Navegaon National Park


जंगले माणसांना जगवितात, पण किती माणसे जंगलांसठी जगतात ?

 "पांढरझरी" तळ्याच्या स्फटीकस्व्च्छ पाण्यात पडलेलं हिरवंशार प्रतिबिंब समोर दिसताच कित्येक कोसांच्या आणि कित्येक दिवसांच्या धावपळीची जाणीव अक्षरश: विरघळुन गेली! "ह्याचीसाठी केला होता अट्टाहास"  ह्या अनुभुतीतुन समोरचे सृष्टीवैभव माझ्यामध्ये सामावून घेण्याचा मी प्रयत्न करत होतो. मी इथे का आणि कसा ह्याची उकलच मला होइना.  डोंगरदर्या हिंडण्याच्या आणि जंगलं फिरण्याच्या आंतरीक ओढीमुळे आज ह्या तलावाकिनार्याच्या गर्द हिरव्या सावलीत उभं राहण्याचं भाग्य लाभलं असावं कदाचित. ह्या ओढीपायी धावपळीत घालविलेला गेल्या कित्तेक दिवसांचा कालखंड कसा समोरच्या पाण्यात तराळत होता...

  "कधीतरी आमच्या विदर्भातील जंगलं येउन बघाच रे!" अस लकडा धनंजयने (ह्यापुढे धन्या!) खुप दिवसांपुर्वीपासून लावला होता.  सरतेशेवटी त्याच्या भावनिक आग्रहाला बळी पडत मी, चैतन्य (च्याट्या) आणि जमल्यास मनिषने (मन्या !) नागपुरात धन्याच्या घरी दिवाळीला जायचे नक्की केले!  वाटेत जाता जाता मन्याच्या घरी, अमरावतीला, एक दिवस पिट स्टॉप घ्यायचे ठरले.
 

  ठरले खरे, पण आमच्या प्रवासासमोर प्रश्नचिन्हांचा चिखल साचला होता! दिवाळीच्या दिवसांत घरी नाही म्हणुन मी आणि च्याट्यानं दिवाळसणाच्या आधीच घरचा "फराळ" चाखला; त्यात मला गुरुद्वादशी म्हणुन नरसोबावाडीला फ्लाईंग व्हिझिट करणे भाग पडले; नागपुरचा प्रवास अगदीच दोन दिवस अगोदर ठरल्याने रेल्वे तिकिटांचा तर प्रश्नच नव्हता पण बसच्याही किमती आकाशाला शिवू पाहात होत्या! असे एक ना दोन अनंत प्रश्न!  शेवटी मन्याच्या आई-वडीलांची पुण्याची धावती भेट आमच्या पथ्यावर पडली आणि आम्ही १९ तारखेला त्यांच्या सुमोतुन अमरावतीकडे प्रयाण केले...

 

  २० ला अमरावतीत पोचल्यावर, एक दिवस थांबुन, २१ (लक्ष्मीपुजन) ला संध्याकाळी नागपुरात पळायचे असं ठरलं. (आता, आम्ही जे ठरवतो तसेच घडते असे नव्हे, हे सुज्ञास सांगणे न लगे!) ... परन्तु लक्ष्मीपुजनाच्या संध्याकाळी मन्याला आणि  मला अपघात झाला!  पुन्हा आमच्या प्रवासासमोर हे एव्ह्ढ मोठ्ठं प्रशचिन्ह! पण सुदैवाने कोणाला गंभिर दुखापत झाली नाही (मी तर अगदिच ठणठणीत होतो पण मन्याला चेह-याला मार लागला). सरतेशेवटी  २२ला दुपारी मनिष दवाखान्यातुन आणि  मी आणि च्याट्या अमरावतीतुन बाहेर पडलो! 

      

मनिषच्या बहिणीने काढलेली रांगोळी- लक्ष्मीपुजन

  म्हणतात ना, All devils think alike!  रात्री नागपुरात, धन्याच्या घरी पोचल्यापासुनच आमच्या तिघांच्या (मी, च्याट्या आणि धन्या) डोक्यात जंगलाचे वारे घुमु लागले. जंगलात जायचे कसे, तिथे करायचे काय, कोणाला भेटायचे, "अरे वाघ असेन का रे?", "आणि बिबट्या?", "अरे बाबांनो तिथे नक्षलवादीसुद्धा असतीन त्याचे काय?"  ... रात्रीच्या बारा-एक वाजेपर्यंत आम्ही अगदिच "जंग्लाळुन" गेलो होतो!! 

  दुसर्या दिवशी (२३ तारखेला) भल्या पहाटे ६ वाजता "नवेगाव"च्या जंगलाकडे निघायचे "ठरले" होते.  बरोबर चेतन, किशोर, सोपान, प्रमोद अशी  जवळपास १५ वगैरे मंडळी होती.  होता होता ७-७:३० झाले आणि आमच्या ३ गाड्यांनी नवेगाव राष्ट्रीय उद्यानाकडे प्रस्थान केले.  सकाळी जाऊन रात्री परतयचा बेत होता तिथल्या उद्यानांमध्ये जास्त वेळ न थांबता  आणि शक्य तेवढा वेळ घनदाट जंगलामध्ये तिथल्या जाणकार माणसाबरोबर  फिरायचे असे नक्की  केले.

   नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे नागपुरपासुन दोन-एकशे किलोमीटर अंतरावरील साधारण १३५ चौ किमी  क्षेत्रात पसरलेलं राष्ट्रीय उद्यान. घनदाट जंगलांनी वेढलेला नवेगावचा मानवनिर्मित विशालकाय तलाव आणि जवळच असलेलं ईटिया-डोह नावचे धरण ही ह्या अभयारण्याचे खास वैशिष्ट्ये!    नवेगावच्या तलावाची कथा सुधा विशेष! साधारण सातशे वर्षांपुर्वी जेव्हा विदर्भात पाण्याचे दुर्भिक्ष्य पडले होते, तेव्हा तत्कालीन गोंडांच्या राणीने, दुर्गावतीने, राजस्थानतुन काहि खास लोकं बोलाविली. ही लोकं होती "कोहली" समाजाची आणि ह्यांचे नैपुण्य होतं तळी बनविण्यामध्ये! ह्या लोकांनी गोंदियाच्या आसपास बरीच तळी खोदली (त्यामुळेच तत्कालीन भंडारा (आजचा भंडारा आणि गोंदिया) हा महारष्ट्रातील सर्वात जास्त तळी असलेला जिल्हा आहे!) . तर अशाच एका कोहली कुटुंबाने हा नवेगावचा तलाव तयार केला.  चेतन आणि किशोर ह्यांच्या ओळखीमुळे आम्हाला थेट ह्या कोहली कुटुंबियांशी सम्पर्क साधता येणार होता; एव्हढेच नव्हे तर त्यांच्यातीलच कोणीतरी आम्हाला जंगलाची सफर करवणार होता (अहो महाभाग्य !).

 

नवेगावच्या जंगलात 

 

  मजल दरमजल करत आमच्या गाड्या नवेगावच्या जंगलात शिरल्या तसा मी  सरसावुन बसत बाहेरचे सर्व काही डोळ्यात झेलायचा अटोकाट प्रयत्न सुरु केला. माझ्यासाठी जंगल ह्या शब्दातच असे काही जबरदस्त आकर्षण आहे की जंगलातल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींकडे देखिल हापापल्यासारखे बघत रहावेसे वाटते. जंगलाच्या छतातुन सांडणारा सूर्यप्रकाश, जमिनीवर पसरलेली बोडकी लाकडे,  जाळिदार पाने, त्यातुन हालणार्या गुढ गोष्टी, आसमंताताच्या पार्श्वभुमीवर भरुन राहिलेला विविध पक्ष्यांचा आवाज, दुरवरुन येणारा एखाद्या वानरांचा घनकंप घुत्कार,रांगड्या दगडांतुन खळाळणारं शुभ्र पाणी, वार्याबरोबर करकरणारी झाडं, इतकेच  नव्हे तर जंगलाच्या जमिनीवर पडलेलं एखादं प्राचीन  खोडं, एखादं निष्पर्ण झाडं, त्यावरुन अाक्राळविक्राळ स्परुपात पसरलेल्या तितक्याच प्राचीन वेली किंवा  बांबुच्या वठलेल्या काष्ठसमुहाने साठवुन ठेवलेला गुढ अंधार  ... जंगलातील अस्तित्वामुळे तिथल्या  प्रत्येक जडाजड वस्तुतुन, आकार-नाम-रुपाची अस्तरे फाडुन, "जंगलीपणा" कसा उफाळुन बाहेर आलेला असतो! 

जंगलातील दृष्य साठवता साठवता (मी आणि माझा कॅमेरा) कधी नवेगावच्या विशाल सरोवरापाशी येउन पोचलो हे कळलंच नाही!  हा तलाव खरोखरच अबब मोठा आहे! तो सुद्धा मानवनिर्मित! तळ्याकाठी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी संजय-कुटी नावाने एक जागा  विकसित करण्यात आली आहे.

 

 

 

 

 

 

 

ह्याइथे जास्त वेळ न घालविता तडक अजुन घनदाट जंगलांकडे आम्ही कुच केली! "धाबे पवनी" नावाच्या  आदिवसी खेड्याकडे गाड्या धावु लागल्या.  इतक्या वेळ अस्फुटपणे ऐकलेले एक नाव आता मात्र वारंवार कानावर येउ लागले - "माधवराव डोंगरवार - पाटिल". किशोरच्या बोलण्यातुन त्यांच्याविषयीचा आदरभाव सारखा समोर यायचा.


  "पाटिल" हे  मुळचे कोहली. त्यांच्या पुर्वजांनी नवेगावचा तलाव बांधला. जंगलांवर अपार प्रेम करणारा हा माणुस. त्यांच्या द्रष्टेपणामुळे नवेगावच्या जंगलाला राष्ट्रीय उद्यानाचे स्वरुप मिळाले आणि पर्यायाने संरक्षण!  एकेकाळी नरभक्षक वाघांच्या शिकरीमुळे अगदी इंदिरा गांघींपर्यंत ख्याती पोचलेल्या माणसाने सलिम अली किंवा मारुती चितमपल्लिं अश्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावुन पशु-पक्ष्यांच्या शोधार्थ जंगलं पिंजुन काढली! जंगलं आणि संगित ह्यासाठी अवघं आयुष्य वेचलं ह्यांनी. "जंगले जगली पाहिजेत, जंगलातील बांबुंची अवैध तस्करी थांबलीच पाहिजे, जंगलतील निष्पर्ण पडलेलेलं झाड सुद्धा जंगलातच राहिलं पाहिजे" असे म्हणणार्या पटिलांना काही महिन्यांपुर्वीच  देवाज्ञा झाल्याची कळले आणि उगिचच हळहळल्या सारखे झाले. (पाटिलांविषयी सविस्तर पुन्हा केव्हा तरी लिहिन.)

    एव्हाना हे स्पष्ट झाले होते की आम्ही ह्याच डोंगरवार-पाटिलांच्या घरी जाणार  होतो. "माधवाश्रम" नावाच्या ह्या घरात कै. माधवरावांचे चिरंजीव श्रीनारायण आणि नातु भीमसेन सपत्निक राहतात.  त्या गावात वाड्यासारखे दिसणारे हे एकमेव घर!  घर तसे ऐसपैस. अंगणातच आता मारुती चितमपल्लींचे घर बांधुन तयार होत आहे. (चितमपल्ली साहेब सुद्धा लवकरच इथे येउन राहणार आहेत आणि काही लिखाण करणार आहेत.)  अंगणात ७० च्या दशकात पोलंडमध्ये तयार झालेला एक ट्रॅक्टर अगदी दिमाखात उभा आहे!   घरचा पाहुणचार झाल्यावर  आम्ही ईटिया डोह धरणाकडे निघालो. आता ह्यावेळी आमच्या बरोबर भीमसेनदादा सुद्धा निघाले आणि धरणापाठोपाठ जंगलाची वारी सुद्धा करवून आणायचे कबूल केले. ह्याइथुन मी, च्याट्या आणि धन्याने त्यांना पकडुन त्यांच्या बरोबर गप्पा मरायचा जो घाट घातला तो अगदी शेवटपर्यंत! 'जंगलातला माणुस' म्हणुन आम्हाला त्यांचे कुतुहल; तर 'खास पुण्यावरुन आलेले" म्हणुन त्यांना आमचे!

 

 ईटिया डोह

 घरचा पाहुणचार झाल्यावर  आम्ही ईटिया डोह धरणाकडे निघालो. इंग्रजांनी ह्या धरणाचा आराखडा तयार केला होता पण तो  काम सुरु करण्याच्या आधीच भारताला स्वातंत्र्य मिळाले. पुढे भारत सरकारने तोच आराखडा अनुसरुन १९७५ साली हे धरण उभं केले.

 

 पारंपरीक धरणाप्रमाणे ह्याला दरवाजे नाहीत. धरणाच्या पाण्याने विवक्षित उंची गाठली की, ओवरफ्लोच्या रुपात हे पाणी सांडव्यात  उत्सर्जित केले जाते. धरणाचा परीसर कमालीचा विलोभनीय आहे. निळ्याशार पाण्यात तरळणारे  अभ्राच्छादीत  आकाश, स्वच्छ प्रतिबिंब पाडत  उभ्या असलेल्या गर्द झाडींनी माखलेल्या टेकड्या,  क्षितिजावर पसरलेल्या सातपुड्याच्या रांगा आणि त्यांवर उभा असणारा प्रतापगड, सर्वच कसे नयनरम्य संज्ञेत बसते!

एव्हाना १ वाजला होता आणि आम्ही जेवणं उरकुन घनदाट जंगलांमध्ये पायी फिरायला सज्ज झालो. 

होता होता आम्ही लोकं अगदीच निबिड जंगलामध्ये घुसलो. च्याट्या आणि मी विविध फुलांचे  आणि एकंदरीतच त्या जंगलाचे फोटो काढण्यात मश्गुल होतो. ह्या घोर जंगलामध्ये कै. माधवरावांची समाधी आहे. त्याच्या इच्छेनुसार त्यांच्या पर्थिवाचे ह्या अरण्याच्या भुमीमध्येच दफन करण्यात आले. जवळच माधवझरी नावाची एक जागा आहे.  माधवरावांनी पशु पक्ष्यांना उन्हाळ्यात पाण्यासाठी जास्तीत जास्त स्त्रोत मिळावे म्हणुन स्वत: दिवसरात्र राबुन हा झरा बनविला असं अभिमानाने सांगितले जाते.

बांधावर कोरलेल्या ओळी पुरेशा बोलक्या आहेत:
 

श्री. माधवराव पाटीलांनी पाणी काढले दगड फोडुनी
आवड श्री चिंतमपल्ली साहेबांची प्राणी पितील प्राणी
उद्घाटन केले श्री आमदार शिवनकरांनी

 

 

 

 
आम्ही जंगलातील ओढ्याच्या मार्गने आता मार्गस्थ झालो. एव्हाना जंगलाने आता आमच्यावर पुर्ण मोहिनी घातली होती. आम्ही आता फक्त गर्द झाडीने वेढलेलो होतो आणि जंगलाचे  भितीयुक्त गांभिर्य सर्वत्र पसरले होते.  सागाची रुंद पाने, वाळुन त्यांची तयार झालेली जाळी, वेड्यावाकड्या पसरलेल्या अजगरासरख्या अजस्त्र वेली, अस्वलांनी नखे घासुन ओरबाडलेलं एखादं अर्जुनाचं झाडं, जमिनीवर पसरलेल्या शुष्क पानांतुन लाल भडक मुंग्यांची 

शिस्तबद्ध पलटण,  जमिनीवर कशीबशी पोचुन थरथरणारी सूर्याची किरणे,  आडदांडपणे झाडावर नाचणारी माकडे, ह्यासर्वांच्या पार्श्वभुमीवर साचुन राहिलेला वाघ, बिबट्या आणि नक्षलवादी ह्यांच्या उपस्थितीचा भीषण थरार!  दगडधोंड्यांच्या, शेवाळलेल्या, ओलसर रस्त्यावरुन आम्ही निसर्गाचा अविष्कार डोळे भरुन पहात निघालो. 
 

 

   "का उमप ते नोहे| ठाकते कोण्हा|" ज्ञानेश्वर म्हणतात की ,'जे  अनंत आहे ते कोणालाच मिळू शकत नाही.' जंगल हा सुद्धा अनंत विषय आहे आणि ह्याचा असाच अखंड शोध चालू ठेवावा असे वाटत होते पण आत्ता आम्ही सुरु करतोय न करतोय तोच "मावळतीच्या दिनकराने" हिरमोड केला! संध्याकाळ आली होती आणि आम्हाला जंगल सोडणं क्रमप्राप्त होतं. प्रचण्ड हिरमुसले होउन मी, धन्या आणि च्याट्याने त्या घनदाट जंगलाला सविनय रामराम ठोकला!

    

   वास्तविक अनेक दिवसांची जंगले फिरण्याची सुप्त इच्छा आता शमण्याच्या ऐवजी अधिकच प्रक्षोभित झाली! आणि नागपुरात आजुबाजूला फिरण्याचा पुर्वनिर्धारित बेत बासनात गुंडाळुन आम्ही परत जंगलात जायचे  ठरविले!  आणि ह्यावेळी भीमसेन दादांशी बोलुन जंगलात रात्र काढायचेही नक्कि केले.
मी, धनंजय आणि चैतन्य २५ च्या दुपारी  पुन्हा एकदा माधवाश्रमात दखल झालो. इथे येउन आम्ही रामटेक, मार्कण्ड मंदिर, पवनारचा आश्रम अश्या अनेक स्थळांच्या भेटींना तिलंजलीच दिली होती, आणि आम्हाला ह्याचं काडीमात्रही दु:ख नव्हते! 

  दुर्दैवाने नुकत्याच सुटलेल्या एका बिबट्याच्या मुक्त वावरामुळे आमच्या जंगलात उघड्यावर रात्र घलविण्यच्या स्वप्नावर पाणी पडलं. पण तरीही आमच्यासाठी इथे येउन जंगलात राहणर्या माणसांबरोबर जंगलाच्या गप्पा मारणे "हेही  नसे थोडके" होते!   अगदी रात्रीपर्यंत  भीमसेनदादांनी तयर केलेला स्लाइड-शो पहात, जंगलाच्या यथेच्छ गप्पा मारल्या  आणि  जंगलातुन येणार्या गुढ शांततेत झोपुन गेलो.
 

     भल्या पहाटे आम्ही तिघं आणि सोबतीला भीमसेनदादा असे चौघं जंगलात पदभ्रमण करायला निघलो. भल्या पहाटे  निसर्गात फिरायचा अनुभव हा नेहमीच विशेष असा असतो आणि हे तर साक्षात घनदाट जंगल मग काय विचारा! सकाळी सकाळी जंगल त्याच्या वेगळ्याच पण कमालीच्या  प्रसन्न स्परुपात समोर येतं. जंगलातील प्रत्येक गोष्टं कशी मांगल्याची उधळण करत असते.

   एखाद्या नाजुक लालबुंद पानांवर चकचकणारी सूर्यकिरणे, त्याच किरणांमुळे कोळ्यांच्या जाळ्यांना मिळणारी धारदार चन्देरी चकाकी,  एखाद्या भुईनिंबाने उगारलेला नाजुकसा फणा, जीवन हे जंगलात पावलोपावली कसे ठासुन भरलेले असते! वाटेत एका झाडावर  थबकलेला  जंगली कबुतरांचा थवा त्यांना पहाण्यच्या माझ्या खुप दिवसांच्या सुप्त इच्छेला पुर्ण करुन गेला. (जंगली कबुतर हा महाराष्ट्राचा राज्यपक्षी, म्हणुन पाहण्यची खुप उत्कंठा होती.) सूर्यप्रकाशाच्या सोनेरी रांगोळीवरुन गर्द झाडीतुन आम्ही मार्गाक्रमण करत, आजुबाजुच्या निसर्गाचा मनमुराद आनंद लुटत आणि फक्त जंगलाच्या चर्चा करत आम्ही चौघं आमच्या नियोजीत जागी अर्थात पांढरझरीच्या नितळ तळ्याकाठी येउन थबकलो.

कमळफुलांनी खचाखच भरलेला हा पांढरझरीचा हा स्फटिकस्वच्छ तलाव कमालीचा अंतर्मुख करायला लावणारा आहे. पाण्यात तराळलेल्या भुतकाळा प्रमाणेच त्यात भविष्याचे अनेक प्रश्न तरंगत होते. मानवाच्या बेपर्वा वर्तणुकीतुन होणर्या विनाशाचे गांभिर्य निसर्गसान्निध्याशिवाय नाही कळू शकत. जगात सर्वत्र होत असलेलं जंगलकापणीचे विदारक चित्र मन विषण्ण करायला लावणारं आहे.  जंगलात चालणारी एक आणि एक कुर्हाड मानवी भविष्यावर घाला  घालत आहे हे आम्ही कधी समजणार.  बेसुमार बांबू-कापणीतुन होणारा विनाश तर निसर्गाची अनेक चक्रे बिघडवितोय. (विविध कारखाने आणि खाणी येथे असणर्या चटयांच्या अमाप मागणीमुळे बांबूवर अस्मानी संकट कोसळल्याची स्थिती आहे. बांबू हा गवत वर्गात मोडत असल्याने त्याचा  छ्टाईवर कहिही निर्बन्ध नाहीत!!)   बांबूच्या छटाईमुळे होणारा वनसम्पदेचा नाश, त्यामुळे त्याच्यावर  अन्न आणि निवार्यासाठी अवलंबुन असणर्या विविध पशुपक्ष्यांच्या नष्टचर्य आ वासुन उभं आहे. कुठल्याशा खुळचट वैद्यकीतल्या खुळचट कल्पनांमुळे माणसाने स्वत:चे आयुष्या वाढविण्यासाठी किंवा निव्वळ चैनीखातर  इतर अनेक प्राण्यांचे आयुष्य उध्वस्त केले. विविध प्राण्यांवर सर्वनाशाची कुर्हाड कोसळली तर त्याच्या कितीतरी पट अधिक प्राणी विनाशाच्या रांगेत उभे आहेत. आज चित्त्यासारखा प्राणी भारतात नाही ही अत्यंत लज्जास्पद आणि आपल्या वर्तणुकीचा विचार करायला लावणारी गोष्ट आहे आणि वेळीच बदललो नाही तर दुर्दैवाने वाघावरही हिच वेळ येणार हे सांगायला वेगळा तर्क नको. वाघासारख्या जंगलाच्या राजाची ही अवस्था तर जंगलाचा सेवेकरी आणि प्रचंड उपेक्षित असलेल्या गिधाडची काय कथा? समस्त महाराष्ट्रात कशीबशी शेकड्याने गिधाडे उरली आहेत. जंगलात झपाट्याने घटणारी प्राण्यांची संख्या आणि पाळीव प्राणी कसायांकडे विकण्याच्या पद्धतीमुळे गिधाडे आता फार कमी काळाचे सोबती उरलेले आहेत. मानवाच्या हव्यासापोटी जंगलाच्या विनाशाचे एक उदहरण फार बोलके आहे. चीनमधील  अर्थव्यवस्था मुक्त केल्यावर तिथे अमेरिकेतुन आयात होणर्या गायीच्या मांसाची मागणी  प्रचंड वाढली पर्यायने अमेरिकेत गायींसाठी लागणर्या सोयाबीनची मागणी वाढली आणि ती पुर्ण करता करता ब्राझिलमधिल अमॅझोनच्या खोर्यातील ७०% जंगले साफ झाली! वाढतं प्रदुषण, झपट्यानं नष्ट होणारी प्राणीसंपदा, विरळं होत जाणारी जंगलं,  कायमच लटकणारी ग्रीन हाऊसची तलवार पर्यायने भयानक गतीने वाढत जाणारं पृथ्वीचे तापमान, ओझोनचे घटते प्रमाण ... पर्यावरणाच्या दृष्टीने भविष्य फार काही सुखावणरं नाहिये....

-भालचंद्र पुजारीसदर लेखासाठी आणि एकुणच नागपुर वारीसाठी विदर्भ एक्स्प्लोरर्सच्या ग्रुपची विशेषत:धनंजय जोशी ह्यांची मोलाची मदत झाली. जंगलातील भ्रमंतीबद्दल आणि विविध गोष्टींच्या माहितीबद्दल आम्ही डोंगरवार-पाटिल कुटुंबियांचे विशेष आभारी आहोत. लेखातील सर्व छायाचित्रे मोठ्या आकारामध्ये लेखकाकडे उपलब्ध आहेत. आपल्या बहुमुल्य प्रतिक्रिया कृपया ह्या पत्त्यावर पाठवाव्यात : bspujari -AT- gmail.com. Best viewed in Firefox browser.