श्रीज्ञानेश्वरांची श्रीज्ञानेश्वरी - भावार्थदीपिका - टंकलिखित करून दोन वर्षे उलटली. पण प्रत्येक ग्रंथात ग्रंथाबद्दल माहिती देणारे जसे 'पहिले पान' (प्रस्तावना म्हणा) असते; ज्यात हा ग्रंथ कशाविषयी आहे हे थोडक्यात सांगितले जाते असे 'पहिले पान' म्हणून काय लिहू हा मोठा प्रश्न होता. कारण श्रीज्ञानेश्वरीबद्दल कांही सांगणे म्हणजे एखाद्या काजव्याने वा पणतीने सूर्याची तोंड ओळख करण्याचा प्रयत्‍न करावा अशा प्रकारचे आहे. पण केव्हाना केव्हा तरी हे 'पहिले पान' लिहिणे आवश्यकच होते, एक औपचारीक आवश्यकता म्हणून.

        श्रीज्ञानेश्वरांना तरी नेमके कोणत्या पदाने संबोधावे ह्यात तरी एकवाच्यता आहे का ? 'संत' म्हणून तर त्यांचे संतांमध्ये एक आगळेवेगळे स्थान आहेच - भक्तांची माऊली. पण लगेच योगीजन सरसावून पुढे येऊन म्हणणार, 'ते संत आहेत याबदल प्रश्नच नाही, पण ते आहेत खरे "योगियांचे योगी" आणि हेच उचित आहे.' पण मग ज्ञानीजन कसे मागे राहतील. ते म्हणतात. 'अहो काय सांगता ? ज्ञानदेवांना "ज्ञानियांचा राजा" म्हणतात हे विसरलात काय ? आणि तेच त्यांचे मुख्य भूषण आहे बरं ! ' ह्यासर्वावर कळस म्हणजे एका अधिकारी गुरूचा एक आदर्श शिष्य कसा असतो हे जगाला आपण शिष्यपदाचा मुकुटमणिच बनून दाखविले. विलक्षण सामर्थ्य असतांही श्रीज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका, अमृतानुभव वा चांगदेव पासष्टी हे तिन्ही ग्रंथ केवळ गुरुआज्ञेनुसारच रचले, आपणहून नव्हे. 'हरिपाठ फक्त अपवाद दिसतो पण त्याच्याही इतिहासाबद्दल फारसे संशोधन झाले नसावे असे वाटते. अशा या भक्तशिरोमणि, महायोगी, परमज्ञानी श्रीज्ञानदेवांना संतजन श्रीकृष्णाचा - परमेश्वराचा अवतारच मानतात. (चरित्र पहावे).

        बरे ग्रंथाबद्दल काय सांगावे. त्यासाठी कोणतेही रूपक वापरा, फिकेच पडते. टिका ग्रंथ म्हणावे तर (हो ! गीताशास्त्र मराठीत समजावून देण्यासठी हा ग्रंथ रचला गेला अशीच समजूत रूढ दिसते ना ? ती खरीही आहे पण त्याविषयी नंतर) त्यातील काव्यसौंदर्य इतके अलौकिक आहे की त्याला ललित शास्त्रकार 'महाकाव्याचा रावो', 'काव्याची यमुना' इ. म्हणतात. तत्त्वज्ञानी याला तत्त्वज्ञानाची गंगा म्हणतात. आणखी कोणी प्रगट-अप्रगट नीतिच्या शिकवणीची सरस्वती म्हणतात. हे सर्व जरी असले तरी हा अध्यात्मशास्त्रातील एक श्रेष्ठ ग्रंथ आहे. मग त्याचा वाचक परमार्थ मार्गाच्या वाटचालीतला नुकताच आरंभ केलेला नवखा असो, मुमुक्षु असो वा साधक असो, कोणत्याही स्तरातील मार्गस्थाला त्यात त्याला अपेक्षित उत्तम मार्गदर्शन सापडेल हे निश्चित. तसेच वृत्ति/स्वभावानुसार भविकासाठी हा ग्रंथ भक्तिरसाने ओथंबलेला आढळेल, कर्माभिमानी व्यक्तिला स्वधर्म व कर्तव्य परायणतेचाच उपदेश आहे असे वाटेल, योगाकडे कल असणार्‍यास योगाचे रहस्य सापडेल.

        श्रीज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत आपल्या ग्रंथाचा उल्लेख केवळ 'धर्मकीर्तन', 'वाग्‌यज्ञ' असाच केला आहे. आणि हा ग्रंथ म्हणजे 'गीतार्थ मराठीतून सांगणे' ह्यासाठीच आहे असे खुद्द श्रीज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ग्रंथात अनेक ठिकाणी म्हटले आहे. पण गीतार्थ सांगण्याचा मुख्य उद्देश असला तरी ह्याला गीतेवरील भाष्यग्रंथ वा टीकाग्रंथ म्हणता येणार नाही. कारण भाष्यकाराचा, टिकाकाराचा उद्देश असतो की कोण्या विशिष्ट ग्रंथात त्याला अवगत झालेल्या किंवा त्याच्या मते ग्रंथकराच्या हेतूचा अर्थ, तात्पर्य वगैरे जसा त्याला भासला ते पटवून देणे. पण अशा प्रकारचा प्रयत्‍न ह्या ग्रंथात दिसून येत नाही. गीतेतील प्रत्येक पदाचे शब्दरुप भाषांतर असे त्याचे स्वरूप नाही, की अमक्या ठिकाणी 'योग' श्ब्दच का वापरला, वा तमक्या ठिकाणे 'भक्ति' हा शब्दच कसा उचित आहे; फार काय श्रीकृष्ण अर्जुनाला अमुक जागी पार्थ, कौंतेय इत्यादि संबोधनच का वापरतात, त्याचा हेतू काय - अशा प्रकारचे तर्क विवाद ह्या ग्रंथात नाहीत.

        पण अर्थ समजावण्याकरिता 'गीता'च का निवडली ? 'वेद' हे परमेश्वराचे निश्वसित आहेत. त्याचा सारांश आणि तोही स्वतः परमेश्वराने आपल्या मुखाने प्रकट केला असा - ज्यात समग्र अध्यात्मशास्त्र परिपूर्ण आहे असा - एकमेव ग्रंथ आहे. ते शास्त्र सकल लोकांसाठी खुले करावे ही श्रीनिवृत्तीनाथांची आज्ञा. म्हणून 'लोकांलागि' रचलेला हा शुद्ध अध्यात्म ग्रंथ. मग तो भगवद्‌गीतेच्या श्लोकांसहित वाचा अथवा श्लोकविरहित वाचा, कोणालाही 'अध्यात्माची' ओळख होणार नाही हे अशक्य ! आणि एकदा का ग्रंथ वाचला (अर्थात सद्यकाळी तोही अनाकलनीय म्हणून अर्थासहित बरं का !) की त्याच्या पारायणाची गोडी लागणार नाही अशी संभावना क्वचितच. मग पारायण करणार्‍यांच्या जीवनात अध्यात्म अवतरायला लागते, त्यांच्या आचरणातील, त्यांच्या वृत्तीतील झालेला बदल इतरांनाही जाणवतोच.

        श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेल्या बोधाची श्रीवेदव्यासांनी छंदोबद्ध रचना केली ती भगवद्‍गीता सर्व जगाने डोक्यावर घेतली. कारण ती 'भगवान उवाच' आहे. पण 'श्रीज्ञानेश्वरी' पाहून श्रीव्यासही म्हणाले असते, इथे तर  श्रीकृष्ण परमेश्वर स्वतःच आपली पितांबरी फेडून, सामान्य जनांच्या कळवळ्यापोटी त्यांच्यासारखाच वेष धारण  करून, साडेतीन  मात्रांचा प्रणवच  प्रत्येक ओवीत गुंफून अध्यात्म सांगत आहेत"  प्रत्यक्ष   परमेश्वरानेच रचलेल्या अशा ह्या काव्याला काय म्हणावे  - सत्यम्‌ शिवम्‌ सुंदरम्‌ !!