एका चुकलेल्या विमानाची गोष्ट!

-भालचंद्र पुजारी

 

एका चुकलेल्या विमानाची गोष्ट!
त्रिएस्ते!
ईटलीच्या इशान्येकडिल एक शांत आणि निवांत गाव ('टाऊन' म्हणा हवे तर). भुमध्य समुद्रला जोडलेल्या 'एड्रियाटिक' नावाच्या समुद्रकिनारी असलेले हे टुमदार बंदर, स्लोव्हेनिया आणि क्रोएशियाला एकदम चिकटुन बसले आहे!  त्याच्या ह्या अश्या विशेष भौगोलिक स्थानामुळे प्राचीन काळापासुनच त्रिएस्ते राजकीय आणि
सांस्कृतिक घटनांचे एक प्रमुख केंद्र बनुन राहिले. प्राचीन काळच्या वैभवाची साक्ष देत आजही कितीतरी राजवाडे आणि वास्तु त्रिएस्तेमध्ये सर्वदुर पसरल्या आहेत! पण त्रिएस्तेमध्ये आज दिसणारी परदेशी पाहुण्यांची वर्दळ ही काही फक्त पर्यटकांची आहे असे नाही. १९६४ सालापासुन त्रिएस्ते शैक्षणीक क्षेत्रात एक फार मोठे केंद्र म्हणुन नावारुपाला आले. त्यासाली अब्दूस सलाम नावाच्या एका थोर पाकिस्तानी शास्त्रज्ञाने युनेस्कोच्या मदतीने International Center for Theoretical Physics अर्थात आयसीटीपी ची स्थापना केली. विकसनशील देशातील भौतीकशास्त्रातील संशोधनाला चालना मिळावी हा त्यामागील प्रमुख हेतू. ह्या केंद्राला भेटी देण्यासाठी मग त्रिएस्तेमध्ये शास्त्रज्ञांची आणि विद्यार्थ्यांची वर्दळ सुरु झाली आणि त्रिएस्ते एक शैक्षणीक केंद्र म्हणुन ओळखले जाउ लागले.

पुणे! 'पुर्वेकडचे
ऑक्सफर्ड' म्हणुन (किमान पुण्यात तरी) ज्याची ओळख आहे त्या पुणे विद्यापिठातील भौतीकशास्त्रविभागात इतर ब-याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत जे घडते तेच माझ्या बाबतीत घडले - मला आयसीटीपीकडुन बोलावणे आले. फरक फक्त इतकाच होता की ही माझी आयसीटीपीला दुसरी भेट होती आणि ह्यावेळी मी 'आमंत्रित वक्ता' (Invited speaker) ह्या नात्याने एका कार्यशाळेत भाषण देणार होतो! व्हिसा वगैरेची कामे (अर्थातच घाईघाईत) उरकून सप्टेंबरच्या मध्यात मी त्रिएस्तेतील 'कार्लो जुंकर' गल्लीतील हॉटेल मिन्यॉनमध्ये जाउन थडकलो! कार्यशाळा जेमतेम ४ दिवसाची होती त्यामुळे माझी भेट सुद्धा एका आठवड्यापेक्षा कमीच होती. कार्यशाळेचा आयोजक आणि माझ्या PhD च्या गुरुजींचा खास स्नेही डॉ स्टेफानो कोझ्झीनी ह्याला, का कोणास ठाउक, माझे भारी कौतुक. (आमचे गुरुजी म्हणतात की मी त्याच्यावर 'काळी जादू' केलीय!) माझ्यासारख्या वयाने सर्वात लहान वक्त्याला बोलावण्यासाठी त्याने अगदीच आटापिटा केला होता! त्यामुळे ईटलीत पोचल्या पोचल्या दुस-या दिवशी सक्काळी सक्काळी त्याला जाउन भेटलो (आणि ईटलीतील पिझ्झा ह्यापासुन ते पोलंडचे परराष्ट्रधोरण अश्या विविधांगी विषयावर सविस्तर चर्चाही केली!)

१५ ते १७ सप्टेंबर: कार्यशाळा! कार्यशाळेमध्ये आमंत्रित वक्त्याला काहिही काम नसते - फक्त मधुन-अधुन एखाद्या भाषणानंतर काहितरी टिप्पणी द्यायची - ह्याची उपरती झाली! रोज सकाळी उठुन त्रिएस्तेच्या समुद्रकिनारी भटकंती करणे, तिथल्या समुद्री पक्ष्यांचे फोटो काढत बसणे आणि मग कार्यशाळेत जाणे असा उद्योग सुरु झाला! मग संध्याकाळी परत समुद्र किनारी टवाळक्या करत एखाद्या पिझ्झेरियात जाउन मस्त 'मार्घेरेट्टा' पिझ्झा खाणे हाही दिनक्रम बनुन गेला. नाही म्हणायला कार्यशाळेत बसुन मी माझ्या भाषणाची तयारी करत होतोच (हो ना, भारतातुन भाषण तयार करुन गेलो असतो तर काय थ्रील राहिले असते?!) आणि हो एके दिवशी वेळात वेळ काढुन स्लोव्हेनीयालाही जाउन आलो!

१८ सप्टेंबर :  भाषण! सकळी ९-१० ही आमच्या बडबडीला ठरवुन दिलेली वेळ! आणि आम्ही आमचे काम चोख पार पाडले, भाषण चांगले झाले (म्हणजे कोणी झोपले नाही आणि भाषणानंतर बरेच प्रश्न पण विचारले गेले!) स्टेफानो अजुनच खुष! १८ ला संध्याकाळ पर्यंत कार्यशाळाही संपुन गेली आणि मी अगदिच मोकळा झालो.

'दूरदॄष्टीने' मी १९ च्या जागी २० तारखेचे परतीचे तिकीट काढले होते, कारण एक दिवस मला भटकायला आणि फोटोग्राफी करायला हवा होता!

१९ सप्टेंबर : माझा प्रस्थान दिन उद्यावर येउन ठेपला होता! आज इथला गाशा गुंडाळावा लागणर ह्याची जरा खंतही होती आणि भारतात परतणार ह्याचा आनंदही! आज बरीच कामे होती. थोडं भटकायचे बाकी होते (ते कधी संपते का?), काही खरेदी करायची होती आणि इथल्या मित्रांना बाय-बायही सांगायचे होते! सकाळी "डुइनो" नामक किल्ला बघुन शहराच्या दुस-या टोकाला कुच केली! चुपचाप 'टोरी-दी-युरोपा' गाठले. हा एक भला मोठा
शॉपींग मॉल आणि आमच्या मित्रगणांसाठी चोकलेटस्ची खरेदीचा अपरीहार्य कार्यक्रम आटपुन येता येता रात्र झाली होती. त्यानंतर ओळखीच्यांचा निरोप घेउन रुममध्ये परत येइपर्यंत १०:३० वाजले होते.

आता माझी काळाशी स्पर्धा सुरु झाली! रुम आलो तेव्हा लक्षात आले की आपला
'बॅग भरणे' हा विधी तर अजुन बाकीच आहे! दुसर्या दिवशी ७ वाजताचे विमान होते. त्यासाठी मला सकाळी ५ ची बस धरायची होती, जी पकडण्यासाठी मला किमान १५ मिनीटांची पायपीट करणे भाग होते. त्यामुळे ३:३० चा गजर लावुन झोपायचे ठरवले! एव्हाना १२ वाजू लागले होते! आता मनात शंकेची पाल चुकचुकायला लागली 'उद्या सकाळी जागच नाही आली तर?' मनाशीच म्हटले 'अरे हट! असे कसे होइन? आजपर्यंत कधी साधा ट्रेकही चुकवला नाही इथे आख्खे विमान आहे!" मोबाइलचा गजर पुन्हा एकदा तपासुन पाहिला. (हो, मी AM च्या जागी PM चा गजर लावू शकत होतो!) विचारांच्या  गोंधळात इकडे १२:३० ही होऊन गेलेले! ... छान थंडगार वातावरणात मी रजईमध्ये गुरफटुन गेलो!....

.... आणि हाय रे दैवा! ज्याची भीती होती तेच घडले.
नेमका त्याच रात्री आमच्यातला कुंभकर्ण 'जागा' झाला आणि तो बिचारा मोबाइल आमच्या कानाशी वाजुन वाजुन थंड पडला पण आम्ही काही कुसही बदलली नाही! आमचे डोळे जेव्हा किलकीले झाले तेव्हा सूर्यप्रकाश खिडकीच्या फटीतुन सांडू लागला होता! ७ वाजले होते! "आकाश कोसळणे", "जमिन फाटणे", "ह्रदयाचा ठोका चुकणे" हे आणि अश्या अर्थाचे झाडुन सर्व वाक्प्रचार कुटुन कुटुन एकत्र करून त्यांचा अर्क काढल्यावर जे काहि तयार होइन तशी माझी केविलवाणी अवस्था झाली! ७ वाजताचे विमान आणि ७ वाजता मी रुममध्ये! कितीही धावपळ केली तरी विमानतळावर पोचायला किमान १ तास लागतो त्यामुळे आता  धावपळ करुनही काही अर्थ नव्हता. माझी यात्रा त्रिएस्ते -> पेरीस -> मुंबई अशी होती. विचार केला, परीसला जाउन विमान पकडावे का? पण अर्थातच १०:३० वाजेपर्यंत मला ९०० किमी नेउ शकणारे एकच वाहन होते ते म्हणजे विमान जे मी चुकवून बसलो होतो! 'आता पुढे काय?' ह्यापुर्वी ह्या प्रश्नाची भीषणता मला इतकी कधीही जाणवली नव्हती!

आयसीटीपी च्या रिस्पेप्शन डेस्कवर काही मदत मिळते का ते पहावे म्हटले. तडक आयसीटीपी गाठले! पोचल्यापोचल्या
आयसीटीपीच्या रिसेप्शनिस्टने हळुच एक टोमणा मारुन घेतला  "आयुष्यात माझी फ्लाईट कधीच चुकली नाही त्यामुळे मला काय करायचे ते नक्की माहीत नाही!". त्यानेच आता मला सुचवले की त्रिएस्ते शहरातील काही प्रवासी संस्थांकडे काही मदत मिळते का पहा! इकडे माझ्या भारतातील ट्र्व्हल एजंटशीही सल्लामसलतही करुन पाहिली आणि हळुहळू माझ्या मनाला खात्री पटू लागली की आता नव्या टिकीटाप्रत्यर्थ ५०-६० हजार रुपयांना चुना लागणे क्रमप्राप्त आहे! गुगल-नकाशांच्या सहाय्याने धावतपळत शहरातली एजंसी गाठली. अरे देवा! शनिवारचा दिवस! युरोपियन लोकांचे हेच मला खटकते! शनिवार रविवार म्हणजे अघोषित बंदच असतो आणि ही ट्र्व्हल एजंसीसुद्धा काही अपवाद नव्हती! येणार्या एका सद्गॄहस्थाने हेही सांगितले की हीच काय तर गावातील सर्वच एजंसीस बंद असतात! पुन्हा तोच यक्षप्रश्न, आता पुढे काय? भारतातील माझ्या मित्राने सुचवले की विमानतळावर चौकशी करुन पहा, कदाचीत मदत होइन.

४५ मिनिटांचा जीवघेणा प्रवास करत करत विमानतळ गाठले! इथला टिकीट काउंटरवचा माणुस कुठेतरी गायब झालेला (एकदम भारतात आल्याचा भास झाला!) दहा वेगवगळ्या खिडक्या धुंडाळून शेवटी ते महाशय सापडले. सगळा इतिवॄत्तांत कथन केल्यावर ह्या महाशयांनी एक मार्ग सुचवला. "उद्याचे टिकीट मिळते का ते पहातो, फक्त एक सांग तुझ्याकडे व्हिसा तर आहे ना?" अरे देवा! इतक्या वेळात हे तर माझ्या लक्षातच नाही आले. जर आज माझा व्हिसा संपला तर नक्की पोलिस ठाण्यात चकरा! पण माझे दैव ह्याबाबतीत बाकी बलवत्तर निघाले. का कोणास ठावूक पण मी सहजच एक दिवस जास्तीचा व्हिसा मागितला होता आणि (का कोणास ठावुक) तो मला मिळाला सुद्धा होता! सकाळी उठल्यापासुन उलगडत चाललेल्या घटनाक्रमात इथे पहिल्यांदा मला हायसे वाटण्याची भावना निर्माण झाली! पण ते तेव्हढ्यापुरतेच! माझा व्हिसा फक्त उद्यापुरताच होता म्हणजे काहिही करुन मला उद्या युरोप सोडणे अपरिहार्य होते आणि त्याच बरोबर मी जो विमानप्रवास आज करणार होतो त्याच एअरलाईन्सने मला उद्या प्रवास करणे क्रमप्राप्त होते. (माझ्याकडुन दंडाची काही रक्कम वसुल करुन (म्हणजे नेमकी किती?) माझे टिकीट उद्यावर ढकलण्यात येणार होते!) पण काउंटर वरच्या महाशयांनी ब-याच वेळ संगणकावर खुडबुड करुन मला सांगितले की उद्या नेमके त्रिएस्तेवरुन परिसला जायला विमानच नाहिये! का तर म्हणे रविवारची सुट्टी! मला काही मदत होइन ह्या आशेने मी ज्याच्याकडे आलो होतो त्याच गॄहस्थाच्या कपाळावर "आता पुढे काय?" हा भीषण प्रश्न मला दिसु लागला! हायसे वगैरे वाटणे केव्हाच विरुन गेले होते! म्हटले 'बर बाबा, त्रिएस्ते नाही निदान व्हेनिस वरुन  तरी विमान आहे का पहा!' परत महाशयांनी खुडबुड करुन पाहिली आणि चक्क 'हॊ म्हणाले!
मी - 'बरं मग ते विमान बुक करायचे असेन तर?'
ते - " ते काही मला माहित नाही बुआ, पण मला काही ते इथुन बुक करता येणार नाही"
मी - "??"
ते - "अम्म्म्म्, एक काम करा, मी तुम्हाला व्हेनिसचा नंबर देतो तो ट्राय करा"
मी - "बरं" (मनात - हुश्श्!)

एव्हाना साडेदहा वाजले होते! विचार केला की सगळे सुरळीत झाले असते तर आता मी परिससुद्धा सोडले असते. तरिही ह्य फोन नंबरमुळे सकाळी ७ वाजल्यापासुन जी पळापळ चालली होती ती आता संपेन अशी आशा निर्माण झाली!
पाठिवर एक छोटी ब्याग, एका हातात टेलेफोन लिहिलेली चिठ्ठी, दुस-या हातात चुरगण्याच्या सीमेपर्यंत पोचलेले माझ्या हूकलेल्या विमानाचे टिकीट, कधी ह्या हातात तर कधी त्या हातात फिरणारे चिल्लर पैसे (सेंट्स!) आणि डोक्यावर हिमालयाएव्हढे टेन्शन अश्या लव्याजम्यासकट मी कोइनबाक्स शोधु लागलो! मिळाला. इतका जागतिक दर्जाचा भिकार फोन शोधुनही सापडणार नाही. माझ्या किमान ३ प्रयत्नात मी चिल्लर आत मध्ये टाकुन बोलायला सूरवात केली की हा "Temporary out of order" असा निरोप देउन बंद पडायचा! महत्प्रयत्नाने शेवटी एकदाचा तो लागला. मी सांगायच्या प्रयत्ना होतो की माझे विमान चुकलय आणि आता मला ते रिशेड्युल करयचयं तोच तिकडुन एकदम त्रासिक सुरात विचारणा झाली "तुम्हाला हा नंबर कोणी दिला, हा व्हेनिस विमानतळाच्या गोडाऊनचा नंबर आहे!" वाह् रे महाशय!! "बरं मग् तुम्हीच मला बरोबर नंबर द्या!" - मी!
इथे निदान आपली यात्रा रिशेड्युल करता येते ह्या भावनेने मला जरा बर वाटू लागले होते! तिच्याकडुन योग्य तो नंबर घेउन मी "एअर फ्रांस"च्या केंद्राशी संपर्क साधला! पाच एक मिनिटांच्या संभाषणाने शेवटी पलिकडुन मला हवी होती तिच खबर मिळाली! मला दुस-या दिवशीचे व्हेनिस -> परीस ; परिस-> मुंबई हे विमान मिळाले होते! आणि ह्यासाठी मला ४० युरो (अर्थात अडिच हजार रुपये) इतका खर्च बसणार होता! बास, मी टुण्णकन उडिच मारायची बाकी होती! मी अश्या समजात होतो की बसला आता ५० हजारांना बांबू! पण हे तर भलतेच स्वस्तात निभावले!

अश्या रितीने माझी काही तासांची अतिरिक्त झोप आणि पर्यायाने ते चुकलेले विमान मला अडिच-तीन हजाराचा फटका देउन गेले! दुस-या दिवशीचे विमान पकडण्यासाठी संध्याकाळीच त्रिएस्तेवरुन व्हेनिसला प्रयाण केले! साहजिकच आदल्या दिवशीचा धडा घेत आख्खी रात्र त्या व्हेनिसच्या पुर्णपणे निर्जन विमानतळावर जागुन काढली आणि सकाळी इमानेईतबारे मुंबईचा रस्ता धरला!

तात्पर्य : नेहमी एक दिवस जास्तीचा व्हिसा जवळ बाळगावा! :)


 -भालचंद्र!