गिरिराव अण्णा घाटे जहागीरदार ( १८७० - १९३९ ) यांचा जन्म यावली येथे झाला. यावली हे सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातलं छोटेसं गाव. गिरिराव अण्णा हे गावच्या जहागीरदार घराण्यातल्या माधवरावांचे एकुलतेएक चिरंजीव. गिरिराव लहानपणापासून अतिशय हुशार. आपल्या मुलाने भरपूर शिकावे ही माधवरावांची खूप इच्छा होती. मुलाला शिकवण्यास माधवराव तसे सधन असले तरी यावली गावातच काय, पूर्ण पंचक्रोशीतही शिक्षणाची काही सोय नव्हती. त्यामुळे माधवरावांनी गिरिरावांना गुलबर्गा शहरी नातेवाईकांकडे शिकायला ठेवलं.
गिरिरावांचं प्राथमिक शिक्षण मराठीत झालं. शाळेत गिरिराव अतिशय हुशार म्हणून गणले जात. त्यांचं पाठांतर लहानपणापासून खूप चांगलं होतं. गुलबर्गा त्या काळी निजाम राजवटीत असल्यानं माध्यमिक आणि उच्च शिक्षण उर्दूत असे. त्यामुळे गिरिरावांचं मराठी बरोबरच संस्कृत आणि उर्दू भाषेवर देखील प्रभुत्व होतं. गिरिरावांनी वकिलीची परीक्षा देऊन वकिलीची सनद मिळवली आणि गुलबर्गा सत्र कोर्टात वकिली सुरु केली. गिरिरावांचे लग्न सुभद्राबाई यांच्याशी झालं होतं. दाम्पत्याला १९०२ मध्ये पुत्ररत्न प्राप्ती झाली. त्याचं नाव बळवंत असं ठेवण्यात आलं. गिरिरावांनी गुलबर्गा सत्र कोर्टात १९९० ते १९१६ ही पंचवीस वर्ष वकिली केली. त्याकाळी मोजकेच हिंदू वकील असत. त्यात गिरिरावांचा एक अग्रेसर वकील म्हणून ख्याती होती.
मुलगा बळवंत गुलबर्ग्याच्या नूतन विद्यालयात शिकत होता. १९१६ मध्ये बळवंत ५ वी परीक्षा नूतन विद्यालय, गुलबर्गा येथून पास झाला. परंतु बळवंतच्या गुलबर्ग्यातल्या शिक्षणाने गिरिराव समाधानी नव्हते. बळवंतला पुण्यात शिक्षण मिळावे ही त्यांची इच्छा. त्याकाळी पुण्यात शिक्षणाचं वेगळच वातावरण होतं. न्यू इंग्लिश स्कूल, नूतन मराठी विद्यालय, हुजूरपागा अशा अनेक ख्यातनाम शाळा तर डेक्कन कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज, लॉ कॉलेज सारखी नावाजलेली महाविद्यालये होती. गिरिरावांनी बळवंतच्या शिक्षणासाठी पुण्यात स्थलांतराचा निर्णय घेतला. पंचवीस वर्षाची चांगली चालत असलेली गुलबर्ग्यातली वकिली सोडून पुण्यात छोटं मोठं काम करावं लागणार होतं. परंतु मुलाच्या भवित्तव्या पुढे गिरिरावांना तो त्याग गौण वाटला.
गिरिरावांनी ४० रुपये पगाराची एक नोकरी पुण्यात स्वीकारली आणि बळवंतचा पुण्यातल्या नूतन मराठी विद्यालयात दाखला घेतला. पुढे बळवंतने नूतन मराठी विद्यालयातून मॅट्रिक तर फर्ग्युसन कॉलेज मधून बी ए पूर्ण केले आणि पुण्याच्या लॉ कॉलेजातून अव्वल दर्जात वकिली पूर्ण करून गिरिरावांच्या त्यागाचे चीज केले. शिक्षण पूर्ण झाल्यावर बळवंतराव गुलबर्ग्यास वकिली करण्यासाठी परत गेले. निवृत्तीनंतर गिरिरावांनी मात्र आपल्या मूळ यावली गावी जाऊन शेती करणे पसंद केले. उतार वयात जिन्यावरून पडून एका पायाने ते कायमचे अधू झाले. १९४० च्या सुमारास वयाच्या सत्तराव्या वर्षी यावली येथे त्यांच्या राहत्या घरी गिरिराव अण्णांचे निधन झालं.
संत वाङ्मय आणि वक्तृत्व
घाटे घराण्याचे मूळ पुरुष, आदिनारायण महाराज हे एक पांडुरंग भक्त आणि संत होते. गिरिराव अण्णांना हा संत वाङ्मयाचा संपन्न वारसा मिळाला होता आणि त्याचा त्यांना अभिमान असे. त्यांचा संत वाङ्मय, प्राचीन मराठी वाङ्मय आणि विशेषतः संत तुकारामांच्या लिखाणावर खोलवर अभ्यास होता. गिरिरावांकडे उपजत वक्तृत्व शैली होती. याचा त्यांना त्यांच्या व्यवसायात तर उपयोग झालाच परंतु त्याचबरोबर ते तुकाराम महाराज आणि इतर संत वाङ्मयावर अस्खलित व्याख्याने देत.
त्या काळी प्रसिद्ध समाज सुधारक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी “वसंत व्याख्यान माला” या नावाने व्याख्यान शृंखला सुरु केली होती. या वार्षिक मोहोत्सवात अनेक विषयातील प्रतिष्ठित मान्यवर वक्ते आपली व्याखाने देत. नामदार गोखले, लोकमान्य टिळक, गोपाळ आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर, महादेव नामजोशी अशा दिग्गज विचारवंतांची भाषणे त्या काळी वसंत व्याख्यान मालेत होत असत.
या व्याख्यान मालेत सहसा एक प्रमुख वक्ता बोलत असे व नंतर त्याच विषयावर अनेक उपवक्ते भाषण करत. गिरिरावांनी अनेक वेळा या व्याख्यान मालेत उपनेता म्हणून व्याख्याने दिली होती. इतकंच नव्हे तर प्रमुख वक्ता म्हणून त्यांनी दिलेलं संत तुकारामांवरलं व्याख्यान खूपच प्रसिद्ध झालं. त्याकाळी बहुतांशी विचारवंत पुण्या मुंबईचे असत. परंतु गिरिरावांच्या भाषणाने गिरिराव आणि गुलबर्गा पुण्यातच नाही तर इतर मराठी प्रदशातही भरपूर गाजले.
गिरिराव अण्णा कार्तिकवारीला नित्याने पंढरपूरच्या दर्शनाला जात. त्याठिकाणी चालणारी अध्यात्मिक प्रवचने आवर्जून एकत. गिरिराव अण्णा स्वतः देखील पंढरपूर येथे तुकाराम महाराजांवर व्याख्यान देत. या मोहोत्सवानिमित्त गिरिराव अण्णांनी अनेक संत आणि वारकरी पंथातील विचारवंतांशी ओळख आणि भेटीगाठी होत असत. पंढरपूरमध्ये त्यांची ओळख धुंडामहाराज देगलूरकर यांच्याशी झाली. धुंडामहाराज गिरिरावांच्या वयाने बरेच लहान. गिरिरावांनी त्यांची ओळख आपले पुत्र बळवंतराव यांच्याशी करून दिली. धुंदमहाराजांचा घरोबा पुढे दोन पिढ्या कायम राहिला.
शिक्षण आणि साक्षरता
गुलबर्ग्यात वकिली करत असताना त्यांची मैत्री केशवराव कोरटकर आणि विठ्ठलराव देऊळगावकर या सहकारी वकीलांशी झाली. सामाजिक बांधिलकीची तिघांना जाण होती. शिक्षणाचा प्रसार करून मराठवाड्यात एक सक्षम पिढीची उभारणी करण्याचं स्वप्न तिघांचं होते. १९०८ मध्ये विठ्ठलराव देऊळगावकरांनी गुलबर्ग्यामध्ये नूतन विद्यालयाची तर केशवराव कोरटकरांनी हैद्राबादमध्ये विवेक वर्धिनी या शाळेची स्थापना केली. दोन्ही शाळांच्या उभारणीत गिरिरावांचे मोठे योगदान होते. गुलबर्ग्याच्या नूतन विद्यालयाच्या संस्थापकीय मंडळात ते होते व काही वर्ष संस्थेचे चिटणीस म्हणूनही काम करत होते.
वैचारिक प्रभाव
गिरिरावांचा श्रीकृष्ण नीलकंठ चाफेकर यांच्याशी जवळचे संबंध होते. गिरिराव पुण्यात असताना पुष्कळवेळा श्री नी चाफेकर यांच्याकडेच उतरत. श्री ना चाफेकर हे त्याकाळचे प्रसिद्ध कवी आणि मराठी नाटक आणि वाङ्मय समीक्षक होते. पुण्याच्या डेक्कन कॉलेज आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केले. प्रसिद्ध अभिनेते शंकर नीलकंठ चाफेकर यांचे ते धाकटे बंधू.
रामचंद्र दत्तात्रय रानडे हे गुरुदेव रानडे म्हणून प्रसिद्ध होते. तत्वज्ञानाचे प्राध्यापक आणि अध्यात्माचे मार्गदर्शक याकरता गुरुदेव रानडे प्रसिद्ध होते. गुरुदेव रानडे यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून काम केले व पुढे त्यांनी अलाहाबाद विद्यापीठात अनेक वर्षं तत्वज्ञान विद्यापीठाचे प्रमुख या नात्याने काम केले. गिरिराव अण्णांचे गुरुदेव रानड्यांशी चांगले संबंध होते. गुरुदेव रानडे वयाने गिरिराव अण्णांच्यापेक्षा बरेच लहान असले तरी गिरिरावांना गुरुदेव रानड्यांबद्दल नितांत आदर होता.
निजाम किंवा ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळण्याआधी समाजातील अशिक्षितता आणि चुकीच्या रूढी परंपरा यापासून मुक्ती मिळवणं आवश्यक आहे या विचाराचे ते होते. परंतु स्वातंत्र्यसाठी लढणाऱ्या बांधवांबद्दल त्यांना आपुलकी असे. निजाम सरकारने हैद्राबादेत राष्ट्रीय काँग्रेसवर बंदी आणली. त्यास पर्याय म्हणून हैद्राबाद येथे ‘महाराष्ट्र परिषद’ या नावाने संस्था सुरु करण्यात आली. या संस्थेचा मूळ हेतू सर्वश्रुत असल्याने त्यांच्या कार्यालयाला भाड्याने जागा मिळणे अवघड झाले होते. गिरिराव अण्णांची त्यावेळी हैद्राबादमध्ये रेसिडेन्सीवर जागा होती. ती त्यांनी महाराष्ट्र परिषदेला देऊ केली. आज ही साधी बाब वाटत असली तरी त्या काळी हे करण्याचं धाडस फार कमी लोकांत होतं.
गिरिरावांनी आपले पुत्र बळवंतरावांच्यातली हुशारी ओळखली होती. बळवंतरावांच्या शिक्षणासाठी गिरिरावांनी आपल्या वकिलीला तिलांजली दिली होती. बळवंतरावाना याची पूर्ण जाणीव होती. गिरिरावांच्या व्यक्तिमत्वाचा बळवंतरावावर मोठा प्रभाव होता. पुत्र बळवंतरावांनी पुढे जाऊन संत वाङ्मयाचा मार्ग जोपासला. एकनाथ संशोधन मंदिराची स्थापना केली. औरंगाबाद आणि यावली येथे शाळा उभारण्यात मोलाची कामगिरी बजावली. आपली सामाजिक बांधिलकी यथायोग्य पूर्ण केली. गिरिरावांचं अपूर्ण राहिलेलं कार्य पूर्ण केलं आणि वडिलांना खऱ्या अर्थी श्रद्धांजली वाहिली.
गिरीश घाटे
अण्णा साहेबांच्या वर्ष श्राद्धाला "न्यायमूर्ती बळवंत गिरीराव घाटे - स्मृतीगंध" या नावाने श्री प्रभाकर राव घाटे सह संपादित व एकनाथ संशोधन मंदिर प्रकाशित पुस्तिका छापली गेली. या पुस्तिकेतील संदर्भ या लेखात वापरले आहेत.