१. साखरपुडा

 
विवाह-स्थळ संशोधन
             मुलगा अथवा मुलगी विवाहायोग्य झाली कि स्थळे पाहणे सुरु  होते.शक्यतो मुलीकडून प्रथम प्रस्ताव यायचा.आता  वधु-वर मंडळानी पालकांचा भर कमी केला आहे.पूर्वी साधारण पंचक्रोशीत लग्ने जमायची. म्हणजे एकमेकांबद्दल माहिती मिळविणे सोपे जायचे.आता जगच जवळ आल्याने हे सर्व मागे पडले.तरीदेखील सगोत्र विवाह होत नाहीत.पूर्व मामेभाऊ,आतेबहिण यांस विवाहात प्राधान्य होते.म्हजे बाहेर जाणे नकोच.आता पत्रिकांचे प्रस्थ जोरात आहे.चांगली चांगली स्थळे पत्रिका न जमल्यामुळे   हातची जातात.पत्रिकांवर भरवसा किती ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.परंतु सांप्रतकाळी पत्रिका  बाजूस ठेऊन एकमेकांची वैद्यकिय व पूर्ण माहिती  घेऊन विवाह जमविणे योग्य. देणे घेणे ह्याचा  विचार नवी पिढी कमी करू लागली आहे.पण लग्न दणक्यात   करण्याची फेंशन  झाली आहे. 
     
 वाग्निश्चय - साखरपुडा
                विवाह जमविण्याची प्राथमिक तयारी झाली कि पहिला सोहळा साखरपुडा .पूर्वी वराकडील चार माणसे जाऊन वधुच्या घरी हा ओटी भरण्याचा कार्यक्रम करीत. वधुकडील भाऊबंद मंडळी जमविली जात व त्यांचे समक्ष हा साखरपुडा होई.वराकडील महिला वधूची ओटी भरीत.ह्या साखरपुड्याचे सुध्दा आता समारंभात रुपांतर होत आहे;जागेच्या अभावी हा कार्यक्रम सभागृह घेऊन केला जातो.गावी खळ्यांत कार्यक्रम करतात.सर्व मंडळी जमल्यावर वधु कडील कुणीतरी जाणता माणूस वराकडील मंडळींचे स्वागत करतो व आपल्या मंडळीस सांगतो कि,अमक्या गावचे अमके पाहुणे आपली अमक्याची मुलगी पाहण्यास आली आहेत .दाखवायची का? इतर मंडळी संमती देतात.त्यानंतर मुलगी हातात तांदूळ   घेऊन गाव असेल तर प्रथम तुळशीला  नमस्कार करून नंतर पाहुण्यांच्या समोर येऊन  तांदूळ डावीकडून उजवीकडे गोलाकार टाकून बसून नमस्कार करते.तेथेच तिला उभी करून काही विचारायचे ते विचारा असे तो जाणता माणूस सांगतो.वराकडील जाणता माणूस मुलीला नाव, भावंडे, शिक्षण,नोकरी इत्यादी जुजबी प्रश्न विचारतो.मुलीला घरात नेले जाते.जाणता माणूस विचारतो मुलगी पसंत आहे का? मुला कडून होकार असतोच.त्यावर आता मुलगा आणला असल्यास आमच्या मंडळीना दाखवा असे सांगितले जाते.नंतर मुलगा उभा राहून नमस्कार करतो. त्याला देखील मुलीकडचा जाणता माणूस नाव,शिक्षण, नोकरी वगैरे  प्रश्न विचारतो व खाली बसण्यास सांगतो.वधुपक्षा कडून मुलगा पसंत आहे असे सांगितले जाते.व्यवहारबाबत काही बोलायचे असल्यास सांगा असे सांगितल्यावर मालको-मालकी व्यवहार पटले आहेत.ते आम्ही पाळू.इथे उघड करण्याची आवश्यकता नाही असे सांगितले जाते. काहीजन  तो उघड करतात.वरपक्षाकडील मंडळी साखरपुड्याची तयारी करूनच आलेली असतात.त्यामुळे पुढच्या कामाची मांडणी होते 
               नवीन पध्दती नुसार वधुकडील सूत्रधार वधुवरांना एकत्र उभे करून त्यांचा व त्यांच्या कुटुंबियांचा परिचय करून देतो.व्यावहरिक बाबी ज्याच्या त्याने पाळावयाच्या  अशी सूचना देतो व साखरपुड्याच्या तयारीने आलेल्या वरपक्षाला आपल्या बाजूकडील सर्वांची संमती घेऊन पुढील काम करण्याची सूचना देतो.
               दोन पाट जवळजवळ पूर्व-पश्चिम पुढे होईल अशा प्रकारे ठेवले जातात.पाटाभोवती रांगोळी काढली जाते.बाजूस पाटावर अथवा आंब्याच्या पानावर समई ठेवली जाते.साधारण उंच जागी आंब्याचा   टाळ बांधला जाते.कुठल्याही शुभ कार्याच्या वेळी आंब्याचा टाळ दारावर उंच जागी बांधण्याची प्रथा आहे.अगरबत्ती लावतात.आपल्या पध्दती नुसार पाटावर दोन नारळ (पाणी शिंपडून),पाच विडे व पाच आंब्याची पाने ठेवली जातात.राजापूरच्या पुढे रत्नागिरी जिल्ह्यात मोठा मांड करून त्यावर विडे ठेवले जातात.काही ठिकाणी तर भटजी कडून विधी केले जातात.
               प्रथम मुलीकडील गाऱ्हाणे घातले जाते.गावी तुळशीपुढे नारळ ठेवून इसवट्याला गाऱ्हाणे घातले जाते.मुंबईत तेथेच एक नारळ ठेवून गाऱ्हाणे करतात.प्रथम मूळभूमिका,कुल दैवत,ग्रामदैवत,स्थलदेवता, मावळेवस  इतर चुकले माकले असा गाऱ्हाणे घालण्याचा  क्रम असतो.काही ठिकाणी गाऱ्हाणे इतके सुंदर घातले जाते कि ऐकत राहावे.तर काही ठिकाणी तोंडातल्या तोंडात काय पुटपुटतात  ते कळतच नाही. दोन नारळापैकी  एका नारळाची अदलाबदल केली जाते.हि गावची पध्दत. हा बदललेला नारळ पुढे यजमानांच्या हातात असतो व आमंत्रणास वापरला जातो.दुसरा नारळ वाढविला जातो.आवश्यकते नुसार आणखी नारळ फोडून खिरापत वाढविली जाते.
                नंतर वर पक्षाकडून आलेली ओटी त्या मूळ  मांडाच्या समोर पाटावर ठेवली जाते.ओटी म्हणजे पाच नारळ, पायलीभर तांदूळ,पाच सुकी फळे(आता ताजी फळे आणण्याचा प्रघात आहे).हळकुंड सुपारी सहित आणि गजरा किंवा वेणी व पाच पिकलेली केली.वधुकडील मंडळी ओटीचे गाऱ्हाणे घालून मानवतात.मुलाकडील सवाष्ण वधूस पाटावर बसवून,हळद कुंकू लावून साडी देतात.वधु ती साडी नेसून येते व पाटा वर बसते.वराकडील सवाष्ण रीतसर वधूची ओटी भारतात.नंतर हौसेने इतर महिला वर्ग  देखील वधूची ओटी भरतो.जुन्या रिवाजाप्रमाणे वराचा भाऊ  वधूच्या शेजारी पाटा वर बसून वधूच्या उजव्या हाताच्या चौथ्या  बोटात अंगठी घालतो.सोबत आणलेल्या पेढ्याच्या पुड्यातील एक पेढा काढून तिला भरवतो.ती सुध्दा त्यांतील एक पेढा घेऊन त्याल भरवते.दिराने पेढा भरवणे म्हणजे तिची दिराशी ओळख करून देणे हा समज.आता नवीन पध्दती नुसार वरच हा विधी करतो.नंतर परत वधु हातात तांदूळ घेऊन पहिल्या प्रमाणेच बैठकीत येऊन सर्वाना  नमस्कार करते.तोवर वधु  पक्षा कडून जालेल्या मंडळीस अल्पोपहार दिला जातो.फोटो सेशन होते.गावच्या ठिकाणी साखरपुड्यास गोड जेवण असते.मुंबईत हल्ली साखर पुडा म्हणजे मिनी लग्न  सोहळाच झाला आहे.

© Damre Village
Comments