धादांत खैरलांजी 

२९ सप्टेंबर २००६ रोजी भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी गावात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. अख्ख्या गावाने मिळून आई, मुलगी आणि तिचे दोन भाऊ यांची अत्यंत निर्घृण हत्या केली. तत्पूर्वी मायलेकींवर आळीपाळीने बलात्कार केला. सुरेखा भोतमांगे आणि तिच्या तीन तरुण मुलांचं हे निर्मम हत्याकांड 'खैरलांजी हत्याकांड' म्हणून जगभर गाजलं. देशाबाहेरूनही हत्याकांडाच्या निषेध करणाऱ्या प्रतिक्रिया आल्या. महाराष्ट्रातही मोठा जनक्षोभ उसळला. साहजिकच या घटनेचा साहित्यादि कलांमधून अनेक प्रकारे वेध घेतला गेला. धादांत खैरलांजी हे नाटक याच दिशेने टाकलेले पुढचे पाऊल म्हणता येईल. 
खैरलांजीमध्ये घडलेल्या भीषण प्रकाराचा या नाटकाला ठळक संदर्भ असला तरी हे नाटक म्हणजे खैरलांजी घटनेची पुनर्भेट नव्हे. 
या नाटकातल्या सगळ्या घटकांना जातीय परिमाण आहे पण इथली झुंज प्रामुख्यानं राजकीय ताकद लाभलेली मूल्यहीन व्यवस्था आणि मानवी मूल्यांचा आग्रह धरणारा बुद्धिवादी नागरिक यांच्यातली आहे.
तसेच खैरलांजी फक्त दुर्गम भागातच घडतं असं नाही तर मुंबईसारख्या महानगरातही प्रा. वैशाली गजभिये या व्यक्तिरेखेच्या वाट्याला तितकंच अमानवी खैरलांजी येतं; तपशील भिन्न असतात एवढच. एकुणात या नाटकात उच्चजातीय दलित विरोधी मानसिकतेचा अतिशय नेमक्या आणि परखड रीतीने पर्दाफाश केलेला आहे. पण त्याचबरोबर दलितांमध्ये शिरकाव झालेल्या मध्यमवर्गीय जाणिवांची देखील कठोर चिकित्सा केली गेली आहे. एकूणातच धादांत खैरलांजी हे नाटक वर्तमान वास्तवाचा उभा आडवा धांडोळा घेणारे नाटक आहे. 

निर्माता - लोकायत क्रिएशन्स 
लेखिका - प्रा. प्रज्ञा दया पवार
दिग्दर्शक - शिवदास घोडके 
संगीत - बिपीन वर्तक 
संगीत संचालन - अरुण जी. 
प्रकाश संचालन - हेमंत वाघ 
रंगभूषा - प्रशांत उजवणे 
नेपथ्य - दासू 
जाहिरात आणि प्रसिद्धी - मेहबूब शेख 
सूत्रधार - सुबोध मोरे 

पात्र परिचय 
वैशाली गजभिये - रेणुका बोधनकर 
अमिताभ बनसोडे - अशोक केंद्रे 
बी आनंदराज - श्रीकांत सागर 
आकाश देशपांडे - अभिजित श्वेतचंद्र 
वैष्णवी बर्वे - रोचना मोरे 
प्राचार्य किर्लोस्कर - चेतन सुशीर 
प्रमिला माळी / छायाताई कांबळे - मनाली जाधव