Home‎ > ‎कविता‎ > ‎

नको पाऊस पाऊस

नको  पाऊस  पाऊस

 
नको  पाऊस  पाऊस

जीव  होतो  कसाबसा

मारशील  कारे  दडी

तुला  देतो  खरा  पैसा

 

नको  पाऊस  पाऊस

सगळीकडे  नुसता  राडा

कुठे  तुंबली  गटारे

कुठे  खचे  जुना  वाडा

 

नको  पाऊस  पाऊस

बसे  खिशाला  कात्री

ह्याला  नवा  रेनकोट
तिला  नवी  कोरी  छत्री

 

नको  पाऊस  पाऊस

कपडे  ओले  दोरीवर

उद्या  घालावी  लागेल

तशी  ओली  अंडरवेअर
 

नको  पाऊस  पाऊस

रस्त्या  खड्डे  जणू  'crater '

त्यावर  टेलिफोनवाले

भरती  खणायाचे  'tender

 

नको  पाऊस  पाऊस

होतो  ऑफिसला  उशीर

दारी  उभा  असतो  साहेब

त्याला  गाडी  अन  ड्रायवर

 

नको  पाउस  पाउस

सर्दी  खोकल्याची  साथ

दमा  उफाळे  कुणाचा
कुणा  त्रासे  संधिवात

 

नको  पाऊस  पाऊस

जप  करी  शहरवासी

जारे  गावाकडे  तुझी 

वाट  पाहे  शेतकरी

 

© सुरेश नायर

२ /२०१०
(पाउस ही कविता लिहिल्यानंतर मनात विचार आला कि पुण्या मुंबई सारख्या शहरात राहणाऱ्या माणसाला हाच पाउस कसा वाटत असेल. स्वतः पुण्यात राहून आलेले अनुभव यातून  ही विडंबनात्मक  कविता सुचली.  पण काही असले तरी वळवाचा पाउस आला कि भिजायला किंवा लोणावळा/भुशी येथील सहल करायला  मी एका पायावर अजूनही कधीही तयार आहे.)