श्री बळवंत राव गिरीराव घाटे (१९०२ - १९८९) यांचा जन्म पूर्वीच्या निजाम राज्यात एका सधन कुटुंबात झाला. बळवंत रावांची ओळख अण्णा साहेब किंवा अण्णा अशीच जास्त श्रुत आहे. लहानपणापासूनच अतिशय हुशार अशा अण्णा साहेबांनी वकिलीची पदवी संपादन करून निजाम राज्यातील न्यायव्यवस्थेत नोकरी पत्करली. वयाच्या पंचावन्नव्या वर्षीच निवृत्ती घेऊन अण्णा साहेबानी स्वतःला सामाजिक जीवनात झोकून दिले. वारकरी संप्रदायाच्या सेवेचा आणि सामाजिक बांधिलकीचा जणू त्यांनी ध्यासच घेतला. एकनाथ महाराज्यांच्या विचारांचा आणि वाङ्ममायाचा जनमानसात प्रचार करण्यात त्यांची कामगिरी अतुलनीय आहे. प्रपंच आणि अध्यात्म यांचा योग्य मेळ जो अण्णा साहेबांनी आपल्या जीवनात साधला तो एकनाथ महाराजांच्या शिकवणीचे एक उत्तम उदाहरण म्हणून देता येईल.
माझे आजोबा अण्णा माझ्यासाठी सामाजिक बंधीलकीची जाणीव करून देणारे एक प्रेरणा स्थान आहे. त्यांचे विचार आणि उमेद थोडेबहुत का होईना मला अंगिकारता यावे आणि समाजरूण फेडता यावे ही मी देवाचारणी प्रार्थना करतो. त्यांच्या अतुलनीय कार्याची छोटीशी ओळख करून देण्याचा मी इथे एक प्रयत्न करतो.
गिरीश घाटे
व्यावसायिक जीवन
अण्णा साहेबांचा जन्म १९०२ साली पूर्वीच्या निजाम राज्यात एका सधन कुटुंबात झाला. गुलबर्गा येथील नूतन विद्यालयात शालेय शिक्षण घेऊन पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले. प्रथम फेर्ग्युसन कॉलेज आणि नंतर लॉ कॉलेज मध्ये उच्च शिक्षण घेऊन त्यांनी वकिलीची पदवी संपादन केली. अण्णा साहेबांचे वडील, श्री गिरीराव अण्णा त्याकाळी गुलबर्ग्यात उमेदीचे वकील म्हणून प्रसिद्ध होते. अण्णा साहेबांच्या गुणांना वाव मिळावा म्हणून त्यांनी आपली वकिली थांबवून पुण्यास स्थलांतर करणे पत्करले. वयाच्या तेविसाव्या वर्षी वकिलाची पदवी संपादन करून अण्णा साहेब गुलबर्ग्यास परत आले व वकिली करू लागले. लवकरच त्यांना निजाम पदरी न्यायाधीश पदाची संधी मिळाली आणि ती त्यांनी कबूल केली. न्यायालयीन व्यवस्थेवरचा त्यांचा विश्वास आणि न्यायदानातील त्यांची निस्पृहता या मुळे एक उत्तम न्यायाधीश म्हणून ते किर्तीस आले. व्यावसायिक जीवनात त्यांच्या बदल्या मुख्यतः मराठवाड्यातच झाल्या. त्या काळी निजामशाहीत हिंदू अधिकारी कमीच असत. परंतु महत्वाच्या कामी अण्णा साहेबांची मात्र नियुक्ती जरूर होत असे. १९५६ साली मराठवाड्याचे मुंबई राज्यात विलीनीकरण झाले. अण्णा साहेबानी याचवेळी वयाच्या पंचावन्नव्या वर्षी सेवा निवृत्ती घेतली.
वारकरी संप्रदायाचा ध्यास आणि सामाजिक बांधिलकी या आयुष्याच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली.
एकनाथ सौंशोधन मंदिर
वारकरी संप्रदायाच्या प्रेमाचं बीज अण्णांच्या मनात त्यांचे वडील गिरीराव अण्णांनी प्रथम रोवलं. गिरीराव अण्णा वारकरी संप्रदायाचे गाढे अभ्यासक. तुकाराम महाराजांवरचे वसंत व्याख्यानमालेतील त्यांचे व्याख्यान त्या काळी अतिशय गाजले. वसंत व्याख्यानमाला ही तत्कालीन विचारवंतांना विचारांच्या देवांघेवणासाठी एक महत्वाचे व्यासपीठ समजली जाते असे. नोकरीनिमित्त अण्णा साहेब पैठणला राहू लागले. त्यावेळी प्रथम एकनाथ महाराजमच्या विचारांकडे अण्णा साहेब ओढले गेले आणि पुढील आयुष्यात एकनाथांची शिकवण अंगिकरण्याचा पण त्यांनी केला.
औरंगाबादेत स्थायिक झाल्यावर प्रसिद्ध इतिहासकार सेतू माधव पगडी याना बरोबर घेऊन १९५१ साली अण्णा साहेबांनी एकनाथ संशोधन मंदिराची स्थापना केली. एकनाथ महाराजांच्या वाङ्ममयाचा अभ्यास व पुनरप्रकाशन, वारकरी सांप्रदायाच्या साहित्याचे विश्लेषण आणि जनमानसात प्रसार हे संस्थेचे ध्येय. जनातेपर्यंत भक्ती मार्ग व आध्यात्मिक विचार पोहोचवण्यासाठी अनेक विद्वान आणि अभ्यासकांची व्याख्याने संस्थेने योजण्याचे काम केले.
संस्थेची सरकारी घेतलेली दखल संस्थेच्या कामाचा आवाका दाखवते. भारताचे तत्कालीन राष्ट्रापती माननीय श्री राजेंद्रप्रसाद औरंगाबादेत आले होते. त्यांनी अण्णा साहेब आणि श्री सेतू माधव पगडी याना आवर्जून निमंत्रण पाठवले व संस्थेच्या कामाची माहिती करून घेतली. राष्ट्रपतींनी संस्थेच्या कामाची वाखाणणी केली आणि पुढील कामास आशीर्वाद दिले. तदनंतर तत्कालीन मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण, मुख्यमंत्री श्री वसंतराव नाईक, शिक्षण मंत्री मधुकर राव चौधरी यांनी संस्थेला भेट देऊन संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.
भावार्थ रामायण या एकनाथ महाराजांच्या ग्रंथाचे पुनरसंकलन करण्याचे महाराष्ट्र सरकारने ठरवले. अण्णा साहेबांची या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. पैठणच्या नाथ मंदिरावर अण्णा साहेबांना कोर्ट रिसिव्हर नेमण्यात आले. त्यांच्या अखेरपर्यंत अण्णा साहेबानी ही जबाबदारी निस्पृहतेने पार पाडली.
शिक्षण व साक्षरता
अण्णासाहेबांच्या मते शिक्षण हा मानवतेचा पाया आहे. आपल्या आप्त स्वकीयांत अनेकांना अण्णा साहेबानी शिक्षणास भरघोस मदत केलीच परंतु सार्वजनिक शिक्षण क्षेत्रातही मोलाची कामगिरी बजावली.
संस्कृत विद्वान श्री अशोक देव यांना बरोबर घेऊन अण्णा साहेबांनी औरंगाबाद येथे श्रीनाथ संस्कृत प्रशाला स्थापन केली. प्रशालेत संस्कृत शिक्षणाशिवाय चार वेदांचे शिक्षणही देण्यात येत असे. प्रशालेचे यश पाहून मराठवाड्यात आणखी काही शाळा संस्कृत शिक्षणासाठी पुढे आल्या. त्यांच्या कामाचा अनुभव पाहून अण्णा साहेबांची महाराष्ट्र संस्कृत विकास समितीत निवड झाली.
अण्णासाहेबांच्या प्रोहोत्सहनाने स्थानिक महिला मंडळाने औरंगाबाद येथे १९६४ साली बाल ज्ञान विद्या मंदिर नावाने प्राथमिक शाळा सुरू केली. अण्णा साहेबांच्या पत्नी दमयमती बाई घाटे यांनी पुढाकार घेतला. या शाळेचे कालांतराने रूपांतर एका मोठ्या शाळेत झाले. आज शाळेत १००० हुन अधिक विद्यार्थी शिकत आहेत. शाळेच्या यशात अण्णा साहेबांच्या कन्या डॉ. कुमुदिनी कुद्रीमोती यांचा मोलाचा वाटा आहे.
यावली येथिल श्री काळभट सरांना ग्रामीण भागात शाळा सुरू करण्यास अण्णा साहेबांनी प्रोहोत्सहित केले. अण्णा साहेबांचे दोन्ही चिरंजीव श्री प्रभाकर राव आणि विठ्ठल राव यांनी शाळा उभारणीत मोलाची मदत केली. शाळेची मुहूर्तमेढ अण्णा साहेबांच्या मृत्यु पश्चात १९९० मध्ये झाली. अण्णा साहेबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शाळेचे नामकरण अण्णा साहेबांच्या नावे करण्यात आले. आज ही शाळा यावली येथे २५० हून अधिक विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देत आहे.
सामाजिक बांधिलकी
अण्णा साहेबांचं मूळ गाव यावली. सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यातील एक छोटेसे हे गाव. शिक्षण आणि नोकरीनिमित्त अण्णा साहेब बहुतांशी बाहेरगावीच असत. परंतु गावावरचं त्यांचं प्रेम कधीच कमी झालं नाही. वेळ मिळेल तेंव्हा यावलीला यायची त्यांना ओढ असे. गावाशी सामाजिक बांधिलकी त्यांनी कायम जपली. गावात एकी निर्माण व्हावी आणि जनमानसात भक्ती मार्ग रुजू व्हावा ह्या साठी त्यांनी रोज प्रभात फेरीची सुरुवात केली. हा उपक्रम इतका लोकप्रिय झाला की पुढील पंचवीस वर्षे त्यात खंड पडला नाही. गावाच्या विकासासाठी त्यांनी केलेले काम अमुलाग्र आहे. गावात समाज मंदिराची स्थापना, गावातील विठ्ठल मंदिराची पुनर्रचना, गावात वीज आणणे, गावात माध्यमिक शाळेची स्थापना इत्यादी अनेक उपक्रम अण्णा साहेबांनी राबवले. या सर्व कामात अण्णा साहेबाना त्यांचे दोन्ही पुत्र प्रभाकर राव आणि विठ्ठल राव यांची खूप मदत झाली.
त्यांची सामाजिक बांधिलकी यावली पुरती मर्यादित नव्हती. नोकरीनिमित्त जेथे म्हणून अण्णा साहेब राहिले, त्या जागेचे ऋण फेडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अण्णा साहेब रायचूर जिल्ह्यात कुष्टगी या गावी काही वर्षं होते. त्याच सुमारास रायचूर जिल्ह्यात अतिशय मोठा दुष्काळ पडला. अण्णा साहेबांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यात गरजूंसाठी अनेक अन्नछत्र सुरू केले. जवळपास १५०० लोकांना तीन ते चार महिने अन्नाचा पुरवठा या अन्नछत्रांत केला. त्यांच्या या कार्याचे उदाहरण लोक अनेक वर्ष देत.
वैचारिक प्रभाव
आपल्या विचारातील सामाजिक बांधिलकीचे श्रेय ते त्यांना जो सत्संग लाभला त्यास देत असत.
आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांचा अण्णा साहेबांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. विनोबाजींबरोबर विचार विनिमय करण्याचा योग अण्णा साहेबाना मिळाला. मराठवड्याच्या एका दौऱ्यात विनोबाजींनी अण्णा साहेबांकडेच मुक्काम केला. विनोबाजींच्या भूदान चळवळीस प्रतिसाद देत अण्णा साहेबानी यावलीत जमीन दान केली.
वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. धुंडा महाराजांबद्दल अण्णा साहेबाना अतिशय प्रेम व आदर होता. धुंडा महाराजांबरोबर भक्ती मार्गावर वैचारिक देवाण घेवाण कारण्याचे अनेक योग अण्णा साहेबाना आले. धुंडा महाराज त्यांच्या आजारात अण्णा साहेबांच्या घरीच औरंगाबाद येथे राहत होते.
अनेक विचारवंत आणि विद्वानांबरोबर चर्चेची संधी अण्णा साहेबांना लाभली. गुरुदेव रानडे, सोनोपंत दांडेकर, महादेव शास्त्री जोशी, पांडुरंग शास्त्री आठवले अशी काही नावे उदाहरणादाखल देत येतील.
अण्णा साहेबांची गाथा त्यांच्या पत्नी दमयंती बाई यांच्या शिवाय पूर्ण होणार नाही. आयुष्यातल्या सर्व सुख दुःखात बाई अण्णा साहेबांच्या मागे ठामपणे उभ्या राहिल्या. अण्णा साहेबांच्या या झंझावाती गलबताला याच बंदरात वेळोवेळी विसावा लाभला...
गिरीश घाटे
अण्णा साहेबांच्या वर्ष श्राद्धाला "न्यायमूर्ती बळवंत गिरीराव घाटे - स्मृतीगंध" या नावाने श्री प्रभाकर राव घाटे सह संपादित व एकनाथ संशोधन मंदिर प्रकाशित पुस्तिका छापली गेली. या पुस्तिकेतील संदर्भ या लेखात वापरले आहेत.