तिच्या बोलण्याचं ऐसं, काय सांगावं तंतर
मन मोहुनिया जाई, काय घालती मंतर
तीच बोलणं मधाळ, जशी सावनी बरसात
मोर नाचावा वनात, तस हसन गालात
तिच्या मोकळ्या केसात, सार चांदन गुंतत
बट वाऱ्यानं हालती, मन गुतत गुतत
तिच्या रूपाची उपमा, काय चांदाला देवावी
सारी नजर गोठती, आत कर्नात भिनती
तिच्या सौंदर्याची कळी, अशी मोर्च्यात फुलावी
जाती अंताची घोषणा, तिची मूठ वळावी
तीन चाकोरी मोडून नवा पायंडा पाडावा
मला सोबती घेऊन, जिर्ण पहाड फोडावा
~ लोकशाहीर शंतनू कांबळे
समतेच्या वाटेनं, तू खणकावत पैंजण यावं
तू यावं, तू यावं, बंधन तोडीत यावं
शेतात रानात, जिथं घामानं भिजली धरती
हिरव्या पिकांवरती, जिथं राघू हो डोलती
ऐसी या कष्टाची महती, गान कोकिळा बोलती
त्या सरीसरीतून, घाम-अत्तर लेवून यावं
तू यावं, तू यावं, बंधन तोडीत यावं
वाडे जातीपातीचे, ज्यात माणसं कोंडली
ऐसे जबरी विष, पिढी पिढी हो पोळली
हाडामासाची ही, कशी माणसं ना दिसली
भिंती जातीपातीच्या, तू तोडत फोडत यावं
तू यावं, तू यावं, बंधन तोडीत यावं
अन्यायाविरुद्ध, जिथं मुठी हो वळल्या
इवल्याशा या चिमण्या, जिथं घारीशी हो भिडल्या
त्या युद्धभूमीतून, रक्तचंदन लेवून यावं
तू यावं, तू यावं, बंधन तोडीत यावं
समतेच्या वाटेनं, तू खणकावत पैंजण यावं
तू यावं, तू यावं, बंधन तोडीत यावं
~ लोकशाहीर शंतनू कांबळे
सावु पेटती मशाल, सावु आग ती जलाल
सावु शोषितांची ढाल, सावु मुक्तिचं पाऊल
साद दिली पाखरांना, सारं रान धुंडाळुन
फडफडले ते पंख, झेपावल नवं गाणं
सावु वाघिण आमची, तिनं फोडली डरकाळली
थरथरल्या चाकोऱ्या, गड ढासळल बाई
सावु पेटती मशाल...
दुध ज्ञानाचे पाजले, गर्भ यातना सोसुन
येल मंडवाला जाई, ज्ञान चांदण पिऊन
हरणं चालली कळपात, कशी निर्भय तोऱ्यात
स्वाभिमानाची गं उब, आत्मभान पांघरुन
सावु पेटती मशाल...
घुसमट काळजाची, माझ्या आजही पदरी
कधी ढिली कधी जाम, माझ्या येसणीची दोरी
जरी मोकळा गं श्वास, माझ मन जायबंदी
झळकते गं वरुन, अंधारल आतमंदी
मुक्या माऊलीची साद, सावु घुंगाराचा नाद
सावु लावण्याचा साज, सावु झाकलेली लाज
सावु पेटती मशाल...
आता नको कोंडमारा, नको विषारी हा वारा
नको दासीपण आता, नको जुलमाचा पहारा
ज्योत लाविलीस सावु, वणवा मी पेटविण
तु जे शिल्प कोरलेस, ते मी बोलके करीन
सावु पेटती मशाल...
ज्योती क्रांतीबा जणांचा, तशी क्रांतीज्योत सावु
त्यांनी लावियेले रोप, आम्ही नभाला भिडवु
सावु क्रांतीची गं वेल, सावु समतेची चाहुल
सावु शोषितांची ढाल, सावु मुक्तीच पाऊल
सावु पेटती मशाल...
~ गायन: शीतल साठे
बुध्द कबीर भीमराव फुले या भूमीवर जन्मले
त्यांनी जनजीवन फुलविले ग,
शेजारीण सखये बाई
देवाच्या नावावर, जे करती छूमंतर
ते भरती आपुली घरं ग,
शेजारीण सखये बाई
देव अंगातला बडबडं, मान हालवून हात हात उडं
मागतो बकरं कोंबडं ग,
शेजारीण सखये बाई
देव अंगात आल्यावर, दारूगांजा हवा भरपूर
गंडे दोरे खर्च नंतर ग,
शेजारीण सखये बाई
सुखदेवची देतो जीवा, पोरं देतो मागशील तवा
मग नवरा कशाला हवा गं ,
शेजारीण सखये बाई
देव अंगात वागतो, जर शब्दाला जागतो
का भगत भीक मागतो ग,
शेजारीण सखये बाई
उपवासा नवसामुळं, ही बुध्दी मातीला मिळं
हे कसं तुला ना कळं ग,
शेजारीण सखये बाई
शेवटी सांगते ग आता, सोड साऱ्या भाकड कथा
भरडल्या जीवा किती व्यथा ग,
शेजारीण सखये बाई
त्या भीमरायानं दिला, एक जीवनमार्ग भला
पंचशीलच तारील तुला ग,
शेजारीण सखये बाई
मनी घेऊनी तू विश्वास, धर विज्ञानाची कास
प्रगतीचा मार्ग तुज खुला ग,
शेजारीण सखये बाई
~ शा. लक्ष्मण केदारे
बाई मी धरण, धरण, धरण बांधीते
माझं मरण, मरण, मरण कांडीते, न बाई मी धरण
झुंजमुंजु ग झालं, पीठ जात्यात आटलं
कणी कोंडा ग, कणी कोंडा ग
कोंडा मी रांधिते, न बाई मी धरण...
दिस कासऱ्याला आला
जीव माग घोटाळला
तान्हं लेकरू, माझं लेकरू,
पाटीखाली मी डालते, न बाई मी धरण...
काय सांगू उन्हाच्या झळा
घावाखाली फूटे शिळा
कळ दाटे पायी, कळ दाटे पायी
पाला मी बांधिते, न बाई मी धरण...
पेरापेरात साखर
त्यांचं पिकलं शिवार
घोटभर पाण्यासाठी, घोटभर पाण्यासाठी,
सारं रान धुंडाळीते, न बाई मी धरण...
येल मांडवाला चढे
माझ्या घामाचे ग आळे
माझ्या अंगणी, माझ्या अंगणी,
पाला-पांचोळा ग पडे, न बाई मी धरण...
माझं मरण, मरण, मरण कांडीते, न बाई मी धरण
~ दया पवार
माझी मैना गावाकड राहिली
माझ्या जिवाची होतीया काहिली
ओतीव बांधा, रंग गव्हाळा, कोर चंद्राची,
उदात्त गुणांची मोठया मनाची, सीता ती माझी रामाची
हसून बोलायची, मंद चालायची, सुगंध केतकी,
सतेज कांती घडीव पुतळी सोन्याची, नव्या नवतीची, काडी दवण्याची
रेखीव भुवया, कमान जणू इंद्रधनूची,
हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची, तशी ती माझी गरिबाची
मैना रत्नाची खाण,
मैना रत्नाची खाण, माझा जीव की प्राण, नसे सुखाला वाण,
तिच्या गुणांची छक्कड मी गायिली, माझ्या जिवाची...
अहो ह्या गरिबीनं ताटातूट केली आम्हा दोघांची
झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची
वेळ होती ती भल्या पहाटेची
बांधाबांध झाली भाकरतुकडयाची
घालवित निघाली मला माझी मैना चांदणी शुक्राची
गावदरीला येताच कळी कोमेजली तिच्या मनाची
शिकस्त केली मी तिला हसवण्याची
खैरात केली पत्रांची, वचनांची, दागिन्यानं मढवून काढायची
बोली केली शिंदेशाही तोडयाची,
आणि साज कोल्हापुरी, वज्रटीक गळ्यात माळ पुतळ्यांची
हे हे कानात गोखरं, पायात मासोळ्या,
दंडात इळा आणि नाकात नथ सर्जाची
परी उमलली नाही कळी तिच्या अंतरीची
आणि छातीवर दगड ठेवून वाट धरली मी मुंबईची
मैना खचली मनात,
मैना खचली मनात, ती हो रुसली डोळ्यात, नाही हसली गालात,
हात उंचावुनी उभी राहिली, माझ्या जिवाची...
अहो या मुंबईत गर्दी बेकारांची, आन त्यात भरती झाली माझी एकाची
मढयावर पडावी मूठभर माती तशी गत झाली आमची
ही मुंबई यंत्राची, तंत्राची, जगणारांची, मरणारांची,
शेंडीची, दाढीची, हडसनच्या गाडीची,
नायलॉनच्या आणि जॉर्जेटच्या तलम साडीची
बुटांच्या जोडीची, पुस्तकांच्या थडीची,
माडीवर माडी, हिरव्या माडीची पैदास इथं भलतीच चोरांची,
ऐतखाऊंची, शिरजोरांची, हरामखोरांची, भांडवलदारांची,
पोटासाठी पाट धरली होती मी कामाची,
पर्वा केली नाही उन्हाची थंडीची, पावसाची,
पाण्यानं भरलं खिसं माझं, वाण मला एका छत्रीची
त्याच दरम्यान उठली चळवळ संयुक्त महाराष्ट्राची
हे हे बेळगाव, कारवार, निपाणी, गोव्यासह एकभाषिक राज्याची
चकाकली संगीन अन्यायाची,
फौज उठली बिनीवरची, कामगारांची, शेतकऱ्यांची, मध्यमवर्गीयांची
उठला मराठी देश,
उठला मराठी देश, आला मैदानी त्वेष, वैरी करण्या नामशेष
गोळी डमडमची छातीवर साहिली, माझ्या जिवाची...
म्हणे अण्णाभाऊ साठे, घरं बुडाली गर्वाची,
मी-तूपणाची, जुलुमाची जबरीची तस्कराची,
निकुंबळीला कत्तल झाली इंद्रजिताची
चौदा चौकडयाचं राज्य रावणाचं, लंका जळाली त्याची
आन तीच गत झाली कलियुगामाजी मोरारजी देसायाची आणि स. का. पाटलाची
अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची
परळच्या प्रलयाची, लालबागच्या लढाईची, फाऊन्टनच्या चढाईची
झालं फाऊन्टनला जंग,
झालं फाऊन्टनला जंग, तिथं बांधुनी चंग, आला मर्दानी रंग,
धार रक्ताची मर्दानी वाहिली, माझ्या जिवाची...
महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची,
दाखविली रीत पाठ भिंतीला लावून लढायची
परी तगमग थांबली नाही माझ्या अंतरीची,
गांवाकडं मैना माझी, भेट नाही तिची
तीच गत झाली आहे या खंडित महाराष्ट्राची
बेळगाव, कारवार, डांग, उंबरगावावर मालकी दुजांची,
धोंड खंडणीची, कमाल दंडेलीची, चीड बेकीची, गरज एकीची
म्हणून विनवाणी आहे या महाराष्ट्राला शाहीराची
आता वळू नका,
आता वळू नका, रणी पळू नका, कुणी चळू नका
बिनी मारायची अजून राहिली, माझ्या जिवाची...
~ लोकशाहीर आण्णाभाऊ साठे
अरे सांगा आम्हाला बिर्ला, बाटा, टाटा, कुठं हाय हो
अरे सांगा धनाचा साठा न् आमचा वाटा कुठं हाय हो
घाम शेतात आमचा गळं
चोर आयातच घेऊन पळं
धन चोरांचा हा पळण्याचा, फाटा कुठं हाय हो
सांगा धनाचा साठा...
न्याय वेशीला टांगा सदा
माल त्याचा की आमचा वदा
अरे करा निवाडा आणा तराजू, काटा कुठं हाय हो
सांगा धनाचा साठा...
लोणी सारं तिकडं पळं
अरे इथं भुकेनं जीव हा जळं
अहो दुकानवाले दादा आमचा, आटा कुठं हाय हो
सांगा धनाचा साठा...
इथं मिठात शिजते तुरी
तिथं मुर्गी काटा सुरी
सांगा आम्हाला मुर्गी, कटलेट, काटा कुठं हाय हो
सांगा धनाचा साठा...
इथं बिऱ्हाड उघडयावरं
तिथं लुगडी लुगडयावरं
या दुबळीचं धुडकं फडकं, धाटा कुठं हाय हो
सांगा धनाचा साठा...
शोधा, सारे साठे चला
आज पाडा वाटे चला
अहो वामनदादा आमचा घुगरी, घाटा कुठं हाय हो
सांगा धनाचा साठा...
~ लोकशाहीर वामनदादा कर्डक