव या मुळे अनेक बदल ते आणू शकले नाहीत. परंतु खचून न जाता सामाजिक बदलाचा पुरस्कार त्यांनी शेवटपर्यंत केला.
राजकारण
केशवरावानी सक्रिय राजकारणात भाग घेतला नाही. समाज जागृती ही समाजाची प्रथम गरज आहे या विचारांनी ते राजकारणाला दुय्यम महत्व देत. परंतू ब्रिटिश राज्यातील काँग्रेसच्या चळवळीला त्यांची सहानुभूती असे. ते स्वतःला गोपाळ कृष्ण गोखले पुरस्कृत मवाळ विचारसरणीचे अनुयायी मानत. परंतु लोकमान्य टिळकांबद्दल त्यांना अतिशय आदर होता आणि त्यांच्याशी असलेल्या स्नेहसंबंधाबाबत त्यांना अतिशय अभिमान होता. भारतीयांवरील अत्याचाराला कंटाळून चाफेकर बंधूनी रँड साहेबांचा वध केला. दामोदर चाफेकर पकडले गेले परंतु बाळकृष्ण चाफेकर निजाम राज्यात भूमिगत झाले. बाळकृष्ण चाफेकरांना त्या काळी अतिशय कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागले आणि त्यातच ते आजारी पडले. अशा परिस्थितीत लोकमान्य टिळकांच्या विनंतीला मान देऊन केशवरावांनी बाळकृष्ण चाफेकरांना योग्य ती मदत केली. त्या काळी निजाम सरकारात असूनही केशवरावांनी जोखीम पत्करून हे काम केले.
केशवरावांच्या मरणोत्तर त्यांचे चिरंजीव विनायकराव यांनी हैद्राबादेत केशव मेमोरियल ची स्थापना केली. 15 ऑगस्ट 1947 रोजी केशव मेमोरियल मध्ये स्वतंत्र भारताचा तिरंगा फडकवला गेला. तेंव्हा अजूनही निजाम राज्य होते. निजाम पोलिसांनी करावाई केली त्यात अनेक देशभक्त जखमी झाले. येथून चळवळीला वेग आला आणि अखेर निजाम राज्य स्वतंत्र भारतात विलीन झाले.
वैचारिक प्रभाव
केशवरावांचा तत्कालीन विख्यात व्यक्तींबरोबर जवळचा संबंध आला व त्यांच्या विचारांचा प्रभाव केशवरावांवर झाला. केशवरावांना टिळकांबद्दल अतिशय आदर होता आणि त्यांच्याबरोबर विचारांची देवाणघेवाण करण्याचे त्यांना योग आले. बळवंत चाफेकर सारख्या संवेदनशील प्रकरणात टिळक केवळ केशवरावांवर विश्वास टाकू शकले. प्रसिद्ध समाज सुधारक महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या बरोबर अनेक संस्थांतून काम करण्याचा योग्य केशवरावांना आला. पाश्चिमात्य संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी आण्णासाहेबांच्या बरोबर विदेश दौरा करण्याचा योग्य केशवरावांना आला. रँग्लर परांजपे यांच्या बरोबर केशवरावांची घनिष्ट मैत्री होती. केशवरावांच्या अंतिम समयी देखील रँग्लर परांजपे त्यांच्या बरोबर होते.
केशवरावांच्या सामाजिक कार्यातील त्यांच्या काही घनिष्ट सहकाऱ्यांचा येथे उल्लेख करणे आवश्यक आहे. हैदराबादचे वामनराव नाईक, गुलबर्ग्याचे विठ्ठलराव देऊळगावकर आणि गिरीरावअण्णा घाटे जहागीरदार या सहकाऱ्यांचा केशवरावांच्या कार्यात मोलाचा वाटा आहे. केशवराव सक्रिय राजकारणात नव्हते, परंतु त्यांच्या दोन अनुयायांनी स्वतंत्र भारताच्या राजकारणात महत्वाची भूमिका निभावली. केशवरावांचे जेष्ठ पुत्र विनायकराव व केशवरावांचे जवळचे अनुयायी श्री काशीनाथ वैद्य स्वतंत्र भारताच्या नव्या हैदराबाद राज्यात विधान सभेवर निवडून आले. विनायकरावानी अर्थ मंत्री म्हणून कार्यभाग सांभाळला तर श्री काशिनाथ वैद्य यांची 1952 साली सभापती म्हणून निवड झाली.
न्यायमूर्ती काशिनाथ वैद्य यांनी केशवराव कोरटकरांचे चरित्र 1936 साली प्रथम प्रकाशित केले. न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांनी संपादन व प्रस्तावनेसहित राजहंस प्रकाशन प्रा. ली. तर्फे 2015 साली पुनःप्रकाशित केले. हा लेख लिहिताना या पुस्तकाचा संदर्भ घेतला आहे.
Keshavrao Koratkar,
https://en.m.wikipedia.org/wiki/Keshav_Rao_KoratkarHyderabad Samajik Sudharana Sangh,
https://en.m.wikipedia.org/wiki/Hyderabad_Samajik_Sudhar_SanghAarya Samaj, Arya Samaj in Hyderabad state,
https://en.m.wikipedia.org/wiki/Arya_SamajKeshav Memorial Educational Society,
https://kmcl.in/history