दासबोधातील तत्त्वज्ञान - प्रकरण २

२. माया

प्रारंभ

मागचे प्रकरण     

 

    श्रीरामदासस्वामींचा दासबोध हा एक अपूर्व ठांथ आहे. त्यामध्ये अंतर्भूत असणार्‍या अनेक विषयांमध्ये श्रीशंकराचार्यांचे अद्वैत तत्त्वज्ञान हा एक विषय आहे. साहजिकच मायेचेही विवेचन श्रीरामदासांनी तेथे केले आहे. ते मनोरंजक, उद्‍बोधक व कुतूहलजनक आहे.

    मायेचे विवरण करताना रामदासस्वामींनी अनेक गोष्टींना माया म्हटले आहे व मायेसाठी अनेक समानार्थी शब्द वापरले आहेत. तसेच त्यांनी एकच कल्पना विभिन्न स्थानी भिन्न शब्दात व पद्धतीने मांडली आहे. त्यामुळे त्यातील संगती चट्दिशी लक्षात येत नाही. म्हणून दासबोधात जेथे माया आणि मायिक हे शब्द आले आहेत, त्या सर्व स्थळांचा परामर्श घेऊन या मायेच्या विवरणाचा साकल्याने आणि सुसूत्रपणे विचार प्रस्तुत लेखात केलेला आहे व तो सोईसाठी तीन भागात विभागला आहे.

 

विभाग - १

 

माया या शब्दाचा वापर - माया हा शब्द रामदासस्वामी प्रायः वापरतात तरी त्यांनी कारणपरत्वे मूळमाया, महामाया, वैष्णवी माया, गुणमाया, गुणक्षोभिणीमाया, अविद्यामाया आणि दृश्यमाया असेही विशिष्ट शब्द वापरलेले आहेत. त्यांचा संक्षिप्त खुलासा येथेच करणे अनुचित होणार नाही. ही माया वैष्णवी म्हणजे विष्णूची अथवा परमात्म्याची आहे, तसेच ती विष्णूच्या मोहिनीईरूपाप्रमाणे मोहात पाडणारी आहे. निश्र्चळ असणार्‍या ब्रह्मात प्रथम जे चांचल्य निर्माण होते ती मूळमाया. मूळमाया म्हणजेच महामाया. मूळमायेत पंचभूते आणि सत्त्व, रज व तम हे तीन गुण सूक्ष्मरूपाने असतात. हे तीन गुण मूळमायेतून प्रकट झाले की तीच माया गुणक्षोभिणी माया किंवा गुणमाया या संज्ञेला पात्र होते. पुढे तीन गुण व पंचभूते यांच्या मिश्रणातून हे स्थूल विश्व दिसू लागते. जेव्हा माया विश्वरूपाने जडत्वात येते, म्हणजे इंद्रियगम्य अशा स्थूल दृश्य स्वरूपात येते तेव्हा ती अविद्यामाया (११.१.९) वा दृश्यमाया होते. एकाच स्त्रीला आई, मुलगी, बायको, सून, सासू इत्यादी संज्ञा कारणपरत्वे दिल्या जातात, त्याप्रमाणे माया जरी एकच आहे तरी तिला विशिष्ट कारणास्तव भिन्न भिन्न नावे दिलेली आहेत.

 

सत्य कळण्यासाठी मिथ्या पाहावे लागते - मायेचे विस्तृत वर्णन रामदासांनी केले आहे. त्याबाबतीत एक गोष्ट लक्षात घ्यावी :- अद्वैत वेदान्तात, 'अध्यारोपापवादाभ्यां निष्प्रपंचं प्रपञ्च्यते' ही विषय मांडण्याची पद्धती१ आहे. माया ही मुळातच मिथ्या आहे. तेव्हा मायेचे कितीही सविस्तर वर्णन केले असले तरी ते मिथ्याच ठरते. ज्याप्रमाणे एखादी घटना तपशीलवार उत्तम प्रकारे सांगावी आणि मग म्हणावे की, ते सर्व घडलेच नाही अथवा स्वप्नात घडले, त्याप्रमाणे मायेच्या वर्णनाचा प्रकार आहे. आणि खोट्या मायेचे हे वर्णन मात्र सत्य ब्रह्म कळण्यासाठी आहे हे लक्षात घ्यावे. ही गोष्ट लक्षात ठेऊनच मायेचे विवेचन पाहावयाचे आहे.

मायेविषयी मूलभूत गोष्टी - मायेचे विवेचन पाहाताना ज्या गोष्टी आपल्या स्मरणात हव्यात, त्या पुढीलप्रमाणे आहेत:- जे जे चंचलाकार आहे ते ते माया आहे (११.२.९). जगताचे अवडंबर हे मायेने निर्माण केलेले दृश्य आहे (८.१.४३). या दृश्य विश्वात जे काही निश्र्चळ, चंचल तसेच जड आहे ते सर्व मायेचा पसारा आहे (१२.३.८.). सगळया सृष्टीचे सूक्ष्म बीज मूळमायेत आहे (२०.२.२०). मूळमाया निश्र्चळ ब्रह्मात निर्माण होते; निश्र्चळ ब्रह्मातील चांचल्य अथवा चंचळ संकल्प म्हणजे मूळमाया आहे (१०.१०.५-७; १३.३.३; १५.७.२). ही 'माया दो दिसांची' (१५.८.३८) म्हणजे नाशवंत वा अशाश्वत आहे.

    माया हा स्त्रीलिंगी शब्द असल्याने स्त्रीची कल्पना येते. तरी या मायेला चित्त, चैतन्य यासारखी नपुंसकलिंगी नावे (१०.१०.३०) आणि २परमेश्वर, जगदीश, जगदात्मा, आत्मा, अंतरात्मा इत्यादी पुल्लिंगी नावेही दिली जातात (१०.१०.१६-१८), ही महत्त्वाची गोष्ट विसरू नये.

    माया ही असत्य (१०.१०.५५) अथवा मिथ्या (८.२.५३) आहे. तथापि ती नाहीशी करण्याचा कितीही प्रयत्‍न केला तरी ती ज्ञानावाचून नष्ट करता येत नाही (७.१.५९). मायेवर विचार केला की ती नाहीशी होते (६.८.३४) म्हणजे विचाराअंती मायेचा नाश आहे. विवेक करून मायेचा शोध घेतला तर ती नाहीशी होते (७.१.५६).

माया सांडून ब्रह्म पाहावयाचे आहे - मायेने ब्रह्म आच्छादलेले आहे. मायेला बाजूला सारून ब्रह्म निवडून घ्यावयाचे आहे. ज्याप्रमाणे पाण्यावरील शेवाळ बाजूस सारून पाणी घ्यावयाचे असते, त्याप्रमाणे माया सांडून ब्रह्माचा अनुभव घ्यावयाचा आहे (६.५.११-१२) म्हणजेच मायेचा त्याग करून शाश्वत असे परब्रह्म समजून घ्यावयाचे आहे (१४.९.१२,३०); कारण मायेला दूर करून जर तिच्या मुळाशी म्हणजे ब्रह्माकडे गेले तरच आपल्याला समाधान होणार आहे (२०.९.१३). याचे कारण असे आहे की आपण म्हणजे जीव, मुळात ब्रह्मरूपच आहोत (९.१०.३१).

ब्रह्मरूप आपण आहोत - आपले खरे स्वरूप ओळखणे म्हणजेच ज्ञान आहे (५.६.१-२). आपण ब्रह्म आहोत हेच खरे आपल्या स्वरूपाचे ज्ञान होय (५.६.१०). हे ब्रह्म निर्गुण आहे. कल्पनेच्याही पलीकडे असणार्‍या निरंजन ब्रह्माला विवेकाचे द्वारा ओळखावयाचे आहे (२०.१०.२४). विवेकाने निर्गुण ब्रह्माशी ऐक्यता होते (६.३.२१) आणि 'निर्गुणी जे अनन्यता । तेचि मुक्ति सायोज्यता ।' (११.१.४२) अशी वस्तुस्थिती आहे.

    आता, माया सांडण्यासाठी माया काय, हे कळले पाहिजे. या दृष्टीने मायेचे विवेचन आवश्यक ठरते. तेव्हा आता प्रथम मायिक व मायाजाळ या शब्दांच्या वापराचा निर्देश करून मग मायेचा तपशील दिला आहे.

मायिक - मायिक हा शब्द माया या शब्दापासून साधलेला आहे. मायेच्या टप्प्यात पडणारे, मायाजनित, नाशवंत, अशाश्वत, लबाडीचे, फसवे, खोटे, मिथ्या इत्यादी अनेक अर्थांनी त्या त्या संदर्भात मायिक हा शब्द रामदासांनी वापरलेला आहे. पंचभूतादि३ पदार्थ मायिक आहेत (७.३.१५,२९-३२). पंचभूतांची वार्ता मायिक आहे (१७.९.११). जे पांचभौतिक आहे ते मायिक आहे (१३.६.१७). स्थूळ देह इत्यादि तत्त्वे मायिक आहेत. सर्व चराचर मायिक आहे (६.४.१३). दृश्य जगाचा विचार मायिक आहे (६.४.१७). या जगातील अत्यंत विचाराचे बोलसुद्धा मायिक आहेत (६.१०.१८) व वक्तृत्व स्वभावतः मायिक आहे; त्याचा त्याग करावा (७.९.३). चंचळ असणारे हे सर्व मायिक आहे (१०.१०.४९). दृश्य हे मायिक आहे (६.९.३). दृश्याची उपाधी मायिक आहे (११.१.४४). माणसाचा भाव मायिक असू शकतो (३.१०.१४). असत शिष्य मायिक असतो (५.३.५३); तो मिथ्या मायिक बोलतो (५.३.९०). (शिल्पकाराने बनवलेले) पुतळे मुळासारखे दिसले तरी ते मायिक असतात (६.८.१५). आकाशात आभाळ फिरू लागले की, चंद्र पळतो असे जे वाटते ते मायिक आहे (८.३.४५). निश्र्चळ आणि चंचळ तत्त्वे एकच मानणे हे म्हणणे चंचळामधील मायिक स्थितीचे आहे (११.१.३२).

    आपण म्हणजे जीव हा कोणी स्वतंत्र तत्त्व नाही. म्हणून 'आपुली तो मायिक वार्ता' (६.१०.१३) आहे. 'आपला तो मायिक विचार' आहे (९.१०.१४; २०.४.२९) आणि अनुभव नसल्यास, शब्द१ ब्रह्म हेसुद्धा मायिक आहे (७.३.२४).

    जे मायिक आहे ते लयाला जाते (११.२.९; १२.३.११). जे जे मायिक आहे त्याचा विचाराने निरास करावा (१२.३.९). आणि स्वतःला ब्रह्माचा अनुभव आला, ज्ञानाने ब्रह्मजागृती झाली की मग स्वभावतःच काय मायिक आहे ते कळू लागते (७.४.१३).

    मायिक शब्दाच्या संदर्भात एक गोष्ट नोंदली पाहिजे:- मायेचे रूप मायिक आहे आणि माया ही मायिक आहे असे विधान रामदासस्वामी कधीकधी करतात. उदा- मायेचे अवघेचि जाणावे । रूप मायिक (१२.३.१०); माईक माया (३.१०.४९); तैसी माया भयानक । विचार पाहता मायिक (८.८.४४); चंचळ माया ते मायिक (११.१.३३); असो ऐसी माया मायिक । शाश्वत ते ब्रह्म येक (७.४.२६).

मायाजाळ - या जगात जीवामागे लागलेल्या गोष्टींना उद्देशून रामदासांनी 'मायाजाळ' हा रूपकात्मक शब्द वापरला आहे. विश्व हा मायेचा विस्तार आहे. त्यात जन्ममरणरूपी संसार व दुःखपरंपरा जीवाला सोडीत नाहीत. संसार ही एक वागुरा (जाळे) आहे; संसारच मायाजाळ (मायेचे जाळे) आहे; त्या मायाजाळात प्राणी गुरफटले जातात. जो संसारात येतो तो मायाजाळात गंउडाळला जातो (३.१०.३६). जे प्राणी मायाजाळात पडले आहेत ते संसारातील दुःखांनी दुःखी होतात (५.२.१३). दुःख भोगणारा प्राणी क्षणैक, मनात पस्तावतो आणि उदास होतो; पण तो मायेच्या पसार्‍यातून न सुटता पुनः लगेच मायाजाळाने गुरफटला जातो (३.४.४९). देहाला नाना प्रकाराचे विकार होतात; प्राणी सुखदुःखांत अडकतात; अशाप्रकारे ते मायाजाळात गुंडाळले किंवा गुरफटले जातात (३.१.५०). मायाजाळात सापडलेला प्राणी दुश्र्चित होतो (७.१.४९). त्याला परमार्थ समजत नाही. मग परमार्थबुद्धी विसरून जाणारा तो मूर्ख माणूस मायाजाळात भ्रमण करीत राहतो (१.१०.३३). या स्थितीत त्याला देव कोण हे कळत नाही, संतांचा विवेक उमजत नाही व मायेचे कौतुक समजत नाही; तो तेथेच बद्ध होऊन राहतो (५.७.१३).

    पण विवेकाने पाहिले तर मायाजाळ म्हणून खरे काही नाही आहे (२०.७.२५) हे कळून येते.

विवेकाची आवश्यकता - विश्व हे अष्टधा४ प्रकृतीचा म्हणजे मायेचा खेळ आहे. या प्रकृतीच्या अंती गेले तर निवांतपणे देवाचा निश्र्चय करता येतो (५.१०.३४). जेव्हा दृश्य प्रकृती व पंचभूतिक विश्व बाजूला होते व द्वैत लयाला जाते, तेव्हा खरे ज्ञान होते (५.६.३). म्हणून अष्टधा प्रकृतीचा निरास करून परब्रह्म जाणून घ्यावयाचे आहे: माया हा पूर्वपक्ष आहे (६.५.१६); अष्टधा प्रकृती हा पूर्वपक्ष आहे (१८.५.२९). खरे कळण्यासाठी पूर्वपक्ष दूर करावा लागतो (१३.८.३७). म्हणून पूर्वपक्ष असणार्‍या मायेचे खंडन करून (१४.८.४९), अलक्ष्य अशा ब्रह्मामध्ये लक्ष लावले पाहिजे (१८.५.२९).

    मायेचा पार दुस्तर आहे (१७.४.५). ब्रह्म हे इंद्रियगम्य नाही. म्हणून विवेकी लोक मायाब्रह्माचा विवेक करतात (६-५-९). ब्रह्म कसे आहे, मूळमाया४ कशी आहे, अष्टधा४ प्रकृती, शिव४ शक्ती, षड्गुणेश्वर४ गुणसाम्य४ म्हणजे काय (१७.४.७). अर्धनारीनटेश्वर४, प्रकृतिपुरूष४, गुणक्षोभिणी४, त्रिगुण५ इत्यादींचा विचार साधुपुरूष करतो (१७-४-८-९).

    प्रकृतीच्या म्हणजे मायेच्या पसार्‍याला काही अर्थ नाही, सर्व काही कर्ता देव आहे, हा विवेक हवा (१२-७-२८). सारासार विचाराने प्रकृतीचा म्हणजे मायेचा निरास होतो (१३-७-११-१२); विवेकाने प्रकृतीचा म्हणजे गुणमायेचा निरास करावयाचा आहे (९-६-५४)

    त्यासाठी 'मायोद्‍भवाचे लक्षण' (१-१-११) पाहावयास हवे. माया ओलांडून जाण्यास अध्यात्माचे श्रवण हाच मार्ग आहे (२०-९-१४). माया आणि ब्रह्म ओळखणे म्हणजेच अध्यात्माची ओळखण होय (७-१-५४). विवेकाने माया आणि ब्रह्म यांचे विवरण केले तर जन्ममरण चुकते (६-५-२५). माया व ब्रह्म यांचा विवेक करून, त्यांचे ज्ञान करून घेऊन 'आपणास आपण जाणावे' (९-४-२९), म्हणजे जन्ममरणातून सुटून (९-४-२९) स्वस्वरूपस्थिती म्हणजे सायुज्यमुक्तस्थिती प्राप्त होते.

    हे सर्व लक्षात घेऊन आता प्रथम सारासार वा नित्यानित्यविवेक आणि तदनुषंगाने संतसगती, सद्‍गुरू, इत्यादीचा संक्षिप्त ऊहापोह करून, मग आपले म्हणजे जीवाचे स्वरूप कसे आहे ते संक्षेपाने सांगून, नंतर ब्रह्माचा१ विचार थोडक्यात देऊन, मायेचे विस्तृत विवरण पुढे दिले आहे.

आपली सद्यःस्थिती व परमार्थाची आवश्यकता - सध्या आपण या जगात जन्मलो आहोत. जन्म हा दुःखाचे मूळ (३-५-५२), दुःखाचा अंकुर, शोकाचा सागर व भयाचा डोंगर आहे (३-१-१). जन्ममरणाचे चक्र म्हणजे संसार, संसारात दुःख आहे, संसार दुःखमूळ आहे (३-२-१). सुखासाठी६ आपण बाह्य विषयांकडे धावतो; पण 'विषयजनित जे जे सुख, तेथेचि होते परम दुःख' (३-१०-६५) अशी स्थिती आहे.

    याउलट परमार्थ सर्वांना विसावा देणारा आहे, परमार्थ हा संसारात तारक आहे (१-९-२०-२१). आणि 'सकळ सृष्टीचे बीज । मूळमायेत असे सहज । अवघे समजता सज्ज । परमार्थ होतो' (२०-३-१७). परमार्थ केल्याने, माया ही मिथ्या (लापणिका) (१-९-१६) असून, ती 'माया विवेके मावळे' (१-९-१४) हे कळून येते. परमार्थ केल्यावर मुख्य परमात्मा म्हणजे ब्रह्म अनुभवास येतो, त्यामुळे जन्माचे सार्थक होते (१.९.२४-२५).

    तेव्हा आपणास सुख हवे असल्यास, आपण प्रयत्‍नपर्वूक७ ब्रह्मा-विष्णू-महेश यांनाही निर्माण करणारा थोर देव ओळखून घेतला पाहिजे (६-१-१२).

संतसंगतीची महती - देव किंवा परमात्मा या जगात साधुसज्जनांच्या८ संगतीत शोधावयाचा आहे (६-९-१९) कारण 'मायातीत अनंताची । संत८ सोय सांगती' (१-५-१४). सत्संगाविना देवाधिदेवाची प्राप्ती होत नाही (५-१-२३). संतांचा संग धरल्याने सद्वस्तूचा म्हणजे ब्रह्माचा लाभ होतो (६-९-२०).

सदगुरूंची जरूरी - जो साधू आपल्याला परमार्थांचे मार्गदर्शन करतो, तो सद्‍गुरू. म्हणजे 'जो ब्रह्मज्ञान उपदेसी । अज्ञान अंधारे निरसी । जीवात्मया परमात्मयासी । ऐक्य करी' (५-२-९). सद्‍गुरू ब्रह्म आहे (१.४.२३-२९), त्याला माया स्पर्श करू शकत नाही (१-४-१); म्हणून मायेच्या आधारे सद्‍गुरूंचे वर्णन करता येईल असा विश्वास धरता येत नाही (१-१-४). मायेच्या बळावर सद्‍गुरूंचे९ वर्णन करता येत नाही कारण तेथे माया लाजते (१-४-५).

    सद्‍गुरूपदापुढे मायाजनित देवसामर्थ्य ते केवढे (५-३-४६) ? सदगुरूंच्या अभय-कराने अनावर असणारी माया ओसरते (१.४.९). सद्‍गुरूकृपेच्या बळाने मायेसहित ब्रह्मांड दृष्टीस येत नाही (५-३-४८). सद्‍गुरूंच्या कृपेने अपार संसार दुःखे संपतात आणि ईश्वर प्रगट होतो (५-१-४०). सद्‍गुरूविना आत्मज्ञान होतच नाहीई (५-१-१९-२१). म्हणून आत्मज्ञानाने प्राप्त होणारे मोक्षसुख ज्याला हवे असेल त्याने सद्‍गुरूला शरण जाणे आवश्यक आहे (५-१-४४).

सारासारविवेक - परमार्थ करावयाचा म्हणजे विवेक१० करण्यास शिकले पाहिजे. विवेक नसल्यास परमार्थ होत नाही (१२-४-७).

    या संसारात येऊन नित्यानित्यविवेक केला तर संसाराचे सार्थक होते (१७-१-२१). पंचभूतिक हे जड आहे; त्यात आत्मा व्यापक आहे, हे नित्यानित्य-विवेक केल्याने कळते (६-३-८). आत्मा तेवढा नित्य आहे, अन्य सर्व अनित्य आहे. जे नित्य म्हणजे शाश्वत आहे तेच सार आहे; त्याउलट जे अनित्य म्हणजे नाशवंत अथवा अशाश्वत आहे ते असार आहे (१४-९-५). या जगाच्या अवडंबरात सार व असार विवेकाने ओळखावयाचे आहे (१३-२-१). जे दृश्य प्रगट आहे ते असार आहे, तर त्यात गुप्त असणारा११ परमात्मा सार आहे (६-२-२१). चंचळ दृश्य नाशवंत आहे (१३-२-१८). जे नाशवंत आहे ते असार आहे व जे शाश्वत आहे ते सार आहे (१४-९-५). माया नाशवंत आहे. म्हणून ती असार आहे. ब्रह्म शाश्वत आहे, ते सार आहे (१३-२-१८; ६-३-२६). चंचळ आणि नाशवंत बाजूला सारून पाहिले तर शाश्वत, निश्र्चल असणारे ब्रह्म सार आहे हे कळते; फक्त परब्रह्म सार आहे. (१३-२-२७). अशा प्रकारे विवेकाने या असार जगतात जगदीश तेवढाच सार आहे (६-३-९) हे कळते. माया अनित्य व असार असून, परब्रह्म हे नित्य व सार आहे हे कळून येते.

आपले ज्ञान - नित्यानित्यविवेक करून मुख्य देवास जाणणे, आपले खरे स्वरूप आपण ओळखणे म्हणजे ज्ञान आहे. 'पाहावे आपणासी आपण । या नाव ज्ञान' (५-६-१-२) आहे.

    आपण म्हणजे मीपण आणि मीपण म्हणजे जीवपण; हे जीवपण अज्ञानामुळे आहे (७-२-२०). मायेअंती जीवपणाची भ्रांती होते. म्हणजे असे:- दोन गोष्टी मुख्य आहेत एक मुख्य परमेश्वर व दुसरी गोष्ट जगताच्या आकारात परिणत झालेली प्रकृती म्हणजे माया. मग हा तिसरा 'आपण' ( जीव) मध्ये कोण चोर आहे (४.९.११)? आपला आपण शोध घेतला तर 'आपला तो मायिक विचार' (९.१०.१४) असून आपण मायिक (मिथ्या) आहोत हे कळते (६-१०-१३). हा 'मी' मुळातच मिथ्या आहे (९-२-३७). मिथ्या असणार्‍या प्रकृतीमुळे ( मायेमुळे) 'मी' निर्माण होतो (९-२-३८). विवेकाच्याद्वारे पाहिले तर प्रकृतीचा निरास होतो व उरतो तो फक्त आत्मा अथवा ब्रह्म; मग आपण आहोत कुठे (४.९.१०)? विचाराने कळते की आपण (जीव) नाहीच (४-९-८); आपण मिथ्या आहो, देव खरा आहे (४-९-२२) हेच खरे.

    मीपण म्हणजे जीवपण कल्पिलेले आहे. आपला आपण शोध घेतला की, आपण मायिक आहोत हे कळून येते. मग मीपण म्हणून काही उरत नाही. सर्व तत्त्वांचा निरास केल्यावर उरते निर्गुणब्रह्म अथवा आत्मा; हा निर्गुण आत्मा आपण आहो (६-३-२३,२९-३०), ते निर्गुण ब्रह्मरूपच आपण आहोत (९-१०-३१).

    निर्गुण परमात्म्याला जाणणे म्हणजे ज्ञान (६-१-१९). आपण ब्रह्म आहोत हेच खरे आपल्या स्वरूपाचे ज्ञान होय (५-६-१०). आपणच ब्रह्म आहोत हे अनुभवाने कळते (९-१-२९). स्वरूपाच्या अनुभवानंतर प्रकृती व पुरूष या दोहोंचा निरास होतो, मग तेथे प्रकृतिजन्य ( मायाजन्य) मीपणाला स्वतंत्र अस्तित्व कसे असणार (९-२-३९)?

    सर्व तत्त्वांचे निरसन झाल्यावर, आपले खरे रूप अरूप आहे, ते स्वस्वरूप आहे (१२-२-३०) हे कळते. जे जे साकार आहे ते ते कल्पान्ती नष्ट होते; पण स्वरूप मात्र सर्वकाळ 'असतचि असते' (९-२-१). भगवंताचे (ब्रह्माचे) स्वतःचे रूप तीच स्वरूप होय (९-२-३) आणि ब्रह्माचे स्वरूप तेच आपले स्वरूप आहे.

ब्रह्म दृश्यापेक्षा वेगळे आहे - जे ब्रह्म आपण आहोत ते ब्रह्म दृश्यापेक्षा वेगळे आहे. पंचभूते आणि तीन गुण मिळून बनणार्‍या अष्टधा४ प्रकृतीलाच म्हणजे मायेलाच दृश्य हे नाव आहे (६-२-१४). पंचभूतिक दृश्य विश्व आकाराला आले आहे (६-२-८), ते दृष्टीला दिसते व मनाला भासते. जे जे आकाराला येते, ते ते नष्ट होऊन जाते (१८-८-१८). जे दृष्टीस दिसते व मनास भासते, ते सर्व कालांतराने नाश पावते (६-८-४७). म्हणून दृश्य हे विनाशी आहे (६-२-१५). सर्व दृश्य हे नाशवंत अथवा अशाश्वत आहे (६-९-२२).

    जे दृश्याच्या उपाधीपेक्षा वेगळे आहे, जेथे दृश्यमायेचे अस्तित्व नाही त्यालाच परब्रह्म म्हणतात (१७-१०-८). जेथे दृश्यभ्रम नाही ते विमल व निश्र्चळ परब्रह्म आहे (१३.७.१०). ते दृश्यभासाच्या अंती असणारे (४.९.१९), दृश्याच्या गलबल्यापेक्षा वेगळे असणारे (१८.८.१८) परब्रह्म आहे. अच्युत व अनंत परमात्मा दृश्यापेक्षा निराळा आहे (६.९.२२). दृश्याच्या आदि व अंती असणारे निर्गुण ब्रह्म शाश्वत आहे (६.२.८). निराकार आत्मा ( ब्रह्म) शाश्वत तसेच सत्य आहे (१३.६.११).

ब्रह्म मायेपेक्षा पृथक आहे - ही सृष्टी पंचभूतिक आहे (६.२.७). पाच भूतांपेक्षा वेगळे निर्गुण ब्रह्म आहे (१३.८.२९). विश्वात पंचभूतांचे मिश्रण आहे, पण त्यांतून आत्माराम१२ ( ब्रह्म) अलिप्त आहे (८.१.४२). सगळया सृष्टीचे सूक्ष्म बीज मूळमायेत आहे (२०.२.२०). ज्या अष्टधा प्रकृतीतून म्हणजे मूळमायेतून हे विश्व उत्पन्न होते, त्या 'अष्टधेचे जिनस नाना' (१७.१०.१४) आहेत; मूळमाया बहुजिनसी आहे (२०.३.१२). याउलट परब्रह्म हा मुख्य जिन्नस आहे; त्याला काहीच तुळणा नाही (२०.५.४).

    मूळमायेच्या पूर्वी, मूळमायेच्या मागे, निर्गुण ब्रह्म आहे (६.९.३२) म्हणजे सृष्टीपूर्वी ब्रह्म असते; म्हणून ब्रह्मात सृष्टी मुळीच असत नाही (६.६.१). तसेच मूळ ब्रह्मस्वरूपात माया नसते (८.३.५०). ब्रह्म हे१३ मायातीत आहे (१२.६.३); परमात्मा हा मायातीत विश्राम आहे (७.६.५९). ब्रह्म हे कल्पनेपलीकडे आहे; तेथे माया मळ नाही (१४.९.१४). परमात्मा । ब्रह्म केवळ (एक) आहे; त्याला मायेचा मळ नाही (९.३.२२). ब्रह्म हे शाश्वत आहे; तेथे माया१४ भ्रम नाही (७.३.४७).

ब्रह्म कसे आहे ? - दृश्यापेक्षा व मायेपेक्षा वेगळे असणारे ब्रह्म हे निराकार (४.१०.१), केवळ१५ निर्गुण (८.३.४४), अलिप्त (८.३.४३), निरवयव (८.३.४९), निश्र्चळ (१०.१०.१), एक विलक्षण प्रकारचे अचंचळ (१०.१०.५), मायातीत, अपरंपार, निर्मळ, शाश्वत (१२.६.१-३), अविकारी (१३.३.१), अविनाश निर्गुण (६.३.६) आहे. ब्रह्म हे कल्पनारहित आहे; त्याला अंत नाही म्हणून ते अनंत आहे (१९.५.२७). परब्रह्म निराभास आहे (९.६.३७) म्हणजे ते वेगळेपणाने अनुभवास येणारे नाही. ब्रह्म सर्वव्यापक आहे (१०.१०.३-४). अशा ब्रह्माचे ज्ञान झाले असता तात्काळ मायेचे भान उडते (७.१.६१).

माया कशी आहे ? - माया चंचळ आहे (८.३.४८). ती ईश्वराच्या संगतीत असते (७.५.५८). माया सगुण ( गुणांनी युक्त) आणि साकार आहे; ती सम्पूर्णपणे विकारी म्हणजे सतत बदलणारी आहे (७.१.५५). माया अनेक व अनेकरूपी आहे; विश्वाच्या रूपाने ती प्रगट होते (७.१.५७). माया बहुरूपी व बहुरंगी आहे म्हणजे बहुरूप्याप्रमाणे अनेक रंगरूपे धारण करून ती व्यक्त होते. या सृष्टीची रचना मायेमुळे होते (७.१.५८-५९). मूळमाया सूक्ष्म आहे (१७.३.१८).

    जसे आकाशात मुळात नसणारे आभाळ अथवा मळभ अकस्मात येते, तसे मायेमुळे ब्रह्माच्या ठिकाणी दृश्य विश्व दिसू लागते (८.३.३६). जसे आकाशात प्रचंड असे धुराचे डोंगर आभाळामध्ये दिसतात, तसे ही मायादेवी विश्वरूपी अवडंबर दाखविते (७.४.४०). ज्याप्रमाणे वायूमुळे दृश्य असणारी धूळ आकाशात उडते, त्याप्रमाणे मूळमायेमुळे दृश्य जग दिसू लागते (८.३.३४). या विश्वाच्या 'आदि-अंती एक देव आहे'; पण 'मध्येचि लाविली माव' (२.५.३९) आहे. विश्वाच्या 'मूळपासून सेवटवरी । अवघी मायेची भरोवरी' (१२.६.२३) आहे. सृष्टिभान हा मायेचा स्वभाव आहे (९.७.१३). या विश्वात 'माया आहे मायापणे । विस्तारली' (९.१०.२३) किंवा 'अवघी माया विस्तारली' (८.३.२१) आहे. दृष्टीला जे दृश्य दिसते आणि जो भास मनाला भासतो ते दोन्ही माया आहेत (७.१.५६). माया म्हणजे पंचभूतांचा विस्तार आहे (७.१.५५). मायेच्या विस्ताराला मर्यादा नाही (७.१.५७).

    स्थूल पंच महाभूतांना माया चेतविते (७.३.१५). विश्वातील नाम आणि रूप मायेमुळे आहे (८.३.२४). विश्वातील अनुभव आणि अनुभव घेणारा हे द्वैत मायेमुळे आहे (६.१०.३३). जगातील मंत्रमाळा, इत्यादि सर्व माया आहे (५.४.१०). संसारातील तारूण्य, वैभव, हावभाव, सोहाळे हे सर्व मायिक माया (फसवा देखावा, भ्रम) आहे (३.१०.४९).

माया म्हणजे आपली कल्पना आहे - आपली कल्पना ही मायाच आहे (७.१.५९). धातु, पाषाण, मृत्तिका इत्यादीमध्ये देव मानणे ही आपली कल्पना आहे; पण ते सगळे मायेच्या भ्रमाने तसे वाटते (६.६.४४-४६). बद्धपणा आणि मुक्तपणा या दोन्ही कल्पना आहेत; कल्पना खोटी असते. मृगजळाप्रमाणे किंवा गगनातील आभाळाप्रमाणे मुक्त-बद्ध या कल्पना मायामय आहेत; त्या खोट्या आहेत (७.३.६०-६१). म्हणून मुक्त आणि बद्ध हा विनोद आहे आणि तो मायेच्या गुणामुळे आहे (७.६.५६).

माया मोहिनी घालते - माया विष्णुस्वरूप आहे म्हणजे मोहिनीरूपातील विष्णूप्रमाणे ती मोहिनी घालते (७.१.५७). मायेमुळे मिथ्या असणारे दृश्य विश्व खरे वाटते, तर सत्य असणारे ब्रह्म खरे वाटत नाही; विचार केल्यावर कळते की ही मायाजनित भ्रमाची क्रिया आहे (७.१०.१). सत्य असणारे ब्रह्म आच्छादले जाते; जे मिथ्या आहे ते सत्य वाटते; पाहाता पाहाता असा विपरीत प्रकार घडतो; अशी मायेची करणी आहे (७.१०.५-६).

माया बाजीगरी आहे - मनुष्य जे कृत्रिम म्हणजे खर्‍यासारखे खोटे निर्माण करतो, त्याला बाजीगरी (जादूगिरी, गारूड) म्हणतात. भगवंतापासून जे कृत्रिम निर्माण होते त्याला माया म्हणतात. ही माया विचित्र आहे; ती अनेक प्रकार निर्माण करते (६.८.३३). माया ही १६बाजीगरी आहे; ती खर्‍यासारख्या दिसणार्‍या पण खोट्या अशा वस्तू दाखविते. माया दिसते खर्‍यासारखी; पण जाणते तिला खरी मानीत नाहीत (६.८.२४). ही माया अगदी खर्‍यासारखी दिसते; ती सतत दृष्टीस पडत असल्याने ती खोटी असूनही खर्‍यासारखी भासते. मायेला खरी म्हणावे तर ती नाश पावते. बरे, तिला मिथ्या म्हणावे तर ती प्रत्यक्ष दिसत असते. म्हणून माया खरी आहे व खोटी आहे असे म्हटले तर त्यावर मन विश्वास ठेवण्यास तयार होत नाही; परंतु ते बरोबर नाही. मायेचा विचार म्हणजे खोट्याचा विचार आहे. मायाजनित जे हे दृश्य दिसते ते केवळ स्वप्नाप्रमाणे आहे (६.८.३४-३६).

माया नाशवंत आहे - वरवर पाहिल्यास माया ही न भंगणारी व पूर्ण वाटते (७.१.५८); परंतु प्रत्यक्षात मात्र तसे नाही. माया क्षणभंगुर आहे (७.१.५६). माया१७ ही नाशवंत आहे; तिचा शेवट होतो (८.८.३७). कल्पांती माया नष्ट होते (८.८.३६). ' म्हणजे 'दिसेल तितके नासेल । उपजेल तितके मरेल । रचेल तितुके खचेल । रूप मायेचे' (१२.३.१२) असे आहे.

माया मिथ्या आहे - दासबोधाच्या चौदाव्या दशकाच्या दहाव्या समासात (१-२१ ओव्या) रामदासस्वामीनी अनेक दृष्टांत व उदाहरणे देऊन मायेविषयी सांगितले आहे. त्या सर्वांचा मथितार्थ असा आहे :- माया स्वप्नवत आहे (१४.१०.३). गगनातील गंधर्वनगराप्रमाणे माया आहे (१४.१०.४). माया सत्य वाटते; पण ती कायमची मिथ्या असते (१४.१०.१).

    माया ही मृगजळाप्रमाणे आहे (७.३.३६). माया अथवा प्रकृती ही लटिकी (९.२.३८) अथवा असत्य आहे (१०.१०.५५). शहाण्या विचारी माणसाला माया मिथ्या आहे (८.२.५३; २०.३.२३) हे कळून येते. सत्त्वगुणाच्या प्रकर्षाने माया मिथ्या आहे हे कळते (२.७.४२). जरी सर्व मायाच विस्तारली आहे तरी ती संपूर्णपणे नाहीच (८.३.२१). माया ही मुळातच नाही (६.१०.३३). 'माया असोनीच नाही' (८.८.४). माया ही 'नाथिलीच आहे' (८.३.४९).

    माया मिथ्या आहे हे कळल्यावर खरे म्हणजे तिचे दडपण जीवावर पडू नये; पण तसे होत नाही. मायेचे दडपण पडते आणि जीव आपल्या स्वस्वरूपातून खाली घसरतो; पण लटक्या (मिथ्या) मायेच्या या दडपणामुळे सत्य परब्रह्म सोडणे बरोबर नाही. ब्रह्म हे एकमेव सत्य आहे हा निश्र्चय झाल्यावर उगीचच इकडे तिकडे कशाला फिरावे (२०.३.२३-२४) ? ज्याला ब्रह्मसाक्षात्कार झाला आहे अशा साधूला मात्र त्याचे स्वरूपाशी अनुसंधान लागल्याने, जिकडे तिकडे परमात्माच दिसतो; त्याला ही माया कुठेच आढळत नाही (७.१०.२९)

    अशाप्रकारे मायेबद्दल सांगावे तितके थोडेच आहे (७.१.५७).

माया व ब्रह्म यांतील भेद - आतापर्यंतचे ब्रह्म व माया यांचे विवेचन पाहिल्यावर त्या दोन्होंतील फरक लक्षात येतोच. तथापि हा भेद अधिक सुस्पष्टपणे रामदासांनी अनेक स्थळी पुढीलप्रमाणे मांडला आहे : - ब्रह्म निर्गुण१८ असून अविनाशी आहे; माया सगुण असून नाशवंत आहे (६.३.६). परब्रह्म शाश्वत आहे, माया अशाश्वत आहे (६.८.४८; ७.२.२३;७.४.४१). माया चंचळ आहे, परब्रह्म निश्र्चल आहे (११.१.३; ८.३.४८). मूळमाया४ ही अपूर्ण, एकदेशी म्हणून पूर्ण व्यापक नाही गुणमाया४ सुद्धा पूर्ण व्यापक नाही; निर्गुंण ब्रह्म पूर्ण व्यापक आहे. (२०.१.१-१०). ब्रह्म हे निःशब्द आहे; माया शब्दयुक्त आहे (१८.५.२७) म्हणजे मायेमध्ये बोलणे होते; माया नसताना बोलता येत नाही. ब्रह्म आकाशाप्रमाणे आहे, तर माया ही वार्‍याप्रमाणे आहे (७.४.२४) (म्हणजे माया दिसते पण तिचे दर्शन होत नाही). माया दिसते पण ती नाश पावते; ब्रह्म दिसत नाही आणि ते कधीच नष्ट होत नाही (१४.१०.१). ब्रह्मवस्तु निरवयव म्हणजे अखंड आहे, पण तेथे माया अवयव दाखविते म्हणजे अवयव अथवा खंड पडल्याचा भास निर्माण करते (८.३.४९). गुणमाया सगळा खटाटोप करते पण त्यातील काहीही निर्गुण ब्रह्मस्वरूपात घडत नाही; तथापि स्वस्वरूपातच (म्हणजे ब्रह्मामध्येच) मायेची सर्व घडामोड चालू असते (८.३.५२).

    दृश्यात असणारे कोणतेच गुण ब्रह्मामध्ये नाहीत, तथापि साक्षित्व, चैतन्य१९ व सत्ता हे गुण माया उगाचच ब्रह्माच्या माथी मारते. म्हणजे मायेमुळे या गुणांचा आरोप ब्रह्मावर केला जातो. घट, मठ, इत्यादींमुळे एकच आकाश हे घटाकाश, मठाकाश व महदाकाश असे तीन प्रकारचे मानले जाते, त्याप्रमाणे माया खरी मानली म्हणजे ब्रह्मावर वरील तीन गुणांचा आरोप होतो. जोपर्यंत माया खरी वाटते तोपर्यंत ब्रह्म हे साक्षी होते (म्हणजे मी 'साक्षीपणाने पाहतो' असे ब्रह्म मानते व त्यामुळे द्वैत येते); पण माया आणि अविद्या यांचा निरास झाला की द्वैत उरत नाही म्हणजे ब्रह्माचे साक्षित्व उरत नाही. (७.५.८-१०).

    माया आणि ब्रह्म यांचा विवेक अधिक व्यवस्थित व्हावा म्हणून सहाव्या दशकाच्या संपूर्ण पाचव्या समासात रामदासस्वामी माया आणि ब्रह्म यांतील भेद पुढीलप्रमाणे सविस्तर सांगतात : ब्रह्म निर्गुण, निराकार आहे; माया सगुण, साकार आहे. ब्रह्माला पारावार (अन्त) नाही, मायेला मर्यादा / अन्त आहे. ब्रह्म निर्मळ, निश्र्चळ आहे; माया चंचळ, चपळ आहे. ब्रह्म केवळ निरूपाधिक आहे; माया उपाधिरूप आहे. माया दिसते, ब्रह्म दिसत नाही. माया भासते, ब्रह्म भासत नाही. माया नाश पावते, ब्रह्म कल्पान्तकाळीसुध्दा नष्ट होत नाही. माया रचते (निर्माण होते), ब्रह्म निर्माण होत नाही. माया खचते, ब्रह्म खचत नाही. अज्ञानी माणसाला माया आवडते, ब्रह्म मात्र आवडत नाही. माया उपजते, ब्रह्म उपजत नाही. माया मरते, ब्रह्म मरत नाही. धारणेने (बुद्धीने) माया धरता येते, पण ब्रह्म मात्र धरता येत नाही. माया फुटते, ब्रह्म फुटत नाही. माया तुटते, ब्रह्म तुटत नाही. माया विटते (विकार पावते), ब्रह्म विटत नाही, ब्रह्म अविनाशी आहे. माया विकारी आहे, ब्रह्म अविकारी आहे. माया सर्व काही करते, ब्रह्म काहीच करत नाही. माया नाना रूपे धारण करते, ब्रह्म हे अरूप आहे. माया पंचभूतात्मक व अनेक आहे. ब्रह्म शाश्वत

आणि एक आहे. माया लहान आहे, ब्रह्म थोर आहे. माया असार आहे, ब्रह्म सार आहे. मायेला अलीकडे व पलीकडे (अंत) म्हणजे स्थल मर्यादा आहे, ब्रह्माला नाही. विश्वात सगळी माया विस्तारली आहे; मायेमुळे ब्रह्मस्थिती आच्छादिली गेली आहे. ब्रह्म आकाशाप्रमाणे निर्मळ आहे, माया पृथ्वीप्रमाणे गढूळ (मलिन) आहे. ब्रह्म सूक्ष्म आहे, माया स्थूलरूपी आहे. ब्रह्म अप्रत्यक्ष (इंद्रियांना अगम्य) आहे, माया प्रत्यक्ष दिसते (इंद्रियगम्य आहे). ब्रह्म सम आहे, माया विषमरूपी आहे. माया लक्ष्य आहे, तर ब्रह्म अलक्ष्य आहे. माया साक्ष (पुराव्याने सिद्ध करण्यासारखी) आहे, तर ब्रह्म असाक्ष आहे. (माया ही तर्काच्या कक्षेत पडत असल्याने) मायेमध्ये पूर्वपक्ष व उत्तरपक्ष असे दोन पक्ष आहेत; ब्रह्मात मात्र तसले पक्ष नाहीत. माया पूर्वपक्ष ( अनेक आणि निरसन करण्यास योग्य) आहे, तर ब्रह्म सिद्धान्त ( एक अबाधित) आहे. माया अनित्य, असत आहे; ब्रह्म नित्य, सत आहे. ब्रह्माला कर्म नाही (म्हणजे ते कर्मरहित, निष्क्रिय आहे) व त्याला हेतू नाही; तर माया कर्म करणारी ( क्रियाशील) व हेतूने युक्त आहे. ब्रह्म अखंड घनदाट आहे; माया खंडित, पंचभूतिक व पोचट (पोकळ) आहे. ब्रह्म हे निरंतर ( अखंडपणे) पूर्ण (निघोट) आहे, तर माया जुनी, नाशवंत, अपूर्ण आहे. माया घडते (निर्माण होते, घडविली जाते), ब्रह्म घडत नाही. माया पडते (स्थानभ्रष्ट होते), ब्रह्म पडत नाही, माया बिघडते (बदलते, बाधित होते), ब्रह्म बिघडत नाही, ते जसेच्या तसे राहते. ब्रह्म कायमचे असते (असतच असते), तर माया निरास करताच नाहीशी होते. ब्रह्माला कल्पान्त ( प्रलय,नाश) नाही, मायेला कल्पान्त आहे. माया कठिण आहे, ब्रह्म कोमल आहे. माया लहान आहे, ब्रह्म विशाल आहे. माया नाश पावते, ब्रह्म सर्वकाळी असतेच. जसे बोलावे तशी ब्रह्म वस्तू नव्हे म्हणजे ब्रह्म बोलण्याच्या टप्प्यात येत नाही, तर जसे बोलावे तशी माया असते म्हणजे शब्दांनी मायेचे वर्णन करता येते, व तशी ती असते. काळ (नाश) ब्रह्मापर्यंत पोचत नाही,काळ मायेवर झडप घालतो. अनेक रंगरूपे निर्माण करणे हा मायेचा खेळ आहे (ब्रह्म तसे करीत नाही). माया भंगते वा मोडते, ब्रह्म अभंग आहे, ते जसेच्या तसे राहते. या जगात जितके चल व अचल (चेतन-अचेतन) दिसते आणि बदलत जाते ते सर्व माया आहे; तर (न बदलणारा) परमेश्वर ( ब्रह्म) चराचर विश्वाला आत बाहेर व्यापून आहे. सर्व उपाधीपेक्षा ( विश्वाच्या बंधनापेक्षा) वेगळा असा परमात्मा ( ब्रह्म) आहे (माया तशी नाही). जसे आकाशाचे प्रतिबिंब पाण्यात पडले तरी आकाश पाण्याला स्पर्श करीत नाही (म्हणजे आकाश अलिप्त असते) तद्वत ब्रह्म हे विश्व व्यापूनही अलिप्त असते (६-५.२-२४). असा ब्रह्म व माया यांमध्ये सर्व बाबतीत फार मोठा फरक आहे.

    अशाप्रकारे भाव आणि अभाव, सार व असार, जीव तथा शिव, माया आणि ब्रह्म यांचे यथायोग्य ज्ञान झाले की जन्म मरण संपते (९-४-२४) आणि आपण ब्रह्मरूप होतो.

तळटीपा

१.     तपशीलासाठी पहा : - याच ठांथातील चौदा ब्रह्मे व एक मुख्य ब्रह्म हा लेख.

२.    परमेश्वर इत्यादी शब्द रामदासस्वामी जसे माया सूचित करण्यास वापरतात, त्याचप्रमाणे निर्गुणब्रह्मासाठीही ते परमेश्वर (७-२-५०), निर्गुणदेव (६-२-२८), ईश्वर (१८-६-१३), आत्मा (६-३-१), परमात्मा (१०-१०-२) इत्यादी शब्द वापरतात. त्यामुळे संदर्भानुसार या शब्दांचा अर्थ घ्यावा लागतो.

३.    आकाश, वायू, तेज, जल व पृथ्वी ही पंचभूते होत.

४.    याचा खुलासा पुढे योग्य स्थळी येतो.

५.    सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण

६.    सुख हवे असेल तर रघुनाथाच्या भजनी लागले पाहिजे (३-१०-६३). आयुष्य हेचि रत्‍नपेटी । माजी भजनरत्‍ने गोमटी । ईश्वरी अर्पूनिया लुटी । आनंदाची करावी (३-१०-२७), असे रामदास सांगतात.

७.    ब्रह्मा विष्णु आणि हर । हे जयाचे अवतार । तोचि देव हा निर्धार । निश्र्चयेसी (८.१.२१), येक ब्रह्मा विष्णु महेश । ऐकोन म्हणती हे विशेष । गुणातीत जो जगदीश । तो पाहिला पाहिजे (१९.५.२०).

८.    कवीबद्दलही रामदास सांगतात की 'हे निरंजनाची खूण । की हे निर्गुणाची वोळखण। माया विलक्षणाचे लक्षण । ते हे कवी ।' (१-७-८). कवी म्हणजे क्रांतदर्शी त्र+षी, मुनी, सज्जन.

९.    तथापि सदगुरूचे वर्णन करण्याची तीका इच्छा असल्याने, मायायोगे मी सदगुरूमहिमा सांगेन (१-४-६) असे रामदास म्हणतात.

१०.    विवेकाच्या जोडीने वैराग्यही हवे. संसारातील दुःखामुळे वैराग्य उत्पन्न होते (५-३-३५). आणि 'विषयी वैराग्य उपजले । तयासीच पूर्ण ज्ञान झाले' (५-६-६१).

११.    दिसेल ते नासेल । आणि येईल ते जाईल । जे असतचि असेल । तेचि सार ॥ १३-२-२.

१२.    जीवशिव पिंडब्रह्मांड । मायेअविद्येचे बंड । हे सांगता असे उदंड । परी आत्मा तो वेगळा ॥ (८-७-४३). ब्रह्मालाच परमेश्वर, परमात्मा, आत्मा अशी नावे आहेत (७-२-५०). आत्म्यासाठी पहा - ८.७.४४-५४.

१३.    आधी दृश्य सोडिले । मग शून्यत्व वोलांडिले । मूळमायेपरते देखिले । परब्रह्म ॥ ८-१०-७०

१४.    भ्रम म्हणजे 'येक असता येक वाटे । येक सांगता येक निवटे । येक दिसता येक उठे । या नाव भ्रम' ॥ १०.६.२३.

१५.    देवपद आहे निर्गुण । ६.९.३२.

१६.    जो मनुष्य आंतरनिष्ठ म्हणजे आत्मनिष्ठ झाला आहे, त्यालाच माया ही बाजीगरीसारखी दिसते (१५.१०.३१)

१७.    अष्टधा प्रकृति संपूर्ण । नाशिवंत ॥ (१२-३-१९). अष्टधा प्रकृती म्हणजे माया.

१८.    सगुण व निर्गुण यांचा खुलासा असा : -चंचळपणे विकारले । सगुण ऐसे बोलिले । येर ते निर्गुण ऐसे बोलिले । येर ते अवघेचि जाले । मायेमध्ये (१६.९.१६)

१९. माया म्हणजेच अष्टधा प्रकृती, म्हणून देवाला (ब्रह्माला) येणारे साक्षित्व हे अष्टधा प्रकृतीमुळे आहे हे ओळखले पाहिजे (११-२-३५) असे रामदासस्वामी सांगतात.

 

 

विभाग - २

 

१) ब्रह्म व माया हा भेद कोण करते ? - ब्रह्म सत्य आहे, माया असत्य आहे. गुरूंनी जे ब्रह्म

सांगितले ते कळले, तथापि मायेचेही अनुसंधान लागलीले आहे. अंतःकरणात ब्रह्म प्रकाशत आहे, पण प्रत्यक्षात माया दिसत आहे. असे हे द्वैत दिसून येते. तेव्हा माया ब्रह्माचे हे द्वैत कोण करते व या द्वैताचे निरसन कसे करावयाचे (७.५.१-२) ? असा प्रश्न श्रोता करतो. त्यावर वक्ते रामदास सांगतात : माया व ब्रह्म या दोघांचेही ज्ञान होते आहे. ठीक आहे. येथे प्रश्न असा आहे:- माया आणि ब्रह्म यांना जाणणारा कोण आहे (७-५-३)? या प्रश्नाचे उत्तर 'मन' असे आहे. म्हणजे असे : मन संकल्प-विकल्प करते. मनाने केलेला ब्रह्माचा संकल्प (विचार) खरा असतो; पण मनाने केलेली मायेची कल्पना२० ही खोटी असते; तिला विकल्प म्हणतात. तेव्हा संकल्प-विकल्प, माया-ब्रह्म, हे द्वैत मन२१ करते (७.५.४). दृश्य हे माया आणि ब्रह्म हे मायातीत अशी कल्पना करून मन खुणेने माया व ब्रह्म या दोन्हीचे अस्तित्व मानते. पण ब्रह्म हे कल्पनारहित आहे हे ज्ञानी माणसे जाणतात. ब्रह्म हे मन व बुद्धी यांना अगोचर, कल्पनेच्या पलीकडे आहे. त्याचा अनुभव आला की द्वैत उरत नाही. जोपर्यंन्त द्वैताचा अनुभव येत असतो तोपर्यन्त ब्रह्माचा अनुभव येत नाही. आणि ब्रह्माचा औनभव२२ आला की द्वैत उरत नाही. द्वैत आणि अद्वैत या दोन्हीही मनाला भासणार्‍या कल्पना आहेत. कल्पना फार सामर्थ्यसंपन्न आहे; ही कल्पना ब्रह्म मायेची कल्पना करते. कल्पना मायेचे निवारण करते. तसेच ब्रह्माची स्थापनाही करते (७.५.१५-१८). खरे पाहिल्यास माया व ब्रह्म हे द्वैत नाहीच; ते मनाने कल्पिलेले आहे. आहे ते एकमेव निश्र्चळ ब्रह्म. ते ब्रह्म हेच आपले स्वरूप आहे.

(२) विश्वाचा कर्ता व मायेचा नियन्ता ईश्वर आहे काय ? - एक शंका अशी आहे:- ब्रह्म निर्गुण व निरवयव आहे. तेथे चराचर विश्व कसे दिसू लागते (८-२-१) ? म्हणजे असे:- देव ( ब्रह्म) जर निर्गुण आहे तर मग सृष्टीचा कर्ता कोण? निर्गुण ब्रह्मात कर्तृत्व नसल्याने ते कर्ता होऊ शकत नाही. तेव्हा सृष्टीचा कर्ता सगुण ईश्वर मानावयास हवा. कारण कर्तेपणा हा गुण आहे. पण देव जर सगुण मानला तर तो नाशवंत ठरतो (८-२-१७). बरे, 'मायोपाधि जगडंबर' (८-१-४३) असे म्हणून जर म्हटले की, माया स्वतंत्र आहे व ती हे विश्व रचते, तर हे म्हणणेही विपरीत ठरते. माया स्वतंत्र आहे, तिला कुणी केलेले नाही, ती स्वतःच विश्वरूपाने विस्तारते, असे मानले तर देवाला काहीच स्थान राहात नाही (८.२.१८.१९). आता, 'देव स्वतःसिद्ध निर्गुण आहे व त्याचा स्वतंत्र असणार्‍या मायेशी काही संबंध नाही, असे जर म्हटले तर ते (तुमच्या) अद्वैताला विरोधी होते (८-२-२०). कारण मग निर्गुण देव ( ब्रह्म) आणि माया अशी दोन स्वतंत्र तत्त्वे होतात. मग अद्वैत कुठले? बरे, सगळे कर्तेपण जर मायेकडे असेल तर मग अर्थ असा होतो की, भक्तांचा उद्धार करणारा कोणी देव नाही. आणि देवाशिवाय नुसती माया असेल व तिच्यावर सत्ता गाजविणारा कुणी देव नसेल तर मायेचा लय कोण करील? आम्हा भक्तांना कोण सांभाळील (८.२.२१-२२) ? म्हणून माया स्वतंत्र आहे असे म्हणणे बरोबर नाही. तेव्हा मायेला निर्माण करणारा व तिच्यावर स्वामित्व गाजविणारा एक ईश्वर मानावयास हवाच. तेव्हा तो ईश्वर कसा आहे व मायेचा विचार काय हे आम्हास कळावयास हवे (८.२.२३-२४).

    समाधान :- वरील शंकेचे समाधान करण्यापूर्वी, ईश्वर आणि माया यांच्या संदर्भात असणारी भिन्न मते रामदास प्रथम अशी देतात : (१) देवाच्या इच्छेने माया झाली. देवाला इच्छा झाली नसती तर माया निर्माण झाली नसती. (२) देव निर्गुण आहे; त्याला इच्छा नाही; म्हणून माया झाली नाही; ती मिथ्या आहे. (३) प्रत्यक्ष दिसणारी माया नाही कशी म्हणता येईल? (तेव्हा माया आहे आणि ती) माया ईश्वराची अनादि शक्ती आहे (४) जर माया खरी असती तर तिचा निरास ज्ञानाने कसा होईल? (ज्ञानाने मिथ्या वस्तूचा निरास होतो म्हणून) माया मिथ्याच आहे. (५) जर माया मिथ्या आहे तर मग तिच्या त्यागासाठी देवाने भक्ती हे साधन२३ का सांगितले आहे ? तसेच, मायेतून दूर होण्यास अनेक साधने सांगितली जातात; पण मायेला बाजूला सारता येत नाही. तेव्हा माया मिथ्या कशी? (६) योग, पुराणे इत्यादी मायेला मिथ्या म्हणतात; पण नुसते माया मिथ्या म्हटले की लगेच माया सुटत नाही. (७) अज्ञानी माणसाला मायेचे मिथ्या भान खरे वाटते. तेव्हा जो कोणी जसा निश्र्चय करतो तशी त्याला माया वाटते. (८) कुणी म्हणतात :- माया मुळीच नाही (८.२.२७-३८). असा बराच मतभेद (८-२-५२ पर्यंत) सांगून झाल्यावर, रामदास सांगू लागतात:- वरील शंकेत दोन भाग अपेक्षित आहेत; मिथ्या असणारी माया ब्रह्मात कशी झाली (८-२-५३) ? आणि विश्वाचा कर्ता कोण? या दोन प्रश्नांची उत्तरे पुढीलप्रमाणे आहेत : - निश्र्चळ ब्रह्माआत माया झाली (८-३-२७); तरी ब्रह्माचे मूळचे निर्गुणत्व तसेच राहाते. प्रथमपासून मूळ माया ब्रह्माआत नसते. ती निर्माण झाल्यावर जरी ती खरी वाटते तरी ती पुनः लय पावते (८.३.२९-३०). मूळ ब्रह्मस्वरूपात माया नाही; पण ती खरी आहे असे भासते (८-३-५०). ज्याप्रमाणे निश्र्चळ आकाशात वारा वाहतो, वारा आकाशात उत्पन्न होतो आणि तेथेच वाहतो, त्याप्रमाणे निश्र्चळ परब्रह्मात चंचळ माया निर्माण झाल्याचा भास होतो व माया निर्माण झाल्याचा भास हा भ्रम आहे (१०.१०.११) म्हणजेच माया हे अस्तित्वात असणारे असे स्वतंत्र तत्त्व नाही. माया मिथ्या आहे आणि माया स्वतःच मिथ्या असल्याने तिचा सर्व खेळ मिथ्या आहे. ज्याप्रमाणे माणसाच्या चंचळ नजरेला गगनातील आभाळात सेना दिसते; पण ती खोटी असते, त्याप्रमाणे मायेचा खेळ मिथ्या आहे (८.३.५३-५४).

    काहीजण म्हणतात की हे सर्व ब्रह्मांड माया निर्माण करते (१३-८-१९); पण वस्तुस्थिती अशी आहे:- मुळात विश्व झालेच नाही. (८-३-१). अद्वैतात द्वैत असत नाही (८-३-८). याचा खुलासा असा:- सर्वकर्त्या परमेश्वराने विश्वाचा विस्तार केला. मूळ परमात्मा अनंत शक्ती निर्माण करतो. अनंत शक्तीनी युक्त असतो तो मूळ पुरूष२४ म्हणजे मूळ माया, आणि सगळे कर्तेपण मूळमायेत असते (८.३.११-१४); पण ही माया मिथ्या आहे. विश्वात मायेचा विस्तार आहे; पण ती सर्वस्वी खरी नाही (८.३.२१). ब्रह्माच्या दृष्टीने पाहिल्यास हे विश्व लटके (मिथ्या) आहे. तेव्हा लटक्याचा कर्ता कोण हा प्रश्नच चूक आहे (१३.८.३१). वंध्यापुत्राचा बाप कोण अशासारखा हा प्रश्न आहे. विश्व हे स्वभावतः झाले (१३-८-११). ब्रह्मावर विश्वाची२५ कल्पना केली गेली. ब्रह्म विश्वरूपाने भासते.

मूळमाया कोठून आली व कोणी केली ?- निर्गुण अशा मूळ ब्रह्मात माया नव्हती.मग साहजिकच सकळ माया कोठून आली (८-१-५७) असा प्रश्न निर्माण होतो. म्हणून शिष्य गुरूंना विचारतो:- जर मुळात ब्रह्मामध्ये माया नव्हती, तर 'ब्रह्मी माया कैसी जाली' (८-१-५९) ? जर 'येक ब्रह्म निराकार । मुक्त अक्रिय निर्विकार' (८-२-४) आहे तर 'तेथे माया वोडंबर । कोठून जाली' (८-२-४) ? आणि जर ब्रह्म निराकार आहे, तर त्या 'निराकारी कैसी जाली मूळमाया' (८-३-२५) हा प्रश्न निर्माण होतोच.

    यावर 'मायोद्‍भवाचे शोधिले पाहिजे मूळ' (१०-८-२८) असे म्हणून रामदासस्वामी या प्रश्नाचे उत्तर असे देतात :- ब्रह्मा-विष्णू-महेश या तीन देवांनी मूळमाया निर्माण केलेली नाही; कारण हे तीन देव मूळ मायेच्या अलीकडचे२५ म्हणजे तिच्यानंतरचे आहेत. म्हणजे असे : - मूळ मायेतून२५ गुणक्षोभिणी माया उद्‍भूत होते व गुणक्षोभिणीपासून त्रिगुणात्मक असणारे ब्रह्मा, विष्णू व महेश हे तीन देव उत्पन्न होतात (१०.२.५-६) या तीन देवांखेरीज अन्य देवही मूळ माया निर्माण करू शकत नाहीत. कारण२५ त्या त्या देवांची रूपे ही मूळ मायेमुळेच आहेत. पाच भूतेही माया निर्माण करीत नाहीत; कारण माया ही स्वतःच सूक्ष्म अशा पाच भूतांनी बनलेली आहे. तसेच मायेने मायेला निर्माण केले असेही म्हणता येत नाही; कारण अद्वैत वेदान्तात मायेला निर्माण करणारी दुसरी माया मानलेली नाही (१०.२.१२-१३).

    अशाप्रकारे मायेचा अन्य कोणी उत्पादक नसल्याने असे म्हणावे लागते:- ब्रह्मापासून मूळमाया झाली (९-६-२६, १०.४.९). आधी एक नित्यमुक्त, क्रियारहित परब्रह्म होते; तेथे अव्याकृत (अस्पष्ट) व सूक्ष्म अशी मूळ माया झाली (८.२.३). अचंचळ अशा ब्रह्मांत चंचळ माया सूक्ष्म रूपात येते (१५.७.१). निराभास अशा ब्रह्मामध्ये मूळ मायेचा जन्म झाला (१०.३.१). दृष्टांत देऊन सांगावयाचे झाल्यास आकाशात ज्याप्रमाणे आभाळ येते व जाते त्याप्रमाणे ब्रह्मात मूळ माया उत्पन्न होते व लयास जाते (१७.२.७). आकाशात जसा वायू उत्पन्न होतो तशी मूळमाया ब्रह्मात होते (१०.९.१). निश्र्चळ आकाशात चंचळ वायू निर्माण होतो, त्याप्रमाणे परब्रह्मामध्ये मूळमाया निर्माण होते (८.३.२७). निराकार अशा आकाशात जसा वायूचा विकार होतो२६ म्हणजे वायूची झुळुक येते, त्याप्रमाणे ब्रह्मात मूळमाया येते (९-६-१)

    पण वरील म्हणण्याचा अर्थ असा नव्हे की, परब्रह्माने माया निर्माण केली. कारण परब्रह्माच्या ठिकाणी कर्तृत्व नाही. तसेच, मूळमाया खरी मानली तरच ब्रह्मामध्ये कर्तृत्व येईल; पण माया खरी नाहीच, ती मिथ्या आहे. त्यामुळे ब्रह्मात कसे बरे कर्तृत्व मानता येईल (१०.२.१३-१४) ? तेव्हा ब्रह्मामध्ये माया झाली याचा अर्थ इतकाच आहे की, सनातन असणार्‍या ब्रह्मात माया हे मिथ्याभान२७ विवर्तरूपाने भासू लागते (८.२.२)

मायेचा ब्रह्मावर परिणाम होतो काय ? - शंका अशी येते जर माया ब्रह्मातच२८ निर्माण होते व तेथेच तिचा खटाटोप चालतो, तर मायेचा ब्रह्मावर काही परिणाम होतो की नाही? समाधान :- या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे. माया आणि तिचा खटाटोप यातील काहीही ब्रह्मस्वरूपात घडत नाही (८-३-५२). म्हणजे माया व तिची क्रिया यांचा निर्गुण ब्रह्मावर काहीही परिणाम पडत नाही. ब्रह्म आहे तसेच निर्गुण, निराकार, निर्विकार, निश्र्चल व विमल राहते. दृष्टांताच्या द्वारा हे पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येते:- (१) आकाशात वायू निर्माण झाल्यामुळे जसा आकाशाच्या रूपाला धक्का लागत नाही, त्याप्रमाणे ब्रह्मात मूळमाया निर्माण झाली तरी निर्गुण ब्रह्म तसेच राहते (८.३.२८-२९) (२) आकाशात आभाळ (मळभट) आले. त्या आभाळामुळे आकाश निश्र्चळ नाही असे जरी भासते / वाटते, तरी तत्त्वतः आकाशाची निश्र्चळता मुळीच लोपत नाही; त्याप्रमाणे मायेमुळे निर्गुण ब्रह्म सगुण झाले असे भासते/ वाटते, तरी प्रत्यक्षात मात्र तसे काही घडत नाही; निर्गुण ब्रह्म आहे तसेच राहते. गगनात आभाळ झाले आणि गेले तरी त्याचा आकाशावर काहीही परिणाम होत नाही. आकाश आहे तसेच राहाते. त्याप्रमाणे माया आली आणि गेली (म्हणजे नष्ट झाली) तरी निर्गुण असणारे ब्रह्म सगुण होत नाही. ते आहे तसेच निर्गुण राहते (८.३.३७-३९).

    याप्रमाणे माया-ब्रह्माविषयीच्या काही शंकांचे निरसन झाले. आता जी मूळमाया ब्रह्मात निर्माण होते व विश्वोत्पत्ती हा जिचा खेळ आहे, त्या मूळ मायेचे स्वरूप काय, इत्यादि भाग आता पुढे दिला आहे.

मूळ माया म्हणजे काय ? - निश्र्चळ ब्रह्मात चंचळ निर्माण होते (१७.१.१). निश्र्चळ ब्रह्मात उद्‍भूत होणार्‍या या२९ चंचळाला मूळ माया३० म्हणतात (१०.१०.५-७). निश्र्चळ ब्रह्मात हे जे चलन ( हालचाल, चांचल्य) किंवा चंचळ झाले ते इच्छा, स्फूर्ती किंवा स्मरण या स्वरूपाचे असते (१०.१०.१२). वेगळया शब्दांत सांगायचे झाल्यास, निश्र्चळ ब्रह्मात चंचळ म्हणजे निश्र्चळ अशा ब्रह्मात स्वत:चे३१ स्मरण स्फुरले (१७.२.६). निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी 'अहं' ( मी) अशी स्फूर्ती ( स्फुरण) झाली (८-३-५१). आणि निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी 'अहं' अशी जी स्फूर्ती येते तीच माया (८-३-५१). निश्र्चळ ब्रह्मास अहंपणाने होणारी स्वतःची३२ जाणीव म्हणजे मूळ प्रकृती४ (१०.१०.१३). आणि मूळ प्रकृती म्हणजेच मूळ माया (१०.१०.१४). मूळ ब्रह्मात जे पहिले स्फुरण झाले तेच अंतरात्म्याचे म्हणजे मूळ मायेचे स्वरूप आहे (१६-७-४). निराकार ब्रह्मामध्ये स्फूर्तिरूप अहंकार उठला (४.१०.१). ब्रह्मात उठणारा स्फूर्तिरूप अहंकार ( मूळ माया) वायुस्वरूप आहे (४.१०.२) म्हणजे मूळ माया३३ वायुस्वरूप आहे. वायूत जाणीव असते. ही जाणीव म्हणजेच इच्छा (१०.४.१०) अर्थात ही इच्छा म्हणजे 'अहं बहु स्यां' ही इच्छा वा कल्पना किंवा संकल्प होय. म्हणजे आता असे म्हणता येते की, मूळ ब्रह्मात कल्पना आली (११.१.८-९), ब्रह्मात संकल्प उठला (१२.६-४). निश्र्चळ परब्रह्मात चंचळ संकल्प३४ निर्माण झाला (१३-३-३). हा संकल्प३५ ( जाणीव) म्हणजे मूळ माया (१५.७.२). मूळ माया३६ संकल्परूप आहे (२०.९.३३). मूळ माया ही मुळात अत्यंत सूक्ष्म कल्पना आहे (२०.२.१९).

    वरील भाग रामदासस्वामी निराळया शब्दांत असा सांगतात:- मूळ माया वायुस्वरूप आहे. वायूत जाणीव असते (१०-४-१०). म्हणून वायू आणि जाणीव या दोहोंच्या मेळाव्याला मूळ माया३७ म्हणावे (१०-९-५). ब्रह्माच्या निश्र्चळ स्वरूपातील चंचळ स्थिती म्हणजे वायू (१०-९-४). या वायूमध्ये जगज्योती३८ असते (१०-३-११,१३). म्हणून वायू, जाणीव किंवा जगज्योती यांच्या मेळाव्याला मूळ माया म्हणतात (१०.९-७)

    अशाप्रकारे, निश्र्चळ ब्रह्मात उठणारा चंचळ संकल्प वा कल्पना किंवा स्मरण अथवा स्फूर्ती/अहंकाररूप स्मरण अथवा इच्छा म्हणजेच मूळमाया आहे.

मूळमायेची अनेक नावे - निश्र्चळ वा अचंचळ ब्रह्मात चंचळ निर्माण होते, ते चंचळ म्हणजे माया. या चंचळाला किंवा मूळ मायेला अनेक नावे दिली जातात (१०.१०.५-७). मूळ मायेला शिवशक्ती असेही म्हणतात (१०.१०.७). या शिवशक्तीला अनंत नावे आहेत (५.४.२१). निश्र्चळ ब्रह्मातील चंचळ म्हणजे मूळ माया इंद्रियगम्य नाही.तथापि त्या चंचळाची थोडीफार कल्पना यावी म्हणून त्याला अनेक नांवे दिलीली आहेत (१०.१०.६). रामदास ही नावे अशी देतात:-

    निश्र्चळ ब्रह्मात निर्माण झालेल्या चंचळाला मूळ माया, मूळ प्रकृती, मूळ पुरूष३९, शिवशक्ती म्हणतात (१०.१०.७). मूळब्रह्मात जो चंचळ संकल्प उठला, त्याला अर्धनारीनटेश्वर४० म्हणतात. त्यालाच पड्गुणेश्वर४१ म्हणतात. त्यालाच सर्वेश्वर, सर्वज्ञ, साक्षी, द्रष्टा, ज्ञानघन, परेश, परमात्मा, जगज्जीवन, मूळ पुरूष अशी नावे देतात (१२.६.४-५). निश्र्चळ ब्रह्मातील चंचळ संकल्पाला आदिनारायण म्हणतात (१३.३.३). मुळात जो हरिसंकल्प आहे त्यालाच अर्धनारीनटेश्वर म्हणतात. षड्गुणेश्वर तोच आहे (२०.५.८)

    सर्व तत्त्वांत मुख्य तत्त्व असणार्‍या सत्त्वगुणाला (शुद्धसत्त्वगुणाला) अर्धमात्रा, महत्तत्त्व, मूळमाया म्हणतात (१२.५.११)

    निश्र्चळ ब्रह्मात जे चंचळ निर्माण होते तोच आत्मा४२. तो सर्वांच्यापेक्षा श्रेष्ठ असल्यामुळे त्याला परमात्मा म्हणतात. त्यालाच चैतन्य, साक्षी, षड्गुणेश्वर ही नावे आहेत. तो सर्व जगाचा स्वामी असल्याने त्याचे जगदीश्वर असे नाव आहे (१७.१.१-२). जगदीश्वर, मूळमाया यांनाच षड्गुणेश्वर४३ म्हणतात (१३.३.४.). मूळमाया अथवा मूळ पुरूष यानाच अनंतनामी जगदीश म्हणतात (८.३.२०). मूळमायेलाच पूरूष प्रकृती म्हणतात (१०.९.७.; २०.५.८). पुरूषप्रकृतीलाच शिवशक्ती असे नाव आहे. मूळमायेतील वायूला प्रकृती म्हणतात आणि जगज्ज्योती म्हणजे पुरूष. वायूमध्ये जी विशेष जाणीव आहे तोच प्रकृतीमधील पुरूष आहे. वायू म्हणजे शक्ती व जाणीव म्हणजे ईश्वर (शिव). त्यालाच अर्धनारीनटेश्वर म्हणतात (१०.९.८-१०). मूळ मायेला अर्धनारीनटेश्वर म्हणतात (२०.५.८).

लिंगानुसार नावांचे वर्गीकरण - मूळमायेला असणारी नावे तीनही लिंगात आहेत. लिंगानुसार ही नावे संक्षेपाने अशी सांगता येतील : - (१) स्त्रीलिंगी नावे:- मूळ माया, मूळ प्रकृती (१०.१०.७), गुणेश्वरी (१७.१.३) जगदीश्वरी, परमेश्वरी, विश्वेश्वरी, त्रैलोक्यजननी, जाणीवकळा, जगज्योती, जीवनकळा इत्यादि (१०.१०.२२-२६)

(२) नपुंसकलिंगी नावे:- अंतःकरण, चित्त, चैतन्य, जीवित इत्यादी (१०.१०.३०)

(३) पुइ१/४ंगी नांवे:- मूळ पुरूष (१०.१०.७), परमात्मा, परमेश्वर, परेश, ज्ञानधन, ईश्वर, जगदीश, जगदीश्वर, जगदात्मा, आत्मा, अंतरात्मा, विश्वात्मा, द्रष्टा, साक्षी, सर्वात्मा, क्षेत्रज्ञ, शिवात्मा, देही, कूटस्थ इत्यादि (१०.१०.१६-१८)

मूळ मायेची चौदा नावे - दासबोधाच्या विसाव्या दशकात सूक्ष्म मूळ मायेला चौदा नावे (२०.३.१३; २०.५.११) आहेत असे म्हटले आहे. ही चौदा नांवे पुढीलप्रमाणे दिली जातात : - (१) चैतन्य (२) गुणसाम्य (३) अर्धनारीनटेश्वर (४) प्रकृतिपुरूष (५) शिवशक्ती (६) षड्गुणेश्वर (७) माया (८) अंतरात्मा (९) अर्धमात्रा गुणक्षोभिणी४४ (१०) शुद्धसत्त्वगुण४४ (११) सत्त्व४४ (गुण) (१२) रज४४ (गुण) (१३) तम४४ (गुण) आणि (१४) मन (२०.५.६-१०, २०.९.२३-२९). इतक्या प्रकारांनी ज्ञानात्मा म्हणजे आदिसंकल्प अथवा हरिसंकल्प प्रत्ययास येतो (२०.५.१०) असे रामदास म्हणतात.

    या चौदा नावांपैकी चैतन्य, अर्धनारीनटेश्वर, शिवशक्ती, षड्गुणेश्वर, अंतरात्मा, माया, मूळ माया, शुद्ध सत्त्वगुण, अर्धमात्रा, गुणक्षोभिणी, प्रकृतिपुरूष ही नऊ नावे वर येऊन गेली आहेत. उरलेली गुणसाम्य, सत्त्व, रज, तम व मन४५ ही पाच नावे नवीन आहेत.

काही नावांचे अधिक स्पष्टीकरण - मूळ मायेचे स्वरूप अधिक स्पष्ट होण्यास वर दिलेल्या नावांतील काही नावांचे स्पष्टीकरण पाहाणे योग्य होईल. (१) आत्मा, अंतरात्मा:-जेथे चंचळपण४६ असते तेथे अंतरात्मा असतो (२०.६.९). अंतरात्म्याचा उल्लेख रामदास कधी आत्मा या नावानेही करतात. मुळात हरिसंकल्प आहे, तोच सर्वांचा आत्माराम होय (२०.५.६). आत्मा चंचळ आहे (१२.५.१५). जाणीव म्हणजेच अंतरात्मा. जेथे जाणीव असते तेथे अंतरात्मा असतो. ही जाणीव नाना ठिकाणी भिन्न प्रकारानी व्यक्त होते. प्रकृतिपुरूष, मूळ माया (२०.६.१७), आदिशक्ती, शिवशक्ती, मुख्य मूळ माया, सर्वशक्ती हे सर्व आत्म्याचे ( अंतरात्म्याचे) गुण आहेत (२०.६.२०) म्हणजे हे सर्व जाणीवेचे भिन्न प्रकार आहेत. मूळमायेत जाणीव आहे. मूळ मायेत अंतरात्मा आहे; त्याचा महिमा कळत नाही. (२०.८.१८). अंतरात्मा म्हणजेच सगुणदेव वा ईश्वर होय (१४.९.१३). ब्रह्मा-विष्णू-महेश या तीनही श्रेष्ठ देवांवर अंतरात्म्याची सत्ता आहे (१८.८.७-८). सृष्टीतील सर्व पदार्थाना, मंउगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांना चाळवणारा आत्मा आहे (१०.१०.३९). अंतरात्मा४७ ( परमात्मा) सर्वांच्या अंतःकरणात असतो (१०.१०.२७). (२) चैतन्य:-मूळ माया पदार्थाना चेतविते, चेतना देते; म्हणून तिला चैतन्य४८ म्हणतात (२०.२.२१). निश्र्चळ ब्रह्मात चंचळ झाले; ब्रह्मामध्ये चंचळ संकल्प उठला, म्हणजेच निश्र्चळ ब्रह्मात चैतन्य जागे झाले. म्हणून त्या संकल्पास चैतन्य म्हणतात (२०.५.५-७). हे चैतन्य जडाला चेतना देते (२०.९.२३). (३) अंतःकरण:-मूळ माया ही संकल्परूप४८ आहे; तेच४९ अंतःकरणाचे स्वरूप आहे (२०.९.२३). म्हणून मूळ मायेला अंतःकरण म्हटले आहे. (४) अर्धनारीनटेश्वर, षड्गुणेश्वर:-प्रकृती५० पुरूष, ५१शिवशक्ती या मिश्रणालाच षड्गुणेश्वर म्हणतात (२०.९.२६); त्यालाच अर्धनारीनटेश्वर म्हणतात (२०.३.१०). मूळ मायेत दोन तत्त्वे आहेत:- त्यातील एकाला प्रकृती वा शक्ती म्हणतात तर दुसर्‍याला पुरूष अथवा शिव म्हणतात. त्या दोन्हीच्या मिश्रणाला अर्धनारीनटेश्वर किंवा षड्गुणेश्वर म्हणतात आणि:- त्रिगुणाकरता जो ईश्वर । अर्धनारीनटेश्वर । सकळ सृष्टीचा विस्तार । तेथून जाला ॥ (१.३.१,२५) असे आहे. (५) जाणीवकळा:-मूळ मायेत जाणीव आहे म्हणून जाणीवकळा हे नाव; हाच खुलासा जगज्योती आणि जीवनकळा या नावांच्या बाबतीत आहे. (६) त्रैलोक्यजननी :- मूळ माया ही त्रैलौक्याच्या उत्पत्तीला जबाबदार आहे; म्हणून हे नाव, याच्या अनुषंगानेच जगदीश्वरी, विश्वेश्वरी, परमेश्वरी ही नावे आहेत. (७) मूळ प्रकृती (अष्टधाप्रकृती):- मूळ मायेला मूळ प्रकृती हे नाव आहे. कारण तीच विश्वाचे मूळ कारण आहे. या मूळमायेलाच अष्टधा प्रकृती हा पर्यायी शब्द रामदास वापरतात हे पुढील गोष्टींवरून स्पष्ट होते. पंचभूते आणि त्रिगुण यांचे मिश्रण असणारी मूळ माया ब्रह्मात निर्माण होते; तिलाच अष्टधाप्रकृती म्हणतात (१०.४.९). मूळ मायेतच अष्टधाप्रकृतीचा विचार येतो (१३.३.४; २०.२.२२). मूळ ब्रह्मात जी कल्पना आली ती मूळमाया; मुळात अष्टधा प्रकृती कल्पनारूप होती; पुढे तीच फोफावली (११.१.७,९). (८) सत्त्व, रज, तम, गुणसाम्य:- सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांचे मिश्रण (कर्दम) मूळमायेत असते (२०.३.९). मूळमायेतून पुढे हे तीन गुण प्रगट होतात; म्हणून ही तीन गुणांची नावे मूळमायेची नावे आहेत (२०.५.९). तसेच, ज्या अवस्थेत सत्त्व-रज-तम हे तीन गुण समान असतात, ती ५२गुणसाम्य अवस्था होय (२०.९.२४). मूळ मायेत गुप्त अथवा सूक्ष्म रूपाने असणारे गुण साम्यावस्थेत असतात म्हणून गुणसाम्य हे नाव मूळमायेला लावले जाते (२०.२.२५). ब्रह्मातला मूळ संकल्प म्हणजे मूळमाया; मूळ संकल्पात गुणांचे प्रमाण समान असते म्हणून त्यास गुणसाम्य म्हणतात (२०.५.७).

    मूळमायेत गूढ रूपाने असणार्‍या गुणांच्या साम्यास-गुणसाम्यास - संकेताने (खूण म्हणून) महत्तत्त्व म्हणतात (२०.२.२३). जेथे सत्त्व रज व तम हे तीन गुण मिश्रित व गूढ रूपात असतात, त्याला महत्तत्त्व म्हणतात (२०.३.९). जेथे तीन गुण गूढरूपाने असतात त्याला महत्तत्त्व म्हणतात; त्यालाच अर्धमात्रा, शुद्धसत्त्वगुण व गुणक्षोभिणी म्हणतात (२०.९.२७). या स्पष्टीकरणाने गुणेश्वरी या नावाचेही स्पष्टीकरण होते.

मूळमायेचे स्वरूप - मूळ परब्रह्मात जो पहिला मूळ-संकल्प उठला तो जाणीवरूप आहे; म्हणून मूळमाया५३ जाणीवरूप (१५.७.२; १०.१०.१५; ९.८.२६) वा जाणीवमय (२०.२.१९) आहे. मूळमायेतील जाणीवेला जरी अनेक नावे आहेत तरी मूळ जगज्ज्योती एकच आहे (१०.१०.३२).

    निश्र्चळ ब्रह्मात उठणारा स्फूर्तिरूप अहंकार हा वायुस्वरूप आहे (४.१०.१-२). म्हणजे मूळमाया वायुस्वरूप आहे (९.६.८; १०.३.२). वायू भासतो पण त्याचे रूप कळत नाही; त्याप्रमाणे माया भासते पण तिचे रूप कळत नाही (८.३.३१). खरे म्हटले तर वायु दाखविता येत नाही; वार्‍याकडे पाहिले तर केवळ धूळच दिसते; त्याप्रमाणे मूळ माया भासते५४ पण दिसत नाही (८.३.३२-३३). कारण मूळमाया५५ सूक्ष्म आहे (१०.३.१८).

    स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण असे पिंडात चार तसेच ब्रह्मांडात चार मिळून५६ आठ देह५७ आहेत (८.७.४०-४१). ब्रह्मांडात ईश्वराला चार देह आहेत (१०.१०.१५). मूळमाया म्हणजे ब्रह्मांडातील चौथा देह (१७.३.२०) म्हणजे५८ महाकारण देह आहे (२०.३.१२). म्हणजे सर्व देहांत आठवा देह मूळमाया आहे (११.४.११; १३.२.१९). अशाप्रकारे मूळप्रकृती म्हणजे मूळमाया हा ब्रह्मांडातील महाकारण देह आहे (१०.१०.१३).

    मूळमायेत आदिशक्ती, शिवशक्ती इत्यादी सर्व शक्ती असतात (१७.२.९). मूळ पुरूष ( मूळ माया) अनंत शक्ती निर्माण करतो (८.३.१३). सगळया सृष्टीचे सूक्ष्म बीज मूळमायेत आहे (२०.२.२०)

    शारदेची स्तुती करताना रामदास तिला 'माया' (१.३.१३), 'वैष्णवी माया' (मोहात पाडणारी माया) (१.३.२३) अथवा 'महामाया' (१.३.१) म्हणतात व तिचे वर्णन करताना ते सांगतात. (शारदारूपी) मूळमाया अनंत ब्रह्मांडे निर्माण करते व नष्ट करते (१.३.१५; १.३.६). ती अनंत ब्रह्मांडांना झाकणारी म्हणजे आपल्या पोटात सामावून घेणारी आहे. आलंकारिक भाषेत सांगायचे झाल्यास, आपल्याला कल्पना येणार नाही अशा विलक्षणपणाने पसरत जाणारी वेल म्हणजे माया आहे; तिच्यावर फुलांच्या रूपात अनंत ब्रह्मांडे लगडलेली असतात (७.१.१०). ती ब्रह्मदेव इत्यादि देवांची जननी आहे (१.३.१५). ती दृश्यरूपाने भासमान होते. (१.३.२४)

    मायेवाचून भजन व भक्तिभाव यांना स्थान नाही (१.३.२५); कारण मायेमुळे द्वैत आहे. माया ही द्वैताची जननी असून ती स्वतः मात्र अद्वैताची खाणी आहे (७.१.९); कारण ती परब्रह्मापासून कधीच वेगळी असत नाही. (शारदारूपी) मूळमाया ही मूळ पुरूषाची कन्यारूपाने जननी आहे (७.१.१०). म्हणजे असे:-ती मूळपुरूषापासून म्हणजे परब्रह्मापासून जन्म घेते म्हणून ती त्याची कन्या आहे; नंतर ती ब्रह्माला साक्षी बनविते म्हणून ती त्याची माता होय.

    मूळमाया ही नाना कल्पनारूप आहे; तिची अनेक सूक्ष्म रूपे आहेत; ती सूक्ष्म असून मिश्रणरूप आहे (२०.५.४-५). मूळमायेत पाच भूते आणि तीन गुण एकमेकात मिसळलेले आहेत. मुळात म्हणजे मूळमायेत तीन गुण व पाच भूते यांचे मिश्रण आहे; तेथे ते सूक्ष्म आणि एकरूप आहेत (९.६.१४-१५). मूळमायेमध्ये तीन गुण व पाच भूते कशी याचे स्पष्टीकरण असे:- निश्र्चळ ब्रह्मात स्वतःचे स्मरण स्फुरले; ते चित्स्वरूप-चैतन्य-आहे अशी कल्पना केली गेली; त्या स्मरणात गुणांचा समतोल असल्याने तेथे गुणसाम्य असते. (१७.२.६). तसेच, मूळमाया ही वायुस्वरूप आहे (९.६.८). हा वायू म्हणजे मूळमाया पंचभूतांनी युक्त असतो (८.४.४१). म्हणून मूळमाया ही पंचभूतिक (पाच भूतांनी युक्त) आहे. (८.३.५८,६०;८.४.७). अशी ही मूळ माया आहे.

तळटीपा

२०.     तथापि माया कल्पनेसी दिसे । ८.८.४७

२१.    एकीकडे ब्रह्माचे ज्ञान व दुसरीकडे मायेचे सुद्धा ज्ञान असणारी तुर्या अवस्था आहे. तुर्या ही अवस्था ब्रह्म व माया दोन्ही जाणते. म्हणून तिला सर्वसाक्षिणी अवस्था म्हटले जाते (७.५.५; ७.४.४९).

२२.    ज्या ज्ञानात वृत्तीला स्थान नाही ते खरे ब्रह्मज्ञान; ते पूर्ण समाधान देते; ते ज्ञान झाले की ब्रह्म व माया यांचे चिंतनच संपते (७.५.१४).

२३.    भगवान कृष्ण सांगतात : दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया । मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते ॥ भगवद्‍गीता ७.१४.

२४.    गुरूलिंगगीतेत (१.६१) श्रीनिंबरगीकर महाराज सांगतात:- विश्वाच्या उत्पतीला कर्ता असा कोणीच नाही; परंतु ती हरीच्या ठिकाणी कल्पनेने निर्माण झाली आहे.

२५.    पुढे विश्वोत्पत्तीचा भाग पहा.

२६.    ऐसी आत्मस्थिती संचली । तेथे माया कैसी जाली । जैसी आकाशी वाहिली । झुळूक वायूची ॥ ६.३.१२

२७.    विवर्त:- स्वतःच्या स्वरूपाचा त्याग न करता जेव्हा त्या वस्तूची वेगळया स्वरूपात मिथ्याप्रतीति (मिथ्याभान) येते तेव्हा तेथे विवर्तभाव असतो. उदा.रज्जूवर होणार्‍या सर्पाच्या भानामध्ये रज्जू ही स्वतःच्या स्वरूपाचा त्याग न करता सर्पाकाराने मिथ्या भासते.

२८.    भ.स.श्री. राम गोविंद केळकर ऊर्फ श्रीदासराममहाराज आपल्या एका अभंगात म्हणतात- ब्रह्मावरी झाली माया ।

२९.    तुझी माया हे चंचळ । करी विश्वाचा खेळ ॥; चंचळ ते माया निश्र्चळ ते ब्रह्म (श्रीदासराममहाराज).

३०.    मूळमायेच्या आत्मा, मूळप्रकृती, इत्यादी नावांसाठी पुढे पहा.

३१.    हे स्मरण म्हणजे मूळमाया आहे. मूळमायेपासूनच सर्व देवतांची उत्पत्ती आहे. म्हणून रामदास संआगतात:- हे स्मरण सर्व देवतांचे मूळ आहे; या स्मरणाचे अंश म्हणजे नाना देवता आहेत (१९.५.५)

३२.    अहं बहु स्यां । (मी पुष्कळ व्हावे) अशी अहंपणाने ब्रह्माला इच्छा झाली. ही मूळप्रकृती ( मूळमाया) ब्रह्मांडाचा महाकारण देह आहे (१०.१०.३)

३३.    चंचळता झाली वायुरूप माया । श्रीदासराममहाराज.

३४.    पहा:- मूळसंकल्प तो हरिसंकल्प (२०.४.१९); मूळमायेचे सेवटी । हरिसंकल्प मुळी

 

उठी (१७.३.२५); मग त्या पलीकडे जाण । निखळ ब्रह्म निर्गुण (१७.३.२६); हरिसंकल्प मुळी होता (१८.४.२८). मग या मूळ हरिसंकल्पाप्रमाणेच मूळमायेचा खटाटोप चालतो (२०.४.१९)

३५.    तेथेच षड्गुणेश्वर ईश्वराची ओळख घडते; त्यालाच प्रकृतिपुरूष, शिवशक्ती, अर्धनारीनटेश्वर अशी नावे आहेत (१५.७.२-३)

३६.    मुळीच्या संकल्पाचा आरोप । मूळमाया । (२०.५.५)

३७.    मूळमाया हा शब्द स्त्रीलिंगी आहे; म्हणून स्त्रीची कल्पना येते; पण वायू ही कल्पना मुख्य आहे:- जसे सरिता हा स्त्रीलिंगी शब्द असल्याने स्त्रीची कल्पना येते; पण सरिता म्हणजे स्त्री नसून पाणीच आहे. तसे मूळमायेच्या बाबतीत जाणावे (१०.९.६)

३८.    मूळमायारूप वायूतील जाणीव हा जगज्योतीचा मूळ झरा होय (१०.९.५). जगज्जोतीचा खुलासा पुढे येतो.

३९.    मूळपुरूष मूळमाया (८.३.१४,२३)

४०.    निर्गुण ब्रह्मामध्ये जो (संकल्परूप) गुणविकार उत्पन्न झाला तोच पड्गुणेश्वर, तोच अर्धनारीनटेश्वर (१७.२.८)

४१.    शिवशक्ती व प्रकृतिपुरूष यांचा विचारही तोच आहे (२०.५.८)

४२.    अविद्या जड आत्मा चंचळ (१३.७.६); ब्रह्म निराकार निश्र्चळ । आत्म्यास विकार चंचळ (१८.८.१)

४३.    अष्टधा प्रकृतीचा विचार तेथेच आहे (१३.३.४)

४४.    शुद्ध सत्त्वगुणाची कल्पना, अर्धमात्रा गुणक्षोभिणी, तिच्यातून पुढे प्रकट होणारे सत्त्व-रज-तम हे तीन गुण ही मूळमायेचीच नावे आहेत (२०.५.९)

४५.    मन म्हणजे चित्त असे घेतल्यास, चित्त हे नाव मागे येऊन गेले आहे.

४६.    जड अनात्मा चेतवी आत्मा । सर्वी वर्ते सर्वात्मा । अवघा मिळोन चंचळात्मा । निश्र्चळ नव्हे॥ १३.७.९.

४७.    अंतरात्म्याचे हे स्पष्टीकरण विश्वात्मा, सर्वात्मा, जगदात्मा, जगदीश, ईश्वर, परमेश्वर इत्यादींच्या बाबतींतही समान आहे.

४८.    चैतन्य, संकल्प, अंतःकरण देहातही असतात (२०.९.२३). पिंडातही मन, माया, अर्धनारीनटेश्वर, इत्यादि आहेत (२०.९.२५,२९).

४९.    अंतःकरणाचे स्पष्टीकरण मन व चित्त यांनाही लागू पडेल.

५०.    पुरूषैच्छेमध्ये प्रकृती । प्रकृतीमध्ये पुरूषव्यक्ती । प्रकृति पुरूष बोलती । येणे न्याये ॥ १६.७.४०.

५१.    तसेच :- मूळी शिवशक्ती खरे । पुढे जाली वधूवरे । चौर्‍यांशी लक्ष विस्तारे । विस्तारली जी ॥ १७.२.३३.

५२.    समान गुण गुणसाम्य (२०.९.२४); सूक्ष्मरूपे गुणसौम्य । त्यास बोलिजे गुणसाम्य (२०.३.११)

५३.    वासना जाणीजे जाणीव हेत । जाणीव मुळीचा मूळतंत । मूळमायेत असे निश्र्चित। कारणरूपे ॥ ९.८.१३.

५४.    जेव्हा अविद्या-माया विस्तारते (८.३.३२-३३), तेव्हा ती दृश्यरूपाने (सृष्टिरूपाने) जडत्वात येते (११.१.९).

५५.    मूळमाया*प्रकृतिपुरूष सूक्ष्म आहेत (१७.३.१८).

५६.    आठ देहांसाठी पहा:- ९.५.४. या आठ देहांत प्रकृती व पुरूष हे दोन मिसळले तर एकूण दहा देह होतात (८.४.४१).

५७.    देहापेक्षा साक्षी आत्मा वेगळा असतो (८.७.४२). पिंडामध्ये जीव हा देह धारण करणारा आहे तर ब्रह्मांडात शिव हा देह धारण करणारा आहे (१३.१.२४).

५८.    तैसेचि ब्रह्मांडेविण काही । मूळमायेसी जाणीव नाही । ९.७.२.

 

 

 

 

विभाग - ३

 

विश्वोत्पत्ती व विश्वसंहार - मूळमाया ही विश्वोत्पत्तीचे आणि तदनुषंगाने विश्वनाशाचे मूळ कारण आहे. म्हणून आता विश्वाची उत्पत्ती व प्रलय यांचा विचारही आवश्यक ठरतो. तो पुढे दिला आहे.

विश्वोत्पत्तीपूर्वी :- निर्गुण, निश्र्चळ, ब्रह्म हे एकमेव सत्य आहे. ब्रह्मात मुळात माया नव्हती (८.३.५०). मायाच नसल्याने तेथे सृष्टीही नव्हती (६.६.१.). चंचळ मूळमाया निर्माण होण्यापूर्वी ब्रह्म निश्र्चलपणे असते (२०.२.१). नंतर निश्र्चळ अशा परब्रह्मात प्रथम चंचळ मूळमाया निर्माण झाली आणि मग निश्र्चळ ब्रह्मामध्ये / ब्रह्मापासून विश्वनिर्मितीला (भूगोल) प्रारंभ झाला (१३.३.२).

विश्वोत्पत्तीचा आराखडा - मूळमायेपासून होणार्‍या विश्वोत्पत्तीचा वृत्तांत दासबोधात कमी जास्त विस्ताराने अनेक ठिकाणी५९ आलेला आहे. त्याचा तपशील देण्यापूर्वी विश्वाच्या उत्पत्तीचा ढोबळ आराखडा आपल्या दृष्टीपुढे असावा म्हणून तो येथे दिला आहे.

    प्रथम ब्रह्म असते. ब्रह्मात मूळमाया होते. मूळमायेपासून गुणमाया होते. गुणमाया ही सत्त्व, रज, तम हे तीन गुण प्रगट करते. सत्त्व म्हणजे जाणीव (तो विष्णू). रज म्हणजे जाणीव व नेणीव (तो ब्रह्मदेव). तम म्हणजे नेणीव (तो रूद्र). तमोगुणापासून आकाश, वायू, तेज, जल व पृथ्वी ही पंचमहाभूते उद्‍भूत होतात. मग पृथ्वीवर वनस्पती, प्राणी इत्यादी उत्पन्न होतात. पंचभूतांच्या कमी जास्त मिश्रणाने सर्व चराचर सृष्टीचा उद्‍भव होतो.

मूळमायेतून विश्वोत्पत्ती - ब्रह्मांड अथवा सृष्टी निर्माण होण्यापूर्वी मूळमाया होती; त्यावेळी सप्तकंचुक ब्रह्मांड नव्हते; ब्रह्मा-विष्णू-महेश, पृथ्वी, मेरू, सप्तसागर हे सर्व मूळमायेनंतरचे आहेत (८.४.४७-४९). विश्वनिर्मिती हा ६०मूळमायेचा खेळ, लीला आहे (९.६.३३). मूळमाया ही लोकजननी आहे (१०.२.६). मूळमायेकडेच सर्व कर्तृत्व आहे (८.३.१४). मूळमायेत अनंत शक्ती आहेत (८.३.१९). त्या अनंत शक्तीतून दृश्य व व्यक्त पदार्थ उद्‍भूत होतात (१७.२.९). सगळया सृष्टीचे सूक्ष्म बीज मूळमायेत असते (२०.२.२०). वडाच्या बीजात वटवृक्ष असतो, पण दिसत नाही. कारण तो सूक्ष्म असतो; पण त्यातूनच प्रचंड वटवृक्ष होतो. त्याप्रमाणे मूळमाया बीजरूप आहे; तिच्यापासून विश्वाचा विस्तार होतो (१०.९.२-३). विश्व म्हणजे मायेचा विकार व विस्तार आहे (११.२.१०).

    मूळमायेला मागे पाहिल्याप्रमाणे अनेक नावे आहेत. त्यातील आत्मा, अंतरात्मा, जगदीश्वर, परमेश्वर यांचा निर्देश करून त्यांच्यापासून सृष्टी होते, असेही रामदासस्वामी सांगतात. उदा. (१) मूळमायाच नाना विकारांचे६१ मूळ आहे (१५.७.१), नाना प्रकारचे जीव मूळमायेच्या गुणाने होत असतात (१५.८.१६-२५). मायादेवीने पंचभूतांच्या द्वारा केलेल्या गडबडीत सूक्ष्म तत्त्वांमध्ये कोणीच लक्ष घालीत नाही (१७.३.१९). (२) अंतरात्मा:-६१ सकळ देवांचे मूळ । तो हा अंतरात्माची केवळ (१८.१.१६). (३) आत्मा:-मूळापासून सेवटवरी । सकळ काही६१ आत्माच करी । आत्म्यापैलीकडे निर्विकारी । परब्रह्म ते ॥ (१६.७.१३). (४) जगदीश्वर:- जितुके काही निर्माण झाले। तितुके जगदीश्वरे निर्मिले ॥ (१८.२.२६). (५) परमेश्वर/ईश्वर:- स्तंभेविण उभारली । ऐसी विचित्र कळा केली । त्या नाव देव (८.१.२८); परमात्मा परमेश्वरू । सर्वकर्ता जो ईश्वरू । तयापासूनि विस्तारू । सकळ जाला (८.३.१२); विचित्र भगवंताची करणी । तेणे केली उभारणी । अनंत ब्रह्मांडांची (८.३.११).

मूळमायेतील मिश्रण - मूळमायेमध्ये तीन गुण व पाच भूते यांचे मिश्रण असते; तेथे ते सूक्ष्म व एकरूप असतात (९.६. १४-१५). मूळमायेत सूक्ष्मपणाने पंचभूते आणि त्रिगुण असतात (१५.७.९). विश्वनिर्मितीचा मूळ मायेचा खेळ पाहिला तर कळून येते की, ती पंचभूते व तीन गुण यांनी बनलेली आहे (९.६.३३). मूळमाया वायुस्वरूप आहे (९.६.८; १०.४.१०); त्या वायूमध्ये पाच भूते आणि तीन गुण असतात (१०.९.१; १०.३.२). हीच गोष्ट वेगळया शब्दांत अशी सांगितलेली आहे : -

    ब्रह्मात प्रथम चंचळ संकल्प उठला. त्या संकल्पात असणारी चंचळपण आणण्याची शक्ती म्हणजे वायू आहे. हा वायू तीन गुण आणि पंचभूते आणतो. याचा अर्थच असा की, चंचळपणात म्हणजेच मूळमायेत प्रथमापासूनच तीन गुण आणि पंच भूते असतात (१५.७.४). तीन गुण व पंच भूते यांचे हे सूक्ष्म मिश्रण म्हणजेच विश्वाच्या पसार्‍याचे सूक्ष्म बीज होय.

मूळमायेतील पंच भूते - मूळमाया वायुस्वरूप आहे (९.६.८). या सूक्ष्म वायूचा शोध घेतला तर त्यामध्ये सूक्ष्म पंच भूते दिसतात (८.४.४०). अशा प्रकारे पंच भूते बीजरूपाने म्हणजे सूक्ष्मरूपाने मूळमायेत असतात (९.६.२). मूळमायेत पंच भूते असतात

 

हे रामदास पुढीलप्रमाणे दाखवितात :-

    अहं बहु स्यां हा ब्रह्मात उठलेला चंचळ संकल्प म्हणजे मूळमाया. इच्छा ही चांचल्यामुळे येते; चांचल्य हा वायूचा गुण आहे; म्हणून मूळमायेत वायू आहे. शब्द हा आकाशाचा गुण आहे; ब्रह्मातील अहं हे स्फुरण ॓काराच्या नाद - शब्द-रूपाने प्रगटते; म्हणून मूळमायेत आकाश आहे. उपर्युक्त इच्छेला बळ वा सामर्थ्य प्राप्त होते; बळ हा तेजाचा गुण आहे; म्हणून मूळमायेत तेज आहे. या इच्छेतील मृदुत्व तेच जळ; मृदुत्व हा जलाचा गुण आहे; म्हणून मूळमायेत जल आहे. इच्छेनंतर जड पदार्थ निर्माण होतात; जडत्व हा पृथ्वीचा गुण आहे; म्हणून मूळमायेत पृथ्वी आहे (८.३. ५९-६०).

    ही पाच भूते आकाराला येऊन वेगळी दिसू लागली तरी ती एकमेकात मिसळलेली६२ असतातच (९.६.२२). पंचभूते ही व्यक्त असोत अथवा अव्यक्त असोत, स्थूल असोत किंवा सूक्ष्म असोत, एकेका भूतात पंचभूते असतातच (८.३.६१-६२).

    मूळमाया वायुस्वरूप आहे, वायूत जाणीव असते (१०.४.१०). जेथे चलन नसते तेथे जाणीव नसते. जेथे चलन असते तेथे जाणीव६३ असते. वायू हा चलनात्मक आहे; म्हणून चलनात्मक वायूचा म्हणजे मूळमायेचा जाणीव हा गुण आहे (९.६.१३) म्हणजे मूळमायेत६४ जाणीव आहे. मूळमायेच्या या जाणीवेमुळेच, जाणीव नेणीवेचा म्हणजे ज्ञान-अज्ञानाचा विचार करण्याचा प्रसंग येतो. म्हणजे वायूमुळे ( मूळमायेमुळे) जाणीव६५ व नेणीव यांना स्थान प्राप्त होते (९.६.११-१२). कारण जाणीव म्हटले की, तिच्या मागोमाग सापेक्षतेने नेणीव येतेच.

    मूळमायेत जाणीव आहे. साहजिकच तिच्या घटकभूत असणार्‍या पंच भूतांतही जाणीव असतेच. पंच भूतांत जाणीव कशी असते या संदर्भात रामदास सांगतात :-

    जाणीव म्हणजे हेतुपूर्वक किंवा ज्ञानपूर्वक हालचाल. जाणीव हे वायूचे लक्षण आहे. वायूत सगळे गुण असतात. म्हणून जाणीव व नेणीव यांच्या मिश्रणाने पंच भूतांचा प्रवास चालू असतो. म्हणून पंच भूतांत जाणीव आहे. आणि ही जाणीव सूक्ष्मपणे वा स्थूलपणे कुठे स्पष्ट दिसते तर कुठे स्पष्ट दिसत नाही. जसे वायू वाहात नाही तेव्हा तो आहे असे वाटत नाही, तसे सुप्तरूपाने असणारी जाणीव दिसत नाही; पण सूक्ष्मरूपाने ती पंच भूतांत असतेच (९.६.१८-२३).

मूळमायेतील गुण - मूळमायेला शुद्ध सत्त्वगुण नाव आहे (२०.९.२७). तर शुद्ध सत्त्वगुणसुद्धा मूळमायेत असतो असेही रामदास सांगतात (२०.२.२३). जेथे सत्त्व, रज व तम हे तीन गुण गूढरूपाने असतात त्याला महत्तत्त्व अथवा शुद्धसत्त्वगुण म्हणतात (२०.९.२७). मूळमायेत सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण असतात. जाणीव आणि नेणीव ही गुणांची लक्षणे आहेत (२०.३.६). जाणीव, नेणीव आणि जणीव-नेणीव हे औनक्रमे सत्त्व, तम आणि रज या गुणांचे लक्षण आहे (९.६.३८). मूळमायेतील जाणीव म्हणजे सत्त्वगुण, नेणीव म्हणजे तमोगुण, आणि त्या दोहोंमधला म्हणजे जाणीव-नेणीव यांनी युक्त (९.६.३) म्हणजे त्या दोहोंचे मिश्रण असणारा रजोगुण आहे (२०.३.७).

    मूळमायेत सूक्ष्मरूपाने सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण असतात. मूळमायेत गुप्तपणाने म्हणजे सूक्ष्मपणाने असणारे हे तीन गुण साम्यावस्थेत असतात (२०.२.२५). विश्वोत्पत्तीच्या वेळी ही त्रिगुणांची साम्यावस्था ढळते. याचे कारण असे:-

    मूळमाया वायुस्वरूप आहे. पंच भूतांनी युक्त असा वायू म्हणजेच मूळमाया (८.४.४१). मूळमायेचे चलन ( हालचाल, शक्ती) हे वायूचे लक्षण आहे. वायूतील या शक्तीमुळे हालचाल निर्माण होऊन सूक्ष्म तत्त्वे स्थूलत्वाप्रत / जडत्वाप्रत जाऊ लागतात (८.३.५६) आणि क्रमाने सृष्टिरचना होते. विश्व म्हणजे तीन गुण व पाच भूते यांचा अवाढव्य असा खटाटोप आहे (९.६.५३). पाच भूतांनी युक्त असणारी मायाच सर्वत्र विस्तारली आहे (८.३.६२)

गुणमाया अथवा गुणक्षोभिणी माया - मूळमायेतून विश्वाचा अंकुर फुटत असताना, जो पहिला विकार होतो तो म्हणजे गुणमाया अथवा गुणक्षोभिणी माया. मूळमाया बहुगुणी आहे, अधोमुख होऊन तीच गुणक्षोभिणी बनते. (१२.६.६). मूळमायेतील गुणांची साम्यावस्था ढळून, मूळमायेत गुणांचा थोडा विकार झाला की तिला गुणक्षोभिणी माया म्हणतात (९.६.८). हीच गोष्ट रामदासस्वामी भिन्न शब्दांत अशी सांगतात:-

    मूळमायेपासून गुणक्षोभिणी माया निर्माण होते (८.४.२; १०.२.६). मूळमायेतून आणि एक माया उद्‍भवली. तिने गुणाना जन्म६६ दिला म्हणून तिला६७ गुणक्षोभिणी माया म्हणतात (८.४.२). ज्या मायेतून गुण६८ प्रगट होतात तिला गुणक्षोभिणी म्हणतात (२०.२.२४) अथवा मूळमायेपासून गुणमाया झाली (९.६.२६). मूळमायेत तीन गुण प्रगटताच ती गुणमाया होते (११.१.९). म्हणजे गुणक्षोभिणी माया आणि गुणमाया हे दोन्ही शब्द समानार्थी आहेत.

गुणमायेलाही अष्टधा प्रकृती हे नाव - गुणमायेलाही अष्टधा प्रकृती हे नाव आहे ही गोष्ट रामदासकृत अष्टधा प्रकृतीच्या पुढील वर्णनावरून कळून येते. (१) मूळमाया ही अष्टधा प्रकृतीचे मूळ आहे (२०.२.२०). मुळात हरिसंकल्प होता; तो संकल्प म्हणजे मूळमाया, आणि संकल्प हे अष्टधा प्रकृतीचे मूळ आहे (१८.४.२७-२८). (२) मूळ ब्रह्मात जी कल्पना आली तीच मूळमाया (११.१.८-९). कल्पना म्हणजे निश्र्चळ ब्रह्मातील चंचळ. कल्पना हे अष्टधा प्रकृतीचे मूळ आहे. साकार झालेली कल्पना म्हणजे अष्टधा प्रकृती. अष्टधा प्रकृती ही कल्पनेची मूर्ती अथवा मूर्तिमंत कल्पना आहे (११.१.५-६). (३) मूळमाया पंचभूतिक आहे (८.३.६०-६१; ८.४.७). अष्टधा प्रकृतीचे मूळ स्वरूप पंचभूतिक आहे (१२.६.१०).

    अष्टधा प्रकृती या नावाचे स्पष्टीकरण असे आहे : गुणमायेत तीन गुण व पंच भूते असतात (९.६.२६-२७). गुणमाया व तिच्यातून उद्‍भवणारे तीन गुण हे पंचभूतिक असतात (८.४.४१). पाच भूतांमध्ये तीन गुण मिसळले की आठ प्रकार होतात, म्हणून अष्टधा प्रकृती हे नांव दिले आहे. अष्टधा प्रकृती पंचभूतिक आहे (८.४.४२). पाच भूते आणि तीन गुण मिळून अष्टधा प्रकृती बनलेली आहे (१२.६.११). तेव्हा तीन गुण आणि पाच भूते हे दोन्ही मिळून आठ तत्त्वे जिच्यामध्ये आहेत तिला अष्टधा प्रकृती म्हणतात (११.१.७).

    अशा प्रकारे गुणक्षोभिणी माया, गुणमाया व अष्टधा प्रकृती हे शब्द समानार्थी आहेत. (मागे पाहिल्याप्रमाणे रामदास मूळमायेलाही अष्टधा प्रकृती म्हणतात. तेव्हा अष्टधा प्रकृतीचा विवक्षित अर्थ त्या त्या संदर्भावरून ठरवावा लागतो हे उघड आहे).

मूळमायेतून गुणमाया होते म्हणजे काय ? - मूळमायेत असणारे तीन गुण व पंचभूते गुणमायेत असतातच (९.६.२६-२७). मूळमायेत हे तीन गुण साम्यावस्थेत असतात. आता गुणमाया प्रगटली की मूळमायेत सूक्ष्मरूपाने असणार्‍या तीन गुणांची साम्यावस्था संपते आणि ते तीन गुण स्पष्ट वा व्यक्त होतात. म्हणून गुणक्षोभिणी / गुणमाया ही तीन गुणांना व्यक्त दशेत आणणारी संधी ( मधली अवस्था) आहे. एक उदाहरण देऊन रामदास ही गोष्ट पुढीलप्रमाणे स्पष्ट करतात:- दाण्यांनी भरलेले कणीस प्रथम बंद असते; ते उकलले की दाणे मोकळे होतात, म्हणजे दाणे स्पष्टपणे दिसू लागतात. त्याप्रमाणे मूळ मायेत तीन गुण असतात, तिच्यापासून होणारी गुणमाया ही त्या तीन गुणांना व्यक्त किंवा स्पष्ट दशेला आणते (९.६.६-७)

    गुणक्षोभिणी मायेमध्ये सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण६९ जन्म पावतात (१३.३.५); गुणक्षोभिणी / गुणमायेतून प्रथम सत्त्व, रज व तम७० हे तीन गुण निर्माण झाले म्हणजे७१ व्यक्त / स्पष्ट झाले (८.४.३; ९.२६; १२.६.६). नंतर या गुणमायेमध्ये सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांच्या मिश्रणाने (९.६.९) विश्वोत्पत्तीची प्रक्रिया सहजपणे सुरू होते.

    गुणमायेलाच रामदासस्वामी अष्टधा प्रकृती म्हणत असल्याने, अष्टधा प्रकृतीपासून विश्वाचा उद्‍भव होतो असेही रामदास म्हणतात. अष्टधा प्रकृती फोफावली म्हणजे विस्तार पावली आणि ती विश्वाच्या रूपाने जडत्वास म्हणजे दृश्य जड आकारास आली (११.१.७-८). मूळापासून शेवटपर्यंत सर्व विश्वाची उत्पत्ती अष्टधा आहे (११.१.६). अष्टधा प्रकृतीचा विस्तार झाला व तो सृष्टिक्रमाने दृश्यस्वरूपात आकाराला आला (१२.८.१). म्हणून रामदासस्वामी सांगतात 'सगट माया विस्तारली । अष्टधा प्रकृती फोफावली । चित्रविचित्र विकारली । नानारूपे ॥ (१२.२.१०).

    आता गुणमायेनंतरचा विश्वोत्पत्तीचा तपशील पाहण्यापूर्वी पुढील दोन गोष्टी लक्षात घ्यावयास हव्यात.

विश्वोत्पत्तीच्या वृत्तांतातील लक्षणीय गोष्ट - (१) मूळमायेपासून विश्व उत्पन्न होते. मूळमायेत तीन गुण आणि पंचभूते यांचे मिश्रण असते; तेथे ते सर्व सूक्ष्म व एकरूप असतात; पण त्यांची स्पष्टता होताना मात्र एकातून एक निघाले असा क्रम संआगावा लागतो (९.६.१५). म्हणून मूळमाया वा प्रकृती विस्तार पावू लागली की एकातून एक निर्माण झाले (९.६.३९), असे सांगावे लागते. (२) दासबोधातील विश्वोत्पत्तीच्या हकीकतीमध्ये तीन मिश्र प्रवाहांचा मिलाफ झाला आहे. म्हणजे असे:- आपल्या संकल्पनेप्रमाणे रामदासानी संआगितलेला भाग हा एक प्रवाह. त्याच वेळी पुराणांनी सांगितल्याप्रमाणे विष्णूपासून ब्रह्मदेव व ब्रह्मदेवापासून सृष्टी झाली हा भाग येतो, हा दुसरा प्रवाह. यांच्या जोडीने उपनिषदांनी सांगितलेला भाग म्हणजे आत्म्यापासून आकाश, वायू, तेज इत्यादी सृष्ट्युत्पत्तीचा क्रमही सांगितला गेला आहे; हा तिसरा प्रवाह. या तीन प्रवाहांचा मिलाफ व वर उल्लेखिलेला विश्वोत्पत्तीचा आराखडा या गोष्टी लक्षात ठेवल्या म्हणजे विश्वोत्पत्तीचा वृत्तांत कळण्यात अडचण येत नाही.

(अ) रामदासांची संकल्पना - गुणमायेपासून सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण निर्माण होतात (८.४.३; ९.६.२६) म्हणजे तीन गुण स्पष्ट वा व्यक्त होतात. त्यातील तमोगुणापासून७२ पंचभूते झाली. ही पंचभूते म्हणजे७३ आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी ही होत; ही भूते व्यक्त दशेला येतात (१२.६.१०). पुढे त्या पाच तत्त्वांचा म्हणजे पंचभूतांचा विस्तार होतो (८.४.४). या पाच भूतांचा अफाट पसारा होतो (२०.२.२७). पंचभूतांचा विस्तार (१३.६.११) वा पसारा सगळीकडे विस्तारतो (१३.३.६). (येथेच सगळीकडे म्हणजे काय हे नीट लक्षात घ्यावे:- ब्रह्माला सोडून अन्यत्र कुठे तरी विश्वाचा पसारा असत नाही. विश्वाच्या आदी व अंती सत्य असे ब्रह्मस्वरूप आहे. ब्रह्मात होणारी मूळमाया पंचभूतात्मक आहे; म्हणून पंचभूतेही ब्रह्मामध्यी / ब्रह्मावर असतात (८.३.६४). तेव्हा सगळीकडे म्हणजे ब्रह्मावरच). अशा प्रकारे मुळातली मूळमाया पहा अथवा अविद्यायुक्त भूमंडलावर पहा किंवा स्वर्ग मृत्यू - पाताळ या लोकांत पहा, सर्वत्र पाच भूतांचाच विस्तार आहे (८.३.६३). ब्रह्मगोळ म्हणजे ब्रह्मांड पांचभौतिक आहे (८.४.५७).

    तीन गुणांपासून पंचभूते होतात, असेही रामदास कधी म्हणतात. (त्रिगुणांपासून जाली भूते । पावली स्पष्ट दशेते ॥ १३.७.५). म्हणजे असे : मूळमायेतील सूक्ष्म तीन गुण गुणमायेत स्पष्ट होतात. या गुणांमुळेच मूळमायेत असणारी पंचभूते स्पष्ट किंवा व्यक्त दशेला येतात (८.४.४४). इथली कल्पना अशी : - जाणीव-नेणीव हे गुणांचे स्वरूप आहे; जाणीव-नेणीव पंचभूतांतही असते. म्हणून गुणांपासून पंचभूते होतात, असे म्हटलेले दिसते.

    अशाप्रकारे, प्रथम सूक्ष्म अथवा अव्यक्त असणारी पंचभूते ही सृष्टिरचनेत व्यक्त झाली (८.३.५७). म्हणजे ती वेगळेपणाने स्पष्ट होऊन दृश्य रूपास आली (९.६.२७). पाच भूते जेव्हा आकाराला आली तेव्हा ती दिसायला वेगळी दिसू लागली (९.६.२२). व्यक्त दशेला आलेली पंच भूते जड होऊन सर्व तत्त्वे बनतात. आणि यापुढील ब्रह्मांडातील तत्त्वरचना लोकांना माहीत आहे (८.४.४४-४५). म्हणजे असे होते : - पाच भूते क्षणोक्षणी बदलत राहतात; एका पदार्थात बदल होऊन दुसरा पदार्थ निर्माण होत राहतो (९.६.५२). दृश्य हे विकारी आहे; त्यात फरक पडत जाऊन नवीन नवीन वस्तू बनत राहतात (९.६.४१). एक पाणी हे तत्त्व घेतले तर त्याचे असंख्य व अपार७४ विकार झालेले दिसून येतात. अशाप्रकारे पाचभूतांचा विस्तार म्हणजे चौर्‍यांशी लक्ष योनी (९.६.४३).

    अशाप्रकारे विश्वाची उभारणी होते (११.१.११). मायेचा हा सर्व दृश्यात्मक पंचभौतिक पसारा गुंतागुतीचा आहे ( सकळ माया गथागोवी । ८.५.७०). या सर्व विस्ताराचे मूळ पंचभूतिक मूळमाया आहे; हा सर्व विस्तार मूळमायेनंतरचा आहे (८.४.५४)

(आ) पौराणिक कल्पना लक्षात घेऊन - ब्रह्मात निर्माण होणारी मूळमाया वायुरूप आहे; त्यात जो जाणता आहे तो ईश्वर किंवा सर्वेश्वर होय (१०-४-१६); वायूमध्ये (मूळमायेत) जो जाणीव हा गुण आहे तो ईश्वराचे लक्षण आहे; त्या ईश्वरापासून पुढे तीन गुण होतात (१०.९.११). ईश्वराचा तीन गुणांशी संबंध असतो. तीन गुणांमुळे त्याला तीन अंगे दिसतात; त्या तीन गुणांतून ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तीन देव उत्पन्न होतात (१०.४.१७-१८). म्हणजेच मूळ७५ मायेपासून ब्रह्मा, विष्णू व महेश हे उत्पन्न झाले (११.१.४). त्यामध्ये७६ क्रम असा आहे. तीन गुण व्यक्त झाल्यावर, प्रथम विष्णू जन्मास आला; विष्णू म्हणजे शुद्ध७७ जाणीव वा जाणती कळा किंवा सत्त्वगुण होय; विष्णू हा त्रैलौक्याचे पालन करतो (१२.६.६-७). नंतर जाणीव व नेणीव यांचे मिश्रण असणारा ब्रह्मदेव निर्माण झाला; त्याच्या कर्तृत्वगुणाने तीनही भुवने उत्पन्न होतात. पुढे रूद्रा७८ चा जन्म होतोए; तो तमोगुण आहे; तो सर्व संहाराचे कारण आहे (१२.६-६-९). वेगळया शब्दात सांगायचे झाल्यास मूळवायूत - मूळ मायेमध्ये-विष्णू होताच; पुढे त्याने चतुर्भुज देह धारण केला; असाच प्रकार७९ ब्रह्मदेव व महेश यांच्या बाबतीत झाला (१०.४.२१-२२). पुढे ब्रह्मदेवाने सृष्टीची कल्पना केली; त्याच्या इच्छेप्रमाणे विश्व निर्माण झाले; विश्वा८० तील सर्व जीवसृष्टी ब्रह्मदेवाने निर्माण केली (१०.४.३१).

    विश्वाच्या दृश्य पसार्‍यात नाना लोक, नाना स्थाने, चंद्र, सूर्य, तारांगणे, सप्तद्वीपे, चौदा भुवने, शेष, कूर्म, सप्त पाताळे, एकवीस स्वर्ग, आठ दिक्पाळ, तेहतीस कोटी देव, बारा आदित्य, अकरा रूद्र, नऊ नाग, सात त्र+षीश्वर, नाना देवांचे अवतार, मेघ, चक्रवर्ती मनु, नाना जीवांची उत्पत्ती (८.४.५०-५३) असा विस्तार आहे (८.४.५४) असे हे सृष्टिरचनेचे नवल आहे (१३.३.१४).

    ज्या सत्त्वगुणाचा विष्णू बनला आहे, त्या विष्णूच्या अंशाने जग चालते. म्हणजे असे : - ज्या जाणीवेचा विष्णू झाला आहे ती जाणीव विश्वातील सर्व प्राण्यांत विभागली गेली आहे; तिच्या प्रेरणेने प्राणी स्वसंरक्षण करतो. या जाणीवेला८१ जगज्जोती म्हणतात. सर्व प्राणी या जाणीवेमुळे जिवंत राहतात. ही जाणीव सगळया जगाला सांभाळते किंवा ८२ वाचविते, म्हणून तिला जगज्जोती म्हणतात; ती शरीराबाहेर गेली की प्राणी जिथल्या तिथे मरून पडतो (१.९.१२-१५,१८)

    अशाप्रकारे मूळमायेतील जाणीवेत फरक होत होत हा सर्व विस्तार झाला आहे (१०.९.१९); 'मायावल्ली फोफावली' (१९.५.१५) आहे.

(इ) उपनिषदांना धरून - उपाधिरहित८३ आकाश म्हणजे ब्रह्म ( आत्मा) (१०.३.१; ९.६.३७); मुळात अविनाश आत्मा होता (६.२.१२). आत्म्यात किंवा ब्रह्मात मूळमाया जन्मली (६.३.१२, १०.३.१); मूळ ब्रह्मात स्फूर्तिरूप अहंकार म्हणजे मूळमाया प्रगट होते (४.१०.१). हा अहंकार किंवा मूळमाया वायुस्वरूप आहे (४.१०.२; १०.३.२; ६.९.८). या वायूत पंच भूते व त्रिगुण आहेत (१०.३.२). या वायूपासून तेज, तेजापासून आप आणि आपापासून भूमंडळ आकारले (६.३.१३; ४.१०.२-३). म्हणजे वायूपासून अग्नी, अग्नीपासून पाणी व पाण्यापासून सृष्टी निर्माण झाली (८.१.२६-२८; ९.६.१६-१७).

    वरील भागच सविस्तरपणे असा सांगतो येतो : - अंतरात्म्याला आकाश म्हणतात (१३.३.७; १२.६.१२). (हा वायूपलीकडील अंतरात्मा आहे १७.३.१६-१७). त्या आकाशापासून (अंतरात्म्यापासून) वायू जन्मला (१२.६.१२; ११.१.१; १६.७.२).या वायूचे उष्ण व शीत असे दोन प्रवाह असतात. शीत वायूतून तारा व चंद्र जन्मले. उष्ण वायूपासून सूर्य, अग्नी, विद्युत इत्यादि उत्पन्न झाले. तेज हे सुद्धा उष्ण व शीत असे दोन प्रकारचे आहे. तेजापासून पाणी होते. व पाणी आळून-घट्ट होऊन-पृथ्वी बनते (१२.६-१३-१५).

    वायू ते पृथ्वी हा उत्पत्तीतील भाग रामदासस्वामी वेगळया पद्धतीने असाही सांगतात : - (१) वायूपासून अग्नी होतो. वायूमध्ये जे कठिण घर्षण असते त्यापासून अग्नी होतो. मंद वायूपासून शीतल पाणी निर्माण होते. पाण्यापासून पृथ्वी होते (११.१.१-३). (२) वायूपासून तेज जन्माला येते. वायूच्या दोन प्रवाहांच्या घासणीने अग्नी उत्पन्न होतो; तेथे सूर्यबिंब प्रगटते. जो शीत वारा वाहतो त्यामधून पाणी उत्पन्न होते; पाणी आळून पृथ्वी निर्माण होते (११.३.७-९).

    आता, निर्माण झालेल्या पृथ्वीत नाना बीजे असतात; बीजापासून वनस्पती होतात (११.१.३). वनस्पतींपासून नाना रस, अन्नरस उत्पन्न होतात (१२.६.१६). पुढे जीवांच्या चार खाणी झाल्या; चार खाणींचा विस्तार झाला; नाना योनी प्रगटल्या व त्यांत ८४प्राणी निर्माण झाले (११.१.१०). वेगळया शब्दांत :- पृथ्वीच्या पोटात अनंत बीजे असतात; पृथ्वी व पाणी यांच्या मीलनाने बीजांतून अंकुर फुटतात (१३.३.१०). मग पृथ्वीवर अमाप वनस्पती येतात (१२.६.१५). मग वृक्ष, वेली, पाने, धान्य, अन्न, अन्नापासून रेत व रेतापासून प्राणी अशी उत्पत्ती होते (१३.३.११-१३). पृथ्वीवरील चौर्‍यांशी लक्ष प्राणी अन्नरसावर जगतात (१२.६.१६).

    अशी सृष्टिरचना झाली, अशाप्रकारे हे जड दृश्य विश्व आकाराला आले (१२.६.१७-१८).

विश्वाची संहारणी - विश्वाच्या उभारणीच्या अनुषंगाने विश्वाच्या संहारणीचाही विचार करावयास हवा. तो संक्षेपाने असा :-

    विश्वाच्या प्रलयाच्या वेळी, जे ज्यातून निर्माण झाले आहे ते पुन्हा त्यातच विलीन होते (१२.६.१९; १५.४.२२). पृथ्वी जळात विरते; पाण्याला तेज शोषून घेते; वायू तेजाचा लय करतो आणि वायू आकाशात विरून जातो (१५.४.१९-२१; १४.९.६-९). अशाप्रकारे पंच भूतांचा कल्पान्त अथवा नाश होतो (१४.९.९; १५.४.२२). पंच भूते गुणमायेत८५ विलीन होतात; गुणमाया८५ मूळमायेत विरून जाते; गुणमाया व मूळ८६ माया परब्रह्मात लीन होते (१४.९.१०). हाच भाग रामदासस्वामी वेगळया पद्धतीने असा सांगतात :- (१) वायो वितुळताच जाण । सूक्ष्म भूते आणि त्रिगुण । ईश्वर८५ मांडी अधिष्ठान । निर्विकल्पी ॥ (१०.५.२५) (२) निर्माण पंच भूते इये । कल्पान्ती नासती यथान्वये । प्रकृति ८७पुरूष जिये । हेही ब्रह्म होती ॥ (५.६.४७). (३) महद्‍भूत मूळमाया । विस्मरणे वितुळे काया । पदार्थमात्र राहावया । ठाव नाही ॥ दृश्य हालका लोळे गेले । जड चंचळ वितुळले । या उपरी शाश्वत उरले । परब्रह्म ते ॥ (१३.४.२३-२४).

विश्वसंहारानंतर - माया आहे तोपर्यत भेद व अभेद यांची भाषा संभवते. सृष्टी निर्माण होण्याच्या वेळी भेद होता; सृष्टीच्या संहारानंतर अभेद होतो (२०.८.१७). सृष्टीच्या प्रलयानंतर:- तेथे जीवशिव पिंड ब्रह्मांड । आटोन गेले थोतांड । माये-अविद्येचे बंड । वितळोन गेले ॥ (११.१.१७). सृष्टीची संहारणी झाल्यावर, मायेचा निरास होऊन फक्त ब्रह्मस्वरूपाची स्थिती उरते (११.१.१६). प्रलयानंतर 'पुढे शाश्वत उरले । ते परब्रह्म' (१५.४.२३) असे होते.

विश्व सत्य नाही - आत्तापर्यंत ज्या विश्वाची उभारणी आणि संहारणी पाहिली ते विश्व खरे नाही. एक परब्रह्म मात्र सत्य आहे. ब्रह्माखेरीज जे काही अन्य भासते वा दिसते, ते भ्रमरूप आहे:- तीन गुण व पंच भूते भ्रम आहेत. मी-तू, उपासना, ईश्वरभाव हे सर्व भ्रम आहेत (१०.६.९-११). सर्व रूपे आणि नामे भ्रम आहेत (६.२.१३). किंबहुना 'निर्गुण ब्रह्मावेगळे आवघे । भ्रमरूप' (१०.६.३६) आहे. साहजिकच माया व मायाजनित विश्व सत्य नाहीत. मायेने निर्माण केलेला हा विश्वभ्रम अविद्येच्या परिणामामुळे खरा वाटतो (८.१.४२). परंतु हे मायानिर्मित दृश्य जगडंबर-विश्वाचा पसारा-खरे आहे असे कुठलाच अद्वैत वेदान्त गं?रथ सांगत नाही. जग अथवा८८ सृष्टी मिथ्या आहे (८.१.४३-४४; ६.६.४६). ज्ञानी साधंऊना साहजिकच हे विश्व मिथ्या वाटते. म्हणून रामदासस्वामी सांगतात 'दृश्य मिथ्या साधुजना' (६.७.४४), ज्ञानी माणसाला दृश्य हे स्वप्नासारखे मिथ्या आहे (६.७.४३).

उपसंहार - मायेच्या अलीकडे या विश्वात दृश्याचे दडपण (भीड) आहे (१४.९. २८). जे मायेच्या संभ्रमाने गोंधळलेले असतात, त्यांना हे विलक्षण अवघड चक्र कळत नाही (१४.९.२३). एखादा नुसता (शब्द) ज्ञानी जर मायेच्या दडपणाला बळी पडला तर त्याला निश्र्चळ परब्रह्म प्राप्त होत नाही. तो मायेच्या कक्षेत उगीचच बडबड करीत राहतो (१५.४.२८). याउलट परब्रह्म हे तर मायातीत, मायेच्या पलीकडे आहे (१४.९.२८).

    माया आहे तोपर्यंत अन्वय व्यतिरेक८९ आणि तर्क करावा लागतो. परंतु जेव्हा/जेथे माया संपते, तेव्हा/तेथे अन्वय-व्यतिरेक आणि तर्क उरतच नाहीत (१८.५.३२). (अज्ञानी) माणसांना मायेचे प्रत्यक्षपण खरे वाटते. तथापि साधकाला मात्र ते खोटे (अप्रमाण) वाटते (५.९.३२). साधक हा प्रत्यक्ष असणार्‍या मायेला अलक्ष करतो व अलक्ष असणारी ब्रह्मवस्तू अंतरात पाहात असतो (५.९.१६). साधनाच्या अभ्यासाने साधक हा माया सांडून स्वरूपी लीन होऊन जातो (५.९.३३). म्हणजे तो ब्रह्मरूप होऊन जातो.

    अशाप्रकारे मायेचा हिशोब झाला, मायेचे देणे-घेणे संपले, काही बाकी उरली नाही; आणि साध्य असे ब्रह्म प्राप्त झाल्याने, साधनाला अवकाश उरला नाही; साधना आपोआप संपली (२०-१०-२७). माया संपूर्णपणे निरस्त झाली की अवस्था म्हणून उरत नाही (१५.४.२९). मायेचा निःशेष निरास झाला की खरे आत्मनिवेदन घडते, तेथे शब्द पोचू शकत नाही; ते विज्ञान, ती स्वस्वरूपस्थिती, स्वानुभवानेच कळून येते (१५.४.२९-३०). विमल ब्रह्माचा साक्षात्कार झाल्यावर, उन्मनी अवस्था प्राप्त झाल्यावर, केलेल्या साधनेचे फळ मिळते, संसार सफळ होतो आणि निर्गुण व निश्र्चळ ब्रह्म अंतरात स्थिर होऊन राहते (२०.१०.२५-२६)

    अशाप्रकारे विचाराने मायेचा निरास होऊन, आपण ब्रह्मरूपच होऊन राहतो.

तळटीपा

५९. पहा - ८.३.४९-६६; ८.४.२-७; ८.४.४०-४५; ९.६.१-५३; १०.९.१-२१; १०.१०.५-३२; ११.१.१-१०.

६०.    मूळमाया म्हणजे निश्र्चळ ब्रह्मातील चंचळ होय. म्हणून भ.स.श्रीरामराय केळकर ऊर्फ श्रीदादामहाराज म्हणतात:- चंचळाचे गुणे विश्व रचिले; सदानंदरूपी चिद्‍गुण चंचळ । विश्वाचा हा खेळ केला तेणे ॥

६१.    माया । अंतरात्मा (आत्मा) हेच सर्व विकार घडवून आणतात; पण त्यांचा आरोप मात्र ब्रह्मावर केला जातो (२०.७.१९).

६२.    एकेका भूतात अन्य भूते कशी मिसळलेली असतात हे पंचीकरणाच्या सिद्धान्तानुसार ८.४.१३-३८ मध्ये रामदास विस्तृतपणे सागतात.

६३.    जाणीव म्हणजे ज्ञान; नेणीव म्हणजे अज्ञान:- ज्ञान म्हणिजे जाणणे । अज्ञान म्हणजे नेणणे (२०.१.२३).

६४.    मूळमायेत जाणीव कशी याचे आणखी एक स्पष्टीकरण रामदास असे देतात :- पिंडातील महाकारण देहात तुर्या ही सर्वसाक्षिणी अवस्था आहे; म्हणजे तेथे जाणीव वा ज्ञान आहे. ब्रह्मांडात मूळ माया हा महाकारण देह आहे; म्हणून तेथे जाणीव किंवा ज्ञान आहे (९.६.४-५).

६५.    जाणीव-नेणीव हे गुणांचेही लक्षण आहे (२०.३.६). जाणीव-नेणीव हे द्वंद्व निश्र्चळ ब्रह्मात असूच शकत नाही.

६६.    जगदीश्वरापासून त्रिगुण । पुढे जाले ॥ १६.७.४. जगदीश्वर मूळमाया.

६७.    गुणांपुढील कर्दमासी । गुणक्षोभिणी बोलीजे ॥ (२०.३.८).

६८.    गुणक्षोभिणीचे थोडे वेगळे वाटणारे स्पष्टीकरण रामदास असे देतात:-मूळमायेतून शुद्धसत्त्वगुण निर्माण होतो; त्याच्यामध्ये रजोगुण व तमोगुण हे गुप्तपणे म्हणजे सूक्ष्मरूपाने असतातच; त्याला महत्तत्त्व अथवा गुणक्षोभिणी माया म्हणतात. (१७.२.१०).

६९.    येथूनच मूळ ॓काराची मांडणी होते (१३.३.५). अकार, उकार, व मकार हे तीन मिळून ॓कार आहे (१३.३.६). विश्वोत्पत्तीच्या प्रक्रियेत अक्षरांनाही स्थान आहे. निश्र्चळ ब्रह्मातील अहं हे स्फुरण ॓काराच्या नादरूपाने होते. तोच शब्द. शब्दद्वारा वेदशास्त्रे प्रगट होतात (९.६.१०). ॓कारात ( वायूच्या गतीत) तत्त्वे ( पंच भूते) मुळात असतातच (८.३.५५).

७०.    मुळात मूळमायाच असल्याने, मूळमायेपासून तीन गुण निर्माण होतात (२०.२.१६), असेही रामदास सांगतात.

७१.    मूळमायेपासून तीन गुणांपर्यंन्तची तत्त्वे चंचळ असून एकदेशी आहेत; ती सर्वव्यापक नाहीत (२०.२.२६).

७२.    गुणापासूनिया भूते । पावली स्पष्ट दशेते (९.६.२७) असेही रामदास म्हणतात.

७३.    खरे म्हणजे तीन गुण व पंचभूते गुणमायेत असतातच. म्हणून गुणापासून आकाश उत्पन्न होते असे कधीच घडत नाही; तथापि शब्द या गुणाला अधिष्ठान हवे म्हणून आकाशाची कल्पना केलेली आहे (९.६.२८).

७४.    पाण्याच्या अनेक विकारांसाठी ९.६.४४-५१ पहा.

७५.    मूळमाया म्हणजेच ईश्वर, परमेश्वर, सगुणदेव, जगदीश, इत्यादी.

७६.    दासबोधातील कहाणी (१३.५) सांगते:-सगुण ईश्वरापासून विष्णू झाला; विष्णूपासून ब्रह्मदेव झाला; ब्रह्मदेवापासून रूद्र झाला. ब्रह्मदेवाने सर्व सृष्टी निर्माण केली.

७७.    सत्त्वगुणाचा देह धारण करणारा तो विष्णू (१०.९.१२).

७८.    विष्णू जाणता आहे; ब्रह्मदेव जाणता-नेणता आहे; तर महेश हा नेणता आहे (१०.४.१९).

७९.    पुढे मुले-नातवंडे असा त्यांचा विस्तार झाला (१०.४.२८)

८०.    ब्रह्मदेवकृत सृष्टीचा तपशील १०.४.३१-३८ मध्ये आहे.

८१.    अनेक प्राणी निर्माण होती । परी येकची कळा वर्तती । तये नाव जगज्जोती । जाणती कळा ॥ ११.१.२६.

८२.    तये कळेचे पोटी । देव असती कोट्यनुकोटी ॥ ११.९.११; देवदेवता, भुते, इत्यादी जाणीवेचे भिन्न प्रकार आहेत; ते नेहमी वायुरूपाने संचार करीत असतात (१०.९.२०-२१)

८३.    आकाश हे दृश्याच्या उपाधीत सापडले की त्याला भूत म्हणतात (९.६.३४). जे ज्ञेयरूपाने अनुभवास येते ते पंच भूतांत मोडते. आकाश ज्ञेयरूपाने-शून्यपणाने-अनुभवास येते; म्हणून आकाश पंचभूतांपैकी एक आहे (९.६.३६-३७). आकाश व ब्रह्म यांतील फरकासाठी ८.५.३६-४२, ५५-६८ पहा.

८४.    अष्टधा प्रकृतीपासून लहानमोठी शरीरे निर्माण झाली (११.२.१५).

८५.    कारण:-जे जेथे निर्माण होते । ते तेथे लया जाते ॥ १४.४.२२.

८६.    ईश्वर मूळमाया.

८७.    प्रकृतिपुरूष मूळमाया.

८८.    विश्व परब्रह्मी भास । श्रीरामराय गो. केळकर महाराज.

८९.    एक असताना दुसरे असते हा अन्वय; एक नसताना दुसरे नसते हा व्यतिरेक.

पुढचे प्रकरण  -->