|
प्रियकर
(प्रियकराच्या काही भावछटा, थोडे काव्यातून, थोडे गीतातून उमटलेले )
देखता लोचनी गुंफलो वचनी गेलो मी हरपुनी पाहता तुला
सोडून जगाला विसरून स्वतःला तुझाच झाला प्रियकर हा!
********* (हे गीत जगजीत सिंग यांच्या "तुमको देखा तो ये खयाल आया" या गीताच्या चालीवर रचले आहे)
हर्षभावांचा झुलतोय झुला जीवनी तू भेटलीस मला ||धृ||
कोरडे अर्थशून्य होते सारे तोच जाणवला तुझा स्पर्श ओला जीवनी तू भेटलीस मला ||१||
शब्द नजरेचे अर्थ भावांचे लक्ष रचना अशा रचिल्या गेल्या जीवनी तू भेटलीस मला ||२||
गुंफता हात गात्र हे स्फुरले रात्र सरली सौख्यदिन आला जीवनी तू भेटलीस मला ||३||
*********
तू अशी स्वप्नात माझ्या सारखी येऊ नको येउनी रात्रीस माझी झोप तू नेऊ नको
चांदणे होऊन माझे अंग तू जाळीस का दूर राहुनी उभी माझी चिता पाहू नको
होऊनी विषकन्यका ओठास या चुंबीस का प्राशुनी ते विष मी झुरता अशी हासू नको
मांडला हा डाव तू माझेच होई खेळणे टाकुनी फासे अशी हा खेळ तू खेळू नको
********* (मालकौंस रागात एक चाल सुचली त्यावर हे शब्द बसवले आहेत. याला काहीसा गझलचा घाट आहे असे मला वाटते)
जाऊन जराशी येते, तू सांगून गेलीस होती
मी अजुनी पिसतो पाने, क्षण जाती बघ निसटुनी
जाण्या आधीचा डाव, मी जिंकून नेला होता हा दोष असे पानांचा, का व्यर्थ रोष माझ्याशी
दोघात तुझ्या नि माझ्या, तू राजा आणिक राणी हे भाग्य असे गे माझे, होतसे तुझा गुलाम मी
आयुष्य असो की पाने, हा डाव घडी दो घडीचा भोगून घे खेळापुरती, शेवट जाई विखरुनी
© सुरेश नायर |